माणसातला माणूस

आशावादी जगणे जास्त खरे. माणूसकी जिंकते, द्वेष मागे राहतो. डिग्री, धन, हे सर्व कागदी बाण आहेत. माणुसकी नसेल तर त्या शिक्षणाचा अन धनाचा काय उपयोग? म्हणूनच माणसाने माणसाजवळ माणसासारखे वागावे...तर काय अशक्य आहे या जगात?

आज समाज आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. सर्व भेदांच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची क्षमता त्यांत जागृत झाली आहे. वाटा जरी ओळखीच्या होत्या तरी त्यावर स्वतःहून चालून जायची धमक नव्हती, अशा समाजाने परिवर्तनाचा मार्ग स्वीकारला आहे. समोरुन कुणी ओ देत नसेल, तर नसू दे! मागून कुणी बळ देत नसेल तेही नसू दे! बळ, इच्छाशक्ती आणि निर्धार हेच महत्वाचे घटक. भीती हा शब्द आजवर अनेकांना मागे रेटत होता. कोण काय म्हणेल, त्यापेक्षा आपण कुठे कमी पडतोय ह्याची जाणीव समाज मनास जागृत करते, तो समाज उन्नत आणि प्रगत होतो, ते होताना आज स्पष्ट दिसत आहे.

सूफी संत मौलाना रुमी यांना जगात येऊन समाजातील विविधांगी विचारांच्या लोकांशी संवाद साधण्याचे श्रेय लाभले. सर्वधर्मसमभाव राखणारा त्यांचा एक विचार होता. सूफी संगीत हे एक विशेष माध्यम समजले जात असे, आजही आहे. क्षण आणि कण दोन्हीकडे न दिसणारी शक्ती होती. अहंकारविरहित जीवन म्हणजे सूफी जीवन. अल्लाह, ईश्वर एक अद्‌भुत शक्ती, जी सर्वसामान्य व्यक्तीला असामान्य बनवू शकते, कारण ज्याला शोध अध्यात्म शक्तीचा, तोच अनुभवू शकतो ईश्वरी शक्तीला! हे तत्वज्ञान त्यावेळी मौलाना रुमी यांनी समाजास दिले.

मौलाना रुमी यांना अल्तमश नामक एक व्यक्ती भेटण्यासाठी येतो. रुमी नियमितपणे आपल्या पुस्तकी ज्ञानात मसृफ दिसले. अध्यात्माचा शोधक समोर उभ्या व्यक्तीकडे न पाहता आपल्या अभ्यासात मग्न राहिला. आपल्याकडे दुर्लक्ष करणारा आणि पुस्तकी ज्ञानात मग्न असलेल्या रुमीची सर्व पुस्तके घेऊन ती व्यक्ती शेजारीच असलेल्या एका तलावात नेऊन फेकून देतो. रुमी त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करत, धावतपळत त्या तलावातील सर्व पुस्तके गोळा करुन घरी परतला, पाहतो तर काय? एकही पुस्तक न भिजता जसेच्या तसे राहिले. ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष केले आणि तुच्छ मानले तो तर ‘गुरु' माणूस निघाला! रुमी यांनी त्यांस गुरु मान्य केले. अहंकार नडला हेही त्यानी मान्य केले. पुढे तोच गुरु अल्तमश अचानक गायब झाला. मौलाना रुमी यांस सुचेनासे झाले, खूप नैराश्य आले, रानावनात त्याचा शोध घेऊ लागले. इतक्यात एका बंद घराच्या दाराशी येऊन आवाज देता आतून कुणीही साद देईना म्हणून रुमी इतरत्र परिसरातील जागेत जाऊन शोध घेऊ लागले. उंच पर्वत शिखरावर जाऊन पाहिले. निराश होऊन परतले पुन्हा त्याच बंद दाराशी, यावेळी रुमी यांना आतून प्रतिसाद लाभला! "आत ये” हर्षित रुमी आत जाऊन पाहतात; तर काय? त्या वाड्यात कुणीही नव्हते! पूर्णपणे रिकामा असलेल्या त्या पडीक वाड्यातून प्रतिसाद दिला, मग ती व्यक्ती कोण असावी? मौलाना रुमी यांना साक्षात्कार झाला. घरातुन ऐकू येणारा तो आवाज इतर कुणीही नसून तो स्वतःच्या मनातला आवाज होय! अल्लाह, ईश्वर प्रथम मनांत वसतो नंतर सर्वत्र जाणवतो. स्वपूजक नसावे, स्वत्व जपावे, याचा साक्षात्कार त्यांना झाला.

माझी आजी मृत झाल्याला पाच दशकं झाली असतील. तिचा अध्यात्म शक्तीवर विश्वास होता. अधूनमधून ती मला हिकायत सांगायची. निरक्षर असुनही अध्यात्म, निसर्ग भाषा, जडीबुटी, भविष्य अशा विषयांत तिला विशेष रुचि असायची. दारावर दरवेश किंवा फकीर येतांच त्याचे डफलीवरील गायन पूर्ण ऐकून नंतरच त्यांस एक आणा द्यायची! आम्हीं कोकणस्थ; आमच्या वाडीत तेलंगी बामण यायचा, सोबतीला एक धष्ठपुष्ट बैल नीट सजवून आणलेला असायचा. त्यांस तांदुळ, नारळ असे दान मिळावे हिच अपेक्षा. आम्ही बच्चे लोक वाडीभर त्यांच्या संगे फिरायचो. आश्चर्य म्हणजे त्यांससुद्धा आजी एक आणा द्यायची! तेलुगू भाषेत तो गायचा, पण आजीला गायन आवडायचे.

आजीने त्याकाळी एक विचित्र कोडं सांगितल्याचे आठवते. तिच्या मते लांब कुठंतरी अरण्यांत एक आरसा दडलेला आहे, ज्यामध्ये माणूस आपला चेहरा पाहताच त्यांस भोवळ येऊन तो पडेल. का? तर जगात असलेले तमाम आरसे हे सपशेल खोटे आहेत. सच्चा आरसा फक्त एकच आहे, ज्यात माणसाला आपला चेहरा पहायला केव्हाच आवडणार नाही, जो अरण्यांत आहे...अशी ही हिकायत आजी माझ्या बालपणी सांगायची. आता हा आरसा कुठे जाऊन शोधायचा?

इतक्या वर्षांनी आज ध्यानी आले, तो आरसा अरण्यांत नसून माणसाच्या मनांत आहे. आपले मन तोच खरा आरसा. आजी मात्र त्यावेळी कोड्यात बोलून गेली!
सूफी पंथ आशियायी खंडात ज्यास्त स्वीकाला गेला ते आजच्या गंगा-जमनी तेहजीबवरुन ध्यानी येते. "मिलजुल के रहो, जिओ और जीने दो...” ही शिकवण साधू संताकडून मिळाली. समाजमनात रुजली. माणूस माणसाला माणूस समजू लागला, यापेक्षा जागृती ती काय असावी?

काहीं दिवसा पूर्वी एक इंग्रजी शॉर्ट फ़िल्म पाहण्याचा योग आला..संध्याकाळची वेळ...एक कार स्टेशन बंद व्हायच्या अर्ध्या तासापूर्वी एक अनोळखी साहेब व्यक्ती आपली महागडी कार वॉश करण्यासाठी म्हणून येतो. तेथील मालक आणि त्याचा एकमेव मेकॅनिक जॉन कार स्टेशन बंद करण्याच्या घाईत असतात. जॉन वयस्क असला तरी शरीराने हष्टपुष्ट होता. त्याहीपेक्षा तो गरजू असतो. त्याच्या अंगावर ॲप्रन चढवलेले मळके कपडे असतातच. लगेच तो स्प्रे घेऊन गाडी धुवायला सुरु करणार इतक्यांत तो तिरसट मालक त्या जॉनला (मजूर ब्लॅक असतो) गाडी धुण्यास नकार देतो! आलेल्या कस्टमरला मालक कसाबसा राजी करवतो एका अटीवर की ”गाडी दहा मिनिटांत धुतली गेली पाहिजे!” जॉनची आजारी पत्नी, तिला नियमितपणे औषध आणावे लागते, कमाईत थोडीशी भर पडेल. या हेतूने ते चॅलेंज तो स्वीकारतो. खडूस कार मालक घड्याळ लावून उभा होता. ठरल्या वेळेच्या ३ सेकंद आधीच  गाडीची व्हील्स, बॉडी स्प्रे आणि आतील पायपुसण्या इत्यादि स्वछ करून झाल्या! जॉन अशा कामात तरबेज होता. नम्रपणे कार-की मालकास परत देत जॉन आपला एपरन ठीक करू लागला. पण कारमालक स्वाभाविकच खडूस होता. कार बॉडीवरील एके ठिकाणी चुकून केवळ तीन चार इंची स्पॉट धुवायचा राहून गेला. रागाने मालक पैसे न देता गाडी घेऊन निघून गेला. दुर्दैवाने गरीब जॉनच्या त्या दिवसाच्या एकूण कमाईतून तेवढे पैसे कापण्यात आले. पण निराश न होता स्वतःच्या कारने तो घरी निघाला.

घरा शेजारी गाडीतून उतरणार तोच त्याचे लक्ष हमरस्त्यावरील एका कारकडे गेले. रस्त्याच्या मधोमध ती अनोळखी कार उभी दिसली. त्यांस संशय आला. जवळ जाऊन पाहिले तर त्यात एक स्त्री सेल्फ ड्रायव्ह करून इस्पितळात जात असावी, असे त्यांस वाटले. कारण ती गरोदर होती. तिच्या तोंडून अस्पष्ट असे शब्द येत होते. जॉनचा संशय खरा ठरला. अचानक तिला लेबर पेन सुरु झाले. प्रसंगावधान साधून थकून घरी परतणाऱ्या जॉनने लगेच तिला आपल्या गाडीत बसून इस्पितळात नेऊन भरती केले. व्हिलचेअरवरील त्या स्त्रीने मागे वळून त्याच्याकडे पाहिले, त्याचे आभार मानले.  मळक्या कपड्यातला तो मजूर तिने पाहिला; पण नाव विचारायचे राहुन गेले.तो कार वॉश करणारा व्यक्ती असावा, एवढे तिच्या ध्यानी आले. जॉनने आपले एक नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडले व आपल्या घरी परतला.

एका आठवड्यानंतर तो आपल्या आजारी पत्नी शेजारी बसून "आपली सूंदर सकाळ लवकरच येणार” असा आशावादी धीर देत बसला होता. इतक्यांत दारावरची बेल वाजते...पहातो तर काय? त्या दिवशी लेबर पेनमुळे चक्क रडणारी ती गरोदर स्त्री आज हंसत-हंसत दारावर येऊन उभी राहिली! जॉन चकित होऊन तिच्याकडे पाहू लागला! त्या कार वॉश स्टेशनकडून तिने पत्ता मिळवला व घरी येऊन उभयतांचे आभार मानले व त्याच वेळी तिच्या स्वतःच्या कारवॉश स्टेशनचा त्यांस पूर्णवेळ मॅनेजर नेमला. जॉन नेहमीच आपल्या पत्नीस सांगात असे "आपली एक सूंदर सकाळ येणार... नव्हे ती आलीच!”

आशावादी जगणे जास्त खरे. माणूसकी जिंकली, द्वेष मागे राहिला. डिग्री, धन, हे सर्व कागदी बाण आहेत. माणुसकी नसेल तर त्या शिक्षणाचा अन धनाचा काय उपयोग?
म्हणूनच माणसाने माणसाजवळ माणसासारखे वागावे...तर काय अशक्य आहे या जगात? - इक्बाल शर्फ मुकादम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हिंदुत्वच तारू शकते !