कामाचे तास आणि शारीरिक, मानसिक स्वास्थ!

वर्षाचे पॅकेज या गोंडस नावाखाली ना कामाचे तास, ना कामाचे स्वरूप, वरून दिलेले टार्गेट यांची पूर्तता करताना आणि कामाच्या दडपणाखाली त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ यांचा कोणी विचार करतंय कां? एक/दोन अशा दुर्दैवी घटनासुद्धा घडल्या. कामाचे दडपण, ताण यामुळे काहीजण जिवानिशी गेले. जास्त तास काम करणे हे जरी योग्य असले तरी एकूणच आपल्याकडील वस्तुस्थिती, जीवनशैली बघता कायद्याद्वारे निर्देशीत केलेले कामाचे तास आणि नव्याने सुचविलेल्या कायद्यात जास्त तास काम करण्याची तरतूदसुद्धा नसताना कुणी अव्यवहार्य अपेक्षा करु नये.

 इंडस्ट्रियल डिस्प्युट ॲक्टनुसार प्रत्येक कर्मचाऱ्याचे आठवड्याचे ४८ तास निश्वित केले आहेत. त्यात एक दिवस सुट्टीचीसुद्धा तरतूद आहे. एकीकडे काही देश "फोर डे वीक” करण्याच्या तयारीत असताना आपल्या देशात काही ठिकाणी चर्चा चाचपणी करण्याच्या  बातम्यासुद्धा पसरल्या होत्या, असे असताना काही नामवंत उद्योगपती ७० आणि ९० तास काम करण्यासाठी आग्रही असून तसे त्यांनी बोलूनसुद्धा दाखविले.

 समाजमाध्यमावरून यावर फारच खरपूस प्रतिक्रिया आल्या, विविध पोस्ट उपलोड केल्या गेल्या हे आपण सर्वांनी वाचलंच. अशा प्रकारची वक्तव्ये जेव्हा प्रतिथयश उद्योगपती यांच्याकडून केली जातात. तेव्हाखरोखरीच आश्चर्य वाटते. पण जेव्हापासून जागतिकीकरण आणि खासकरून माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा आवाका वाढला मग IT, KPO, BPO, यासारखी सेवा क्षेत्रे मोठ्या प्रमाणावर विस्तारु लागली तेव्हापासून औद्योगिक कायदे अप्रत्यक्षपणे बासनात गुंडाळण्यास सुरवात झाली.

बारा बारा तास काम; तर वेळप्रसंगी त्याहून अधिक काम.. पण त्याचा आर्थिक अधिक मोबदला काहीच नाही. वर्षाचे  पॅकेज या गोंडस नावाखाली ना कामाचे तास, ना कामाचे स्वरूप, वरून दिलेले टार्गेट यांची पूर्तता करताना आणि कामाच्या दडपणाखाली त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ यांचा कोणी विचार करतंय कां? एक/दोन अशा दुर्दैवी घटनासुद्धा घडल्या. ज्यांनी कामाचे दडपण आणि ताण यामुळे आपले आयुष्यसुद्धा संपविले. दिवसांचे एकूण तास चोवीस त्यात किमान सहा तास झोप, विश्रांती, तीनचार तास कुटुंब इतर कामे, कामाच्या ठिकाणी जावे लागण्यासाठी दैनंदिन जीवघेणा प्रवास त्यात किमान दोन तास उरतात. बारा तास बोटावर मोजण्या इतके अपवाद वगळता सर्वाचा दिनक्रम असा धावपळीचा. चोवीस तासातले किमान निम्मे तास या वेळापत्रकात जातात ही वस्तुस्थिती आहे. तर मग ७० तास काय किंवा ९० तास काय, तो कसे काम करू शकेल?

कामाचे तास ठरवताना, कामाचे स्वरूप, त्याला लागणारे शारीरिक श्रम, त्याचे प्रशिक्षण, वातावरण, कामाचे ठिकाण, इ. सर्व घटकांचा विचार, मूल्य-मापन केले जाते कारण त्याच्याकडून Quality Work अपेक्षित असते. कामाचे ओझे, टार्गेटचा ताण, धावपळीची जीवनशैली यांचा नकळतच त्याच्या शरीरावर आणि मनावर परिणाम होत असतो. याउलट कामाच्या तासाचे योग्य नियोजन, प्रसन्न वातावरण, कामामधील आवश्यकतेनुसार Utility ठेवली तर कर्मचाऱ्याची उत्पादन क्षमतावाढेल. त्यातून नक्कीच वाढीव Output मिळेल. जास्त तास काम करणे हे जरी योग्य असले तरी एकूणच आपल्याकडील वस्तुस्थिती, जीवनशैली बघता कायद्याद्वारे निर्देशीत केलेले कामाचे तास आणि नव्याने सुचविलेल्या कायद्यात जास्त तास काम करण्याची तरतूदसुद्धा नसताना उगाचच अशा प्रकारची वक्तव्य अपेक्षित नाहीत. -पुरुषोतम कृ आठलेकर, युनियन उपाध्यक्ष (फार्मा उद्योग), डोंबिवली 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

माणसातला माणूस