जे आवडे लोकांना...!
आम पब्लिक कायदे मोडणाऱ्या हिराेंवर बनवलेले सिनेमे, लेख, कादंबऱ्या पसंत करते. त्यांना आवडता हिरो चोर, डाकू, पाकिटमार, लुटेरा, गरीबांना तात्काळ न्याय देणारा वगैरे असल्याचे खूप आवडते. याचे कारण जनसामान्यांच्या दबले-पिचलेपणात असावे. ‘रोजमर्रा की जिंदगीमे' या कायदेप्रेमी-शांतताप्रेमी लोकांना नीटसे जगताच येत नसते. कायद्याचे रक्षक, लोकनियुवत प्रतिनिधी त्यांचे ऐकत नसतात, व्यवस्था त्यांना न्याय देत नसते. मग ते अशा प्रकारच्या कथानकांत रमतात, तादात्म्य पावतात. त्या विद्रोही, कायदे मोडणाऱ्या नायकाच्या जागी स्वतःला कल्पून स्वप्नरंजनात दंग होतात.
पत्रकारितेचा अभ्यास करताना आम्हाला एक त्रिसुत्री सांगण्यात आली होती. ‘टू इन्फॅार्म, टू एज्युकेट ॲण्ड टू एन्टरटेन पिपल इज जर्नालिझम.' लोकांना माहिती देणे, त्यांचे प्रबोधन करणे व त्यांचे मनोरंजन करणे ही ती त्रिसुत्री होय. प्रत्यक्षातली पत्रकारिता याहुन वेगळी क्षेत्रही पादाक्रांत करीत असून काहींच्या ती पचनी पडते; तर काहींना ती अजिबात आवडत नाही. समाजमाध्यमांच्या शोधानंतर तर पत्रकारितेने पारच कात टाकली असून पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या बाहेर जाऊन वेगवेगळे प्रयोग केलेले तेथे पाहायला मिळत आहेत.
सर्वसाधारणपणे पत्रकारितेने जबाबदार विरोधी पक्षांची भूमिका निभावताना शक्यतो सरकार पक्षाच्या चुका शोधणे, प्रशासनातील गैरव्यवहार उघडकीस आणणे, जनतेची-सर्वसामान्य-कमकुवत-दुर्बल घटकांची बाजू घेणे, कमजोर घटकांवरील अन्यायाविरोधात लेखणी झिजवणे, ज्यांच्यावर प्रसिध्दीचा किरणही कधी पडला नसेल अशांच्या चांगल्या गुणांना, उपेक्षितांमधील गुणवत्तेला वाचक-दर्शकांसमोर आणणे हे लोकांना अपेक्षित असते. प्रत्यक्षात तसे होतेच याची शाश्वती नाही. याला अनेक कारणे असतात. तेवढे खोलात न जाणे उत्तम. पण जनसामान्यांचा कल लक्षात घेतला तर शक्यतो नियम पाळणारे, व्यवस्थेनुसार चालणारे विविध व्यवहार, कायदाप्रेमी, शांतताप्रेमी, संविधानानुसार चालणारे, सामाजिक सौहार्द जपणारे यांच्या बातम्या केल्या तर त्यांना फारसे वाचक, दर्शक लाभतीलच याची कोणतीच खात्री नसते. एका दिवसाच्या चोवीस तासात जगभरातील विविध विमानतळांवर हजारो विमाने उतरतात व उड्डाणे घेतात. हजारो गाड्या धावतात व प्रवाशांची ने-आण करतात. त्यांची बातमी होत नाही. पण एखादे विमान ठरलेल्या धावपट्टीच्या दहा-बारा फूट मागे-पुढे झाले, घसरले त्याची लगेच बातमी होते. एखादी लांब पल्ल्याची गाडी वेळेत निघाली व वेळेत गंतव्य ठिकाणी पोहचली तर कुठलेच प्रसारमाध्यम त्याची दखल घेणार नाही. पण ती तासभर रखडली, प्रवाशांचे हाल झाले, गाडीवर हल्ला झाला, चोरट्यांनी गाडीतील प्रवाशांच्या किंमती चीजवस्तू लांबवल्या तर प्रसारमाध्यमे त्याची दखल घेऊन बातमी करतात व वाचकही ती बातमी कुतुहलाने वाचतात. नेहमीचे, संथ, रटाळ, ‘तेच ते आणि तेच ते' टाईपचे जीवन आणि त्यातील निरस घडामोडी, नियमानुसार चाललेले सारे व्यवहार याच्याबद्दल कुणालाही उत्सुकता, उत्कंठा, कुतुहल, आवड नसते. काहीतरी वेगळे, चाकोरीबाहेरचे, सनसनाटी, संवेदनशील, स्फोटक लोकांना पाहायला, बघायला, वाचायला आवडते. मग प्रसारमाध्यमे, मनोरंजन विश्व यापासून स्वतःला वेगळे ठेवून शुध्द तुपातल्या, सात्विक, नियम-बंधनाला धरुन असणाऱ्यांच्या बातम्या, कलाकृती कशाला बरे देतील? जे विकते तेच खपते हा जगाच्या बाजाराचा नियम आहे. आणि आताचा जमाना तर ‘लाईक, शेअर, कमेंट, सब्स्क्राईब, फॉरवर्ड'चा आहे. शुध्द, सात्विक बाबींना कुणी विचारत नाही अशातला भाग नाही; पण तो वाचक वर्ग, प्रेक्षक वर्ग वेगळ्या प्रकारचा व मर्यादित आहे हे साऱ्यांना ठाऊक आहेच!
गेल्या पन्नास-साठ वर्षात आलेल्या सुपरडुपर हिट सिनेमांची यादी डोळ्यांसमोर आणू या. जसे की मदर इंडिया, जॉनी मेरा नाम, हाथी मेरे साथी, शोले, डॉन, मुकद्दर का सिकंदर, कालिया, मिस्टर नटवरलाल, धर्मवीर इत्यादी. यातील ‘शोले' चे उदाहरण लोकांना लगेच पटेल. यात एक माजी पोलीस अधिकारी असणाऱ्या ठाकूर बलदेवसिंग याची कथा वर्णिली आहे. पोलीसात लागला, नोकरी केली, रिटायर झाला, उतारवयात नातवंडे मांडीवर खेळवीत बसला अशी ती चाकोरीतली सरधोपट ष्टोरी नाही. त्याच्या परिवाराचे गब्बरसिंगने केलेले हाल, त्याचे तोडलेले हात, गावकऱ्यांना दिलेला त्रास हे सगळे त्यात आहे. बरे तो माजी पोलीस अधिकारी असताना आपल्या मनातील असलेली खदखद शमवण्यासाठी पोलीसांची मदत घेतो का? तर अजिबातच नाही. तो दोन चोर, भुरटे, पैशांसाठी काहीही करतील अशा दुक्कलीला (जय आणि विरू) सोबत घेऊन गब्बरसिंगला धडा शिकवतो आणि बदला घेतो व रामगढवासियांनाही जाचातून मोकळे करतो. सांगायचे तात्पर्य हेच की तो स्वतः माजी पोलीस अधिकारी असूनही जर रीतसर पोलीस, शासन, शांतता कमिटी, फिर्यादी-वकील, न्यायालयीन विलंबाच्या प्रक्रिया यांच्या मार्गाने जाताना दाखवला असता तर थेटरात शंभर लोकांनीही जाऊन ‘शोले' पाहिला नसता. पण निर्माते-दिग्दर्शकांनी चाकोरीबाहेरचे, नियमांना बगल देऊन ठाकूर बलदेवसिंगचे बदला घेण्याचे कथानक रचायला सलिम-जावेदला मोकळीक दिली आणि मग लोकांनी तो सिनेमा कसा डोवयावर घेतला याचे तुम्ही आम्ही सारे साक्षीदार आहोत.
आपले प्रेक्षकही त्यांच्या आवडत्या हिरो लोकांनी केलेल्या ‘कायदेभंगाला' जास्त पसंत करतात. बघा ना; राजा रानी, राजा जानी चित्रपटांचे नायक चक्क चोर वगैरे दाखवले आहेत. मिस्टर नटवरलाल, परवरीश, कालिया, डॉन अशा चित्रपटांत अमिताभ बच्चनने चोर, लुटारु, झोलर टाईपच्या भूमिका केल्या आहेत. अगदी पोलीस अधिकारी जरी आपला आवडता नायक दाखवला असला तरी तो कायदेशीर मार्गाने, सारे निती-नियम पाळून, भारतीय दंड विधानांच्या आधीन राहुन आरोपी, गुन्हेगारांना वागणूक देताना दिसणार नाही. तो बोट वाकडे करुनच बदमाषांशी वागला तरच ते प्रेक्षक-दर्शकांना आवडते हे ‘सिंघम' सारख्या देमार सिनेमांनी दाखवून दिले आहे. एक दिवसाचा मुख्यमंत्री कसा धडाकेबाज असला पाहिजे हे अनिल कपूरच्या ‘नायक' चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. तेथे चर्चा, परिसंवाद, परस्पर सुसंवाद, कायद्याचा मार्ग, शांतता कमिटी, मोहल्ला कमिटी यांना रीतसर फाटा देऊन आपले इप्सित साध्य करणारे नायक दाखवण्यात कथा-पटकथा लेखक, निर्माते-दिग्दर्शक, प्रमुख अभिनेत्यांना स्वारस्य असल्याचे दिसते. एकूणच लोकशाही व्यवस्था तिचे चार खांब आणि कायदेपाळूपणा, त्यातील विलंब, भ्रष्टाचार, दपतरदिरंगाई, लाचखोरी, राजकीय लोकांची दंडेली, गटबाजी, जातीजमातवाद यातून निर्माण होणारे वाल्मिक कराडसारखे आका लोक, त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल्यावर लगेच त्यांचे आजारी वगैरे पडणे, मग त्यांच्या समर्थक वगैरे म्हणवणाऱ्यांकडून गुंडशाहीने केली जात असलेली शहरबंदी, त्यांच्या घरच्यांची उपोषणे वगैरेंची नाटके याचा लोकांना उबग आला आहे, लोक याचा मनापासून तिरस्कार करतात आणि त्यांना झटपट निकाल देणारे लोक मग आवडू लागतात. मग ते खतरनाक गुन्हेगारांचे ए्काऊंटर करणारे पोलीस असो की रॉबिनहूड, शहेनशाह, वेताळ, काळा पहाट टाईप काल्पनिक पात्रे! याचे कारण जनसामान्यांच्या दबलेपिचलेपणात दडलेले आहे. ‘रोजमर्रा की जिंदगी मे' या कायदेप्रेमी-शांतताप्रेमी लोकांना नीटसे जगताच येत नसते. कायद्याचे रक्षक, लोकनियुक्त प्रतिनिधी सहसा त्यांचे ऐकत नसतात, व्यवस्था त्यांना न्याय देत नसते. याबद्दल तुम्हाला काय वाटते?
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई