अंधारमाया
मनोहर अण्णा आराम खुर्चीत डोळे मिटून पडले होते. रात्रौ २ वाजल्यापासून त्यांना विश्रांती नव्हती. रात्री २ वाजता मराठवाड्यातील माजी मुख्यमंत्र्याची बायको आणि त्यांचा पीए हजर झाले होते. औरंगाबादचे विमान गोव्यात यायला लेट झाला म्हणे, म्हणून रात्रौ १० वाजता येणार असलेल्या मॅडम २ वाजता आल्या. सारे कसे लपत छपत. कोणी पाहिलं तर बभ्रा आणि वर्तमानपत्रात यायचे. म्हणून रात्रौची वेळ. पण यात आपली धड झोप होत नाही की विश्रांती नाही. मी सहा महिन्यापूर्वीच त्यांच्या यजमानांच्या राजकीय भवितव्याचा अंदाज म्हणजेच भविष्य सांगितले होते. ते बरोबर ठरले म्हणे. आता त्यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची खुर्ची दिसत होती. त्यांच्या मॅडम त्याबाबत चौकशी करत होत्या. त्याकरिता हवे तेवढे द्रव्य सोडायला त्या तयार होत्या. पण ज्योतिष ज्योतिष म्हणजे काय, तर्क महत्त्वाचा. माझ्या तर्काने मी त्यांना सांगितले, साहेबांचा पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर येणार नाही. कारण विरोधी पक्षाची लाट दिसते. तेव्हा साहेबांनी खासदारकीचे तिकीट मिळवावे. द्रव्य सोडण्याची तयारी असली की हवे ते मिळते. ते खासदार म्हणून निवडून येतील आणि केंद्रात मंत्री होतील. बाई खूश होऊन गेल्या. त्यांना दिल्लीचे विमान दिसू लागले. नाहीतरी म्हणे त्या महाराष्ट्रात कंटाळल्याच होत्या. सारखी कटकारस्थाने! त्यात त्यांच्या साहेबांना धड पाच वर्षे मंत्रीपद मिळाले नाही. त्यांनी पर्समधून पैशाचे बंडल काढले, मी काहीच घेत नाही हे त्यांना माहीत, म्हणून माझ्या गादीखाली सरकविले.
ती मंडळी गेली तोपर्यंत पहाट होत आलेली. आता कुठली झोप? आता सकाळची आन्हिके आटोपायला हवीत. घरची पूजा सकाळी सहाच्या आत करण्याची आपली प्रथा. तोपर्यंत एसटीतून उतरलेले लोक रिक्षातून दारात हजर होणार. आपल्या गावाच्या बाहेरुन जाणाऱ्या हायवेवर बसस्टॉप आहे तेथील रिक्षावाले म्हणतात, ‘अण्णांनू, तुमच्या जीवावर आम्ही पॉट भरतवं, तेथे २५-३० रिक्षावाले आहेत. त्यांना हायवे ते आपले घर भाडे २०० रु. घेतात. प्रत्येकाला जायची यायची दहा भाडी तरी मिळतातच.
आपल्यालाही आनंद तेवढी २० कुटुंबे आपल्यामुळे जगतात. सकाळपासून सुरु झालेली जत्रा अर्धा तासापूर्वी संपली. मध्ये साबुदाण्याची खिचडी आणि शहाळ्याचे पाणी घेण्यास उठतो तेवढाच. खूप दमायला होते. पण करणार काय? आपल्या ज्योतिषशास्त्राची महती दूरवर पसरलेली. सर्व काही तोंडी. ज्याला पटले तो दुसऱ्याला सांगतो. या जगात लोकांना विवंचनाच जास्त. आपल्याला नाही का विवंचना? आहे तर... आपली विवंचना कमी होत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा मुलगा श्रीधर उभा राहिला. हा श्रीधर ही मोठी विवंचना आहे आपल्यासमोर. एकुलता एक मुलगा जरा चांगला निपजावा, धड शिकला नाही की काही नाही. ते जाऊंदे शिक्षण नसले तरी आपण एवढे कमवून ठेवले असते त्याच्यासाठी पण काय उपयोग? त्याला जुगाराचा नाद मी मिळविलेले पैसे कुठे ठेवले तरी शोधून काढतो. नाही दिले तर हात टाकायला मागे येत नाही. आणि रात्री त्याचे मित्र गोळा होतात. सगळे जुगारडे आणि दारुडे. गाड्या घेऊन गोव्याला जातात. आणि हल्ली काय म्हणे, बोटीवर जुगार सुरु झाले आहेत त्यात उडवतात.
याच्याच काळजीने त्याची आई यशोदा गेली. आता राहिलो हा आणि मी. लहानपणापासून आईने लाड केले. माझा सगळा दिवस लोकांची भविष्य सांगण्यात गेला. माझेपण दुर्लक्ष झाले. मनात म्हणत होतो अभ्यासात लक्ष नाही, नसूदे आपला हा पिढीजात ज्योतिषाचा धंदा उपाशी ठेवणार नाही. लोक ज्योतिष सांगणाऱ्याला कमी पैसे देत नाहीत. मी कुणाकडेही पैसे मागत नाही, ही बातमी पसरल्यामुळे माझ्या गादीखाली लोक उलट भरपूर पैसे ठेवतात. पण उपयोग काय? या श्रीधरची घारीसारखी नजर असते. लोक गेली की हा गादीखाली हात घालतो आणि पैसे जुगारात उडवतो. आजूबाजूचे लोक विचारतात, ‘अण्णांनू, तुमका तुमच्या झिलाचा ज्योतिष कळना नाय? तुम्ही जगाक सुधारतास, पहिलो झिलाक सुधरवामवो या लोकांना काय सांगणार कपाळ? ज्योतिष असे टि.व्ही. वरच्या कार्यक्रमासारखे दिसत नसते. ज्योतिष म्हणजे तर्क आणि अंदाज. ज्याला तर्क बरोबर करता येतो तो यशस्वी ज्योतिषी होतो. अण्णांना आपला भूतकाळ डोळ्यासमोरून सरकू लागला.
..आपले वडील गावातील एकमेव ब्राह्मण. गावातील पूजाअर्चा, देवस्थानची पूजा सांभाळत असत. सायंकाळी लोक आपल्या अडीअडचणी विचारायला येत. वडील पंचांग उघडत आणि काहीतरी पुटपुटत विचारणाऱ्याच्या मनाला समाधान वाटेल असे काहीतरी सांगत. काळे दोरे, त्यात अगरबत्तीची पूड बांधून ठेवलेली असे. तो दोरा मंत्र पुटपूटत हातात ठेवत. तो माणूस मोठ्या विश्वासाने तो दोरा घरी नेई. वडील कधीच पैसे सांगत नसत. पण आलेला माणूस थोडेतरी द्रव्य नाहीतर निदान तांदूळ, शेंगा, कुळीथ काहीतरी ठेवून जाईत. वडीलांची किर्ती चार गावात पसरली होती. वडीलांनी फार माया नाही जमवली; पण कुटुंबाला काही कमी पडले नाही हे खरे.
मी हायस्कूलमध्ये होतो तेव्हा इतर कोणत्याही विषयापेक्षा विज्ञानाची आवड जास्त निर्माण झाली. वझेबाई विज्ञान छानच शिकवायच्या. त्यामुळे मराठी, संस्कृत यापेक्षा फिजिक्स जास्त जवळचे वाटायचे. गॅलेलिओ, न्यूटन, आर्कमिीडीज यांचा मी भक्तच झालो. जयंत नारळीकरांसारखे अवकाश विज्ञानात संशोधन करायचे होते. त्यासाठी एस.एस.सी. नंतर पुण्याला जायचे, फर्ग्युसनमध्ये ॲडमिशन घ्यायची असे मनातल्या मनात मांडे घालत होतो पण....अकरावीत असताना ध्यानीमनी नसताना वडीलांचे आकस्मिक निधन झाले आणि सर्व काही संपले. मागच्या तीन बहिणींची आणि आईची जबाबदारी १६ व्या वर्षी खांद्यावर पडली. दापोलीचे मामा म्हणाले, आता पुण्याला शिकायचा विचार सोड.
वडीलांनंतर या गावचे तुलाच करायला हवे. तेव्हा वेदशास्त्र आणि ज्योतिष शिकून घे. हा गाव तुला काही कमी पडू देणार नाही. मोठ्या जड अंतःकरणाने मामांचा सल्ला ऐकावा लागला. पण ठरवले, गोव्याला जाऊन मामांचे साडू दामलेशास्त्री यांचेकडू राहून वेदशास्त्र, ज्योतिष विद्या सर्व शिकायचे. तसेच केले. २ वर्षे दामलेशास्त्रींकडे राहिलो. त्यांचा विद्यार्थी बनलो. त्यांच्या घरची सर्व कामे केली. संस्कृत शिकलो. वेदशास्त्र पारंगत झालो. दामलेशास्त्रींकडून ज्योतिष विद्या मिळविली. दामलेशास्त्रींचा आपल्यावर एवढा विश्वास बसला की, त्यांचेकडे ज्योतिष विचारायला येणाऱ्या मोठ्या असामींना माझ्याकडे पाठवायला लागले.
आणि अचानक तो दिवस आला. माझा भाग्योदय म्हणाना. गोव्यातील एका दारु कंपनीचा मालक दामलेशास्त्रींकडे त्यांचे टिपण घेऊन आला. भलीमोठी परदेशी गाडी घराबाहेर उभी. सर्व बोटात हिऱ्याच्या अंगठ्या आणि गळ्यात जाड सोन्याची चेन. त्याचा माल पोलीसांचे सर्व अडथळे तोडून महाराष्ट्रात पोहोचायचा. सर्व ठिकाणी हप्ते पोहोचलेले असत. तरीपण पुढे काही दगाफटका नाहीना, हे विचारायला तो आला. दामलेशास्त्रींनी त्याला माझ्याकडे पाठविले. काहीशा अविश्वासाने त्याने त्याची कुंडली आणि हात मला दाखवला. मी त्याची कुंडली पाहिली, हात पाहिला. माझ्या ज्योतिषशास्त्राने मला समजले, या गृहस्थाला पुढचे दहा दिवस मोठा धोका आहे. धंद्यात सांभाळून रहायला हवे. नाहीतर आजपर्यंत मिळविलेले एका क्षणात राख होण्याची शक्यता. मी त्या गृहस्थाला सांगितले, तुम्हाला धंद्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तुमच्यावरची सरकारची मर्जी राहणार नाही. गोव्याच्या राजकारणात मोठे वादळ येणार आहे. त्यामुळे तुमचा व्यवसाय पुढील दहा दिवस बंद ठेवा. तो घाबरला. माझ्यावर विश्वास ठेवून त्याने महाराष्ट्रात जाणारे त्याचे सर्व टेम्पो थांबविले आणि माझा अंदाज खरा ठरला. गोव्याचे सरकार अल्पमतात आले. दोन दिवसात विरोधी पक्ष सत्तेवर आला. आणि नवीन मुख्यमंत्र्यांनी सर्व दारु सम्राटांवर धाडी घातल्या. त्यांचा बाहेर जाणारा माल तपासला. बहुतेक मद्यसम्राट तुरुंगात गेले. त्यांच्या फॅक्टरी सील केल्या गेल्या. पण सर्वांना आश्चर्य वाटले, सर्वात मोठा मद्यसम्राट सुखरुप होता आणि त्या दिवसापासून आपल्याकडे आमदार, खासदार, मंत्री, उद्योगपती यांची रीघ लागली.
पण हे सर्व सोडून आपण कोकणात आपल्या घरी आलो. वडील गेल्यानंतर लोकांना त्यांचे भविष्य सांगणारा हवा होताच. आपल्याकडे पंचक्रोशीतील लोक येऊ लागले. तसेच गोव्याचे धनाढ्यपण येऊ लागले. आपली कीर्ती मुंबई-पुणे पर्यंत पसरली आणि अनेक आमदार, खासदार, मंत्री रात्रौचे गुपचूप येऊ लागले. पण आपण उतलो नाही की मातलो नाही.आपण वडीलांनी बांधलेल्या साध्या घरात रहात होतो. मात्र घराभोवती रिकामी जागा होती त्याठिकाणी नारळी फोपळीची झाडे लावली. विहिरीवर पंप बसवून घरात पाणी आणले आणि शेजारील गावातील सरवटे यांची कन्या यशोदा हिला पत्नी म्हणून घरात आणले. तिन्ही बहिणींची लग्ने करुन दिली. बहिणी आपआपल्या संसारात सुखात, आनंदात आहेत. मग २ वर्षांनी श्रीधरचा जन्म झाला. आणि नातवाला मांडीवर खेळवून आई देवाघरी गेली.
यशोदा प्रेमळ, संसारी त्यामुळे तीनजणांचा संसार आनंदात सुरु होता. श्रीधरच्या जन्मानंतर मी त्याची कुंडली केली आणि त्याचे ग्रह उच्चप्रतीचे आहेत हे पाहून हरखून गेलो. माझ्याकडे गर्दी वाढत होती. लोक माझ्या सल्ल्याने सुखी होत होते. काही राजकीय नेत्यांना मी दिलेला सल्ला ऐकून आमदारपद मिळाले, मंत्रीपद मिळाले. सर्व काही छान होते. पण श्रीधर जसजसा मोठा होत गेला तसतशा विवंचना वाढू लागल्या. शाळेतील शिक्षक त्याच्या तक्रारी सांगू लागले. त्याचे अभ्यासात लक्ष नव्हते. आणि यशोदाचा मार खाऊन-खाऊन तो कोडगा बनला. मी रिकामा असलो म्हणजे यशोदा त्याच्या तक्रारी सांगायचा; पण मी तिला म्हणायचो, त्याचे ग्रह उच्चप्रतीचे आहेत, तेव्हा तू काळजी करु नकोस असे सांगून तिला गप्प करत होतो.
पण एकदा हद्द झाली. शाळेतील मुलांची सहल पाच मैलावरील गावात गेली. श्रीधरपण सहलीला गेला. त्या गावात एक पाण्याने तुडूंब भरलेला तलाव होता. मुले तलावाच्या आजुबाजूला खेळत होती. तेव्हा शिक्षकांची नजर चुकवून श्रीधरने एका गरीब मुलाला तलावाकडे नेले आणि त्याला बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. नशीब एका मुलीने ते पाहिले आणि शिक्षकांना सांगितले. सर्वांनी कसेबसे त्या मुलाला पाण्यातून बाहेर काढले. प्रथमोपचार करुन पोटातील पाणी बाहेर काढले. यशोदेला आणि मला कळले तेव्हा शरम वाटली. अपराधी वाटले. त्या मुलाच्या आईवडीलांची व शिक्षकांची कशीबशी समजूत घातली. श्रीधरने असे अनेक पराक्रम केले. त्यामुळे आमची मान खाली जात राहिली. मी त्याची कुंडली पुन्हा पाहिली. त्याचे ग्रह उच्च होते. परंतु श्रीधरचे वर्तन उलट होते. मला आता मी शिकलेल्या ज्योतिष विद्येबद्दल शंका वाटू लागली. बाहेरचे सर्वजण आपला जयजयकार करतात सकाळपासून दारात गर्दी करतात, रिक्षावाले प्रवाशांना आपल्याकडे आणून आपला संसार चालवतात आणि आपल्या स्वतःच्या मुलाचे काय हे प्रताप?
श्रीधर चौदा वर्षाचा झाला आणि आता तो कोणालाच आवरेना. गावातील टवाळखोर, व्यसनी मुलांच्या संगतीत राहू लागला. गावातील चांगल्या घरातील मुलींच्या आईबापांच्या तक्रारी येऊ लागल्या. त्याला खूप समजावून पाहिले, पण पालथ्या घड्यावर पाणी. यशोदेचा रक्तदाब सतत वरखाली होऊ लागला. आणि शेवटी एकदिवस ती गेलीच.
यशोदेच्या जाण्याने आपण एकटे पडलो. पण श्रीधरला रान मोकळे झाले. आता त्याचे टोळभैरव मित्र घरी येऊ लागले. पत्त्याचे डाव मागील दारी रंगू लागले. हळूहळू हे पत्ते प्रकरण पैसे लावून जुगारापर्यंत गेले. आणि सुरुवातीला तालुक्याच्या ठिकाणी आणि हल्ली गोव्यामध्ये बोटीवरील जुगारापर्यंत वाढले. आपल्याला लोकांनी दिलेले पैसे कपाटातून गायब होऊ लागले. आणि नंतर नंतर गादीखाली हात घालून जबरदस्तीने खिश्यात जाऊ लागले. जुगारासोबत ही मंडळी दारुपण पितात असे गावातील लोकांचे म्हणणे. असेल. सायंकाळ झाली की तालुक्याच्या गावातील जुगारडे गाड्या घेऊन येतात आणि ह्याला घेऊन गोव्याच्या दिशेने सुसाट पळतात. मला कोण विचारतो? माझ्याशी तो एक शब्द बोलत नाही. फक्त पैसे मिळाले नाहीत तर हात टाकतो. अशी ही आपली दशा.
आराम खुर्चीत बसल्याबसल्या मनोहर अण्णांच्या गेल्या पंचवीस वर्षांंतील आयुष्य डोळ्यासमोरुन सरकत होते. पण पुढे काय? हा प्रश्न सतावत होता. श्रीधरचे ग्रह उच्चप्रतीचे आहेत हे हे पत्रिकेवरुन आपले म्हणणे, हे का खोटे होते आहे हे त्यांच्या लक्षात येईना. श्रीधरमध्ये आपला अंश आहे मग आपण शिकलेल्या ज्योतिषशास्त्रात स्वतःचे किंवा स्वतःच्या अंशाचे भविष्य पाहताना चूक होते, ही या ज्योतिषशास्त्राची मर्यादा आहे का? मग ह्या बाहेरख्याली श्रीधरला सुधारण्यासाठी योग्य मार्ग कोणता? की आपला शेवट या व्यसनी मुलाच्या हातून आहे? अशा विचारांची मालिका अण्णांच्या मनात सुरु होती. विचार करता करता अण्णांचा डोळा लागला. नाहीतरी रात्री झोप झालीच नव्हती.
‘अण्णांनू, ओ अण्णांनू अशा हाका आल्याने अण्णा जागे झाले.
‘अरे चंद्या, ये रे ये, तुझीच वाट पाहत होतो.
‘अण्णांनू, आज दमलेले दिसतास, आज खूप लोका इल्ली काय?
‘हो बाबा, मध्यरात्री माजी मंत्र्यांची बायको आणि पीए आलेला, त्यांनी सकाळचे ४ वाजवले. मग कसली झोप? दिवसभर तुला माहीत आहेच रोज जत्रा भरते. लोकांना मी सांगतो ते पटते रे बाबा, पण....
‘श्रीधर भाऊ आसा काय गेलो?
‘गेला बहुतेक, मला सांगून जातो थोडाच? पण त्याची ती चांडाळचौकटी रस्त्यापलीकडे दिसली. म्हणजे त्याच्या गाडीतून गेलाच असणार, त्याचे काय? जाता-येता गादीखाली हात घातला म्हणजे पुडकी हाताला लागतात. मग त्याचे जुगारात उडवायला काय जाते?
एक मोठा निःश्वास टाकून अण्णा म्हणाले - ‘पण चंद्या, हे किती दिवस चालणार? आणि पुढे काय? हा मी प्रख्यात ज्योतिषी असून माझ्यापुढे प्रश्न आहे.
‘अण्णांनू, माझा ऐकशात एकदा बाबा चव्हाणाकडे येशात माझ्याबरोबर? अहो त्याचेकडे तुमच्यापेक्षा जास्त गर्दी असता.
‘‘कोण ? बाळ्या चव्हाणाकडे मी जाऊ? अरे त्याच्या अंगात येते असे ऐकतो. कसला तरी अवसर आहे म्हणे. लोक काय करतात गर्दी.
‘ओ अण्णांनू, तुमचा ह्या पुस्तकी ज्योतिष, ग्रहतारे, चंद्र बघून कायकाय ता सांगतास, ओ बाळ्याचा अवसर काय सांगता तो लोकांचा पटता, त्याच्या पुढ्यात कसला तरी भस्म असता, कोणतरी सांगा स्मशानात जाऊन डोक्याकडचा भस्म बाळो हाडून ठेवता, त्या भस्माचो अंगारो लावता, आणि तोच अंगारो प्रसाद म्हणून देता. लोकांका अनुभव आसा म्हणान गर्दी करतात. त्याच्या घरासमोर गोव्यातल्या श्रीमंतांचे गाडये लागलेले असतत. अहो दोन वर्षात बाळ्यान स्लॅबचा दोन मजली घर बांधल्यान, त्याच्या बायलेच्या अंगावरचे दागिने बघलात? आता मोठी गाडी येवची आसा पुढच्या महिन्यात. तरी बाळो म्हणता मी कोणाकडून पैसे घेनय नाय.
‘मग काय एवढे मोठे घर, दागिने, गाडी झाडाला लागली काय बाळ्याच्या? पैसे मागत नसेल तो कदाचित, पण लोक स्वखुशीने पैसे, सोनं ठेवून जातात, मी पण कोणाकडे पैसे मागत नाही. पण लोक पैसे गादीखाली ठेवतात, आता ते पैसे जुगारात जातात हा भाग वेगळा.
‘अण्णांनू, माझा ऐका, एकदा चला माझ्याबरोबर बाळ्याकडे. तुम्ही फक्त एकदा येवा. बाकी सगळा मी संभाळतय. श्रीधर सुतासारखो सरळ नाय इलो तर तुमका ताँड दाखवचय नाय.
‘नाही रे बाबा, हे असले अवसार, अंगात येणे म्हणजे फसवणूक आहे नुसती, शास्त्र नव्हे. मी पण ज्योतिष सल्ला देतो पण चंद्र, सूर्य, नक्षत्रे यांची स्थाने आणि तर्क ह्यांच्या सहाय्याने. माझे ज्योतिष म्हणजे विज्ञान आहे, अंधश्रध्दा नव्हे.
‘आसात कदाचित अंधश्रध्दा. नायतर नसात कदाचित ता विज्ञान, पण लोकांका अनुभव मिळता मा... अहो, नांदगावचो आपा नाईक एक नंबर बेवडो. चोवीस तास दारु. तेची बायल पोरा कंटाळलेली, पण आपाच्या बायलेन बाळ्याकडसून घेवन अंगारो, प्रसाद त्याच्या जेवणात घातलो, त्यापासून त्याची दारु सुटली ती सुटली. आता आषाढी कार्तिकी वारी करता. विचार करा अण्णा. हो तुमचो श्रीधर सुधारलो तर मग तुमवझ्र कसलीच काळजी रवाची नाय.
‘खरं आहे रे चंद्या. या गावात तूच एक माझा मैतर आहेस. काय बरे वाईट बोलायचे ते मी तुझ्यापाशीच बोलतो. दिवसभर आलेल्या लोकांशी बोलून त्यांचे ज्योतिष सांगून कंटाळतो आणि संध्याकाळी तू केव्हा येतोस याची वाट पाहत असतो. तुझ्याकडून दहा गावातल्या बातम्या समजतात.
‘अण्णांनू, एकदा रातचे जावया, ह्या कानाचा त्या कानाक कळूचा नाय. मी बाळ्याक निरोप धाडतय. अण्णा येतले म्हणून.
‘पण तो कसले कसले उपाय सांगेल, ते करणे मला जमणार नाही. मी कसलीही हिंसा करणार नाही, आणि बळी देणार नाही.
‘तुम्ही काय पण करु नका अण्णा, मी सगळा बघतंय. तुम्ही फक्त एकदा माझ्याबरोबर येवा. तुमचा ह्या दुःख बघवणा नाय माका.
‘मी तिथे एक शब्द सुध्दा बोलणार नाही, काय बोलायचे, सांगायचे आहे ते तू करायचे. आणि तू सोडून मी बाळ्याकडे गेलो हे कुणालाही कळता कामा नये. नाहीतर तुझी माझी मैत्री संपली.
‘तुम्ही कसलीच काळजी करु नका अण्णांनू, मी उद्या रात्री माझी रिक्षा घेवन येतय, सगळा गाव झोपलेला असताना तेवा निघाया. आणि मध्यरात्रीनंतर परत येवया. मी बाळ्याक निरोप धाडतय. तो तुम्ही येतालास म्हणान घरातल्या सगळ्यांका बाहेर पाठवित सर्व कार्यक्रम निश्चित करुन चंद्या गेल्या. अण्णा विचारात पडले, आजपर्यंत मानाने जगलो, दामलेशास्त्रींकडून ज्योतिष ज्ञान घेतले. त्याचा उपयोग अनेकांना झाला. पण या मुलामुळे आपल्याला अगतिक व्हायला झाले. मनात नसतानासुध्दा ह्या बाळ्याच्या घरी जायचे चंद्याला कबूल करुन बसलो. पण ह्या कृतीने माझे मन मला क्षमा करणार आहे का? दामलेशास्त्री आता हयात नाहीत, पण त्यांचा आत्मा मला क्षमा करेल? यशोदा असती तर मी बाळ्याकडे जाणे कबूल केले असते? पण आता मी एकटा आहे. श्रीधर नावालाच आहे. व्यसनात पूर्णपणे बुडाला. एक चंद्याच आहे आपला जीवाभावाचा मैतर. त्याच्याशीच आपण मनातलं बोलतो. त्यानेच हा सल्ला दिला. शेवटी श्रीधर सुधारणे महत्त्वाचे. मग मी कितीही खालची पायरी गाठली तरी बेहत्तर. मनोहर शास्त्रींनी निश्चय केला. चंद्या म्हणाला तसे उद्या जायचेच. कारण श्रीधर माणसात येणे महत्त्वाचे. जोशी घराण्याला लागलेला डाग पुसला पाहिजे. दुसऱ्या दिवशी रात्रौ गावात निजानिज झाली तशा चंद्या बंद दाराची रिक्षा घेऊन आला आणि अण्णा रिक्षातून निघाले. बाळ्याच्या गावात रिक्षा पोहोचली तेव्हा तो गावपण गाढ झोपेत होता. बाळ्याला आधीच निरोप दिला होता. त्यामुळे अण्णा जोशींसारखे विद्वान ज्योतिषी आपल्याकडे येणार म्हणून बाळ्याने आपले सहकारी आणि कुटुंबीय दुसऱ्या गावाला पाठविले होते. बाळ्या चंद्याच्या रिक्षाची वाटच पाहत होता. रिक्षेचा आवाज आला तसे बाळ्याने दार उघडले आणि दोघे आत येताच दरवाजा बंद करुन घेतला. अण्णा आत आले. बाळ्याचे घर पाहत राहिले. भला मोठा हॉल, सगळीकडे संगमनवर लावलेला, महागडे फर्निचर. बाळ्या त्यांना आत घेऊन गेला. आतली एअरकंडिशन खोली, एक मोठे उंचावर सिंहासन आणि त्यासमोर मोठे लाकडी टेबल. टेबलावर ठेवलेले भस्माचे पितळी ताट. पाठीमागे शंकराचा मोठा फोटो आणि लोकांना बसायला महागडा कोच. पायाखाली पाय रुतणारा गालिचा. अण्णा बाळ्याने दोन वर्षात मिळविलेले वैभव पाहत राहिले. दोन वर्षापूर्वी बाळ्या गवंडीकाम करायचा आणि कुठूनतरी ही विद्या शिकून आला आणि लोक गर्दी करायला लागले. अण्णा विचार करायला लागले, आपण गेली पंचवीस वर्षे ज्योतिष सांगतोय, पण आपले घर आहे तसेच आहे आपण लाकडी खूर्चीवर बसतो आणि समोर येणारे लोक बाकड्यावर बसतात. अगदी उद्योगपती, आमदार, खासदार सुध्दा. बाळ्याने अण्णांना पायाला हात लावून नमस्कार केला.
‘अण्णांनू, तुम्ही खरे विद्वान, तुमचा घराणा विद्वान, तुम्ही शास्त्र शिकून इलात, तुमका मुंबई-पुण्यापासूनचे लोक मानतात. मी काय ओ, एक विद्या शिकान इलंय, त्याच्या जीवार लोकांका सांगतय, लोकांका पटता म्हणून लोक येतत. ह्यो चंदो म्हणालो, तुमची कायतरी अडचण झाली हा... ती तुमच्या शास्त्रात निवारणा नाय म्हणून माझ्याकडे इलास, बघुया माझ्या विद्येन तुमचा काय काम झाला तर झाला.
बाळ्याने फटाफट लाईटी लावल्या. त्यामुळे सिंहासनावर लालपिवळ्या रंगाचा प्रकाश पडला. आणि बाकीचा भाग अंधारात बुडाला. आता कोचवर बसलेले अण्णा आणि चंद्या काळोखात गेले. बाळ्या जाऊन सिंहासनावर बसला आणि समोरील भस्माने डोक्यावर पट्टी काढली. हाताला भस्म लावले. आणि हात जोडून कसलातरी मंत्र पुटपुटू लागला. अण्णा शांतपणे सारे पाहत होते. इथे आल्यावर एकही शब्द बोलणार नाही हे त्यांनी चंद्याला आधीच सांगून ठेवले होते. हळूहळू सिंहासनावर बसलेले बाळ्याचे अंग घुमू लागले. त्याची मान कापू लागली आणि तोंडातून मोठमोठे श्वास बाहेर पडू लागले. चंद्या हळूच अण्णांना म्हणाला, ‘अंगात इला, आता काय विचारतीत ता सांगाक व्हया. मी सगळा सांगतय, तुम्ही काययेक काळजी करु नकात.
अंगात आलेला बाळ्या जोराजोराने श्वास टाकत म्हणाला, ‘लेकरां तुझो काय प्रश्न आसा?
चंद्या हात जोडून म्हणाला, ‘महाराज माझ्याबरोबर इलेहत ते अण्णा जोशी, तेंचो झिल व्यसनाक लागलो हां, त्यांच्या कुटुंबात कोणाकच कसला व्यसन नाय. पण ह्यांच्या झिलाकच ह्या व्यसन इला खयसून? आणि ता व्यसन जायतं कसा? ह्या इचारुक आमी इलवं. अंगात वारं आलेला बाळ्या आता जोराजोरात श्वास बाहेर टाकत होता. तसाच तो म्हणाला, ‘हे तुझ्याबरोबर इलेले माणूस पापभिरु आसत ह्या खरा, पण त्यांच्या वडीलांकडून एक मोठी चूक झालेली आसा, तेचो वचपो ह्यांच्या मुलाकडून काढलो जाता. बाळ्या म्हणाला.
कसली चुक झाली हा ती सांगा. आणि तेच्यावरचो इलाज काय तो सांगा?
अंगात आलेला बाळ्या उत्तरला - ‘हेच्या वडीलांनी देवाचो नाग मारलेलो आसा. आणि त्या नागाक मूठमाती न देता, तेका तसोच झाळीत टाकून दिलो. तोच नाग आता पुढच्या पिढीक त्रास देता.
अण्णांना आठवले, बागेची सफाई करताना वडीलांनी अनेक सरपटणारे प्राणी मारले होते. कारण कोकणात असे सरपटणारे प्राणी आजूबाजूला असतातच. पण त्यात नाग होता किंवा नाही हे माहिती नाही. चंद्या अंगात आलेल्या बाळ्याला म्हणाला, ‘मग हेच्यार उपाय काय तो सांग लेकराक, लेकराची चूक पायाखाली घे, आणि तेका मार्ग दाखव.
बाळ्या उत्तरला - ‘तेच्यासाठी ह्यो प्रसाद तीन दिवस तेच्या जेवणात तेका नकळत घाल. असे म्हणून त्याने हाताने समोरील भस्म एका कागदावरुन चंद्याच्या हातात दिले. हो प्रसाद तेच्या पोटात गेलो की तो घराबाहेर पडूचो बंद होतलो. आणि मग बारा दिवसानंतर एक चांदीचो नाग करुन देवखोलीत ठेवंदे आणि तेची रोज पूजा कर. म्हणजे या संकटातून तूझी कायमची मुक्ती होयत. चंद्याने मान डोलावली आणि हात जोडून नमस्कार केला. हळूहळू बाळ्याचे घुमणे कमी झाले आणि दोन मिनिटात तो नेहमीसारखा झाला. बाळ्याने अण्णांना चला उठायचं अशी खूण केली आणि ते बाहेर पडले. रिक्षात बसल्यावर चंद्या अण्णांना म्हणाला, ‘बघुया प्रयत्न करुन. अण्णा काही बोलले नाहीत. ते आपल्या वडीलांनी कधी नाग सर्प मारला होता हे आठवत राहिले. वाटेत मध्येच बाळ्याने अण्णांच्या हातात ती पुडी ठेवली. ही नकळत त्याच्या जेवणात घाला तीन दिवस. काय बघुया काय बदल होता काय. अण्णांनी ती पुडी हातात घेतली. त्यांचे मन त्यांना सांगू लागले बघ प्रयत्न करुन. नाहीतरी तुझे सगळे प्रयत्न थकले. हा एक नवीन उपाय.
चंद्याला अण्णांना मध्यरात्रीनंतर सोडले आणि तो घरी गेला. अण्णांनी दरवाजा उघडला त्यांना माहित होते श्रीधरची येण्याची वेळ पहाटे पाच नंतर. त्यांनी अंथरुणात अंग टाकले. त्यांनी ठरविले. रोज आपण खिचडी करुन ठेवतो, ती श्रीधर दुपारी खातो. त्यात हे भस्म टाकू तीन दिवस. बघु काय चमत्कार होतो काय?
अण्णा नेहमीप्रमाणे उठले. त्यांनी श्रीधरच्या खोलीत पाहिले. पहाटे केव्हातरी येऊन तो आता घोरत होता. त्यांनी आन्हीके उरकली. देवपूजा केली. लोक यायच्या आधी खिचडी करायला घेतली. त्या खिचडीतील थोडी खिचडी आपल्यासाठी ठेवली. आणि बाकीच्या खिचडीत रात्रौ आणलेल्या भस्मातील थोडे भस्म टाकून श्रीधरला सहज दिसेल अशी ठेवली. नेहमीप्रमाणे रिक्षावाले लोकांना अण्णांकडे सोडू लागले आणि त्यांच्या कुंडल्या मांडून त्यांचे भविष्य सांगू लागले. पण त्यांचे लक्ष आज स्वयंपाकघरात होते. श्रीधर जागा होवून खिचडी खातो की नाही हे त्यांना पहायचे होते. अकराच्या सुमारास श्रीधर जागा झाला आणि नंतर घरात भांड्याचा आवाज ऐकू आला. थोड्यावेळाने त्यांनी आत जाऊन पाहिले. श्रीधरने सगळी खिचडी संपवली होती. दुपारी अण्णांनी आपली खिचडी संपवली तेव्हा त्यांनी पाहिले, श्रीधर गाढ झोपी गेला होता. त्यांना बरे वाटले. सायंकाळ झाली, रोजची श्रीधरची बाहेर पडण्याची वेळ झाली तरी श्रीधर गाढ झोपेत. आज त्याचे टोळभैरव मित्रपण आले नाहीत. अण्णांना वाटले, बाळ्याच्या भस्माचा परिणाम की काय? म्हणजे माझ्या ज्ञानी ज्योतिषापेक्षा बाळ्याची विद्या श्रीधरला मानवली? अण्णा मनात म्हणाले, असू दे कोणत्याही उपायाने का होईना श्रीधरची व्यसने सुटावीत आणि जोश्याच्या घरात आलेले हे संकट दूर व्हावे.
त्या रात्री अण्णा समाधानाने झोपले. दुपारी झोपलेला श्रीधर उठलाच नव्हता. पुन्हा दुसऱ्या दिवशी अण्णांनी खिचडी केली. थोडी आपल्यासाठी ठेवली. बाकीच्या खिचडीत भस्म टाकून ती खिचडी श्रीधरसाठी ठेवली. श्रीधर दुपारी उठला. त्याने ती खिचडी संपवली आणि तो परत झोपी गेला. अण्णांचे लक्ष होते. दुसऱ्या दिवशीही त्याचे टोळभैरव आले नाहीत की, श्रीधर बाहेर गेला नाही. उलट दुपारी झोपलेला श्रीधर उठलाच नाही. सायंकाळी नेहमीसारखा चंद्या अण्णांशी गप्पा मारायला आला. श्रीधर दोन दिवस बाहेर गेला नाही; एवढेच नव्हे तर त्याचे टोळभैरव मित्र सायंकाळी गाडी घेऊन येतात आणि श्रीधरला गोव्याला घेवून जातात तेपण आले नाहीत, हा सगळा बाळ्याच्या भस्माचा परिणाम असे चंद्या छातीठोकपणे सांगायला लागला. आपल्या विद्वत्तेचा पराभव असेल कदाचित, पण अण्णांनापण बाळ्याच्या विद्येविषयी आदर वाटायला लागला. तिसऱ्याा दिवशी अण्णा खुशीत उठले आणि खिचडी करुन आपणासाठी त्यातील वेगळी काढून बाकी श्रीधरसाठी ठेवली त्यात बाळ्याने दिलेले भस्म टाकले. आज तीन दिवस झाले. त्यानंतर काय होणार ते पाहू. गेले दोन दिवस तरी श्रीधर बाहेर पडला नाही. सकाळपासून अण्णा आपल्या खूर्चीत बसून आलेल्या लोकांचे समाधान करत होते. पण त्यांचे लक्ष माजघरात होतेच. श्रीधर उठून खिचडी खातो का हे पहात होते. नेहमी प्रमाणे श्रीधर उठला, त्याने खिचडी खाल्ली; पण आज तो झोपला नाही. विहिरीवर जाऊन आंघोळ केली. मग नवे कपडे घालून स्कूटर घेऊन बाहेर गेला. येताना भजी, वडे पार्सल आणले आणि घरात बसून खाऊ लागला. अण्णांचा एक डोळा श्रीधरवर होताच.
अण्णांनी उठून खिचडी खाल्ली. कॉफी पिऊन ते परत आपल्या खूर्चीवर येऊन बसले. सायंकाळचे चार वाजले ही श्रीधरच्या मित्रांची गाडी घेऊन येण्याची वेळ. अण्णांनी आत पाहिले. श्रीधर कपडे करुन तयार होता. एवढ्यात त्याच्या मित्रांची गाडी रस्त्यापलीकडे आलेली दिसली, तसा वेगाने श्रीधर उठला गादीखाली हात घालून नोटा खिक्यात कोंबल्या आणि धावतच गाडीत जाऊन बसला. अण्णांनी डोक्याला हात लावला. दोन दिवस आशेवर होतो. पण याचे परत सुरु झाले म्हणायचे.
मग अण्णांनी आलेल्या लोकांना पटापट मोकळे केले. आणि ते अंगणात आरामखुर्चीत येऊन बसले. आता थोड्या वेळाने चंद्या येईल. त्याला हे सर्व सांगायचे आणि आता पुढे काय ते ठरवायचे. असे अण्णा मनातल्या मनात म्हणू लागले. पण सहा वाजले, सात वाजले तरी चंद्याचा पत्ता नाही. अण्णांनी विचार केला. बहुतेक चंद्या आज येत नाही. आपण आता पेज घ्यावी आणि अंथरुणावर पडावे असे म्हणून अण्णा उठले तोच त्यांच्या दारात पाच-सहा मोठ्या गाड्या, स्कूटर्स, मोटरसायकली आणि शेवटी पोलीसांची गाडी येऊन थांबली. मोठ्या गाड्यातून त्यांच्या बहिणी, भावोजी, भाचे मंडळी आणि चंद्यापण उतरला. तोपर्यंत गावातील इतर लोकपण दिसू लागले. पोलीसांच्या गाडीतून पोलीस इन्स्पेक्टर आणि चार पोलीसपण उतरले. अण्णा भांबावून गेले. हे काय चाल्लेय त्यांना कळेना. त्यांनी पाहिले. त्यांच्या बहिणी, भाचे रडत होते. त्यांनी चंद्याकडे पाहिले. तोही नजर चुकवत होता. पण रडत होता. एवढ्यात पोलीस इन्स्पेक्टर पुढे आले. त्यांनी आपली कॅप हातात घेतली आणि खालच्या आवाजात म्हणाले, ‘गोव्याला जाणारी बोलेरो या गाडीचा बांद्याजवळ लक्झरीला आपटून अपघात झाला आणि आतले तिघेही जागच्या जागी ठार झाले. त्यात तुमचा मुलगा श्रीधर मनोहर जोशी हा जागच्या जागी ठार झाला. त्याच्या बॉडीची ओळख पटवायला तुम्ही हॉस्पिटलमध्ये यावं अशी विनंती आहे.
श्रीधर मनोहर जोशी हे नाव कानात पडताच अण्णा एकदम ताठ झाले. मोठ्याने किंचाळले, ‘चंद्या, चंद्या मी माझी पायरी सोडली रे चंद्या आणि ताडताड घरात निघून गेले. पाठोपाठ अण्णा, अण्णा अशा हाका मारत चंद्या, अण्णांच्या बहिणी, भाचे आणि इन्स्पेक्टर धावतच मागून गेले. अण्णा ताडताड घरात गेले ते न्हाणीघरात पाण्याने भरलेल्या दोन तांब्याच्या कळशा होत्या तिकडे गेले. काही कळायच्या आत त्यांनी पाण्याने भरलेली तांब्याची कळशी उचलली आणि डोक्यावर ओतली. कळशी टणटण आवाज करत बाजूला गेली. चंद्या - ‘अण्णा, अण्णा सांभाळा असे ओरडत होताच, पण त्यांनी दुसरी पाण्याने भरलेली कळशी उचलली तेव्हा चंद्या त्यांना अडवायला गेला. त्याला हाताने ढकलून त्यांनी ती कळशी उचलली आणि डोक्यावर ओतण्यासाठी वर घेऊ लागले पण कळशी छातीपर्यंत आली आणि भरलेली कळशी आणि अण्णा दोघेही खाली पडले. सर्वजण धावले. दोन पोलीसांनी ओल्या झालेल्या अण्णांना उचलून बाहेर ओसरीवर आणले. कोणी कांदा नाकाला लावला. कोणी तोंडावर पाणी मारले. कोणी लिंबू लावले. पण अण्णा केव्हाच जग सोडून गेले होते.
त्या रात्री गावातील ब्राह्मणाच्या स्मशानात दोन प्रेते बाजूला बाजूला जळत होती. आणि एका झाडाखाली बसून चंद्या अश्रू ढाळत होता... -प्रदीप केळुसकर