शेअर मार्केट मधील फसव्या App द्वारे फसवणूकीचा नवा फंडा

शेअर मार्केट मधील करोडो अब्जो रुपयाच्या उलाढालीच्या बातम्या पाहून, वाचून अनेकजण आपणही यात पैसे कमवण्यासाठी प्रयत्न का करू नये, असा विचार करीत असतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन तर असतोच असतो. मग काही सायबर भामटे व्हाट्‌सअपवर फेक मेसेज, लिंकग्रुप वर जॉइन होण्यासाठी लिंक पाठवण्याचा सतत मारा करत असतात. ते कीतीही वेळेस डिलीट केले तरी सतत व्हाट्‌सअपवर त्या लिंक येतच रहातात. मग आपण ऊत्सुकतेपोटी त्या लिंकवर क्लिक करून ओपन करतो...आणि फसतो.

...पण हे लक्षात येऊपर्यंत उशिर झालेला असतो. आपल्याकडून तो ग्रुप जॉइन केला जातो. मग त्यांचे शेअर मार्केट ट्रेडिंग चे ॲप (App) जे की ते फेक असते. ते आपल्याला डाउनलोड करायला सांगितले जाते. त्यात OTC आणि IPO असे दोन ट्रेडिंगचे प्रकार असतात. त्यानंतर त्या भामट्यांचा एक Whats App discussion Group नावाचा ग्रुप असतो. त्या ग्रुपवर आपल्याला जॉइन केले जाते. त्या ग्रुपवर जवळपास ८०-९० % हे सर्व त्यांच्याच गँगचे भामटे लोक असतात. जेव्हा त्यांचे हे फेक ट्रेडिंग ॲप (App) जॉइन केल्यानंतर ते त्यात आपले अकाऊंट ओपन करतात. लॉगिन, पासवर्ड दिला जातो. त्याचबरोबर आपले बँक डिटेल्स, आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर हे सर्व सोपस्कार पूर्ण केले जातात. नंतर ते आपले अकाऊंट रीचार्ज करायला सांगतात. म्हणजे आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी त्यात पैसे टाकायला सांगतात. कमीत कमी पाच हजारापासून ते जास्तीत जास्त कितीही असू शकतात. ते पैसे जमा करण्यासाठी ते एक अकाऊंट नंबर देतात. त्यातील काही नावे तपती जलधारा, चिकन सेंटर, मटन सेंटर, ट्रेडिंग कंपनी आदि. अनेक विविध नावाने असतात आणि हे अकाऊंट फक्त ३० मिनिटेच ॲक्टिव राहील असे ते आपल्याला सांगतात. त्या दरम्यान त्यात पैसे नाही टाकता आले तर परत दुसऱ्या बँकेचे अकाऊंट नंबर देतात.

अशा प्रकारची अनेक अकाऊंट त्यांचेकडे असतात. मग त्या App अकाऊंटमधील जमा रकमे (Balance) नुसार आपल्याला OTC अन्डर शेअर खरेदी करायला सांगतात. ते एका कंपनीचे नाव देवून त्या कंपनीचे शेअर खरेदी करायला सांगतात आणि त्या कंपनीच्या शेअरवर १० %, ३० %, ५० % अशा प्रकारचा वेगवेगळा, आपल्या जमा असलेल्या रकमेनूसार सूट (Discount) देण्यात येतो. मग शेअर खरेदी केल्या-केल्या लगेच त्यात आपल्याला फायदा झाल्याचे दिसते आपली रक्कम वाढलेली असते. हा प्रकार दुपारी २ ते ४ वाजे पर्यन्त चालतो. मग दुसऱ्या दिवशी आपण खरेदी केलेल्या शेअरमध्ये ५० % ते १०० % अधिक टक्के फायदा झालेला दिसतो. ग्रुपमध्ये सामील असलेले त्या गँगचे भामटेही लाखोचा फायदा झाल्याचे स्क्रीन शॉट त्या ग्रुपवर टाकत रहातात. त्या फायद्याचे स्क्रीन शॉट बघून आपले डोळे चक्राऊन जातात. आपणही एवढे पैसे कमवू शकतो असे आपल्याला वाटायला लागते. मग आपण अजून त्या अकाऊंटमध्ये पैसे टाकत रहातो. आपल्याला त्या ॲप (App) मधील अकाऊंट वर लाखो रुपये फायदा झाल्याचे दिसते. तसेच रोज त्या फायद्यात लाखोची वाढ होत असल्याचे आपल्याला दिसत राहते. मग हे भामटे नवीन आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास अजून २००  % ते ५०० % फायद्याचे आमिष दाखवतात. ग्रुपमधील अनेकांना २०० ते ५०० % फायदा झाल्याचे स्क्रीन शॉटही ग्रुप मधील भामटे टाकत रहातात. मग नव्या आयपीओ चे नाव App टाकले जाते.

ग्रुपमधील भामट्यांना झालेल्या फायद्याचे स्क्रीन शॉट बघून तो आयपीओ Subscribe करण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. आयपीओवर टच केल्यानंतर IPO Subscribed असे दिसते. येथेच आपल्या फसवणुकीला सुरुवात होते. पहील्या दिवशी तो आयपीओ किती रुपयेचा आणि किती quantity चा खरेदी झालेला आहे ते त्यात दिसत नाही. मात्र दुसऱ्या दिवशी आपल्या अकाऊंटमधील पूर्ण रक्कम त्या आयपीओ मध्ये ( IPO) लॉक झालेली दिसते. अकाऊंट मधील जमा रकमेपेक्षा जास्त रकमेचा आयपीओ खरेदी (Subscribed) केल्याचे त्यात दिसते. कारण त्या APP मध्ये आयपीओच्या खरेदीची Quantity ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसतो. जर समजा त्या APP अकाऊंटमध्ये १० लाख रुपये जमा असतील तर १५ लाखाची त्याआयपीओ ची खरेदी (Subscribed) केल्याचे त्यात दिसते. मग अकाऊंटमधील आपले १० लाख रुपये त्या आयपीओत लॉक केले जातात. ते अनलॉक करायचे असल्यास परत ५ लाख त्या अकाऊंटवर जमा करावे लागतील असे सांगितले जाते. मग आपण ते दहा लाख अनलॉक करण्यासाठी ५ लाख रुपये अजून त्यात जमा करतो. ५ लाख रुपये जमा केल्या नंतर ती पूर्ण रक्कम अनलॉक झाल्याचे त्या APPअकाऊंट वर दिसते. मग आपल्या त्या अकाऊंट मध्ये १५लाख बॅलेन्स दिसतो. मग आपण त्यातील काही रक्कम काढून घेन्याचा (withdraw) विचार करतो. त्यानुसार तसा त्या APP द्वारे आपण अप्लाय करतो. आपण पैसे काढून (withdraw) घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत हे त्यांना लगेच समजते. यानंतर हे APP वाले भामटे परत ती रक्कम एका नवीन आयपीओ मध्ये लॉक करून टाकतात आणि अजून पैसे जमा करायला सांगतात. तेव्हाच आपली पूर्ण रक्कम अन लॉक होईल असे सांगीतले जाते.

आपल्या जोपर्यन्त लक्षात येत नाही तोपर्यन्त हे असेच सुरू राहते. जेव्हा आपल्यासोबत फसवणूक होत आहे आणि आपल्या हे लक्षात आलेले आहे हे त्यांना कळते तेव्हा हे सायबर भामटे आपला APP ACCESS  लॉक करुन टाकतात. तसेच ग्रुपमधून आपला नंबरही डिलीट करून टाकतात. फोन उचलणे बंद करतात. साहजिकच आपला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट संपतो. मग आपली पूर्णपणे फसवनूक झाली आहे हे आपल्या लक्षात येते. यानंतर आपण काय करणार आहोत हे साईबर गुन्हेगाराला माहीत असते. साहजिकच अनेकजण सायबर क्राइम पोलिसाकडे तक्रार करतात. ऑनलाइन पोर्टलवर किवा हेल्पलाइन नंबरवर ही तक्रार केली जाते. हे त्या भामट्यांना माहीत असते. हे ते ओळखून असतात. सायबर क्राइम पोलिस आपली तक्रार आल्यावर त्या भामट्याचे अकाऊंट लॉक, होल्ड करतात. त्यांचे असे अकाऊंट लॉक, होल्ड करून काही उपयोग होत नाही. कारण हे भामटे आपण पैसे जमा केलेले अकाऊंट फक्त ३० मिनीटासाठीच वापरत असतात. त्याच दरम्यान त्या अकाऊंटमध्ये जमा झालेली पूर्ण रक्कम ते लगेच काढून घेतात. त्यामुळे सायबर क्राइम पोलिसही हतबल होतात. मग पोलिस स्टेशनमध्ये चकरा मारणे सुरू होते. हाती काहीच लागत नाही. हे भामटे शक्यतो पर राज्यातील, कदाचित बाहेरच्या देशातीलसुद्धा असू शकतात. अशा प्रकारे त्यांची फसवणुकीची नवी पद्धत आहे. अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या रोज नवनव्या तक्रारी सायबर क्राईम पोलिसाकडे येत आहेत. त्यामुळे अशा फेक अप (APP) वर विश्वास ठेऊ नये. असे पोलीसाकडून सांगण्यात येत आहे. सावध राहणे एकच पर्याय आहे. - व्ही.एम.देशमुख 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

वाट घटस्फोटाची!