वाट घटस्फोटाची!
ताई मी चहा घेऊन लगेच निघेन, घरात शिरताच वरदने सांगितले.
दादा, कसली रे एवढी घाई? अरे, नेहाला तर भेटून जा, येईलच ती एवढ्यात. ‘नेहाला भेटायला मिळणार, मग माझे सर्व प्रोग्रॅम्स रद्द,' खुश झालेल्या वरदने सांगितले.
‘ताई, नेहा कधी आली? किती दिवस राहणार आहे इथे? कशी आहे ती?'
‘ती बरी आहे' असे म्हणणाऱ्या सावित्रीचा उतरलेला चेहरा वरदच्या चाणाक्ष नजरेतून सुटला नाही. तेवढ्यात नेहाने घरात प्रवेश केला त्यामुळे वरद आणि सावित्री गप्प झालेत. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत चहा पिऊन झाला.
‘नेहा तुझे कसे चाललेय?' वरदने विचारले.
‘अगदी छान चाललंय.' नेहा म्हणाली.
‘बेटी, अगं वरद तुझ्यावर जिवापाड प्रेम करणार तुझा मामा आहे, का लपवतेस त्याच्यापासून?' सावित्रीबाई म्हणाल्या.
‘ताई, काय झाले? मला नीट सांग,' वरद म्हणाला. नवऱ्याने मारलं म्हणून रागारागात माहेरी आली. आमची मुलगी का जड आहे आम्हाला? अशा अंगावर हात उगारणाऱ्या राक्षसाकडे पाठविण्यापेक्षा घटस्फोट मागेन मी, निश्चयी सुरात सावित्रीबाई म्हणाल्यात.
‘ताई, मला नेहाकडून ऐकायचे आहे, तीला बोलू दे.'
‘काय बोलणार माझं कोकरू? पश्चात्ताप करतेय ती, राजशी लग्न केल्याचा.' आपली बहीण लेकीला काही बोलू देणार नाही याची वरदला कल्पना होती.
‘ताई, मी आणि नेहा बाहेर जाऊन येतो, आम्ही जेवण बाहेरच करू, तेवढाच नेहाला जरा चेंज मिळेल. आम्हाला घरी यायला उशीरच होईल,' वरदने सांगितले.
‘माझी काहीच हरकत नाही, तुझी भाची तयार आहे का? तीलाच विचार'.
वरद आणि नेहा घराबाहेर पडले आणि नेहा बोलती झाली. ‘मामा, मी कॉलेजला शिकत असताना ज्या कंपनीत प्रोजेक्टसाठी जायचे त्याच कंपनीत राज कामाला होता. आमची ओळख झाली, परिचय वाढला आणि त्याचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. मी राजला घरी बोलावले. राजच्या सामान्य परिस्थितीमुळे आई-बाबा थोडे नाराज होते परंतु त्याची हुशारी, मोठे पद आणि समजूतदारपणाची वागणूक पाहून आई-बाबांनी आमच्या लग्नाला परवानगी दिली. एवढ्या श्रीमंत घरची मुलगी, ती आपल्या घरी ॲडजेस्ट होईल का? राजच्या आई-बाबांना काळजी होती परंतु राजपुढे त्यांचे काहीही चालले नाही. लग्नानंतर सासुबाई आमच्याकडे दोन-तीन महिने येऊन राहिल्या, अगदी मुलीप्रमाणे माझ्यावर प्रेम करू लागल्या. मला स्वयंपाक अजिबात करता येत नव्हता; परंतु त्यांनी मला तो शिकवला आणि मी चांगला स्वयंपाक करू लागले. माझे आणि त्याच्या आईचे छान जमते हे बघून राजही खूप खुश होता. माझे सासरे शेती करण्यात व्यस्त असायचे. दर तीन महिन्यांनी सासूबाई यायच्या. शेतातले गहू, तांदूळ ज्वारी, बाजरी, भुईमूग वगैरे घेऊन. त्या आल्या की आठ दिवस राहायच्या. दिवस अगदी मजेत जात होते.
माझे बाबा त्यांच्या व्यवसायात तर आई तिच्या नोकरीत मग्न होती. दर रविवारी राज आणि मी माझ्या आणि त्याच्या आईबाबांशी बोलायचो. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला माझ्या आई-बाबांनी केक आणि गिपट ऑनलाईन पाठविले; तर राजच्या आई बाबांनी स्वतः उपस्थित राहून आमचे कौतुक केले. नेहा, तु खूप मोठ्या घरची मुलगी; परंतु आमच्यात मिसळलीस.. म्हणत राजच्या बाबांनी माझी मनसोक्त प्रशंसा केली. सासुबाई आल्या की मला शक्य तेवढी मदत करायच्या. सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी मी आणि त्या मिळून नाश्ता करायचो; तर राज चहा करायचा. चहा, नाश्ता एकत्र घ्यायचा आणि त्यानंतर मी आणि राज ऑफिसला बरोबर जायचो. माझी आई निवृत्त झाली, त्यानंतर मी आणि राजने आग्रहाने आईला बोलावले. आई आली त्यावेळी सासूबाईदेखील आमच्याकडे होत्या. मला नाश्ता बनवताना बघून आईला खटकले. पुढचे दोन-तीन दिवस मी नाश्ता बनवत असताना आई मला मुद्दाम बाहेर बोलवून घ्यायची आणि नाश्ता करण्याची पूर्ण जबाबदारी माझ्या सासूबाईंवर पडायची. सासुबाई काहीही बोलल्या नाही; परंतु राजला ते खटकल्याचे मला जाणवले. दुसऱ्या दिवशी आम्ही माझ्या आईला आणि सासूबाईंना घेऊन मॉलमध्ये गेलो. दोघांसाठी साड्या आणण्यासाठी. सासुबाईंना पसंत पडलेली साडी बरीच महाग होती तेव्हा आई म्हणाली, तुम्ही लहानशा गावात राहता.. कशाला घेता एवढी महाग साडी. माझ्या आईने खूप भारी; तर सासुबाईंनी अगदी कमी किमतीची साडी घेतली. आईच्या बोलण्याने सासूबाई आणि राज मात्र नक्कीच दुखावले गेले.
नंतर आईचे आमच्या घरी येणे वाढले. तीला वाटायचे की मी काहीच काम करू नये आणि सर्व काम माझ्या सासूबाईंनी करावे. मला हे पटत नव्हते; परंतु आईच्या दबावामुळे मला काही बोलताही येत नव्हते. राज मात्र त्याच्या आईला सर्वतोपरी मदत करत होता. आई आणि सासुबाई तशा समवयस्क; पण सासूबाईंशी न बोलता फक्त माझ्याशी बोलायचे, राजकडे सुध्दा दुर्लक्ष करायचे; हे राजला आवडत नव्हते.
कंपनीने राजला दोन महिन्यांसाठी दिल्लीला पाठविले. मी एकटी होते म्हणून सासूबाई आमच्या घरी आल्या. एके दिवशी सकाळी माझ्याकडून स्वयंपाकघरात पाणी सांडले आणि मी ते पुसायला विसरले. सासुबाईंना उठायला थोडा उशीर झाला होता म्हणून त्या घाईघाईत स्वयंपाक घरात शिरल्या आणि पाय घसरून धपकन पडल्या. त्यांच्या उजव्या हाताला आणि डाव्या पायाला दुखापत झाली. त्यांच्या पडण्याची सर्व जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेऊन माझ्या चुकीवर पांघरूण घातले. मदतीला म्हणून मी आईला बोलावून घेतले. सासुबाईंच्या हाताला आणि पायाला खूप सूज आली होती म्हणून मी त्यांना डॉक्टरांकडे नेले. डॅाक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एक्स रे काढले. हाताला आणि पायालाही फ्रॅक्चर होते. सहा आठवडे विश्रांती घ्या डॉक्टरांनी सांगितले. नेहाने राजला कळविले तेव्हा तो पटकन म्हणाला, नेहा तू काळजी करू नकोस मी लवकर परत यायचा प्रयत्न करतो. प्लीज तु आईची काळजी घे.
नेहा बेटी, इतरांची दुखणी काढण्यापेक्षा स्वतःच्या तब्येतीकडे आणि करिअरकडे लक्ष दे, आई सारखी मला सांगत होती. आईच्या दबावामुळे मी आणि आईने सासुबाईंना त्यांच्या घरी पोहोचविले. आता मात्र आई खुश होती आणि मीही जरा निवांत झाले होते. आईही तिच्या घरी परत गेली.दोन दिवसांनी राज परतला आणि घरात शिरताच तो आईच्या रूमकडे गेला. आई रूममध्ये नाहीये, आई कुठे आहे? राजने विचारले. सासूबाईंच्या त्या अवस्थेत मी त्यांना गावी सोडले हे समजल्यावर राजचा संताप अनावर झाला. राज माझ्या अंगावर धावून आला आणि माझ्या गालावर मारणार तोच त्याचा फोन वाजला म्हणून मी बचावले. त्याच्या आईला भेटण्यासाठी राज गावी गेला. माझ्या आईला हे सर्व सांगितल्यावर आईने मला घरी बोलावून घेतले
‘नेहा, तुला माहेरी येऊन किती दिवस झाले?' वरदने विचारले.
‘आज आठ दिवस झालेत.' नेहा उत्तरली.
‘राजपासून घटस्फोट घ्यायचा?'
‘नाही, नाही मामा. अरे आमचे एकमेकांवर अतोनात प्रेम आहे.'
‘राजचा कधी फोन आला होता का?' वरदने विचारले.
‘हो पाच वेळा आला होता परंतु मी फोन घेतला नाही.' आई म्हणाली, ‘अजिबात बोलू नकोस, येऊ दे त्याला नाक घासत.'
वरदने नेहाला संसार, त्यातील रुसवेफुगवे, करावी लागणारी तडजोड, नवरा बायकोरूपी संसार रथाची दोन चाके, त्यांच्यातील सुसंवाद, अधूनमधून येणारी वादळे वगैरे गोष्टी नीट समजावून सांगितल्या. नेहालाही ते पटले. ‘आय ॲम सॅारी मामा' म्हणत नेहाने चूक मान्य केली. वरदने राजला फोन लावला. राज वरदशी छान बोलला आणि बोलता बोलता त्याने नेहाच्या अंगावर हात उगारल्याचे मान्य करत माफी मागितली.
‘मी उद्या तुमच्या आईंना भेटायला येतो' वरद म्हणाला.
‘मामा, नेहालापण आणा ना. ती माझ्यावर रागावली आहे, माझा फोनही घेत नाही. मी विनवणी करतो, माझ्या नेहाला तुमच्याबरोबर आणा.'
‘नेहा तूपण येशील का माझ्याबरोबर?' वरदने विचारले.
‘नक्की येईल पण फक्त भेटायलाच नव्हे, तर आईंना परत आमच्या घरी आणायला. आता मी त्यांना सासूबाई नव्हे तर ‘अहो आई' म्हणणार, नेहा म्हणाली. ‘राज मी आईंच्या सेवेसाठी महिनाभर रजा घेणार आहे बरं का,' नेहाने सांगितले.
‘नेहा, तु रजा घेण्याची काहीही गरज नाही. तुझ्या मदतीला माझ्या सौभाग्यवतीला म्हणजेच तुझ्या मामीला मी पाठवणार आहे, चालेल ना?'
‘क्या बात है मामा,' राज आणि नेहा आनंदाने म्हणाले.
हसत खिदळत आलेल्या मामा भाचीला पाहून नेहाची आई आश्चर्यचकित झाली. ‘ताई, नेहाच्या आयुष्यातील अंधःकार संपला आहे आणि स्वच्छ प्रकाशाने तीच्या दैदिप्यमान आयुष्याची पुनश्च सुरुवात झाली आहे.'
‘दादा, काय ते नीट सांगशील का?' नेहाने सर्वांना आईस्क्रीम दिले आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेत वरद बोलु लागला. ‘ताई, राज आणि नेहा हे मेड फॉर इच अदर जोडपे आहे. जगु दे त्यांना हवं तसं. त्यांचं चुकलं तर प्रेमाने सांग; पण नकळत त्यांच्यात अंतर पडेल असे काही करू नकोस. चूक त्यांची नाही तर तुझी आहे. सावर स्वतःला. नेहावर तुझा जेवढा हक्क आहे त्यापेक्षा जास्त हक्क आहे राज आणि त्याच्या आई-बाबांचा. राजने फक्त हात उगारला, मारले नाही. नेहाला समजावण्याऐवजी तु तीला भडकावते आहेस. नको बनूस त्यांच्या घटस्फोटाचे कारण. नेहावर करतेस तेवढेच प्रेम कर राज आणि त्याच्या फॅमिलीवर. तोडू नकोस, जोड त्यांना.'
आज वरदने त्याच्या लाडक्या बहिणीला खडे बोल सुनावले होते. आयुष्यात प्रथमच नेहाचे बाबा त्यांच्या मेव्हण्यावर खुश झाले होते. वेल डन वरद असे मनातल्या मनात म्हणत होते. सकाळी नेहा आणि वरदच्या आधीच सावित्रीबाई कारमध्ये जाऊन बसल्या, राजच्या आईंना भेटायला आणि त्यांना त्यांच्या मुलाच्या नी सुनेच्या घरी आणायला.
सावित्रीबाईंमुळे घटस्फोटाकडे सुरु झालेली वाटचाल त्यांच्या बंधूराजाने सफाईने थांबविली होती. ‘परमेश्वरा, तूच पाठविलेस रे माझ्या बंधूराजाला' म्हणत त्या वरदला म्हणत होत्या, ‘चल दादा, मला माझ्या सखीला भेटायचे आहे, माझ्या राजच्या आईला.' सावित्रीबाईंमध्ये अचानक झालेला हा अनपेक्षित बदल पाहून मामा आणि भाची दोघेही स्तंभित झाले. ‘परमेश्वरा, हा बदल तात्पुरता नको तर कायमचा असू दे रे बाबा,' म्हणत वरदने गाडी सुरू केली. -दिलीप कजगांवकर