पतंग उडवू चला

संक्रांतीनिमित्त जिकडेतिकडे पतंग उडवले जातात. मलाही पतंग खूप आवडतात  व तेही बालपणापासून, अगदी पतंग बनवण्यापासून, मांज्या बनवण्यापर्यंत सगळ काही जमतं. आमच्या लहानपणीच्या घराला मोठी गच्ची होती व गल्लीत दोन तिन, गुजराती ‘पतंग तज्ञ'  मित्र होतेच की! मग काय आम्ही पतंगांचे डॉ.च झालो! तसे आमच्याकडे सगळ्यांनाच पतंग उडवायला आवडते.

शनिवारची दुपारची वेळ होती. मी सवयी प्रमाणे वामकुक्षी घेत होतो. थोडीशी झोप लागली असेल नसेल, एकदम मुलांचा गलका खाली आला ‘पतंग ‘पतंग!!' मी दचकून खाली डोकावलं. तर काय ? आमचे चिरंजीव व ४/५ सोसायटीतील मुले पतंगाचा गठ्ठा  घेउन बसले होते. चिरंजीव ऊत्स्फुर्तपणे म्हणाला ‘कोण कोण पतंग उडवायला येणार?' आमच्या नातवंडांचा होकार सर्व प्रथम ‘मी'  ‘मी' करुन !! लगेच बाकीच्यांनी ‘मी पण,मीपण'‘म्हणून ‘मम' म्हंटलं ! एक दोन पतंग हातात घेउन घरातच उडवायलाही लागली ! तर काही आपापल्या मित्र मैत्रिणींना हाक मारुन बोलवू लागली ! मग काय आमचे नातवंड मागे थोडेच रहातील ! नातू आयन व नात अर्ची, धाडधाड करीतच माझ्या खोलीत धडकली व आबा, उठा, चला !पतंग उडवायला! असे म्हणत हात, पाय ओढू लागली .आतां मी मात्र ‘गलितगात्र' झालो, अरे ‘हो हो म्हणत सावरलो ! मला व त्यांना चांगले माहित होते की आबांना, पतंग उडवणे आवडते.

हे अगदी खरं ! की मला पतंग खूप आवडतात  व तेही बालपणापासून, अगदी पतंग बनवण्यापासून, मांज्या बनवण्यापर्यंत सगळ काही जमतं. आमच्या लहानपणीच्या घराला मोठी गच्ची होती व गल्लीत दोन तिन, गुजराती ‘पतंग तज्ञ'  मित्र होतेच की! मग काय आम्ही पतंगांचे डॉ.च झालो! तसे आमच्याकडे सगळ्यांनाच पतंग उडवायला आवडते, मुलगा तर कायम तत्पर !! केंव्हाही चला, गडी रेडी, अगदी परदेशातसुद्धा त्याने वेगवेगळ्या आकाराच्या व रुपाच्या पतंगी घेउन बीच वर उडवल्या आहेत व सोबतीला तितकीच हौशी पत्नी पण असणार ! असो ! खाली हॉलमधे बरीच मुले जमली होती. जयवंत (चिरंजीव) एखाद्या शिक्षकाप्रमाणे प्रत्येकाला, पतंगाला ‘कन्नी' कशी बांधायची हे व्यवस्थित समजून सांगत होता. काही गावात कन्नीला वेगवेगळी नांव आहेत जसे की मंगळसूत्र वगैरे. क्लास जोरात सुरु होता प्रत्येकाची लगबग चालू होती. एकमेकांची कॉपी करायला ‘फूल्ल' परवानगी होती, तरीसुद्धा चुकणारे होतेच. शिक्षक जय व मी मदतिला होतोच नां! परिक्षेची ५ वा. वेळ होती, प्रत्येकजण काही  ना काही धडपड करत होता, अर्ची, आयन प्रत्येकाला आवश्यक ‘सामुग्री' पुरवत होते, काही घरोघरी जाउन गँग वाढवत होती. नातवंडांचे मित्र जमले. आयन, अर्ची, अनय, अनन्या आरोही, मैत्री जमले. गलका सुरु झाला. पतंग उडवायला जायचं ठरलं टेकडी' वर तेही ‘वेताळ टेकडी (ARAI). आमची Discovery तयारच होती अनयच्या वडिलांनी आपली Verna काढली मग काय सगळ्यांची छान सोय झाली उडायला तयार झालेली पतंग मुलांनी गाडीत व्यवस्थित ठेवली, चक्री मांजा, प्यायला पाणी कात्री सेलो टेप वगैरे सामग्री आठवणीने घेतली. मग कोणत्या गाडीत कोणी बसायचं हे समजुतदारपणे (?) ठरले काहींना अक्षरशः कोंबले, मुलांचे आई वडिलही तितक्याच उत्साहाने, आनंदाने सोबतीला आले, तेवढ्यात एकाने जवाबदारीने ‘मास्क' ची आठवण दिली व सगळी पलटण वेताळ टेकडी वर एकदाची निघाली ! गाड्यांमधून पटापट उड्या मारत सगळे पटांगणात आली. प्रत्येका ने ३-३ चा ग्रुप करुन पतंग व चक्री सकट पटांगणाचा एक एक कोपरा पकडला. जोश मुलांसकट आई वडिलांनाही होता ! पतंग उडवायची पळापळी सुरु झाली, एकमेकांना सूचना देणे सुरु झाले, ‘अरे ! तू पतंग उलटा पकडलाय!' तर दुसऱ्याकडून ‘अग ! जंप मारुन पतंग वरती सोड' मधूनच आवाज येई , ‘अरे! तूला काही जमत नाही; दे मला बघ मी कशी उडवतो' लगेच प्रत्युत्तर, ओअरे यार ! ही पतंग बरोबर नाही', तुझी दे! दुसरा मंजुळ आवाज, ‘अग ! हा मांजाच कच्चा आहे, म्हणून उडत नाही' वगैरे वगैरे सर्वच आपापल्या परी, वरिष्ठांच्या सूचनांकडे लक्ष (न ) देतां वा कधीमधी पळून, पतंग उडवायची धडपडत करत होते पण काय झाले कोणास ठाऊक एकाचीही पतंग निट उडेना. पाच दहा फूट उंच जाउन परत गिरक्या मारत ‘भू माता' काही सोडत नव्हती सगळे अदल बदल करुन पाहिले; पण हॅट मी उडणार नाही..म्हणजे नाही !! असा निश्चय सगळ्याच पतंगांनी केला होता की काय ? असे मनाला चाटून गेले ! मी एका कोपऱ्यात ऊभा होतो, सगळी गंमत बघत होतो, अरे कोणाचीच पतंग उडत नाहीये, जरा आपणही आपला हात दाखवूया असा विचार करुन मैदानांत उतरलो. एकाची पतंग,चक्री घेतली पतंगीला हलकासा बाक दिला, कन्नी उगिचच चेक केली व पतंग उडवायला तय्यार झालो ! एकाच्या हातात चक्री दिली काही बारीकशा सूचना दिल्या, त्यातला एका चुणचुणीत मुलाच्या हातात पतंग सोपवली व मी इशारा केला की दोन्ही हात उंच करुन आकाशाकडे सोडायची. बस इशारा पाहून मूलाने पतंग हवेत सोडली, मी पण सर्व कौशल्य लावल थोडी फार उंच गेली,मुलांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला; पण पतंग काही निट उडेना. परत प्रयत्न केला; पण नेहमी उंच गरुडासमान भरारी मारणारी माझी पतंग दोन चार गिरक्या घेउन जमीनीवरच लँडींग काही सोडू इच्छित नव्हती. मी पण वेगवेगळ्या दिशांचा प्रयत्न केला पण छे! अजिबात टेकअप होतंच नव्हती ! सर्वांसह मी पण हताश झालो. गाडीत येउन बसलो, विचार करु लागलो आज आपल्या पतंगी का रुसल्याय ? तो पर्यंत सर्वांनी आपला गाशा गुंडाळून गाड्यांकडे परंतु लागले होते ! तरी पण बच्चे कंपनी खूष होती; जो काय पतंग उडवायचा आनंद घ्यायचा तो त्यांनी मनसोक्त लूटला होता ! घेतला होता !! मी मात्र आज चांगली वाहती हवाच नाही ! अशी स्वतःची समजूत करुन घेत होतो व तेच खरं होतं का ? (वेताळ टेकडी (?) या संभ्रमात बराच वेळ होतो!! - अनिल देशपांडे 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

राज्यात मराठी भाषेचे महत्व वाढणार केव्हा?