आजीचे लिखाण
नातवंडांच्या आयुष्यात, आज्यांचं आणि आजोबांचं किंवा ओल्ड माणसांचं बरेच योगदान असते. परदेशातली मुल मुलींना तर बाळंतपणाला आजी आजोबा यावे हे प्रकर्षाने वाटतं. यातच हा आजी-आजोबांचा उपयोगिता सिद्धांत आहे. या कामासाठी उपयोगिता, मार्गदर्शन या गोष्टीमुळे हे जाणवतं की साठ वर्षावरील वयस्कर लोक आनंदाने जगू शकतात. आधुनिक मुलांच्या उपयोगी पडू शकतात.
हल्लीच्या दिवसात आपण वाचत असलेल्या साहित्यातील बरेचसे साहित्य हे आजीचे साहित्य म्हणावे असे आहे. उपदेश, आठवणी, पर्यटन असे वृद्ध आजी-आजोबांनी लिहिलेलं साहित्य वाचन समूहात फिरते आहे. त्यात आजोबांपेक्षा, आजींचे लिखाण छापले जाण्याचे प्रमाण अधिक आहे. तरुण मुलं-मुली मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये इतकी रमली आहेत की, त्यांना वाचनाचे आकर्षण कमी झालं आहे.
प्रत्येकाचा आपला आपला मतप्रवाह आहे आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मतप्रवाह वेगळा आहे. हा जुना जाणता विचार जो ते शब्दात मांडून व्यक्त करतात, तो वाचला जातो. वृद्ध आज त्यांचं त्यांचं जीवन त्यांच्या परीने आनंददायी बनवत जगत आहेत. घरोघरीची मुलं परदेशी अथवा स्वतंत्र घर करून याच देशी राहत आहेत. पण वृद्ध जीवनाची, त्यांची लकाकी घालवायला तयार नाहीत. अर्थात समाजाला पण त्यांचं लिखाण, त्यांचं त्यांचं स्वतःच्या गोष्टींमध्ये रमून आनंद घेणं, राहणी याला काहीही आक्षेप नाही.
वाढता वयाचा आकडा हा एक आकडा आहे. वय मनाने वाढलं नाही, तर सर्व ठीकठाक आहे. अशा पोस्ट नेहमी ज्येष्ठ नागरिकांच्या समूहात फिरत असतात.
आज एकविसाव्या शतकात, आपल्या देशीसुद्धा नवीन लाइफस्टाइल आली. जीवनशैली बदलली. जागतिकीकरण झालं. अगदी खेडोपाड्यातली पोरंसुद्धा परदेशी गेली आणि आपला देश हा ग्लोबल व्हिलेज बनला. या आधुनिक जीवनशैलीसोबत स्वतःची संस्कृती, परंपरा, जुने काही संस्कार आणि आधुनिकता याचा मेळ घालून जेष्ठ नागरिक आनंदाने वावरतात. कुटुंब आणि जबाबदारी पार पाडत, झेपेल अशा करमणूकीचा शोध घेत आपलं काम पार पडत आहेत.
आपण हे मान्य करायलाच हवं की नातवंडांच्या आयुष्यात, आज्यांचं आणि आजोबांचं किंवा ओल्ड माणसांचं बरेच योगदान असते. परदेशातली मुल मुलींना तर बाळंतपणाला आजी आजोबा यावे हे प्रकर्षाने वाटतं. यातच हा आजी-आजोबांचा उपयोगिता सिद्धांत आहे. या कामासाठी उपयोगिता, मार्गदर्शन या गोष्टीमुळे हे जाणवतं की साठ वर्षावरील वयस्कर लोक आनंदाने जगू शकतात. आधुनिक मुलांच्या उपयोगी पडू शकतात. आधुनिक काळामध्ये,आपल्या कृतीने काही योगदान देऊ इच्छितात.
हल्लीच्या या आज्या बालकांमध्ये बालक होतात. तरुणांमध्ये तरुण होतात. वय वाढल्यामुळे, त्यांच्या समवयस्क आपल्या समूहात त्यांना त्यांचं जेष्ठत्व व आजार यांची जाणीव होत असते. ज्येष्ठ नागरिकांच्या कट्ट्यांवर समूहामध्ये मंडळामध्ये देखील हे जेष्ठ लोक सामील होतात आणि आनंद उपभोगतात. ज्येष्ठ नागरिकांच्या काही काळ बाहेर जाऊन, अन्य मित्र-मैत्रिणींमध्ये रमण्यामुळे घरच्यांना देखील थोडीफार सुविधा, फावला वेळ, एकांत मिळतो.
एक आजी म्हणतात, रोज मी माझ्या कालच्या वागणुकीपेक्षा आजची वागणेची पद्धत सुधारते. स्वतःच्या आरोग्याकडेपण लक्ष देते आणि इतरांना पण आनंदी करायचा प्रयत्न करते. कधी कधी रागात नकळत एखादा वाकडा शब्दपण माझ्या तोंडून निघून जातो. तो तरुणांच्या भलाईसाठी असतो. मुलांना नातवंडांना राग येतो. पण माझं कर्तव्य मी करते. शालेय पुस्तक बोध कथेत, चोरी करणारा मुलगा, न्यायाधीशांनी शिक्षा दिल्यावर आईच्या कानाचा चावा घेत असतो. आईला शिक्षा करतो, कारण की आईने त्याला वेळीच शिक्षण दिलं नाही. वेळीच रागवलं नाही आणि त्याला गुन्हा करण्यापासून अडवलं नाही. ती जाण असल्यामुळे आम्ही आजी आजोबा असूनही थोडे वेडेवाकडे बोललो देखील!
आधुनिक जीवनशैलीशी आणि ह्या नातवंडांच्या आधुनिकतेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न आज्या करतात. पुढच्या पिढीला नेहमीच वाटत असतं मागच्या पिढीपेक्षा पण अधिक स्मार्ट आणि हुशार आहोत. (आठवा, आपल्या पिढीलापण तसं वाटत होतं.) वयाने जुनं झालंतरी सोन्याची किंमत थोडी कमी होते (घट निघते ) अधिक नाही. तसे ज्येष्ठ नागरिक हा श्रेष्ठ खजिना आहे. तरुण वयात त्यांनी सुद्धा पुष्कळ कार्य केलं आहे. शक्ती कमी झाल्यामुळे ते मंद झाले. थकल्यामुळे किंवा परिस्थिती बदलल्यामुळे अन्य कारणामुळे ज्येष्ठ नागरिक पूर्वी एवढे सक्रिय राहू शकत नसतील, तरीही ते आपल्या परीने या समाजहितासाठी तुमच्या कुटुंबासाठी नातवंडांसाठी मुलांसाठी सहभाग घेऊन मदत करत आहेत.
आर्थिक व्यवस्थेचा हे ज्येष्ठ नागरिक कणाच म्हणायला हवे. कारण की बऱ्याच प्रमाणात आर्थिक बचतीचे, साठलेल्या गंगाजळीचे अर्थ व्यवस्थेतील प्रमाण हे जेष्ठ नागरिकांचे साठवलेले पैसे हे आहे. मृत्यूनंतर हे ज्येष्ठ नागरिक सोबत घेऊन जाणार नाही. त्यामुळे ही आर्थिक सुबत्ता पैशाची, बचतीची थैली ते पुढच्या पिढीलाच देणार आहेत.
तर सारांश काय? वृद्धापकाळ अटळ असतो. याचा दृष्टा स्वीकार करत तरुणाईची घर्षण होणार नाही याची काळजी घेत समजून घेत जगायला हवं. नवीन छंद, नवीन गोष्टी, त्यांच्याशी जुळवायचा, वृद्ध लोक प्रयत्न करतात. पण ते सोपंदेखील नसतं. तरुणाईने देखील जेष्ठांना समजून घ्यायला हवं.
वर्षानुवर्षे कष्ट केल्यावर जेष्ठ थकलेले असतात आणि त्यांना स्वतःचा काहीतरी वेळ स्वतःच्या छंदासाठी, स्वतःच्या कामासाठी, आरामासाठी हवा असतो. किरकोळ पर्यटन, देवदर्शन,मित्र-मैत्रिणींशी बोलणं, शरीराची काळजी, आहार या सर्व गोष्टीतून जेष्ठ लोक, दैनंदिन जीवनात तो आनंद मिळवतात. याबाबत देखील या ज्येष्ठांचे कौतुक करायला हवं. चिडचिडणारे खेकसणारा ज्येष्ठ, रागीट कपाळावर आठ्या असलेले वृद्ध आता कथा कादंबऱ्यांमधून मालिकांमधून सिनेमांमधून सुद्धा नष्ट झालेले आहेत. ही नवीन ज्येष्ठांची पिढी समजूतदार आहे आणि ती तरुणाईच्या सहकार्याने त्यांचा हात धरूनच पुढे जात आहे.
करोना काळात सगळं ऑनलाईन असताना, प्रत्येक जण लेखन करत लेखक झाला. व्हाट्सअप युनिव्हर्सिटीवर कविता आणि लेख लिहू लागला. या लिखाणामध्ये आजीचे लिखाण अधिक प्रमाणात होते. या आज्यांचं लिखाण सकारात्मकदेखील आहे, संदेश देणारे आहे. तरुण पिढीने लक्षात ठेवावं, आपण देखील कधीतरी वृद्ध होणार आहोत. या आज्यांच्या जागी आपण असणार आहोत. त्यामुळे आज्यांच्या लिखाणाला आज, यांच्या अभिव्यक्तीला विरोध न करता आज त्यांना मनमोकळेपणे लिहू द्यावे.
आज्यांचा सल्ला, त्यांचं लिखाण देखील लोक आवडीने वाचतात. आजीबाईच्या बटव्यातील किरकोळ उपचार, खूप लोकप्रिय आहेत. पाककृती ज्येष्ठ आज्या चांगल्या सांगतात. कदाचित जात्यावरच्या ओव्या जशा सांस्कृतिक ठेवा बनल्या, असे हे आज्यांचे लिखाण उद्या समाजाला दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करेल. - शुभांगी पासेबंद