आता मुले-नातवंडांवर मराठी संस्कारांची जबाबदारी आपली
केंद्र शासनाने गेल्या महिन्यात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेला खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. या सन्मानामुळे संत ज्ञानेश्वर आणि अन्य मराठी संतांनी लावलेला मराठी भाषेचा वेलु गगनापर्यंत पोहोचला आहे. या निर्णयाचे मराठी भाषिकांमध्ये भरभरून स्वागत होत आहे. आता पुढे काय? आता आपल्या मुलांवर, नातवंडावर मराठी भाषेचा संस्कार करण्याची जबाबदारी ज्येष्ठ नागरिकांवर येते. हे आव्हान गेल्या पिढीतील अनुभव संपन्न जबाबदार नागरिक म्हणून ज्येष्ठांना स्वीकारावेच लागणार आहे.
देशाच्या इतिहासात मराठीला मिळालेल्या अभिजात भाषेच्या दर्जामुळे मराठीच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झाले आहे. ‘माझा मराठीची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके या शब्दात ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीचा केलेला गौरव मराठी भाषेच्या इतिहासात मानाचा तुरा खोवणारा ठरला आहे. आपली ही मराठी भाषा अभिजात आहे, हे सिद्ध करण्यासाठी लीलाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेण्यात आला आहे. या कामात अनेक मराठी भाषिक विचारवंत अभ्यासक आणि साहित्यिक यांचे फार मोठे सहाय्य लाभलेले आहे. कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देताना त्या भाषेचा नोंदविलेला इतिहास हा अतिव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे १५०० ते २००० वर्षे जुना हवा, दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली ती अस्सल साहित्यिक परंपरा हवी, अशी अभिजात भाषा आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी, असे निकष आहेत. अशा भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्राला दीर्घकाळ संघर्ष करावा लागला. या भाषेच्या दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी सन २०१२ मध्ये प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमती गेली. या समितीने सन २०१३ मध्ये आपला अहवाल प्रकाशित केला.
त्यामध्ये महारट्टी, महरट्टी, मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला, असे अहवालात नमूद केले. महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र प्रदेश अस्तित्वात येण्यापूर्वीपासूनच प्रालित होती. या मराठीचे वय किमान अडीच हजार वर्षे जुने असल्याचे अहवालात म्हटले होते. अकरा कोटी लोकांची मराठी जगतातील १० व्या ते १५ व्या क्रमांकाची ही भाषा आहे, हेही अहवालात स्पष्ट करण्यात आले होते.
देशातील ही एक महत्त्वाची भाषा असून तिच्या ऐतिहासिक प्रवासाचे संदर्भ देत आणि विविध शतकांमध्ये विविध साहित्यिकांनी दिलेल्या योगदानाचा विचार करून मराठीचे अभिजातपण स्वयंसिद्ध आहे, असेही या अहवालात म्हटले होते. या अहवालाच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आणि यंदा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आणि या निर्णयाचे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राज्यात, देशात, विदेशात जिथे-जिथे मराठी भाषिक राहतात त्यांनी जल्लोषात स्वागत केले. पण आता प्रश्न पडतोय, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, पण पुढे काय? शासन स्तरावर त्यासाठी विविध निर्णय, योजना अंमलात यायच्या त्या येतील. मात्र मराठी भाषिक म्हणून तुमची आमची सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे. आपल्या मुलांवर, नातवंडावर, पुढील पिढीवर मराठीचे संस्कार करण्याची नैतिक जबाबदारी ज्येष्ठ नागरिक म्हणून आपणावरही आली आहे आणि या जबाबदारीपासून आपणालाही दूर राहत येणार नाही.
आता मुलांच्या, नातवंडांच्या हातात मराठीची पुस्तके देऊन मराठीची वाचन संस्कृती निर्माण करण्याची खरी गरज आहे, नव्हे ती आपली मोठी जबाबदारी आहे. ज्ञानेश्वरीसारख्या संत साहित्याची ओळख नव्या पिढीला करून द्यायची गरज आहे. नव्या पिढीपुढे हा वारसा, अभिजात मराठी भाषेचे महत्त्व पोचविणे हे फार मोठे आव्हानात्मक काम आहे आणि हे आव्हान ज्येष्ठ नागरिक म्हणून आपणास स्वीकारावे लागणार आहे. आज स्पर्धेच्या युगात मराठी भाषा मागे पडत आहे, हे कटू सत्य आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये मुलांना प्रवेश घेण्यासाठी आपण प्रवृत्त होतोय. त्यामुळे मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत. आजच्या स्पर्धेचा आणि करियर घडविण्याच्या स्पर्धेत इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्यास कुणाचेही दुमत असणार नाही. आज त्यासाठी मराठी याआपल्या मातृभाषेकडे दुर्लक्ष करणे, आपल्या मायबोलीचा अपमान करणे संयुक्तिक होणार नाही. मराठी भाषेवरील प्रेम कायम ठेवण्यासाठी घरात, कुटुंबात मुलांबरोबर मराठी भाषेत संभाषण करण्याची गरज आहे. मराठीतील संत चरित्रांबरोबरच मराठीतील कविता, गाणी, भावगीत, गोष्टी, त्यांच्या कानावर वारंवार पडायला हवीत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नेमके काय मिळाले हे समजायला त्यांना फार वेळ लागेल. मात्र मराठीची अस्मिता टिकविण्यासाठी त्यांना मराठीची गोडी लावावीच लागेल. आता शासनाने इंग्रजी माध्यमांतील शाळांमध्ये मराठी हा विषय अविभाज्य केला आहे. केंद्र शासनाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर राज्य शासनाने घेतलेला हा निर्णय मराठीची अस्मिता नवीन पिढीमध्ये जागवण्यासाठीची ही पहिली पायरी असावी. या पायरीवरून मराठी संस्कृती जपण्यासाठीचा प्रवास यापुढे आपल्याला अविरत सुरू ठेवावा लागेल. या प्रवासात ज्येष्ठ नागरिकांचे योगदान फार मोठे असणार आहे.
आता थोडे विषयांतर...अलिकडच्या काळात मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे मुलांच्या जीवनातीलही अविभाज्य भाग बनली आहेत. कामाच्या वेळी मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी, मुलांना जेवण भरवताना, शांत राहण्यासाठी ‘मोबाईल हा पालकांपुढे महत्त्वाचा पर्याय ठरतो आहे. त्याचे विपरीत परिणाम मुलांवर नकळत होत असल्याचे भान पालकांनी ठेवायला हवे. अगदी सहा महिन्यांच्या बाळालाही मोबाईल सवय लागल्याचे आज प्रकर्षाने अनुभवास येत आहे. या विषयावर पालकांना आणखी विस्ताराने सांगण्याची गरज नाही. कारण आज प्रत्येक जण आपल्या कुटुंबात हा अनुभव आपण घेतोय. म्हणून मुलांना स्क्रीनची सवय लावण्याऐवजी त्यांच्याशी प्रत्यक्ष संवादावर आणि मराठी या मातृभाषेतून भर देण्याची गरज आहे. मुलांशी, नातवंडांशी, वडिलधारे, ज्येष्ठ नागरिक, पालक म्हणून आपल्या मायबोलीतून सुसंवाद साधला गेला तर मराठी ही अभिजात भाषा म्हणून तिचा सन्मान वाढविण्यासाठी आपण महत्वपूर्ण योगदान देऊ शकतो. या प्रयत्नात आपणही मागे न राहता मराठीच्या उत्कर्षासाठी मराठीचा झेंडा अटकेपार नेण्यासाठी योगदान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू या.
जय हिंद! जय महाराष्ट्र!! जय मराठी!!!
-प्रभाकर कासेकर, निवृत्ती माहिती अधिकारी, रत्नागिरी