महाकुंभावरही दहशतवादाचे सावट

यंदा प्रयागराज येथील महाकुंभासाठी देश विदेशातून विविध, संत-महंत, साधू-संन्यासी यांसह ५० कोटीहून अधिक हिंदू भक्तगण येणार आहेत. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या पर्वाचा सिद्धतेत गुंतले असताना ‘एक्स' या सामाजिक माध्यमावर नसर पठाण नावाच्या आयडीवरून महाकुंभात हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुम्ही सर्व गुन्हेगार आहात, महाकुंभात बॉम्बस्फोट करणार, १००० हिंदूंना मारणार, ‘अल्ला इज ग्रेट' अशा स्वरूपाचा संदेश ‘एक्स' प्लॅटफॉर्मवर दिसल्यावर विपीन गौर नावाच्या तरुणाने पोलिसांना टॅग करून ही पोस्ट रिटि्‌वट करत धमकीचा स्क्रिनशॉट शेअर केला. धमकी देणाऱ्या नसरचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे.या धमक्या देणारे एका विशिष्ट पंथांचेच का असतात? त्यांच्यात ही धार्मिक कट्टरता कोण निर्माण करतो ?

   विश्वातील सर्वांत प्राचीन संस्कृती लाभलेला देश म्हणजे भारत. जगातील अनेक संस्कृती काळाच्या ओघात नष्ट झाल्या, भारतावरही आजतागायत अनेक परकीय आक्रमणे झाली; मात्र त्यातूनही या देशाची संस्कृती टिकून आहे. सनातन वैदिक हिंदू धर्माला लक्षावधी वर्षांचा इतिहास आहे. त्याची पाळेमुळे येथील मातीत घट्ट रुतलेली आहेत, त्याच्या संस्कृतीच्या खुणा आजही या भूमीत अबाधित आहेत. १९४७ साली धर्माच्या आधारावर देशाची फाळणी झाली. तरीही या देशाने पंथनिरपेक्ष शासनप्रणाली स्वीकारली. बहुसंख्य हिंदू असूनही या देशात अन्य पंथीय सव्रााधिक सुरक्षित जीवन जगत आहेत. सरकारने त्यांना विशेष सवलती आणि संरक्षण पुरवले आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र कायदे आहेत. त्यांचे सण, उत्सव ते येथे गुण्यागोविंदाने साजरे करत आहेत. येथील हिंदूसुद्धा त्यांच्या सुख दुःखात नेहमीच आनंदाने सहभागी होत असतात. अल्पसंख्याकांच्या एखाद्या उत्सवाला येथील बहुसंख्यांकांमुळे गालबोट लागले अशा स्वरूपाच्या घटना घडल्याचे आजतागायत ऐकिवात नाही. याउलट गेल्या काही वर्षातील घटनांचा मागोवा घेतल्यास असे लक्षात येते कि हिंदूंचे सण किंवा उत्सव जवळ आले की हिंदूंवर हल्ले करण्याच्या धमक्या दहशतवाद्यांकडून दिल्या जातात. इतकेच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी श्रीरामनवमी, हनुमानजयंती, शिवजयंती, गणेशोत्सव यांसारख्या उत्सवांत आणि या उत्सवांच्या मिरवणुकांवर दगडफेक होते, हल्ले होतात. आता तर थेट महाकुंभावर हल्ला करण्याची धमकी मिळाली आहे.

महाकुंभ हे हिंदू धर्मतील सर्वात मोठे पर्व आहे. यंदा प्रयागराज या ठिकाणी हा महासोहळा साजरा होत आहे. महाकुंभात स्नान करण्यासाठी आणि कुंभपर्वातील चैतन्य अनुभवण्यासाठी  देश विदेशातून विविध, संत-महंत, साधू-संन्यासी यांसह ५० कोटीहून अधिक हिंदू भक्तगण येणार आहेत. प्रशासनाकडून त्यासाठी केली जाणारी सर्व सिद्धता आता अंतिम टप्यात आली आहे. स्वतः मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या पर्वाचा सिद्धतेत गुंतले आहेत. अशात ‘एक्स' या सामाजिक माध्यमावर नसर पठाण नावाच्या आयडीवरून महाकुंभात हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुम्ही सर्व गुन्हेगार आहात, महाकुंभात बॉम्बस्फोट करणार, १००० हिंदूंना मारणार, ‘अल्ला इज ग्रेट' अशा  स्वरूपाचा  संदेश ‘एक्स' प्लॅटफॉर्मवर दिसल्यावर विपीन गौर नावाच्या तरुणाने पोलिसांना टॅग करून ही पोस्ट रिटि्‌वट केली आणि या धमकीचा स्क्रिनशॉट शेअर केला. ज्याने ही धमकी टि्‌वट केली त्या नसरचा शोध पोलीस यंत्रणा घेत आहे. नसरच्या बायोमध्ये त्याने ‘मी कट्टर मुस्लिम असून मला मुस्लिम असल्याचा अभिमान' असल्याचे लिहिले आहे. सायबर पोलीस त्यादृष्टीने कामाला लागले असून हे टि्‌वट करणारा लवकरच गजाआड दिसेल यात शंका नाही; मात्र हे धाडस या धमकी देणाऱ्यांमध्ये येते तरी कुठून?

 अमरनाथ यात्रा असो वा वैष्णवदेवीची यात्रा असो अशा ठिकाणीही अशा स्वरूपाच्या धमक्या येतात. अमरनाथ यात्रेमध्ये तर दहशतवाद्यांकडून प्रत्यक्षातही हल्ले केले जातात. भारतीय सैनिकांकडून त्यास सडेतोड उत्तर दिले जाते. दहशतवाद्यांकडून दिल्या जाणाऱ्या धमक्या केवळ हिंदूंच्या उत्सवांत, यात्रांमध्येच का येतात? या धमक्या देणारे एका विशिष्ट पंथांचेच का असतात ? त्यांच्यात ही धार्मिक कट्टरता कोण निर्माण करतो ? आपला धर्मच श्रेष्ठ असून अन्य धर्मियांवर हल्ले करा, त्यांना ठार करा, त्यांच्या उत्सवांत विघ्न आणा ही शिकवण कोण यांना देतो ? दहशतवादाला धर्म नसतो हे जरी सत्य असले तरी दहशतवादाचे चटके या देशात केवळ हिंदूंनाच का सहन करावे लागतात ?

   हिंदूंच्या सण-उत्सवांसह स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन या राष्ट्रीय सणांच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट करण्याच्या, दहशतवादी हल्ले करण्याच्या धमक्या मिळत असतात. आजतागायत या देशात अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत ज्यामध्ये लक्षावधी निरपराध नागरिक मारले गेले आहेत. या निरपराध्यांचे रक्त सांडून, त्यांचे जीव घेऊन या दहशतवाद्यांना नक्की काय साध्य करायचे असते ? या धमकी देणाऱ्यांना, हल्ले करणाऱ्यांना मृत्यूचेही भय का नसते ? त्यांच्यात हें कौर्य कोण निर्माण करते ? दहशतवाद ही केवळ भारताची समस्या नसून आजमितीला ती जगभराची डोकेदुखी बनली आहे. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जगभरातील तपास यंत्रणा कार्य करत आहेत. अनेक देशांनी या दशतवादाला देशातून हद्दपार करण्यात यशही मिळवले आहे. त्यासाठी त्यांनी देशस्तरावर काही कठोर निर्णय घेऊन धर्मांधतेवर बंधने घातली आहेत. धार्मिक कट्टरतावाद निर्माण करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. दशहतवादी मग तो अन्य देशात लपून बसलेला का असेना त्याच्या गोटात शिरून त्याला ठार केले आहे. भारत अशा प्रकारच्या कारवाया केव्हा करणार ? राष्ट्रीय सण, हिंदूंचे उत्सव, महाकुंभ आणखी किती वर्ष दहशतवादाच्या सावटाखाली साजरे होणार ? - जगन घाणेकर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

आजीचे लिखाण