जगायला केवळ श्वासाची नाही, प्रेमाचीही गरज असते

 पूर्वी कसं माणसं कधीही यायची, आनंद घेऊन यायची, आनंद देवून जायची. तसा आनंद आता पलॅटमध्ये येवू शकत नाही. माणसांना आपण फोन करून या असे म्हणतो. आनंदाला आपण असे म्हणू शकू का? कोणीच घरी येत नाही आणि आपणही कुणाकडे जात नाही. आपली घरं तुरुंग झाली आहेत. गुन्हे करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं; पण ईथे आपणच आपल्याला तुरूंगात टाकले आहे. पूर्वी माणसे आनंद देऊन जायची. आता सभोवताली माणसेच नाही, मित्र नाही. प्रत्येकाने स्वतःभोवती कोष तयार केला आहे, त्यातून त्यांना बाहेर पडावेसे वाटत नाही. नैराश्य आले आहे..

संस्कारात वाढलेली पिढी आज निर्वात पोकळीत वाढत आहे. आज कुणीतरी यावे, ओळखीचे व्हावे.
अशी गाणी आता इतिहासजमा झाली की काय?

पलॅट संस्कृतीत कोणी येतच नाही. टपाल किंवा खाद्यपदार्थ घेऊन येणारी माणसे, तीही ठरवून येतात. बोलावल्याशिवाय माणसाने येऊच नये अशी तजवीज माणसानी  करून ठेवली आहे. नाच रे मोरा आंब्याच्या वनात ही गाणी मुलांनी कुठे अनुभवायची.

 गोरी गोरी पान
फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण.
पण दादाला आता सांगायची गरजच पडत नाही. दादी अम्मा दादी अम्मा मान जाओ म्हणण्यासाठी दादी कुठे आहे? ए आई मला पावसात जाऊ दे ना म्हणणारी मुले कुठे आहेत?  पावसात जाऊ नको सर्दी होईल असं म्हणणारी आई मात्र आहे.

हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे...कुणाला अनुभवायला मिळत नाहीत व त्याचे त्यांना काही वाटत नाही. या गाण्यांनी, या चित्रपटांनी, या पुस्तकांनी पूर्वी एक काळ गाजवला तो मूल्यांच्या रुजवणुकीसाठी. पूर्वी फक्त संस्कार करणाऱ्याच गोष्टी अवतीभवती होत्या. आम्ही आज निसर्गाला पारखे झालो आहोत, माणसाला पारखे झालो आहोत. भावनाचे तरंग उठण्यासाठी काहीतरी निमित्त हवं असतं. मग ते माणूस असो निसर्ग असो किंवा एखादं स्थळ असो. संवाद साधल्याशिवाय मन हलकं होतच नाही व मनाच्या निचरा होत नाही.

आपण बोलावले तरच कुणीतरी घरात येण्याची शक्यता आहे. पूर्वी कसं माणसं कधीही यायची, आनंद घेऊन यायची, आनंद देवून जायची. तसा आनंद आता पलॅटमध्ये येवू शकत नाही. माणसांना आपण फोन करून या असे म्हणतो. आनंदाला आपण असे म्हणू शकू का? कोणीच घरी येत नाही आणि आपणही कुणाकडे जात नाही. आपली घरं तुरुंग झाली आहेत. गुन्हे करणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जातं; पण ईथे आपणच आपल्याला तुरूंगात टाकले आहे.

 पूर्वी माणसे आनंद देऊन जायची. आता सभोवताली माणसेच नाही, मित्र नाही. प्रत्येकाने स्वतःभोवती कोष तयार केला आहे, त्यातून त्यांना बाहेर पडावेसे वाटत नाही. नैराश्य आले आहे. बाहेर आनंदाची कारंजी, निसर्गसौंदर्य आहे. फुल उमलतं तसं माणसाने स्वतः तून उमलायला हवं. हाताची घडी तोंडावर बोट हे आता लहानासाठी? व मोठ्यांसाठीही खरं ठरत आहे. मोबाईलवर बोटं. तोंडावर कुलूप आहे. कोणी कोणाशी बोलत नाही, त्याची गरज वाटत नाही. पाल निदान पुटपुटते तरी. घरात स्मशान शांतता असतें. व्यक्त होता येत नाही, हीच समस्या आहे. ‘कसं चाललंय' ला कोणीच खरं उत्तर देत नाही.

मनातून  हादरलेली ,घाबरलेलीही ‘मस्त चाललंय म्हणतात'. मनाचा थांगपत्ता लोक लागू देत नाहीत. मनाला समजून घेत नाहीत. लोकं मनात शिरत नाहीत व कुणाला मनात शिरुही देत नाहीत. सगळं कसं अलिप्त आलिप्त. हे विश्वची माझे घर कुणाचेच राहिले नाही. वडीलांच्या घरात मुलें आपल्या वेगळ्या घराचं स्वप्न बघत आहेत.

 आपला अवकाश सीमित झाला आहे, आपले वर्तुळ सीमित झाले आहे. वर्तुळाची त्रिज्या आपली, माझी, मी पर्यंत सीमित झाली आहे. माणसाच्या मनाचा ऑक्टोपस झाला आहे. मन कधी संकुचित होईल व कधी विस्तारेल सांगता येत नाही. मन मोकळं करायला संधीच नाही. मन मोकळं झालं नाही की, विकृती हातात हात घालून येते. ज्या गाण्यांनी इतिहास घडवला ती गाणी इतिहासजमा व्हायला नको. आपल्याकडे कोणी येतच नाही ही भावना भयावह आहे. माणसं भेटतच नाही. त्याच्यामुळे नाती टिकत नाहीत. नाती टिकवणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे नव्हे. भेट, सहवास यातूनच नातं वृद्धिंगत होतं.

माणसे येऊच नयेत अशी तजवीज केली जात आहे. माणसांना कवटाळण्याची संस्कृती गेली. माणसांना टाळण्याची संस्कृती येत आहे. हसण्याची संधी नाही, रडण्याची संधी नाही अशा परिस्थितीत माणसे भकास जीवन जगत आहेत, व्यसनाला जवळ करत आहेत.

कुणी तरी आले तर, काहीतरी संवाद होईल. सहवासातून, संवादातून काहीतरी चांगलं होईल, पण कोणी येतच नाही. घरासमोरच्या सुबक, रंगीबेरंगी मोहून टाकणाऱ्या रांगोळ्या कमी झाल्या. घरात शिरावं असं वाटत नाही आणि कृत्रिम वेलकम लिहिलेली पायताणं, ‘कुत्र्यापासून सावध पाट्या' घरात शिरण्याला परावृत्त करतात.  

नाती अशी वाढवा की ‘आज कुणीतरी यावें' अशी आर्त हाक मारण्याची गरजच पडू नये. ग्रेटा या एका लहान मुलीचं पर्यावरणसाठी संसदेत बाहेर उपोषण करणं, आई-वडिलांच्या सवयी बदलणं, वडिलांचा मांसाहार सोडवणं हे काय आहे? कुणी ना कुणी कोणासाठी तरी निमित्त असतं. पायवाटेला आकार नसतो पाया वाटेला संस्कार असतो. जीवन जगताना प्रत्येकाशी नातं ठेवल्यामुळे कुणामध्ये तरी आशादायक पायवाट सापडतेच. - डॉ. अनिल कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

महाकुंभावरही दहशतवादाचे सावट