प्रभाते मनी राम चिंतीत जावा

रात्रीची शांत झोप झाल्यावर पहाटे मनुष्य जागा होतो तेव्हा सगळीकडे नीरव शांतता असते. बाहेरचा तसेच मनातलाही गल्बला सुरू झालेला नसतो. शरीर आणि मन पुरेशी विश्रांती मिळून ताजेतवाने असतात. अत्यंत कार्यक्षम असतात. अशा प्रसन्न वेळी भगवंताच्या प्रसन्न रूपाचे स्मरण केले तर चित्तवृत्ती अधिकच प्रसन्न होतात. शरीर-मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो.

घनश्याम हा राम लावण्यरूपी।
महां धीर गंभीर पूर्णप्रतापी।
करी संकटी सेवकाचा कुढावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा श्रीराम ६७

संसार दुःखापासून मुक्त होण्यासाठी रामाचे ध्यान करावे असे समर्थांनी सांगितले. इथून पुढच्या दहा श्लोकांतून ज्याचे ध्यान करायचे तो राम आहे कसा ह्याचे वर्णन समर्थ करतात. तसेच पहाटेच्या मंगलसमयी रामाचे चिंतन करीत जावे हेही सांगतात. सूर्योदयापूर्वीची वेळ, जिला ब्राह्ममुहुर्त म्हणतात, त्या शांत, प्रसन्न वेळी रामाचे स्मरण करावे. मानसपूजा करावी. त्याचे मनावर,शरीरावर आणि एकूणच जीवनावर शुभ संस्कार होतात. समर्थांचे रामावर विलक्षण प्रेम आहे. अनन्यभक्ती आहे. श्रीराम त्यांचे सद्गुरू आहेत. श्रीसद्गुरूंचे रूप, गुण, महिमा वर्णन करताना समर्थांची वाणी अगदी बहरून येते.

समर्थ म्हणतात, पावसाळी मेघासारखा सावळा असलेला राम अत्यंत सुंदर आहे. लावण्याची साक्षात मूर्ती आहे.त्याच्याकडे पाहून सौंदर्याचे निकष ठरवावेत, इतके त्याचे रूप मनोहर आहे. आकर्षक आहे. सौंदर्याच्या जोडीने त्याचेसामर्थ्य ही अद्‌भुत आहे. तो धैर्यवान आहे, गंभीर आहे, महापराक्रमी आहे. आपल्या भक्तावर कितीही भयंकर संकट आले तरी त्यापासून भक्ताचे रक्षण करण्यास समर्थ आहे. पावसाच्या पाण्याने भरलेला काळासावळा मेघ जसा उदारपणे सर्वावर सारखाच बरसून मोकळा होतो तसेच श्रीराम आपल्या पूर्ण कृपेची बरसात सर्व प्राण्यांवर करतात. कोणत्याही परिस्थितीत ते अत्यंत धीराने वागतात. आपला तोल ढळू देत नाहीत. त्यांचा संयम कधी सुटत नाही. विचार-विवेक कुंठित होत नाही.राज्याभिषेक होणार हे समजल्यावर ते हुरळून गेले नाहीत. अत्यंत नम्रतेने आणि गांभीर्यपूर्वक ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शाविली. मात्र राज्यपद मिळण्याऐवजी वनवासात जाण्याची आज्ञा झाली तेव्हाही त्याच नम्रतेने आणि विवेकाने त्यांनी ती आज्ञा शिरसावंद्य मानली. श्रीरामांचे चरित्र अनुकरणीय आहे . पुनःपुन्हा ते श्रवण करून, चित्तात साठवून ठेवावे, त्याचे चिंतन करावे, रामांचे सद्‌गुण आपण धारण करण्याचा प्रयत्न करावा. सौंदर्य, सामर्थ्य आणि ज्ञान यांनी परिपूर्ण असलेल्या रामाचे केवळ स्मरण केले तरी अंतःकरणाची शुध्दी होते. ज्ञान धारण करण्याची क्षमता प्राप्त होते. म्हणून त्या रूपाचे चिंतन करावे. माणसाचे अंतिम लक्ष्य जरी निर्गुण प्राप्ती असले तरी उपासनेसाठी सगुणाचेच आलंबन लागते. उपास्य देवतेचे विशिष्ट रूप, विशिष्ट नाव असेल तर ते दृष्टीपुढे आणून त्याचे स्मरण करणे, ध्यान करणे सोपे जाते.

समर्थांनी त्यासाठीच रामाच्या रूपाचे, गुणांचे वर्णन केले आहे. भगवंताच्या अवतारांच्या कथा ऐकताना, त्यांच्या पराक्रमाचे वर्णन ऐकताना माणूस त्यात रंगून जातो. भगवंताने किती अवतार घेऊन, किती भक्तांचे कसे रक्षण केले हे श्रवण केले की आपणही अशीच अनन्य भक्ती केली तर भगवंत आपलेही रक्षण करतील ही श्रध्दा दृढ होते.

 सर्वसाधारण जीवनात सकाळी उठल्यापासून प्रपंच मागे लागतो. अनुकुलता असेल तर माणूस त्यात रमून जातो. प्रतिकुलता असेल तर हतबल होऊन शिणून जातो. रात्रंदिवस संसाराच्या कोलाहलात हरवून जातो. मात्र रात्रीची झोप झाल्यावर पहाटे जागा होतो तेव्हा सर्वत्र नीरव शांतता असते. बाहेरचा तसेच मनातलाही गल्बला सुरू झालेला नसतो. शरीर आणि मन पुरेशी विश्रांती मिळून ताजेतवाने असतात. अत्यंत कार्यक्षम असतात. अशा प्रसन्न वेळी भगवंताच्या प्रसन्न रूपाचे स्मरण केले तर चित्तवृत्ती अधिकच प्रसन्न होतात. शरीर-मनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. इतर कोणतेही विचार मनात प्रवेश करण्याआधी जर भगवंताचा विचार केला तर तो मनात दिवसभर स्थिर राहतो. प्रभातकाळाचे ते वैशिष्ट्य आहे. म्हणून तर अभ्यासासाठी पहाटेचे महत्त्व आहे. प्रातःकाळी केलेला नामस्मरणाचा अभ्यासही फलदायी होतो. दिवस उजाडू लागला की अनंत विचारांची गर्दी सुरू होते. एकाग्रतेने भगवंताचे ध्यान करणे अवघड होते. पहाटेचा आग्रह तेवढ्यासाठीच आहे.दिवसाच्या सुरवातीलाच रामनामाची ऊर्जा रोमारोमात भरून घेतली की पुढच्या सर्व प्रापंचिक आव्हानांना विचार-विवेकाने सामोरे जाण्याचे बळ मिळते. मोक्षाच्या इच्छेने जेव्हा मनुष्याला काही उपासना, साधना करावी असे वाटू लागते तो साधनेचा प्रभातकाळ असतो. त्यावेळी भगवंताच्या सगुण रूपाचे आलंबन लागते. त्याच्या नामाचे, रूपाचे, गुणांचे स्मरण करणे हीपहिली पायरी आहे. त्यातूनच भगवंताबद्दल प्रेम, आदर आणि भक्ती वाढीस लागते. सद्‌गुरुकृपेने पुढे साधनेत प्रगती होत जाते. म्हणूनच साधनेच्या प्रभातकाळी सगुण साकार रामाचे स्मरण करावे. नित्य चिंतनाने चित्त शुद्ध करून घ्यावे. अंतःकरणाची शुध्दता पारमार्थिक प्रगतीसाठी अनिवार्य आहे. भाव शुध्द असेल, भक्ती अनन्य असेल तर भक्ताच्या अंतःकरणात राम नक्कीच प्रकट होतात. घोर भवसंकटापासून त्याचे रक्षण करतात. ”म्हणे दास हा राम तात्काळ पावे। करी संकटी सेवकाचे कुडावे। प्रतापेचि ब्रह्मादिका सोडविले। महीमंडळालागी आनंदविले”
जय जय रघुवीर समर्थ  
-सौ. आसावरी भोईर 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जगायला केवळ श्वासाची नाही, प्रेमाचीही गरज असते