...एक होता निलेश (सत्य घटनेवर आधारित या कथेतील सर्व नावे काल्पनिक आहेत)

निलेशचं आणि माझं प्रेम प्रकरण असंच एकमेकांशी एकही शब्द न बोलता पुढे चालूच होतं. आता तर इतक्या वर्षांनी हळूहळू ते खुपच घट्ट होत गेलं होतं. एकमेकांशिवाय राहणं आम्हाला कठीण व्हायला लागलं होतं. दिवस-रात्र फक्त आणि फक्त निलेशच मला दिसत होता.

कॉलेजचे ते सुरुवातीचे दिवस..अकरावीसाठी मी बिर्ला कॉलेज कल्याणमध्ये प्रवेश घेतला होता. कॉलेज लाईफबद्दल माझ्या मनात कमालीचे कुतुहल होते. कॉलेजला जाण्यासाठी सोबत कुणी मैत्रीण नसल्यामुळे पहिल्या दिवशी एकटं जाण्याची मला खूप भिती वाटत होती. शेजारच्या एका मुलाचा (राजू) पण कॉलेजचा पहिलाच दिवस होता. म्हणून मी त्याला सांगितलं की, आज मी तुझ्यासोबत कॉलेजला येईन. वर्गात गेल्यानंतर दहावीला नानिवडेकर क्लासमध्ये माझ्यासोबत असलेली एक मुलगी नयना हीपण माझ्याच वर्गात होती. त्यामुळे मी तिच्याशी मैत्री वाढवली आणि आम्ही दोघी सोबत कॉलेजला जाऊ लागलो, नानिवडेकर क्लास मधली आणखी एक मैत्रीण, सुवर्णापण माझ्याच वर्गात होती. हळूहळू सुवर्णाशी माझी खूप छान मैत्री झाली आणि आम्ही दोघी एकमेकींच्या जिवलग मैत्रीणी बनलो. एके दिवशी वर्गात बसलेले असताना सुवर्णा मला म्हणाली प्रणिता आपल्या वर्गात एक मुलगा खूप सुंदर आहे, त्याच्या इतका सुंदर मुलगा आपल्या वर्गात दुसरा कुणीच नाही. तो आता वर्गात नाही; पण तो आला की मी तुला दाखविन आणि दोनच मिनिटात ७-८ मुलांचा एक ग्रुप वर्गात येताना दिसला आणि सुवर्णा मला म्हणाली, प्रणिता लवकर बघ, तो मुलगा येतोय आणि त्यावेळी मी त्याच्याकडे पाहिलं तर तो मुलगा माझ्याचकडे बघत होता. सुवर्णाने मला तो मुलगा दाखवला होता पण त्यावेळी हा मुलगा मला खूप आवडलाय आणि याच्या मी आता प्रेमात पडले असं काही झालं नाही.

त्यानंतर एके दिवशी वर्गात मधल्या वेळेस इतरत्र सहज बघत असताना, माझ्या असं लक्षात आलं की मागच्या बाकावरचा तो मुलगा माझ्याकडे बघतोय. पण मी काही फारसं लक्ष दिलं नाही. त्यानंतर कॉलेजमध्ये तो मुलगा जिथे-जिथे मला दिसायचा तेव्हा तो माझ्याचकडे बघत असायचा. आता मात्र माझ्या चांगलंच लक्षात आलं होतं की हा मुलगा सारखाच आपल्याकडे बघतोय आणि त्याचं ते बघणं मला कमालीचं आवडायला लागलं. कारण आधीच तो देखणा होता, दिसायला सुंदर, उंचापुरा, अमिताभ बच्चन सारखे त्याचे लांब लांब पाय, चेहऱ्यावर स्मित हास्य, थोडासा लाजरा, अबोल, रंगाने माझ्यापेक्षा थोडासा एक शेड गोरा. त्याच्याकडे बघून मला नेहमी वाटायचं की हा अमिताभचा फॅन असावा. त्याचा फॅशन सेन्स कमालीचा होता. अमिताभ सारखेच टाईट फिट शर्ट. पँट तो घालायचा, अमिताभसारखा थोडासा मध्ये भांग तो पाडायचा. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव खूप छान असायचे, त्याचं चालणं, उभं राहणं सगळच सुंदर होतं. मला नेहमी वाटायचं की ह्याला हे सगळं कसं जमतं? त्याचं ते मागच्या बाकावर बसून माझ्याकडे सतत बघणं मला हवंहवंसं वाटायला लागलं  आणि मी त्याच्या नजरेच्या जाळ्यात बेमालूमपणे केव्हा अडकले हे मला कळलच नाही. बाकावर बसण्याची त्याची ती स्टाईल, थोडीशी तिरकी मान करून माझ्याकडे बघणं हे मला खूप आवडायला लागलं. विशेष असं की, त्याची ज्या मुलांसोबत मैत्री होती ती सगळी मुलं पुढच्या दुसऱ्या तिसऱ्या बाकावर बसायची; पण हा एकटा कायम शेवटच्या बाकावर बसायचा. मी दुसऱ्या तिसऱ्या बाकावर बसायचे; पण तो मागुन बरोबर अँगल पकडून माझ्याकडे सतत बघत असायचा. मैत्रीणींशी बोलताबोलता मला संधी मिळाली की मीपण त्याच्याकडे बघायचे. आम्ही दोघे एकमेकांना खूप आवडायला लागलो होतो. आम्हाला सतत एकमेकांकडे बघावसं वाटत होतं. एखाद दिवशी तो मला दिसला नाही तर मला अस्वस्थ व्हायचं. माझी नजर सतत त्याला शोधायची.

एके दिवशी सकाळी कॉलेजला जाण्यासाठी मी आणि सुवर्णा बसस्टॉपवर उभे होतो. बाजूलाच त्याची मित्रमंडळी पण होती. सुवर्णाने त्या मुलांना सहज विचारलं, काय रे आज तुमचा तो मित्र नाही आला. त्याचा मित्र मनोज म्हणाला, कोण? सुवर्णा म्हणाली तो बघ दिसायला सुंदर आहे तो. काय नाव आहे त्याचं ? मनोज म्हणाला निलेश नाव आहे त्याचं. आता मला त्याचं नाव पण कळलं होतं. मनात म्हटलं छान आहे नाव. असेच दिवस चालले होते. त्याचं माझ्याकडे बघणं माझं त्याच्याकडे बघणं चालूच होतं. निलेशकडे मी जितक्या वेळा बघितलं असेल तितक्या वेळा माझी नजर कधीच वाया गेली नाही. कारण तो सतत माझ्याकडे बघत असायचा. हळूहळू त्याच्या मित्रांच्याही हे लक्षात आलं होतं. मित्र आम्ही दोघे दिसलो की आम्हाला चिडवायची. एकदा कॉलेजला जाण्यासाठी बसमध्ये उजव्या बाजूच्या तिन सीटवर खिडकीत सुवर्णा बसली होती आणि तिच्या शेजारी मी बसले होते. माझ्या बाजूची सीट रिकामी होती, थोड्या वेळाने निलेश आणि त्याचे मित्र बसमध्ये आले आणि ड्रायव्हरच्या मागची मोठी सीट असते तिथे ही ७-८ मुलं ओळीने बसली आणि एकाएकी सगळी मुलं ओरडायला लागली.. अरे निल्या तू इकडे काय बसलाएस जा ना तिकडे एक सीट रिकामी आहे तिकडे बस. जे काय कळायचं ते मला कळलं होतं. सुवर्णाच्या हे लक्षात आलं की नाही हे मला माहित नाही. अशीच ही मुलं संधी मिळाली की आम्हाला चिडवायची. माझी मात्र तारांबळ उडायची. कुठे चेहरा लपवु अशी माझी अवस्था व्हायची. तो मात्र हसायचा.

हळूहळू दिवस चालले होते. डिसेंबर महिना आला होता. डिसेंबर महिना म्हणजे गॅदरींगचे दिवस. आमच्या वर्गातल्या त्याच्या हयाच मित्रांनी ठरवलं की आपल्या वर्गाचा आपण कोळी डान्स बसवु. कुणाला भाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावं द्यावीत. त्यावेळी दूरदर्शनवरचा महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम विशेष गाजला होता. टिव्ही वरचा तो कार्यक्रम बघत असताना मला नेहमी वाटायचं की आपण पण असा डान्स करावा आणि आता संधी मिळाली होती, म्हणून मी सुवर्णाला म्हटलं की आपण घ्यायचा का भाग,  सुवर्णा पटकन हो म्हणाली आणि आम्ही आमची नावे दिली. दुसऱ्या दिवसापासून नाचाची प्रॅक्टीस सुरू झाली. कॉलेज सुटलं की मुलं वर्गातले बेंच मागे सरकवायची आणि पुढे आम्हाला नाचण्यासाठी जागा करायची. निलेश काही नाचात नव्हता; पण तो या मुलांच्या ग्रुपमध्ये असल्यामुळे रोज नियमीत यायचा आणि समोर बाकावर बसुन आमचा नाच बघायचा. मला मात्र त्याच्या समोर नाचायला खूप लाज वाटायची. नाचात एक मुलगा आणि एक मुलगी अशा जोड्या होत्या. एके दिवशी माझा पार्टनर बाळकृष्ण कॉलेजला आला नाही तर मनोज म्हणाला अरे प्रॉब्लेम झाला रे, आज बाळकृष्ण आला नाही. आता काय करायचं. लगेच बाकीची सगळी मुलं ओरडायला लागली, अरे आपला निलेश आहे ना. निल्या चल लवकर. अरे निल्या, असा काय करतोस चल ना. तो हसायचा. मात्र मला माझा चेहरा कुठे लपवु अशी अवस्था व्हायची.

अशा गंमती महिनाभर चालूच होत्या. रंगीत तालीमसाठी आम्ही बिर्ला कॉलेजची सगळी मुलं चालत चालत सेंच्युरी रेयॉनला गेलो होतो. कारण कॉलेजचे सगळे कार्यक्रम तिथे व्हायचे. त्या निमीत्ताने निलेश सोबत असायचाच, जास्तीत जास्त वेळ आम्हाला एकमेकांचा सहवास मिळायचा. शेवटी गॅदरींगचा दिवस आला. आम्ही सगळी मुलं-मुली नटून थटून तयार झालो होतो. मुलींनी कोळी साड्या नेसल्या होत्या. मुलींना कोळी साड्या नेसवण्यासाठी आमच्या दोन मॅडम्सनी शहाडच्या मच्छी मार्केटमध्ये जाऊन दोन कोळणी आणल्या होत्या. त्यांनी आम्हाला साड्या नेसवल्या. मी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. नाकात नथ, अंगावर दागिने, हिरव्या बांगड्या, अंबाडा, त्यावर शेवंतीची वेणी. मॅडमनी आमचा मेकअप करून दिला होता. आम्ही सगळी मुलं तयार होऊन विंग मध्ये उभे होतो. तिथेच विंगमध्ये एका बाजूला आम्ही सगळ्या मुलींनी आपापल्या बॅगा ठेवल्या होत्या आणि आम्ही नाचायला स्टेजवर गेलो. नाच झाल्यावर आम्ही विंगमध्ये आलो. सगळ्या मुलींनी आपापल्या बॅगा घेतल्या; पण माझी बॅगच तिथे नव्हती. मी प्रचंड घाबरले. एका प्लॅस्टीकच्या पिशवीत माझे कपडे आणि पैशांची पर्स होती. मला प्रश्न पड़ला की आता जर माझी बॅग सापडली नाही तर मी घरी जाणार कशी, कारण साड्या भाड्याने आणलेल्या होत्या. त्या परत करायच्या होत्या. घरी जाण्यासाठी पैसे काय मला मैत्रीणी देतील; पण कपड्यांचं काय ? मला प्रचंड टेंशन आलं. मी बॅग शोधत शोधत विंगमध्ये मागच्या बाजूला गेले तर तिथे मला माझी बॅग दिसली. अरे बापरे माझी बॅग इथे कशी आली ? असं मी म्हटलं. बॅग जवळ निलेश उभा होता. त्याने माझ्याकडे पाहिलं मी त्याच्याकडे पाहिलं आणि मी काहाही न बोलता तिथुन बॅग घेऊन निघून गेले. आता मला कळलं होतं की  बॅग तिथे कशी आली. हे सगळं निलेशनीच केलं होतं त्याला माहीत होतं की  ती नेहमी प्रमाणे माझ्याशी काहीच बोलणार नाही; पण ती तिची एक नजर मला देईल. बस मला एवढंच पाहिजे. आज तिने छान नखरा पण केलाय. मला आज फक्त तिला थोडंसं बाजुला घेऊन बघायचय. असं त्याला वाटलं असावं. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी ग्रुप फोटो काढले. सगळ्या फोटोत निलेश माझ्या मागेच उभा होता. हे मला फोटो मिळाल्यावर कळालं. सुवर्णा मला म्हणाली कि प्रणिता चल आपण आपले फोटो काढू. म्हणून आम्ही फोटोग्राफरकडे गेलो. सुवर्णा तिचा फोटो काढून घेत होती. तिथे निलेश होता. निलेश तिला सांगत होता की तिथे बाजुला एक टोपलीआहे ती अशी कमरेवर घे आणि फोटो काढ. मला मात्र खूप राग आला ( राग येणं स्वाभाविक होतं ) तो तिला का सांगतोय, त्याला काय करायचंय? असं मला वाटत होतं; पण नंतर दुसऱ्याच मिनिटाला मी स्वतःला समजावलं की तो सहज तिला सांगतोय मला का राग येतोय? नंतर सुवर्णा मला म्हणाली, जा आता तुझा फोटो काढ . पण समोर निलेश उभा असल्यामुळे मला प्रचंड लाज वाटली आणि मी फोटोच काढला नाही.

निलेशचं आणि माझं प्रेम प्रकरण असंच एकमेकांशी एकही शब्द न बोलता पुढे चालूच होतं. आता तर इतक्या वर्षांनी हळूहळू ते खुपच घट्ट होत गेलं होतं. एकमेकांशिवाय राहणं आम्हाला कठीण व्हायला लागलं होतं. दिवस-रात्र फक्त आणि फक्त निलेशच दिसत होता. F.Y. ला असताना आमच्या वर्गाची पिकनिक अलिबागला मुरुड-जंजिरा पाहण्यासाठी निघाली होती. सुवर्णा मला म्हणाली, प्रणिता आपण जायचं हं पिकनिकला. मी तिला म्हणाले सुवर्णा पिकनिकला जायचं म्हणजे मला पहाटे घरातुन निघावं लागेल, अलिबागहून परत कल्याणला यायला आपल्याला खूप रात्र होईल. मी लांब राहाते. मी घरी कशी जाणार. तर ती म्हणाली की तू नाही आलीस तर मला माझ्या घरचे सोडणार नाहीत. कारण मला माझे वडिल आणि भाऊ म्हणालेत की तुझी ती टाटातली मैत्रीण येणार असेल तरच जा. शेवटी मी माझ्या घरी माझ्या आई वडिलांना विचारलं तर ते पण मला म्हणाले, सुवर्णा येणार असेल तर जा. पिकनिकला जायचं म्हणून दोन दिवस आधीपासून माझी तयारी सुरू झाली. पिकनिकच्या दिवशी मला पहाटे चार-साडेचारला निघावं लागणार होतं. पहाटे लवकर उठून माझ्या आईने (जिला आम्ही वहिनी म्हणतो) वहिनीने मला छान डबा बनवुन दिला होता.  मी त्या दिवशी छान नखरा केला होता. हिरव्या रंगाचा, मरुन काठांचा नारायणपेठ पंजाबी ड्रेस मी घातला होता. हातात सिल्व्हर रंगाचं मोठं कंगन त्याच्या दोन्ही बाजूला काचेच्या लाल बांगड्या, गळ्यात छानसं,मोठं सिल्व्हर नेकलेस, कानात झुमके, लांबसडक केसांची वेणी त्यावर भरपूर गजरे असा नखरा मी केला होता.

पहाटे चार-साडेचार वाजता माझा मोठा भाऊ, ज्याला आम्ही आप्पा म्हणतो तो मला मोटरसायकलवर सुवर्णाच्या घरी पोहोचवायला आला होता. इतक्या पहाटे एकटं कसं जायचं ? म्हणून शेजारचा एक मुलगा सोबत होता. सुवर्णाच्या घरी पोहोचले तर तिची तयारी चालू होती. आवरून झाल्यावर आम्ही निघालो. डिसेंबर महिन्यातली छान थंडी पडली होती. आम्ही तिच्या घरून चालत स्टेशनकडे निघालो. स्टेशन जवळ येत असताना थोडंसं लांबुनच पाहिलं तर वर्गातली सगळी मुलं-मुली, टीचर्स उभे होते. निलेशची मित्रमंडळीपण उभी होती. मी सगळीकडे पाहिलं तर निलेश काही मला दिसला नाही. तरीपण मला वाटलं होतं की तो येत असेल. पण निलेश काही आला नाही. माझा एकदम मूड गेला. निलेश आला नाही याचा मला प्रचंड राग आला. सुवर्णाला मी म्हणाले होत की मी पिकनिकला नाही येणार; पण तिनेच मला खूप आग्रह केल्यामुळे मला यावं लागलं होतं. म्हणून सुवर्णाचा मला खूप राग आला. आता काही इलाज नव्हता. निलेशशिवाय पिकनिकला तर मला जावंच लागणार होतं.आम्ही सगळे तिथुन निघालो आणि कल्याणहून दिव्यापर्यंत लोकलने गेलो. दिव्याला आम्ही सगळे रेल्वेच्या ब्रिजवर दुसऱ्या लोकलची वाट पाहात उभे होतो आणि अचानक निलेशचे मित्र निलेश, निलेश ओरडायला लागले. आम्ही ब्रिजवर उभे होतो आणि निलेश (हिरो) खाली प्लॅटफॉर्म वरून येताना त्यांना दिसला. निलेशच्या नावाने मुलं ओरडायला लागल्यावर मला इतका आनंद झाला होता की मी त्याचं वर्णन शब्दात करू शकणार नाही. निलेश पायऱ्या चढून ब्रिजवर आला आणि त्याची मित्रं त्याला म्हणायला लागले..अरे निलेश काय तू कुठे होतास, इकडे काय अवस्था झाली होती तुला माहितीए का. सगळा मूड गेला होता, चल बरं झालं तू आलास. जे काही कळायचंय ते मला कळलं होतं. माझा चेहरा मी कुठे लपवु, माझ्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन्स मी कसे लपवू अशी अवस्था माझी झाली होती. कदाचित निलेश माझी गंमत करण्यासाठी लोकलच्या दुसऱ्या डब्यात बसला असावा किंवा त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं असावं की बघु या तिची काय अवस्था होते.

नंतर आम्ही दिव्याहून पनवेलला जाण्यासाठी दुसऱ्या लोकलमध्ये बसलो. लोकलच्या एका डब्यात आम्ही चार मैत्रीणी बसलो होता. खिडकीत एक मैत्रीण, तिच्या शेजारी सुवर्णा आणि तिच्या शेजारी एकदम कडेला मी बसले होते. समोरच्या सीटवर खिडकीत एक मैत्रीण बसली होती. निलेश दारात मला दिसेल अशा ठिकाणी बसला होता. आता आम्ही मैत्रीणींनी सोबत आणलेला खाऊ खाण्यासाठी काढला होता. मी खाऊचा पुडा मैत्रीणींसमोर करत त्यांना खाऊ देत होते. तेवढ्यात निलेश तिथे आला आणि माझ्यासमोर येऊन बसला. मी खाऊचा पुडा पटकन बॅगेत ठेवला. त्यालाही दिला नाही आणि मीपण खाल्ला नाही. काय करावं काहीच सुचत नव्हतं. माझ्या आतमध्ये काय चाललंय मलाच कळत होतं. प्रचंड धडधड होत होती. निलेश समोर बसला होता; पण मी त्याच्याकडे बघूच शकले नाही. खूप लाज वाटत होती मला त्याची, मी खाली मान घालून निःशब्द बसले होते आणि तो माझ्याकडे बघत होता तो मला एकही शब्द न बोलता जणू सांगत होता की बघ मी कशी तुझी गंमत केली. पण आता आलोय मी. बघ माझ्याकडे. पण मी त्याच्याकडे केवळ लाजेने बघूच शकले नाही. पिकनिकच्या दिवशी निलेशने पांढऱ्या रंगाचा टाईट शर्ट आणि लाईट ब्राऊन रंगाची टाईट पँट घातली होती. शर्टच्या स्लिव्हज्‌ थोड्याशा वर फोल्ड केल्या होत्या. त्यात तो खुपच गोड दिसत होता, अगदी तरूण वयातला अमिताभ बच्चन तो दिसत होता.

आज ४० वर्षे झाली या गोष्टीला! पण पिकनिकचा तो निलेश अजुनही माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. पिकनिकच्या दिवशी आम्हाला दोघांना खूप जास्त वेळ एकमेकांचा सहवास मिळाला होता. आधी सुवर्णाने मला पिकनिकला येण्यासाठी केलेल्या आग्रहामुळे मी रागावले होते; पण निलेशच्या येण्याने सुवर्णाचे मी किती आभार मानू असं मला वाटू लागलं होतं. नाहीतर निलेशसोबतचे हे क्षण मी अनुभवलेच नसते. पिकनिकच्या दिवशी निलेशसोबत अनुभवलेले प्रत्येक क्षण आजही माझ्या नजरेसमोर जसेच्या तसे आहेत. अलिबागहून कल्याणला परत यायला आम्हाला रात्रीचे अकरा-साडे अकरा वाजले होते. मी कल्याणपासून लांब राहात असल्यामुळे इतक्या रात्री मी घरी कशी जाणार हा प्रश्न होता. मला माझ्या आईवडिलांनी सांगितलं होतं की तुला रात्री उशीर झाला तर तू सुवर्णाच्या घरी राहा आणि गुरुदेव हॉटेलमधुन घरी फोन करून तसं कळव. त्यानुसार मी सुवर्णाला सांगितलं आणि आम्ही गुरुदेव हॉटेलच्या दिशेने निघालो. आमच्यामागून इतर मैत्रीणी, निलेश, निलेशचे मित्र येत होते.

मनोजने माझ्या दोन मैत्रीणींना विचारलं की प्रणिता कुठे राहाते. (हे तो विचारत असताना मी ऐकलं होतं) माझ्या मैत्रीणी म्हणाल्या..नेतिवली येथे टाटा कँप आहे तिथे ती राहाते, तसं मनोज आणि इतर मित्र ओरडायला लागले, अरे.. निलेश जा तिला सोडवायला. पिकनिक नंतर लगेचच दुसऱ्या दिवशीपासुन कॉलेजला ख्रिसमसची सुट्टी होती.

आठवडाभराच्या सुट्टीनंतर आम्ही कॉलेजला आलो. वर्गात आल्यानंतर पिकनिकचाच विषय चालू होता. आम्ही सगळ्या मैत्रीणी बोलत बसलो होतो. ललिता नावाची एक मैत्रीण तिथे आली आणि सुवर्णाला म्हणाली की सुवर्णा असं ऐकलंय की निलेश तुझ्यामागे लागलाय. तेवढ्यात माझ्या दोन मैत्रीणी म्हणाल्या आम्हीतर असं ऐकलंय की तो प्रणिताच्या मागे लागलाय. तिला माहिती असेल की माझी अवस्था खूप कठीण झाली होती. माझ्या गालात प्रचंड हसू होतं आणि मी हसत हसत म्हटलं..ए मला यातलं काहीही माहिती नाही हं. नंतर पिकनिकचे फोटो आले. त्या सगळ्या फोटोत निलेश माझ्या मागेच उभा होता.

त्यानंतर काही दिवसांनी कॉलेजचे स्पोर्टस्‌ सुरू झाले. स्पोर्टस्‌ असल्यामुळे वर्गात लेक्चर्स होत नव्हते. सगळी मुलं कॉलेजच्या ग्राऊंडवर असायची. आम्ही ७-८ मैत्रीणी वर्गात गप्पा करत बसलो होतो. ललिता तिथे आली आणि म्हणाली, अरे तुम्ही इथे का बसलात? आपल्या वर्गाच्या कबड्डीच्या काँपिटीशन आहेत.. चला ग्राऊंडवर. म्हणुन आम्ही ग्राऊंडवर जायला निघालो. ग्राऊंडवर प्रचंड गर्दी होती. प्रत्येक वर्गाचे स्पोर्टस्‌ वेगवेगळ्या ठिकाणी चालू होते. आमच्या वर्गाची कबड्डीची स्पर्धा एका बाजुला चालू होती. तिथे आम्ही जाऊन उभे राहिलो. आम्ही तिथे पोहोचताच सगळ्या मुलांनी निलेश - निलेश - निलेश एकच गजर केला. निलेश कबड्डी खेळत होता. ( पळता भुई थोडी ) अशी माझी अवस्था झाली होती. काय करू आणि कुठे पळून जाऊ अशी माझी अवस्था झाली होती.

त्यानंतर S.Y.  चं वर्ष सुरू झालं. निलेशचं आणि माझं एकमेकांकडे बघणं पाच वर्षे चालू होतं. S.Y. ला असताना वर्ष अखेरीस सुवर्णाचं लग्न ठरलं. सुवर्णाचं लग्न ठरलं याचं मला खूप वाईट वाटलं होतं. कारण सुवर्णा माझी जिवलग मैत्रीण होती. तिच्या नसण्याने माझं कॉलेज लाईफ जवळपास संपल्यासारखं वाटत होतं. सुवर्णा सोबत नसल्यामुळे माझं कॉलेजच्या बसने जाणं बंदच झालं. मग मी इतर मुलींसोबत त्यांना सोईस्कर पडेल अशा मार्गाने चालत कॉलेजला जाऊ लागले. त्यामुळे निलेशचं कॉलेज स्टॉपवर किंवा बसमध्ये दिसणं बंदच झालं. T.Y. चं वर्ष सुरू झालं . T.Y. चं वर्ष महत्वाचं असल्यामुळे थोडं धावपळीचंच होतं. सगळ्या मुलांनी वेगवेगळे विषय घेतल्यामुळे मुलं वेगवेगळ्या वर्गांत विभागली गेली होती. T.Y. ला असताना शेवटचे दोन-तीन महिने निलेश मला दिसलाच नाही. काय झालं मला माहिती नाही. निलेश मला कॉलेजमध्ये दिसत नव्हता. माझी नजर मात्र त्याला रोज कॉलेजमध्ये शोधत होती. निलेशचं न दिसणं मला अस्वस्थ करून टाकत होतं.

T.Y. ची परीक्षा जवळ आली होती. आता निलेश मला कदाचित परत कधीच दिसणार नाही असं मला वाटत होतं. आम्ही मैत्रीणी मेहेंदळे सरांच्या क्लासला जायचो. एक दिवस क्लासला जात असताना वाटेत समोर रस्त्यापासून थोडं लांब एका बाजुला निलेश माझी वाट बघत उभा असलेला मला दिसला, तो अशा ठिकाणी उभा होता की समोरून आल्यास नजर मला चुकवूच शकणार नाही. त्याने माझ्याकडे पाहिलं, मी त्याच्याकडे पाहिलं. निलेश खूप दिवसांनी मला दिसल्यामुळे मला खूप आनंद झाला होता आणि रडूपण आलं होतं. नजरेने तो मला सांगत होताकि दोन-तीन महिने मी नाही ना दिसलो तुला, तू माझी वाट पाहिलीस ना. बघ मी आलोय तुला भेटायला. अजुनपण मी तुझी वाट बघतोय. तू ये माझ्याजवळ, पण नेहमीप्रमाणे मैत्रीणी काय म्हणतील हाच विचार मी करत राहीले आणि मैत्रीणी सतत तुझ्या सोबत असतात तर मी तुझ्याशी कसं बोलू असं त्याला वाटत असावं. निलेशचं ते क्लासजवळ येऊन मला बघणं हे माझ्यासाठी खूप भारी होतं. नेहमीप्रमाणे आम्ही एकमेकांशी नाहीच बोललो. ही निलेशची आणि माझी शेवटची भेट होती.

नंतर T.Y. .ची परीक्षा सुरू झाली. पहिला पेपर मला अवघड गेला याचं मला खूप टेंशन आलं. पेपरचं टेंशन  मला इतकं आलं की मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावे लागले होते. त्यामुळे मी परीक्षा देऊ शकले नाही. परीक्षा बुडल्यामुळे मी सतत टेंशनमध्ये असायचे, ग्रॅज्यूएशन मी पूर्ण करू शकले नाही याची खंत मला होती. आता मी कधी परीक्षा देते आणि माझं ग्रॅज्यूएशन पूर्ण करते एवढंच ध्येय माझ्यासमोर होतं. या काळात मी निलेशला पूर्ण विसरून गेले. कारण यानंतर निलेश मला कुठे भेटला असता? मे महिन्यात माझी T.Y. ची परीक्षा होती आणि ऑगस्ट महिन्यात माझं लग्न ठरलं. मुलगा पुण्याचा होता. माझ्या लांबच्या नात्यातलाच होता. दिसायला देखणा, गोरापान, उंचापुरा, चांगली नोकरी असलेला नवरा मला मिळाला. डिसेंबरमध्ये साखरपुडा झाला आणि जानेवारीत माझं लग्न झालं.

एके दिवशी नवऱ्यासोबत उल्हासनगरला फिरायला मी चालले होते. कल्याणला उल्हासनगरच्या बसस्टॉपकडे येऊन आम्ही दोघे उभे राहिलो. बस स्टॉपवर समोर बघते तर काय? बस स्टॉपच्या पाईपावर निलेश बसला होता. (बस स्टॉपवर पाईपवर बसायची निलेशला सवयच होती. तो नेहमी पाईपवर बसायचा. तो उंचापुरा असल्यामुळे त्याचे ते लांब लांब पाय फोल्ड करून पाईपवर बसलेला खूपच सुंदर दिसायचा. त्याचं ते मांडीवर दोन हात ठेवून थोडसं वाकून बसणं, थोडीशी मान तिरकी करून बघणं मला खुपच आवडायचं). जवळपास पंधरा मिनिटं निलेश एकटक आमच्याकडेच बघत होता. नंतर उल्हासनगरची बस लागली. तो बसच्या जवळ होता; पण बसमध्ये गेला नाही. तिथेच बसुन तो आमच्याकडे बघत होता.आम्ही त्याच्या समोरून आलो आणि मी त्याच्याकडे साधं बघितलंसुद्धा नाही. त्याच्यासमोरून जाऊन मी बसमध्ये चढले. शेवटच्या स्टॉपला उतरायचं होतं म्हणून मी पुढे जाऊन डाव्या बाजूच्या दोन सीटवर बसले मी खिडकीत बसले. माझ्या शेजारी माझे मिस्टर बसले. आमच्या शेजारच्या तीन सीटवर कडेला निलेश येऊन बसला. म्हणजे मी, माझे मिस्टर आणि त्यांच्या बाजुला शेजारच्या सीटवर निलेश बसला. तसं पाहिलं तर त्याला बिर्ला कॉलेजच्या पहिल्या स्टॉपला उतरायचं होतं; त्यामुळे तो मागे बसू शकला असता पण तो आमच्या शेजारी येऊन बसला होता.

त्याच्या मनात काय चाललं होतं कोण जाणे ! कदाचित तो नेहमी माझ्याकडे बघायचा तसा ती आजपण माझ्याकडे बघेल असं त्याला वाटलं असावं किंवा ती आहे तोपर्यंत मला तिच्या सहवासात बसायचय असं त्याला वाटलं असावं. माहित नाही. बिर्ला कॉलेजच्या स्टॉपला निलेश उतरला मी खिडकीतून त्याला पाहिलं. त्यानंतर कित्येक दिवस मी निलेशकडे त्यादिवशी साधं बघितलंसुद्धा नाही याची खंत मला वाटत राहीली.

 एक स्माईल मी त्याला दिली असती तर काय बिघडलं असतं, असं मला वाटायला लागलं. निलेश माझा कोणीतरी होता; पण साधी ओळखपण त्याला मी दिली नव्हती, याचंं मला खूप वाईट वाटलं होतं. लग्नानंतर मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं.

एके दिवशी मी कल्याणला माहेरी आलेली असताना माझी धाकटी बहिण प्रतिभा मला म्हणाली.. राणी, चल आपण बाहेर फिरायला जाऊ. त्यावेळी मी नुकतीच गरोदर होते आणि आम्ही एका मैत्रीणीसोबत बाहेर फिरायला गेलो. समोरून थोडंसं लांबून निलेश त्याच्या दोन मित्रांसोबत मला येताना दिसला. त्यानेपण लांबुनच माझ्याकडे बघितलं आणि मी ठरवलं की आता आपण  निलेशशी बोलायचं आणि मी तोंडभरून निलेशकडे बघून हसले. तोपण हसला. त्यानंतर २-३ मिनिटं मी त्याच्याशी बोलले. निलेश आणि माझ्या लव्ह स्टोरीचा अंत असा कसा झाला हे आम्हाला दोघांनाही कळलं नाही. आम्ही दोघांनी एकदातरी एकमेकांशी बोलायला हवं होतं, ही खंत आजही आहे.

ह्या गोष्टीला आता ४० वर्षे झाली. माझ्या मिस्टरांच्या आग्रहास्तव माझी ही कहाणी आज मी कागदावर उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. माझी दोन्हीही मुलं आता शिकून खूप मोठी झाली आहेत. जिवापाड माझ्यावर प्रेम करणारा माझा नवरा आहे. पण मी आजही निलूला विसरू शकले नाही. निलेशसोबत अनुभवलेला एक एक क्षण मी कसा विसरू शकते? कॉलेजमध्ये असताना, घरी जाताना टाटाच्या बसमध्ये मी बसलेली असताना रस्त्याच्या पलीकडून जाणारा निलेश माझ्याकडे बघितल्याशिवाय कधीही जात नव्हता. (आजही तो क्षण माझ्या नजरेसमोरून जात नाही.)

आयुष्याच्या या वळणावर मला निलेशला भेटायचंय! त्याच्याशी खूप बोलायचंय! फक्त आणि फक्त स्वच्छ, निखळ मैत्री त्याच्या सोबत करायचीय. एक होता निलेश म्हणण्यापेक्षा एक आहे निलेश असं म्हणायला मला जास्त आवडेल. - प्रणिता परिहार 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

प्रभाते मनी राम चिंतीत जावा