प्राचीन राजसत्तेचा गौरव असणारा नळदुर्ग किल्ला
नळ म्हणजे नलराजाच्या राज घराण्यापर्यंत इतिहास जाऊन पोहचतो! इ.स पाचव्या शतकातील चालुक्य घराण्यातील राजांनी बांधलेल्या! अर्थात नल राजाने आपल्या राजकुमाराच्या सोयीसाठी बांधलेला हा भुईकोट किल्ला आहे! नळदूर्ग नल राजाच्या नावानेच प्रसिद्ध आहे! या किल्ल्यावर अनेक सत्ता राज्य करून गेल्या! चालुक्य, बहामनी, मोघल, निजाम अशा अनेक सत्ताधीसानी राज्य केले! नंतर इंग्रजानी हा भुईकोट किल्ला ताब्यात घेतला होता!
माणूस निसर्गाचा अंश आहे! निसर्गाचं चालतं बोलतं मातीने घडविलेलं रुपडं आहे! माणसाने निसर्गाशी नाळ जोडली आहे! निसर्गाशी एकरूप होता होता निसर्गावरचं मात करीत निसर्गाशी वैर घेऊन माणूस माणसाचाचं वैरी होतो आहे! प्राचीन काळी जेव्हा माणसाला माणसाचीच भीती वाटू लागली असेल तेव्हा त्यानें स्वसंरक्षणार्थ निसर्ग कुशीचा आधार घेतला असावा! नैसर्गिक संसाधनांच्या बळावर माणूस माणसांवरचं आक्रमण करीत राहिला! सत्ता गाजवीत राहिला! त्याचं दमन करीत राहिला! जय-पराजयाच्या प्रचंड रक्तपाती घटना घडत राहिल्या! स्व अस्तित्वाच्या लढाया लढल्या गेल्या असतील! रक्षात्मक डावपेचातून आक्रमक झाला असेल! स्वतःशी लढता लढता परक्यांशी लढला असेल!
माणूस ढाल होऊन अंगावर वार घेत राहिला! इतरांचाही रक्षा कवच बनत राहिला! ‘बळी तो कान पिळी' म्हणीप्रमाणे आक्रमकी ताकदवराने हुकूमत गाजवायला सुरुवात केली असावी! सत्तेची साठमारी वाढत गेली असावी! शत्रूकडून आक्रमणाची भीती वाटू लागली असेल! नैसर्गिक अविष्काराचा फायदा उठवीत निसर्गाच्या कुशीतच सुरक्षित अभेद्य अस्तित्त्व टिकविण्यासाठी काही बांधकामं झाली असावीत! त्यांला किल्ला नाव दिले असावे! अफाट सफाट भूमीवर प्रचंड मोठे बुरुज, तटबंधी बांधून भुईकोट किल्ला बांधला असावा! कधी समुद्रात, पाण्यातील बेटावर किल्ला बांधला असावा! अभेद्य तटबंधीतून जलदुर्ग बांधला असावा! उंच उंच पर्वतांवर भक्कम बुरुज, तटबंदी बांधले असतील अतिविशाल डोंगरी किल्ले बांधले असावीत! आक्रमण अन संरक्षणाच्या दृष्टिने किल्ल्यांना अतिमहत्व प्राप्त झालें असावें! ऐतिहासिक अस्तित्ववादाच्या अशा कित्येक खाणाखुणा तत्कालीन बांधलेल्या.. पण आता पडक्या, ढासळलेल्या, जीर्ण किल्ल्यातून जाणवत असतात! आम्ही अशाच एका भुईकोट किल्ल्यावर गेलो होतो! दिनांक २९ डिसेंबर २०२४ रोजी धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध साडेतीन पिठापैकी एक तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या पवित्र श्रद्धास्थानापासून अवघ्या ३३ किलोमीटर असणाऱ्या नळदुर्ग भुईकोट किल्ला पहायला गेलो होतो!
महाराष्ट्रातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला पाहायला गेलो होतो! तीन किलोमीटर चौरस क्षेत्रफळ असणाऱ्या या भुईकोट किल्ल्यावर आमचे सेनापती श्रीं.वसंतराव बागूल सरांसोबत गेलो होतो! पूर्वीच्या उस्मानाबाद अर्थात आताच्या धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग गावाशेजारी असणाऱ्या किल्ल्यावर गेलो होतो! किल्ल्याचं अतिभव्य स्वरूप पाहता आश्चर्य वाटायला होतं! इतिहासातील एक एक पाने मागे जात राहातात! नळ म्हणजे नलराजाच्या राज घराण्यापर्यंत इतिहास जाऊन पोहचतो! इ.स पाचव्या शतकातील चालुक्य घराण्यातील राजांनी बांधलेल्या! अर्थात नल राजाने आपल्या राजकुमाराच्या सोयीसाठी बांधलेला हा भुईकोट किल्ला आहे! नळदूर्ग नल राजाच्या नावानेच प्रसिद्ध आहे! या किल्ल्यावर अनेक सत्ता राज्य करून गेल्या! चालुक्य, बहामनी, मोघल, निजाम अशा अनेक सत्ताधीसानी राज्य केले! नंतर इंग्रजानी हा भुईकोट किल्ला ताब्यात घेतला होता!
साधारण १२७ एकरात पसरलेल्या या भुईकोट किल्ल्याला आजही अतिशय सुस्थित असलेले भक्कम बुरुज अन डबल कोट तटबंदी असलेलं बांधकाम दिसतं! प्राचीन राजसत्तेचा गौरव असणारा हा भुलभूलय्या किल्ला आहे! महा प्रवेशद्वारापासूनच त्याची सुरुवात होते! १४५ बुरुज असलेला भक्कम दगडी बांधकामातील नागमोडी वळणं घेत, बुरुजातून वेडीवाकडी वळणे घेत आत प्रवेश करावा लागतो! आत गेल्यावर अनेक राजसत्ता अस्तित्वाच्या खाणाखुणा खुणावत असतात! अनेक ठिकाणी किल्ल्याच्या प्राचीन तटबंधी ढासळलेल्याही दिसतात!
किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे बाहेरून वाहात येणारी बोरी नदी किल्ल्याच्या आत प्रवेश करते! किल्ल्याच्या आत नदीवर धरणरुपी बांध बांधला आहे! त्या बांधावरून नर-मादी धबधबे दिसतात! पावसाळ्यात नदीला भरपूर पाणी असतं तेव्हा नर-मादी दोन्ही धबधबे खळखळून वाहातांना दिसतात! नदीवर बांधलेला बांध बांधकाम क्षेत्रातील चमत्कार म्हणावा असा आहे! त्यावेळेस इतकं आधुनिक तंत्रज्ञान होतं यावर विश्वासचं बसत नाही! जिथे पाणी अडवलं आहे त्या दोन्ही धबधब्याच्या आतल्या भिंतीत अतिशय भव्य पाणी महाल बांधलेला नजरेस पडतो! नदीचं विस्तीर्ण पात्र असून कडेने दोन्ही बाजूनीं किल्ल्याच्या भक्कम तटबंधीमुळे किल्ल्याची भव्यता डोळ्यात भरते! नळदुर्ग किल्ला म्हणजे महाराष्ट्राचा ऐतिहासिक अनमोल वारसा आहे!
किल्ल्यात अनेक महाल असून, प्रवेशद्वारापासून तटबंधीच्या आत अनेक दगडी इमारती आहेत! बेसाल्ट दगडातील कोरीव बांधकाम प्राचीनतेची उत्कृष्ट कलाशिल्पची ओळख आहे! किल्ल्यात अनेक तोफा दिसतात त्यापकी एक राणीमहाल समोर ठेवलेली कमी व्यासाची पण २५ फूट लांब अशी भव्य तोफ ठेवण्यात आलेंली आहे! किल्ल्याच्या मध्यवर्ती ठिकाणी टेहळणी बुरुज बांधलेला दिसतो! संपूर्ण किल्ला नजरेच्या टप्यात येईल इतका उंच बुरुज असून साधारण त्याची उंची १५० फुटाच्या वर असावी! त्या बुरुजाचं नाव उपली बुरुज असं आहे! बुरुजावरती अतिविशाल दोन तोफा ठेवलेल्या आहेत! त्या एवढ्या उंचावर कशा नेल्या असतील हा संशोधनाचा विषय आहे! बुरुजाच्या आत टेहळणीस असलेल्या सैनिकांना विश्रांतीसाठी आखीव रेखीव खोल्या बनवल्या आहेत! असा हा नळदुर्ग किल्ला कर्नाटक सीमेपासून जवळ असून निजामशाहीच्या अखत्यारीतून थेट इंग्रजांच्या ताब्यात गेलेला किल्ला असावा!
भक्कम बुरुज अन तटबंधीनी युक्त कोरीव, कलाशिल्पातील आधुनिक तंत्रज्ञानाला आव्हान देईल इतका उत्कृष्ट, नितांत सुंदर भुईकोट नळदुर्ग किल्ला पाहण्याचं भाग्य लाभलं!
-नानाभाऊ माळी