लग्न पत्रिकांची विल्हेवाट लावताना..
दरवर्षी विवाहाच्या मोसमात घरी येऊन पडणाऱ्या पत्रिकांचे पुढे करायचे काय हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. काहीजण त्या रद्दीत देतात तर काही थेट केराच्या डब्यात टाकतात. हिंदू धर्मात लग्नपत्रिकेवर श्री गणेशाचे चित्र छापण्याची किंवा मुखपृष्ठावर गणेशाचे चित्र असलेली पत्रिका विकत घेण्याची प्रथा आहे. गणपतीचे चित्र असलेल्या अशा पत्रिका केराच्या डब्यात टाकल्याने श्री गणेशाचा अवमान होतो. अशावेळी पत्रिकेवरील देवतेचे चित्र व्यवस्थित कापून ठेवावे आणि त्या चित्राचे देवघरातील निर्माल्यासोबत वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. जुने कॅलेंडर रद्दीत देताना, त्यांतील देवतांच्या छायाचित्रांची कात्रणे काढून तीसुद्धा निर्माल्यासोबत विसर्जित करूया !
सध्या सर्वत्र लगीन सराई सुरु आहे. प्रतिदिन कुठे ना कुठे विवाहाची गाणी, बॅण्डबाजाचे स्वर ऐकू येत आहेत. विवाह हा जीवनातील अत्यंत महत्वाचा क्षण मानला जातो. तो क्षण अधिक आनंददायी आणि यादगार व्हावा यासाठी प्रत्येक जण आपापल्या ऐपतीनुसार प्रयत्न करत असतो. विवाह निश्चित झाला कि सर्वात प्रथम कृती केली जाते ती म्हणजे पत्रिका छापण्याची आणि कोणाकोणाला निमंत्रण द्यायचे त्याची यादी तयार करण्याची. पत्रिकेसाठी मजकूर तयार करणे, पत्रिकेत नमूद करायची नावे काढणे, पत्रिकेचे नमुने पाहणे या गोष्टी एकामागोमाग सुरु होतात.
कोकणात पूर्वी विवाहाचे निमंत्रण द्यायला जाताना नारळ घेऊन जात असत. घरातील जेष्ठ मंडळींच्या हातात आदराने श्रीफळ देऊन त्यांचा आशीर्वाद घेतला जात असे. घरातील शुभकार्याला कुटुंबातील सर्वांना उपस्थित राहण्याचे तोंडी निमंत्रण दिले जात असे. पुढे प्रिंटेड पत्रिकांचा जमाना आला. कोणाकोणाला पत्रिका द्यायच्या याची यादी तयार करून कोणाला कोणी आणि कधी पत्रिका द्यायला जायचे याचे नियोजन केले जाते. या संपूर्ण निमंत्रण प्रक्रियेसाठी किमान १५ दिवस राखून ठेवावे लागतात. आता तर सोशल मीडियाचा जमाना आहे. सर्वच कार्यक्रमांचे निमंत्रण व्हाट्सअप च्या माध्यमातून एका सेकंदात एका क्लिकमध्ये सर्वांना पाठवले जाते. हल्ली तर पत्रिकेच्या फोटोसह निमंत्रणाचा व्हिडीओ तयार करून तो पोस्ट केला जातो. फेसबुक, टि्वटर आणि इंस्टाग्रामवर पत्रिकेची इमेज अपलोड करून सर्वांना लग्नाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले जाते. जमाना बदलला असला, निमंत्रण पद्धतीत सोशल मीडियाने अतिक्रमण केले असले, तरी निमंत्रण पत्रिकेचे महत्व अद्याप कमी झालेले नाही हेही खरे. थोड्या का होईना जवळच्या नातेवाईकांना आणि प्रतिष्ठित मंडळींना देण्यासाठी पत्रिका छापल्या जातातच. कुटुंबाच्या ऐपतीनुसार निमंत्रण पत्रिकेचे मूल्य ठरवले जाते. ज्याला बडेजाव दाखवायचा आहे अशी मंडळी एकेका पत्रिकेसाठी १०० ते २०० रुपयेसुद्धा खर्च करतात. अर्थात पत्रिका पाहणारा केवळ लग्नाची तारीख आणि मुहूर्त पाहतो त्यामुळे बाकीच्या शोबाजीला काही अर्थ उरत नाही. सध्या लगीनसराई सुरु असल्याने घरोघरी लग्नाच्या पत्रिका वाटल्या जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात पत्रिकांचा खच येऊन पडला आहे.
दरवर्षी विवाहाच्या मोसमात घरी येऊन पडणाऱ्या पत्रिकांचे पुढे करायचे काय हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. काहीजण त्या रद्दीत देतात तर काही थेट केराच्या डब्यात टाकतात. हिंदू धर्मात लग्नपत्रिकेवर श्री गणेशाचे चित्र छापण्याची किंवा मुखपृष्ठावर गणेशाचे चित्र असलेली पत्रिका विकत घेण्याची प्रथा आहे. गणपतीचे चित्र असलेल्या अशा पत्रिका केराच्या डब्यात टाकल्याने श्री गणेशाचा अवमान होतो. ज्या गणेशाच्या स्मरणाने आणि पूजनाने आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करतो. ज्या गणेशाला गणेश चतुर्थीच्या काळात मूर्तिरूपाने आपण सन्मानाने घरी आणून त्याची मनोभावे पूजा करतो, ज्याला आपल्या देवघरात अग्रभागी स्थान देतो, त्याच्या कृपेसाठी उपास तापास करतो त्या गणेशाचा अशाप्रकारे होणारा अवमान आपण कधी लक्षातच घेत नाही. रद्दीत दिल्या जाणाऱ्या पत्रिकांचे पुढे काय होते हेही आपणास ठाऊक नसते. देवतेचे नाम अथवा देवतेचे चित्र ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी त्या देवतेचे शब्द, स्पर्श, रूप आणि शक्ती कार्यरत असते असे शास्त्र सांगते. त्यामुळे पत्रिकेवरील देवतेच्या चित्राचा सन्मान राखणे आवश्यक आहे. मात्र या पत्रिका साठवून तरी काय करायचे हाही प्रश्न आहेच. अशावेळी पत्रिकेवरील देवतेचे चित्र व्यवस्थित कापून ठेवावे आणि त्या चित्राचे देवघरातील निर्माल्यासोबत वाहत्या पाण्यात विसर्जन करावे, जेणेकरून आपल्या हातून देवतेचा अवमान होणार नाही आणि मनाचेही समाधान होईल. घरी येणाऱ्या श्री सत्यनारायण महापूजेच्या, वास्तुशांतीच्या पत्रिकांचा बाबतीतही आपण वरील प्रमाणे कृती करू शकतो. जुने कॅलेंडर रद्दीत देताना, त्यांतील देवतांच्या छायाचित्रांची कात्रणे काढून तीसुद्धा निर्माल्यासोबत विसर्जित करूया ! - जगन घाणेकर