अक्षर आणि पेपर

माणूस तोच, पण जगण्याची पद्धत बदलत आहे. ७५ वयोमानानुसार मी अजूनही बऱ्यापैकी शिकत आहे, आजच्या विश्वातील जगण्याची तऱ्हा! नवीन वर्ष २०२५ आले, तरीही प्रिंट मिडिया सशक्त आहे. पुल सांगतात- ‘माणूस' महत्वाचा आणि व्यक्त होण्यासाठी ‘अक्षर' महत्वाचे! विचारवंत, प्रख्यात वगैरे पठडीतील विद्वानांनी व्यक्त केलेले विचार आणि एका दर्दी वाचकाने व्यक्त केलेला विचार, या दोन्ही बाजूंना एक वेगळाच गंध आहे. तो अभ्यासक म्हणून मला जवळचा वाटतो. आपण लेखणी सांभाळून वापरली पाहिजे. वाचकांच्या भावना दुखावल्या जातील असे लिहिणे टाळले पाहिजे.

१९९० ला मी गांवी परतलो. शेती ह्याच क्षेत्रात मला स्थिरावयाचे होते. म्हणूनच अनेक स्थानिक शेती तज्ञांचे मार्गदर्शन मिळविले. काहींनी चांगली माहिती दिली, तर काहींनी टोकाचे मत व्यक्त करून, तूर्तास मुंबई गाठावी, असा फर्मान दिला. काहींच्या पोटात गोळा आला, काहींच्या छातीत द्वेष जाऊन दडला. काहींना काहींच सुचेना म्हणून परातभर नकारात्मक अनुभव रंगवून सांगितले. एकूण काय तर ‘आयतोबा' डॉट कॉम मालिकेत सामिल होण्याचा एक मार्ग असावा तो, हे ध्यानी आले.

शेवटीं काय? तर ऐकावे जनांचे, करावे मनाचे. नेमके तेच मी केले.
पुल सांगतात- ‘माणूस'  महत्वाचा आणि व्यक्त होण्यासाठी ‘अक्षर' महत्वाचे! अक्षर खुणावत होतं की बदलत्या कोकणातले अनुभवाचे टिपण करत रहावे व तसेच करू लागलो. डायरी लिहिण्याचा मोह तेव्हापासून सुरू झाला. तो आजही सुरू आहे. त्यांतील काही टिपण रत्नागिरीतील प्रथम दैनिक रत्नभूमी चे मालक-संपादक राजाभाऊ पालांडे यांनी वाचली व ती दैनिक रत्नभूमीमध्ये प्रकाशित करायला सुरुवात केली. साप्ताहिक सदर सुरू झाल्यावर वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक हातो. दापोली एसटी स्टॅन्डच्या आवारातील पेपर स्टालवर अनेक पेपर्स येऊ लागले. त्यावेळी  मुंबई पार्सल व्हाया खेड येत असे. म्हणून च्या ११सुमारास मुबंई पेपर्स मिळत असत. पण दापोलीत सर्वप्रथम रत्नागिरीहुन  ‘रत्नागिरी टाईम्सची'  गाडी यायची. रत्नागिरी एक्सप्रेस, पुढारी अशा इतर पेपर्सचासुद्धा समावेश त्यात असायचा. पण रत्नभूमी मात्र एकमेव असा पेपर होता जो केवळ एसटी पार्सलने दापोलीत यायचा! अनेकवेळा एसटीचे आगमन उशिरा व्हायचे. त्यावेळी मी स्वतः अनुभवले की तीन-चारच्या सुमारास आलेले पार्सल एका बाजूस पडून असायचे. उशिरा आलेला पेपर कोण स्वीकाणार? बरं तोवर विविध गावांतून दापोली शहरांत आलेले नागरिक एव्हाना परत निघून गेल्याने उशिरा आलेले पेपर खरेदी करण्यासाठी वाचकच उरलेला नसे. एकदा भटकंती करत एक जर्सी गाय पेपर स्टोलवर येऊन उभी राहिली तर तेथील ठेवलेले पेपराचे पार्सल ती चघळू लागली. हे मला अवमानास्पद वाटले. केवळ टेक्निकल कारणाने उशिरा येणारे पेपर्स त्याच दिवशीं रद्दीत जमा व्हावेत हे दुर्दैव होय.

तोवर चिपळूण येथून प्रकाशित होणारे दैनिक सागर थेट गांवी येऊ लागले. मामा महाजन वृद्धापकाळाने आजारी होते, मी त्यांची तब्येतीची चौकशी करणयास म्हणून गेलो असता माझ्या समोर मामांनी नाना जोशी यांना थेट फोन करून इकबाल बरं लिहितोय, त्याचे लिखाण सागर मध्ये छापत जा. मामा म्हणाला. छान लिहितोय, मग पुढे काय? तेंव्हापासून माझे स्फुट लिखाण सागर मध्येही  प्रकाशित होऊ लागले.

एके दिवशी दोन विविध पेपरांतून मी लिहिलेला एक वैचारिक लेख एकाच दिवशी प्रकाशित झाला. हा योगायोग असावा. अनेकांनी लॅण्डलाईन वरून शुभेच्छा व्यक्त केल्या. काहींनी केवळ कुतूहल म्हणून त्या लेखातील वस्तुस्थितीचा आढावा म्हणून संदर्भ जाणून घेण्यासाठी कोणत्या पुस्तकात उपलब्ध असेल ह्याची खात्री करून घेतली.

 "ह्याचा अर्थ तुम्ही मराठी पुस्तकं वाचता तर...?” असा साशंक प्रश्न विचारलाच. मलाही तशा खोचक प्रश्नांची उत्तरं द्यायला आवडली. तरुण भारत, पुढारी, लोकमत, पुण्य-नगरी(कोल्हापूर) ते थेट प्रभात (पुणे) इत्यादि पेपरांतून माझे कृषी, पर्यटन तसेच इतर सामाजिक विषयांवरील वैचारिक लिखाण प्रकाशित होऊ लागले. सागरचे उपसंपादक भालचंद्र दिवाडकर यांच्याशी वैचारिक ‘वाद' अधूनमधून व्हायचे. पण त्यांत कटुता नसायची. काही गोष्टींचा मला उलगडा व्हायचा; तर काही विषयावर मला बोलता यायचे. कुठलेही विधान छापील पुस्तकाचा संदर्भ दिल्याशिवाय लिहित नव्हतो. आज ऑनलाइन नेटिझन्स काय-काय म्हणून  लिहितात, ते वाचून चकित व्हायला लागते. वाङ्‌मयीन चौर्य तर खुल्लम खुल्ला केले जात आहे!! हे आता गुपित राहिलेले नाही.

पेपरांतून लिखाण छापून येत असे त्यांस ३० वर्षांचा कालावधी लोटला. काही निवडक अनुभव आले त्याची नोंद घेणे आवश्यक आहे. दापोली एसटी सेवेत ड्रायव्हर म्हणून त्यावेळी कार्यरत असलेले श्री. गोपाळ परांजपे यांच्याशी तोंड ओळख होती. मात्र माझे प्रकाशित स्फुट किंवा लिखाण ते आवर्जून वाचायचे व फोनही करायचे! काही कारणास्तव माझे लिखाण ‘पुण्य-नगरी' कोल्हापूर आवृत्ती कार्यालयात उशिरा गेले. त्यावेळी माझे दैनिक सदर (शनिवार-रविवार वगळून)  प्रकाशित होत असे. २ रु. चा पेपर गोपाळराव रोजच विकत घ्यायचे. एके दिवशी थेट गाडी थांबवून दम भरला काका लिखाण येत का नाही?

मी खूप हसलो. मनाने त्यांना धन्यवाद बोलत पुन्हा अशी चूक होणार नाही असे म्हणताच गाडी पुढे हलली!
सकाळ पेपरांतून माझे लिखाण जेव्हां-जेव्हां प्रकाशित झालंय, तेव्हां चार-पांच दिवसांत लेखाचे मानधन क्रॉस चेकने घरपोच व्हायचे! हे विशेष!पुण्यातील प्रभात दैनिकात ही कोकणाविषयीचे काही निवडक लेख प्रकाशित झालेत. तेथील काही कोकणातील लोक नोकरीच्या निमित्ताने गेलेत त्यांतील काहींनी पोस्टकार्ड लिहून आपल्या प्रतिक्रिया कळवल्या, तेव्हां कळलं दर्दी वाचक असे ही असतात जे चार शब्द का होईना, आपलेपणाने लिहितात.

असेंच एकदा चिपळूण येथील एका गॅरेजमध्ये माझ्या गाडीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. मॅकेनिक गाडी खाली झोपून काम करत होता व शेजारी बसलेल्या माझ्या मित्राना सांगत होता,

"कोळथरचे एक लेखक लोकमतमध्ये दर गुरुवारी लिहितात. तुम्ही ओळखता का त्यांना?”
ओळख न दाखवता आम्ही तेथून निघून आलो. विचारवंत, प्रख्यात वगैरे पठडीतील विद्वानांनी व्यक्त केलेले विचार आणि एका दर्दी वाचकाने व्यक्त केलेला विचार, या दोन्ही बाजूंना एक वेगळाच  गंध आहे. तो अभ्यासक म्हणून मला जवळचा वाटतो. वाचक आहेत. आपण लेखणी सांभाळून वापरली पाहिजे. वाचकांच्या भावना दुखावल्या जातील असे लिहिणे टाळले पाहिजे.

रविवार लोकसत्ता, पाक्षिक सर

स-सलील (दिल्ली) अशा देशस्तरीय अंकांमधून प्रासंगिक लिहिले आहे. ज्यामध्ये कोकणातील चिरेखाण, मत्स्य व्यवसाय इत्यादींवर विशेष लेख प्रकाशित झाले होते

गेल्या ७/८  वर्षांपासून सोशल मीडिया वरील नेटिझन्स या विश्वात तोंडओळख झालीय. ज्यामुळे ब्लॉग रार्इटिंग, कथा लेखन इत्यादी क्षेत्रात अगदीं मोजकेच पण जाणकार मित्र लाभलेत. ऑडिओ मॅगेझिन, ऑडिओ स्टोरी इत्यादी श्राव्य क्षेत्रातही जाणकार आहेत. आपल्या कामाची दखल घ्ोतात. व्हाट्‌सअपच्या माध्यमांतून लिखाण कमी पण संगीत क्षेत्रातील जाणकारांना ऐकू/पाहू शकलो. सकारात्मक दृष्टीकोन असेल तर  सोशल मीडियावर लिखाण करणे तसेंच इतरांचे दर्जेदार लेख, कविता, विनोद, इत्यादी  वाचणे हा एक वेगळाच विरंगुळा असेल, जो सध्या मी अनुभवत आहे.

शेवटीं, माणूस तोच, पण जगण्याची पद्धत बदलत आहे. ७५ वयोमानानुसार मी अजूनही बऱ्यापैकी शिकत आहे, आजच्या विश्वातील जगण्याची तऱ्हा! नवीन वर्ष २०२५ आले, तरीही प्रिंट मिडिया सशक्त आहे. महाड येथून प्रकाशित होणाऱ्या दैनिक ‘रायगडचा आवाज' मध्ये गेली काही वर्षे साप्ताहिक सदर लिहित आहे. वाशी-नवी मुंबई येथील ‘आपले नवे शहर' या पेपरात तसेच रत्नागिरी येथील साप्ताहिक ‘कोकण मीडिया' मधून प्रासंगिक लिखाण करण्याची संधी त्या-त्या संपादकांनी दिली आहे. जालना येथून प्रकाशित होणारे दैनिक ‘शोध कार्य' यामधून कोकणातील काही वैचारिक लिखाण छापून येत असते. नवीन वर्ष, नवा उन्माद, नवीन पिढी आणि प्रिंट मीडिया...या सर्वांना मनस्वी शुभेच्छा. Happy new year २०२५.

-इक्बाल शर्फ मुकादम 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सावित्रीच्या लेकींनो सावधान