याचे अनुकरण व्हावे!
विवाह अर्थात लग्न हा अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वरुपात अलिकडे फारच अवडंबर केला गेलेला वास्तविक पाहता दोन कुटुंबांचा खासगी सोहळा आहे. एक विवाहेच्छु मुलगा व एक मुलगी यापुढे एकमेकांचे पतिपत्नी म्हणून वावरतील व त्याला समाजाची मान्यता असावी, यासाठी त्याला अलगद सार्वजनिक स्वरुप मिळाले. पण त्याचे पुढे काय झाले किंवा होत आहे, याचे तुम्ही आम्ही सारेजण साक्षीदार आहोत. पूर्वी गांधर्व विवाह होत असत. हल्लीही नोंदणी पध्दतीने मोजक्या उपस्थितीत साधेपणाने विवाह होतातच की!
नवी मुंबईतील सानपाडा गावामधील ‘सानपाडा ग्रामस्थ व मौजे सानपाडा देवस्थान समिती'ने एक क्रांतीकारी निर्णय घेऊन लग्नसमारंभात श्रीमंतीचे जे प्रदर्शन मांडले जाते व तीन-चार दिवस लग्नसोहळे चालतात आणि त्यावर अनेकदा काहीजण प्रसंगी कर्ज काढून वारेमाप पैसा खर्च करतात, त्याला अटकाव करण्याचा सकारात्मक प्रयत्न एका ठरावाद्वारे केला आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन. ‘जे यजमान आपल्या घरातील लग्नसोहळ्याचे सर्व विधी एकाच दिवसात करायला मागतील त्यांच्यासाठी विनामूल्य सभागृह, गावातील माजी नगरसेविका सौ. कोमल सोमनाथ वास्कर व उद्योजक श्री. शंकर शिमग्या पाटील यांच्या वतीने प्रोत्साहनपर रोख रक्कम ५१,०००/- रु. दिले जाणार' असा तो ठराव असून त्यानुसार गावामधील श्रीमती रेखा भरत मढवी यांनी त्यांचा सुपुत्र चि. जय याचा साखरपुडा, भातखुंटणी, देवाचे मानपान, नवरा नांदवणे, हळद, लग्न हे सारे मंगलविधी २८ डिसेंबर २०२४ या एकाच दिवसात आयोजित केले होते. ठरल्याप्रमाणे त्यांना देवस्थान समितीचे सभागृह विनामूल्य मिळाले. ‘ૐकार कला सर्कल' यांनी या क्रांतीकारी विवाह सोहळ्याप्रसंगी असा तो पहिलाच सोहळा असल्याने कसलेच पैसे न आकारता बँड वादन केले. घोषित केल्याप्रमाणे सौ. कोमल वास्कर व श्री. शंकर शिमग्या पाटील यांनी ठरलेली रक्कम, सन्मानचिन्ह व भेटवस्तू वधुवरांस दिली. या ऐतिहासिक विवाह सोहळ्यासाठी माजी आमदार संदीप नाईक यांच्याप्रमाणेच परिसरातील मान्यवरांनी वधुवरांस भेटून शुभाशिर्वाद दिले.
माझ्या समजुतीप्रमाणे अंबानी, मल्होत्रा, खान, पटेल, मर्र्चंट, गडाख, विखे, देशमुख, मोहिते-पाटील या व अशा अनेकांनी त्यांच्या त्यांच्या कुटुंबांत शाही विवाह सोहळ्यांची आयोजने केली आहेत. त्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. काही कंपनी मालक, उद्योजक, राजकारणी, प्रचंड श्रीमंत असलेले बडे खेळाडू, मोठे अधिकारी यांच्या घरचे विवाह सोहळे हे असेच खर्चिक व संपत्तीचे नागडे प्रदर्शन मांडणारे असतात. त्यातून त्यांना अनेकदा व्यावसायिक संबंध जोपासायचे किंवा वाढवायचे असतात, भरपूर लोकांची सरबराई करुन, आतिथ्यशीलता दाखवून इम्प्रेस करायचे असते, त्यातून काही लाभ मिळवायचे असतात किंवा अनेकांना यातले काहीच करायचे नसून ‘आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आम्ही तो कसाही खर्च करु, आम्हाला विचारणारे तुम्ही कोण टिकोजीराव?' या भावनेतून आपल्या घरच्या लग्नात भरपूर पैसा उडवायचा असतो व तो ते उडवतात.
सानपाडा येथे झालेला ठराव हा प्रामुख्याने आगरी-कोळी या नवी मुंबईच्या स्थानिक, भुमिपुत्र, मूलनिवासी लोकांच्या पुढाकारातून आलेला आहे. याला कारणच असे की अलिकडे येथील स्थानिक लोकही इतरांचे पाहुन आपल्या घरचे विवाह सोहळे असेच खर्चिक व अनेक दिवस चालणारे आयोजित करत आहेत. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढत आहेत, प्रसंगी मालकीच्या इमारतीतील एखादा फ्लॅट विकत आहेत, एखादा भूखंड विकत आहेत व भपकेबाजपणा दाखवीत आहेत. नवी मुंबईतल्या जमिनी आता जवळपास संपल्या आहेत. गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न टांगल्या अवस्थेत आहे. अनेकांची पुढची पिढी नीट व्यावसायिक शिक्षण घेतेच असे नाही. अनेकजणांनी सिडकोकडून मिळालेल्या साडेबारा टक्के माध्यमातून आलेल्या पैशांचे नीटसे नियोजन न केल्याने तो संपायच्या मार्गावर आहे. नवी मुंबईतील अनेक कारखान्यांचे स्थलांतर वापी, बलसाड अशा भागात झाले आहे व कारखान्यांच्या जागी आय टी पार्क्स बनले आहेत; पण त्याठिकाणी नोकरी करायला येणाऱ्यांत स्थानिक नवी मुंबईकर कमी व भाईंदर, वसई, विरार, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा या व अशा ठीकाणांहुन येणारे परप्रांतीयच जास्त आहेत. अशा स्थितीत नवी मुंबईकर ग्रामस्थांना अनावश्यक खर्चाला फाटा देऊन जवळच्या पैशांचे यथायोग्य नियोजन करुन पुढील पिढीच्या कल्याणाचा विचार करण्याची अधिक गरज होती, त्या अनुषंगाने हा एका दिवसात लग्नाचे सारे विधी चा मार्ग अत्यंत योग्य वाटतो. हा असा पहिलाच प्रयत्न आहे का? तर तसे अजिबात नाही. या आधी ‘आगरी सेने'चे संस्थापक श्री. राजाराम साळवी यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करुन अनेक कुटुंबियांच्या विवाहाचा खर्च उचलण्यात हातभार लावला होता. बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे व येथील एक बांधकाम उद्योजक श्री प्रकाश बाविस्कर यांनीही नवी मुंबईत यापूर्वी सामुदायिक विवाह समारंभ आयोजित केले होते. ‘संत निरंकारी मंडळा'च्या माध्यमातून नवी मुंबईत आधी ऐरोली येथे व नंतर खारघर येथे ‘संत समागमा'च्या समारोपाच्या दिवशी सामुदायिक विवाह सोहळ्याचे नियोजन असते, त्याचा मी साक्षीदार असून या प्रसंगीच्या अनेक वधू-वरांशी मी बोलून त्यांचे मनोगतही जाणून घेतले आहे. यातील काही वधू-वर हे नोकरी/व्यवसायानिमित्त इंग्लंड, अमेरिका, दुबई, जर्मनी, ऑस्ट्रेलिया अशा देशात राहणारे भारतीय होते. काहीजण पिढीजात गडगंज श्रीमंत होते. स्वतः स्व. बाबा हरदेवजी महाराज यांनी त्यांच्या मुलींचे विवाह अशा सामुदायिक सोहळ्यातच केले होते हे विशेष! यातून दिसते काय, की लग्नसोहळ्याचा भपकेबाजपणा व त्यात उडवला जाणारा पैसा यांचा त्या नियोजित वधु-वरांच्या भावी सुखी जीवनाशी कसलाही संबंध नसतो. अनेक धनवंतांच्या घरातील गुटगुटीत बाळे-बाळींचे शाही विवाह सोहळे झाल्यानंतर काही वर्षांतच एकमेकांशी फाटते व ते लोक घटस्फोट घेऊन वेगळे होतात. मग लग्नांसाठी वारेमाप पैसा कशापायी उधळला जातो? मागे नवी मुंबईचे माजी उपमहापौर अशोक गावडे यांच्या घरातील तसेच त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असलेले राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या घरातील लग्नसोहळ्यातील श्रीमंती प्रदर्शनाची दृश्ये टीव्हीवरील बातम्यांतून पाहुन शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती, याचे मला या ठिकाणी स्मरण होते.
आता पुन्हा मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगडकडे येऊ या. येथील स्थानिक हे बहुसंख्येने आगरी आणि कोळी या कष्टकरी समाजांचे आहेत. आणखी तपशीलात सांगायचे झाल्यास नवी मुंबईचे दोन्ही विधान सभा आमदार (श्री. गणेश नाईक व सौ. मंदाताई म्हात्रे) आगरी; तर विधानपरिषद आमदार (श्री. रमेश पाटील) हे कोळी समाजाचे आहेत. शेजारच्याच पनवेल विधानसभेचे श्री प्रशांत ठाकूर, कल्याण ग्रामीणचे श्री राजेश मोरे, कल्याण पूर्वच्या सौ. सुलभा गायकवाड, कल्याण पश्चिमचे श्री विश्वनाथ भोईर, पेणचे श्री रविशेट पाटील, अलिबागचे श्री. महेंद्र दळवी, भांडुपचे श्री अशोक पाटील, बोईसरचे श्री. विलास तरे असे आमदार आगरी समाजाचे आहेत. याआधी केंद्र सरकारमध्ये भिवंडीचे तत्कालिन खासदार श्री. कपिल मोरेश्वर पाटील केंद्रीय राज्यमंत्री होते. आता राज्याच्या मंत्रीमंडळात श्री. गणेश नाईक यांच्याकडे वनमंत्रीपद आहे. यापूर्वी स्व. नकुल पाटील, स्व. मीनाक्षीताई पाटील, ॲड.श्री. लिलाधर डाके, श्री. जगन्नाथ पाटील, श्री रविशेट पाटील यांना राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदे भूषवता आली होती. माझ्या माहितीप्रमाणे श्री. गणेशजी नाईक यांच्या घरचे विवाह सोहळे हे मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत पार पडले होते. डोंबिवलीच्या श्री. जगन्नाथ पाटील यांच्या घरच्या हळदी समारंभात त्यांनी दारुपानाला, मटण-मच्छीला फाटा देऊन साधे भाजी, भात, पापड, लोणच्याचे शाकाहारी जेवण ठेवले असता मोठ्या प्रमाणावर लोकांनी तिकडे पाठ फिरवल्याने ते जेवण कसे बरेचसे उरले होते याचा किस्सा एका कार्यक्रमात सांगितल्याचे मला आठवते. रायगडचे माजी खासदार व ज्यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यासाठी आंदोलने होत आहेत, त्या लोकनेते ॲड.स्व. दि.बा.पाटील साहेबांचा मी नातेवाईक असल्याने त्यांच्याही घरचे विवाह कसे साधेपणाने झाले याची माहिती मला आहे. आगरी-कोळी समाजांतील साखरपुडे, हळद, लग्नसोहळे, प्रि वेडींग, वेडींग, पोस्ट वेडींग फोटोग्राफी यांवर कसा व किती पैसा उडवला जातो यावर अनेकांनी लिखाण केले आहे, ताशेरे ओढले आहेत. ‘मांडवाचे मघारी चाललेय काय?' या नाटकातून घणसोलीच्या श्री.नंदकुमार म्हात्रे यांनी यावर हसत हसवत कोरडे ओढले होते. माझे मित्र हास्यप्रबोधनकार व ‘याल तर हसाल' या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्री. संजीवन म्हात्रे यांनीही त्यांच्या कार्यक्रमातून करमणूकीच्या माध्यमातून खर्चिक विवाह सोहळ्यांवर विनोदी ढंगाने मार्मिक भाष्य केले आहे व त्याला आगरी-कोळ्यांसह सर्व जातिविशेष, समाजघटकांची वाढती पसंती लाभत आहे.
२०२४ च्या डिसेंबर महिन्यातच कल्याण ग्रामीणचे माजी मनसे आमदार श्री. राजू (प्रमोद) पाटील यांचा चिरंजीव आदित्य याचा भिवंडीचे माजी आमदार श्री.योगेश पाटील यांची कन्या सिध्दी हिच्याशी विवाह पार पडला. या विवाहाच्या हळदी-संगीत कार्यक्रमाला ‘आगरी भप्पी लाहिरी' म्हणून प्रसिध्द असलेल्या संतोष चौधरी (दादूस) यांच्या वाद्यवृंदाला म्हणे राजू पाटील यांनी तब्बल २२ लाख रुपये बिदागीदाखल दिले असल्याची पोस्ट समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. तर त्याच डिसेंबर महिन्याच्या २८ तारखेला नवी मुंबईत सानपाडा ग्रामस्थ व देवस्थान समितीच्या ठरावानुसार श्रीमती रेखा मढवी यांच्या चिरंजीवाचा विवाह सोहळा ‘एका दिवसात सारे विवाह विधी साधेपणाने' आयोजित करुन साजरा झाला; त्याबद्दल त्यांना समितीतर्फे ५१,०००/-रु. रोख, भेटवस्तू व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. या दोन प्रसंगांपैकी कशाचे अनुकरण करणे काळाला व मुलामुलींच्या भवितव्यातील सक्षम सहजीवनाला साजेसे आणि सुसंगत ठरेल असे तुम्हाला वाटते?
- राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं शहर, नवी मुंबई