पूल पडला रे पडला -------
सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पलीकडाची गावे. या गावांना नदीपलीकडे जायचे वांदे होते. उन्हाळ्यात जायला मिळे पण पावसाळ्यात कृष्णा दुथडी भरून वाहू लागे आणि मग या गावांचा पलीकडील गावांचा संपर्क तुटे. अनेक वर्षांची पूल बांधण्याची लोकांची मागणी सरकारने मान्य केली आणि आंध्रप्रदेश मधील एका कंपनीला पुलाचे काम मिळाले.
पूल फार मोठा होता आणि पूल उभारणे जिकिरीचे होते. पुलाच्या बांधकामसाठी मराठवाड्यातील शेकडो मजूर आपल्या बायकोपोरासह हजर आले. कंपनीने त्यांना झोपडया उभारण्यासाठी तात्पुरती जागा मिळवून दिली. पाण्यासाठी मोठा ओढा होता.कामगार आले तसें त्यान्च्याकडून काम करून घेण्यासाठी मुकादम आले. मुकादम आपल्या पंटरसह फिरू लागले. इतक्या माणसासाठी दुकानें उभी राहिली.. तसेच विडीकाडी, देशीदारु ची पण दुकानें आली.
दुष्काळी मराठवाड्यातून बिरजू आणि लक्ष्मी आपल्या दोन पोरासकट पुलाचे काम करायला हजर झाली.त्यान्च्या शेजारच्या झोपडीत बिरजूच्या गावातील मोन्या आणि त्याची बायको सरस्वती ती पण आली. मोन्याची ऐशी वर्षांची म्हातारी पण सोबत होती.
बिरजू लक्ष्मीची दोन पोरे तीन वर्षाचा पोरगा आणि दोन वर्षांची पोरगी होती. लक्ष्मी आता तिसऱ्यांदा पोटूशी होती. शेजारची म्हातारी सकाळ संध्याकाळ लक्ष्मीच्या झोपडीत येऊन तिच्या पोटावर हात ठेऊन अंदाज घेत होती.
पुलाचे काम सुरु होते. अनेक ट्रक्स माती घेऊन धावत होते. पुलासाठी लोखण्डी शिगा, लोखण्डी बार, सिमेंट यांची वाहतूक सुरु होती. काळे दगड लांबून लांबून आणले होते.
शेकडो पुरुष, स्त्री कामगार काम करत होते.मुकादम कामगारांची आय बहीण काढून काम करून घेत होता. बरीच नवराबायको जोडी काम करत होती, त्यामुळे त्याना दोन पैसे मिळतं होते पण संध्याकाळ झाली की बहुतेकजण देशी दारू, जुगार याच्यात अडकत होते.
काम संपलं, कामगार घरी आले की बऱ्याच वेळा शेजारचा मोन्या बिरजू लक्ष्मीबरोबर दोन गोष्टी बोलायला येई, कधीकधी मोन्याची म्हातारी पण येई. दोघेही एकाच गावातले, त्यामुळे त्यांची जुनी ओळख होतीच.
असेच एक दिवस मोन्या बिरजूच्या झोपडीकडे आला.. लक्ष्मी झोपडीच्या बाहेर चुलीवर भाकऱ्या भाजत होती आणि तिची पोरे भाकरी चटणीबरोबर खात होती वर पाणी पित होती. मोन्याने झोपडीत डोकावून पाहिले, बिरजू अजून आला नव्हता.
"बिरजू आला न्हाई?"
"न्हाई.. गेलं असलं गुत्यात.. तुमी न्हेत जावा की देवळात.. भजन करायला.."
"तूझ्या दादल्याच मन न्हाई भजनात."
"मग कशात हाये?"
"तुझ्यात हाये.. म्हनून तिसरा पालना येतोय."
तिच्या पोटाकडे पहात मोन्या म्हणाला.
"जावा की.. त्याचं लक्ष माझ्यात न्हाई.. (हाताचा अंगठा तोंडाकडे नेत ).. यांच्यात हाये... काय काळजी चिंता हाय काय.. दोन पोर हायेत आपल्याला.. त्याचं औषध पानी."
एखाद घर पत्र्याच का होईना.. सारं पैस दारूत..
लक्ष्मी भाकरी भाजता भाजता बडबडत होती. तोपर्यत गाणे म्हणत म्हणत बिरजू हजर झाला.
"बिरज्या, देशी पिन वाईट्ट बाबा.. सगळी नासाडी बघ.. त्यापारस इट्ठलच्या भजनाला येईनास."
"तू जातुस न्हवं, तो जा.. मी हाय तो बरा हाय."
"न्हवं, तुले बातमी लागली काय, पुलाला भेग पडली म्हने?"
"व्हय, सगली लोक बोलत्यात.. भेग पडली हाय.. अशान पूल टिकायचा न्हाय..?"
"पन आस का होतंय?"
"याच कारन शांती केली न्हाय.. एव्हडी मोटी नदी.. कशी सांत बसलं?"
एवढ्यात मोन्याची म्हातारी आपल्या झोपडीतून बाहेर पडली आणि लक्ष्मीच्या झोपडीत आली. तिने लक्ष्मीच्या ओटीपोटीवरून हात फिरवला आणि ती बाहेर आली.
"बिरज्या, लक्षमेचे दिवस भरत आलेत.. त्येला कामावर न्हेऊ नको."
एवढ्यात लक्ष्मी आतून बोलली.
"कामावर जायचं नको म्हन्ते म्हातारी, पन घरी बसुन खायच काय? दाल्ला हा असा.. दोन पोर हायेत मला."
"मी आपलं सांगायचं काम केल्ला, आता तुमी काय ते बघा."
एवढ्यात कानठल्या बसवणारा आवाज घुमला
"होम.. होम.. ठो ठो.. धास. धास.."
झोपडीतील सर्व लोक घाबरली. लोक बाहेर पडली आणि सैरावैरा धाऊ लागली. कोंबड्या मोठ्याने ओरडू लागल्या.. डुकरं बिलात जाऊन लपली.
एवढ्यात कुणीतरी ओरडला
"पूल पडला रे पूल पडला... पूल पडला.. धावा.. धावा."
लोक कंदील घेऊन, विजाऱ्या घेऊन नदीच्या दिशेने पळाली
पूल कोसळला होता.. मध्ये मोडून पडला होता.. अजून माती कोसळत होती.
सगळ्या झोपड्यात स्मशानशांतता होती, पूल पडून दहा दिवस झाले, काम बंद झाले म्हणजे दोन पैसे मिळायचे ते बंद झाले. सगळी झोपडपट्टीवाली माणसे बेकार झाली, कुणाकडेच काही नव्हते, कोण कोणाला आणि काय देणार?
इकडे पूल पडला आणि इकडे लक्ष्मीला कळा सुरु झाल्या. बिरजू, मोन्या पुलाजवळ. मोन्याची म्हातारी जवळ होती, तिने लक्ष्मीचे बाळंतपण केले, मुलगी झाली.
मुलीच्या पायगुणाने पूल पडला असे सर्वांचे मत, त्यामुळे जो तो या नवीन जन्म घेतलेल्या मुलीला दोष देत होते.
मुकादम पिसाळला होता, एव्हडी काळजी घेऊनही पूल कसा कोसळला हे त्याला समजत नव्हते, पूल कोसळला हे कळताच कॉन्ट्रॅक्टर येऊन पाहून गेले. त्यानी संतापून मुकादमाला लाथाबुक्यानी तुडवला आणि परत काळजी घेऊन काम सुरु कर, परत पुलाला काय झाल तर त्या पुलाबरोबर तुझा पूल बांधीन, अशी धमकी देऊन तो गेला.
मुकादम सगळीकडे फिरत होता. त्याला कळले तिकडे मिरजेच्या बाजूला एक जागृत देवस्थान आहे, त्याचा कौल लोक घेतात. तो पावतो, अडचणी दूर करतो. मुकादम त्या देवस्थानकडेकडे गेला. त्या देवस्थानाने पूल परत उभा करण्याआधी कोवळ्या पोराचा बळी द्यायला लागेल, असा कौल दिला.
मुकादम कोवळा पोर शोधायला लागला. झोपडयातील कुणी ताजी बाळंतीण शोधू लागला, त्याला बातमी लागली बिरजूची बायको लक्ष्मी तिला आठ दिवसापूर्वी मुलगी झाली आहे. मुकादमाने बिरजूची सगळी चौकशी केली, त्याला अजून दोन मुले असल्याची बातमी कळली.
मुकादमाने सगळी बातमी कॉन्ट्रॅक्टरला सांगितली, कॉन्ट्रॅक्टरने त्या बिरजूला दोन लाख दे आणि त्याचे पोर ताब्यात घे, अशी ऑर्डर दिली.
सगळी झोपडपट्टी भुकेने व्याकुळ झाली होती. रानात जाऊन झाडांचा पाला उकडून ती खात होती. लहान पोर आजूबाजूच्या दुकानात भीक मागत होती, देवळाच्या बाहेर आशेने कोणी काय देईल याची वाट पहात होती. बिरजूची दोन्ही मुले भुकेने रडत होती.. लक्ष्मीकडे त्याना खायला दयायला काही नव्हते... शेजारच्या मोन्याच्या घरात पण सगळा खडखडात होता. जो तो पुलाचे काम कधी सुरु होते, याची वाट पहात होते. बिरजू भुकेने व्याकुळ झाला होता. परत परत आशेने झोपडीत शिरून पहात होता.
लक्ष्मी पाणी पिऊन होती.. छोटीला छातीला लावत होती.. छोटी किंचालत होती कारण लक्ष्मीच्या छातीतून काहीच येत नव्हते.
संध्याकाळच्या सुमारास मुकादम, पंटर आणि त्त्यांचे काही दोस्त बिरजूच्या घरी आले. त्याना बघून बिरजू घाबरला, लक्ष्मी घाबरली. आता काय नवीन बाळंट आले म्हनून.
मुकादम बिरजूला म्हणाला "बिरजू, पुलाच काम बंद हाये.. पूल टिकतं न्हाई.. सगळी झोपडपट्टी उपाशी हाये.. कुणाच्या घरात अन्नाचा दाना न्हाई.. पन पुलाच काम सुरु करण, तूझ्या हातात हाये.."
"माझ्या हातात?मी काय करनार?"
"तू करू शकतोस, हे बघ मालकांनी तुझ्यासाठी दोन लक्ष रुपये दिल्याती.."
झोपलेली लक्ष्मी बाहेर आली, मालक दोन लक्ष रुपये देत्यात.. कशापाई तिला कळेना.
"मी काय करयचा मालक... बिरजू एवढे पैसे पाहून गांगरला."
"तुझी दोन पोर हाईत ना मोठ्ठी, त्यासानी शाळेत पाठ्वयच.. गावाकडे घर बांधायचं, बदल्यात..."
"बदल्यात काय? लक्ष्मी काळजीने म्हणाली."
"बदल्यात तुझं तान्ह पोर आम्हास्नी दयायचं, बस.."
एवढ्यात मुकादमच्या बरोबर आलेला पंटर बोलला "अरे बिरजू, बली चढाना पडेगा..नरबली.. छोटे बच्चेका, तो ही पूल टिकेगा."
त्याच बोलण ऐकून अंगात शक्ती नसलेली लक्ष्मी कडाडली "म्ही न्हाई देनार माज लेकरू.. नऊ म्हैने पोटात वाढवलंय त्यास्नी."
मुकादम चिडला "अग लक्षमे, ह्ये पैक बघ, दोन लाख हाईत, सगळ्या चिंता जातील तुमच्या... तू पोर दिलस, तर पुलाच काम सुरु... म्हंजी सगळी झोपडपट्टी जेवायला लागलं. सगळी तुझं नाव काढतील. तू बोल की बिरजू? पैक नको हाईत काय?"
"पैक कुनाला नको असत्यात मालक.. पर.. पोटच पोर.. त्याला बली दयायचा.. न्हाई.. न्हाई.. मेलो तरी चालेल पर पोटच पोर.."
"आर, कुठ तुझं पोर कलेक्टर होनार की दगदर व्हणार.. तुज पोर तुझ्यापारीस हमालीच करनार.. आनी एक दिस उपाशी मरनार."
"न्हाई न्हाई मालक, माझ्या बायलीच बराबर हाय.. आमचं पोर न्हाई देनार पुलासाठी."
रागारागाने मुकादम, पंटर निघून गेले.
मुकादम नरबळीसाठी छोटया मुलाच्या शोधात होता.. पुलाच्या कामास उशीर होतं होता.. मग मुख्य कॉन्ट्रॅक्टरच्या मुलाने लक्ष घातले. त्याला समजले मुकादम नरबळी साठी मुल शोधतोय. त्याने मुकादमला हाकलून लावले. पंटर आणि त्याच्या जवळच्या मंडळींना हाकलून लावले.
चांगले इंजिनिअर नेमले आणि पुलाचे काम सुरु झाले.
सारी झोपडपट्टी आनंदात होती. सर्वांच्या घरात दोन पैसे येऊ लागले..
नवीन मालकाने या वस्तीसाठी बस ठेवली, त्यातून मुले तालुक्याच्या गावी शाळेत जाऊ लागली. बिरजू लक्ष्मीची दोन्ही मुले शाळेत जाऊ लागली.
सरकारी नर्स त्या भागात फिरू लागली, तिच्या प्रयत्नाने स्त्रियांची कुटुंबनियोजन शत्रक्रिया झाल्या. लक्ष्मीने पण शत्रक्रिया करुन घेतली.
लक्ष्मीची छोटी एकदम देखणी आणि चुणचुणीत होती. ती खेळत असताना लक्ष्मी तिला कौतुकाने पहायची. तिच्या मनात यायचे, त्या वेळी मुकादमाने दोन लाख रुपयाचे आमिष दाखवले या मुलींसाठी पण चार दिवसाची उपाशी असून आपण विरघललो नाही पण एवढेच नव्हे दारूचे व्यसन असलेला आपला नवऱ्याने ते पैसे घेतले नाहीत.
- प्रदीप केळुस्कर