ही रामनाम नौका भवसागरी तराया!
संसाराला ‘भवसागर म्हटले आहे. ह्या दुस्तर सागरात मद, मोह, लोभ यासारख्या अक्राळविक्राळ सुसरी आहेत. त्यांचे विषारी डंख माणसाला घायाळ करतात. भ्रमाचे भयंकर भोवरे त्याला गरगर फिरवत पार तळाशी नेऊन बुडवतात. कामनांच्या अफाट लाटा कासावीस करून टाकतात. दुःख, शोकाचे वादळवारे त्याला भरकटत नेतात. घोर भवसागरात तो अगदी हरवून जातो.
नव्हे सार संसार हा घोर आहे।
मना सज्जना सत्य शोधूनि पाहे।
जनी वीष खाता पुढे सूख कैचे।
करी रे मना ध्यान या राघवाचे । श्रीराम ६६।
ज्या संसारात माणूस आसक्त होतो, ज्या संसाराचे त्याला विलक्षण प्रेम वाटते, ज्या संसाराकडून तो सुखाची अपेक्षा करतो तो संसार वास्तविक अत्यंत भयंकर आहे. संसार ‘सार' नाही तर ‘असार' आहे. तो सत्यनाही, शाश्वत नाही, कल्याणकारक नाही. सुखदायक तर मुळीच नाही. त्याचे स्वरूप ‘मिथ्या' आहे. तो नाशवंत आहे. जन्म-मरणाच्या बंधनात अडकवणारा आहे. दुःख मूळ आहे. संसाराला भवसागर म्हटले आहे. ह्या दुस्तर सागरात मद, मोह, लोभ यासारख्या सुसरी आहेत. त्यांचे विषारी डंख माणसाला घायाळ करतात. भ्रमाचे भयंकर भोवरे त्याला गरगर फिरवत पार तळाशी नेऊन बुडवतात. कामनांच्या अफाट लाटा कासावीस करूनटाकतात. दुःख, शोकाचे वादळवारे त्याला भरकटत नेतात. घोर भवसागरात तो अगदी हरवून जातो.
अशा हतबल अवस्थेत ज्यांच्या आधाराची अपेक्षा करावी ते सर्वच तिथे गटांगळ्या खात असतात. फार कमी लोकत्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. बहुतेक सर्व तसेच बुडून मरतात. समर्थ म्हणतात, हे मना! ह्या नाशवंत, दुःखदायक संसाराला सारसर्वस्व मानण्याची चूक करू नकोस. तो सत्य नाही. हे सज्जन मना! जेसत्य आहे ते शोधून पहा. हा दृश्य संसार, रंगीबेरंगी जग हे सत्य नाही. त्याच्यात व्यापून असलेले चैतन्य सत्य आहे. ते सहजपणे दिसत नाही. सूक्ष्म, ज्ञानदृष्टीने त्याचा शोध घ्यावा लागतो. ते चिरंतन आहे. त्याच्या सत्तेने जग चालते. जगाचा नाश झाल्यानंतरही जे निश्चलपणे उरते ते सार तत्व शोधून पाहणे यात खरा पुरुषार्थ आहे. नश्वर संसारातील नश्वर पदार्थांचा संग्रह करून फक्त तेवढ्यातच जीवनाची इतिकर्तव्यता मानणे हा पुरुषार्थ नव्हे. समर्थांनी संसाराला विषाची उपमा दिली आहे. विष खाल्ल्यावर जीवाला सुख वाटेलही अपेक्षा करणे जितके अनाठायी आहे तितकेच संसारापासून सुखाची अपेक्षा करणे अनाठायी आहे. ज्याचा जो स्वभाव नाही त्याच्यापासून तो भाव मिळण्याची आशा करणे हा मूर्खपणा आहे. जे आडातच नसते ते पोह-यात येऊ शकत नाही. सांसारिक पदार्थ आणि संपूर्ण संसार नाशवंत आहे. त्यापासून शाश्वत सुख मिळेल ही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. विष खाल्ल्याने जसा अंगाचा दाहच होतो, शेवटी तडफडून मृत्यु होतो तसेच संसारात आसक्त झाल्याने जीवाची फक्त तगमग होते. त्रिविध तापाने मनुष्य होरपळून निघतो. योग्य वेळी, योग्य उतारा नाही केला तर तो तडफडून मरून जातो. पुन्हा पुन्हा जन्मत-मरत राहतो.
ह्या संसार-विषावर उतारा सांगताना समर्थ म्हणतात, "करी रे मना ध्यान या राघवाचे”. रामाचे अति पावन नाम, राघवाचे नित्य स्मरण हाच भवविषापासून तारणारा मंत्र आहे.एकमेव उतारा आहे. रामनामाने भगवान शंकरांचा हलाहलाने झालेला भयंकर दाह शमला. त्याच रामनामाने आपला भवदुःखाचा दाहही शमेल यात शंका घेण्याचे कारण नाही. आपल्या जीवनाचे सुकाणू रामांच्या हाती सोपवले तर या घोर भवसागरातून ते निश्चितपणे सुखरूपपणे आपल्याला पैलतीरी घेऊन जातील. कितीही वादळवारे आले तरी रामांच्या कृपेने आपले मार्गक्रमण योग्य दिशेनेच होईल. जीवननौका भरकटणार नाही. ज्या अंतःकरणात रामांची वस्ती असेल तिथे काम-क्रोधादिक हिंस्त्र श्वापदे फिरकणार नाहीत. जी दबा धरुन बसलेली असतील ती दिव्य नामाला घाबरून आपसूक काढता पाय घेतील. अंतःकरणात जेव्हा भक्ती स्थिर होते तेव्हा भय संपते. कारण भय येते ते द्वैत भावनेतून. आपण आणि इतर या भेद भावातून. जिथे अनन्य भक्ती असते तिथे सर्वत्र फक्त आणि फक्त रामच दिसतो. रामाशिवाय इतर काहीही दिसत नाही. आपले स्वतःचे अस्तित्वही रामाला समर्पित होते.असा अद्वैतानुभव येतो तेव्हा भयाचे नामोनिशाण राहत नाही. निखळ आनंद, अखंड समाधानाचा प्रत्यय येतो.
सर्व संतांनी हा विलक्षण अनुभव स्वतः घेऊन मग आपल्यासमोर प्रकट केला आहे. कोणाही संताने कितीही भयंकर असला तरी संसाराचा त्याग करा असे सांगितलेले नाही, तर संसारातील आसक्तीचा, त्यापासून असणा-या सुखाच्या अपेक्षेचा त्याग करायला सांगितले आहे. मनाची आसक्ती रामाकडे वळवावी. आनंदाची अपेक्षा आनंदस्वरूप रामाकडून करावी. संसाराचे दुःखमूळ, भयप्रद स्वरूप जाणून घ्यावे. आपण ह्या भयंकर संसाराचे नसून आनंदस्वरूप भगवंताचे आहोत हे सत्य जाणून घ्यावे. "ध्यान लागले रामाचे। दुःखहरले जन्माचे” हा साक्षात अनुभव घ्यावा.
जय जय रघुवीर समर्थ
-सौ. आसावरी भोईर