शासकीय अधिकारी संमेलनाचे फलित
पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिरात २० ते २२ डिसेंबर २०२४ अशा तीन दिवस चाललेल्या शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या साहित्य संमेलनाला जोडूनच या रंग मंदिरातील कलादालनात भरविण्यात आलेले पुस्तक प्रदर्शन आणि चित्रकार, छायाचित्रकार, नाणी संग्रहक, काष्ट शिल्पकार, खडू कलाकार अशा जवळपास २० अधिकारी, कर्मचारी यांनी मांडलेल्या कलाकृती संमेलनाचे विशेष आकर्षण ठरल्या. कलेला जसं जातीपातीचे, धर्माचे, देशाचे, प्रांताचे, वयाचे असे कसलेच बंधन नसते, तसे ते कुठल्या पदाचेही नसते, हे इथे पाहायला, अनुभवायला मिळाले.
शासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप, त्यामुळे साहित्य निर्मितीत निर्माण होणाऱ्या अडचणी, परराज्यातील मराठी अधिकाऱ्यांचे अनुभव अशी अधिकाऱ्यांच्या कामाची कक्षा विचारात घेऊन विषय निवडले गेले होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचे सूत्र संचालन व्यावसायिक नव्हे तर स्वतः अधिकारी असलेल्या डॉ सोनाली घुले - हरपाळे, प्रांजल शिंदे - चोभे यांनी अतिशय सफाईदारपणे करून "हम भी कुछ कम नहीं” हे सिध्द केले.
संमेलनाचे उद्घाटन करताना, शासकीय अधिकाऱ्यांची प्रशिक्षण संस्था असलेल्या ‘यशदा' चे महासंचालक निरंजन सुधांशू यांनी, ‘यशदा'त शासकीय अधिकाऱ्यांमधील कला गुणांना वाव मिळावा, म्हणून कायमस्वरुपी कलादालन उघडण्यात येईल असे सांगितले. याला जोडूनच आजी माजी शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या पुस्तकांचे प्रदर्शनदेखील कला दालनात होऊ शकेल याबाबत अवश्य विचार करावा असे वाटते. यावेळी अधिकारी सर्वश्री शेखर गायकवाड यांचे "इलेक्शन स्कृटिनी अँड नॉमिनेशन”, सरकारी ऋतुचक्र, शंकरराव मगर यांचे "विद्येच्या प्रांगणातील संघर्ष यात्री”, गणेश चौधरी यांचे "ग्रामीण विकासातील माझे प्रयोग”, दिगंबर राेंधळ यांचे "कुळ कायदा”, राजीव नंदकर यांचे "सुखाचा शोध” आणि प्रा डॉ भावना पाटोळे यांचे "उत्तर भारतातील मंदिरे” ही पुस्तके प्रकाशित झाली.
संमेलनाचे उद्घाटक निवृत मुख्य सचिव डॉ नितीन करीर यांनी आपण एक वाचक म्हणून बोलणार असून त्यांच्या वाचन प्रेरणेचे मूळ, भावलेली पुस्तके याचे विवेचन केले. शासकीय अधिकाऱ्यांनी आपली संवेदनशीलता जपावी, असे आवाहनही त्यांनी केले. इतर वक्त्यांनीही समयोचीत मार्गदर्शन केले.
"अधिकाऱ्यांसाठी साहित्य लेखनातील आव्हाने” या विषयावरील परिसंवादात, साहित्य निर्मिती करणाऱ्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकारी, सहकारी यांच्या कडून वेळप्रसंगी मिळणारी सापत्न वागणूक, असूया, धोरणात्मक, तांत्रिक अडचणी, समाजाशी संवाद तुटणे, गैरसमज, तिरस्कार, आत्मगौरव, आत्मवंचना आदी तोंड द्यावे लागते, असा सूर व्यक्त झाला. या परिसंवादात सर्वश्री भारत सासणे, विश्वास पाटील,किरण कुलकर्णी, प्रल्हाद कचरे हे सहभागी झाले होते.
"इतर राज्यातील प्रशासकीय कार्यसंस्कृती आणि अनुभव” या विषयावरील परिसंवाद उद्बोधक ठरलाच; शिवाय भाषा नीट न समजल्याने कसे गोंधळ होतात,हे या अधिकाऱ्यांनी छान सांगितल्याने उपस्थितांचे मनोरंजनदेखील झाले. या परिसंवादात आसाम - मेघालय या राज्यात सेवा बजावून स्वेच्छा निवृत्त झालेले आय ए एस अधिकारी विशाल सोळंकी, राजस्थानचे आय पी एस अधिकारी संतोष चाळके, अरुण उन्हाळे यांनी भाग घेतला होता.
संमेलनातील कविसंमेलनात १५ हून अधिक कवी अधिकाऱ्यांनी भाग घेतला. अध्यक्षस्थानी गझलकर, डॉ दिलीप पांढरपट्टे होते. या कवींचे आशय,विषय, भाषा प्रभुत्व, रचनांची मांडणी, यामुळे चांगलीच रंगत आली. आपल्या सेवेत समाजाचा गुन्हेगारी चेहरा समोर येत गेला, संताजी वरील साहित्य कृतीला परवानगी मिळण्यासाठी पुस्तकाचा दस्तावेज विविध विभागातून ६ महिने फिरत होता असे अनुभव निवृत्त पोलीस महानिरीक्षक, लेखक बी जी शेखर यांनी ”प्रशासनातील लक्षवेधी साहित्य निर्मिती” यांनी कथन केले.
"कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रशासन व साहित्य” विषयावरील चर्चासत्रात सर्वश्री डॉ. ओमप्रकाश यादव, कमलाकर हट्टेकर, डॉ. राजेंद्र गोळे, डॉ. विकास गरड, सतीश बुद्धे सहभागी झाले होते. शासनाच्या दैनंदिन कामकाजात तसेच माहितीचे जतन करण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर प्रभावीपणे होत असून या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वापरण्यास सोप्या, उत्तम ॲप्सचीही निर्मित होते. त्यामुळे कामकाजातील हस्तक्षेप कमी होण्यास मदत होईल, माहितीचे संकलन मोठ्या प्रमाणात झाल्याने अनेक कामे एका क्लिकवर होण्यास मदत होईल असे मत व्यक्त करण्यात आले.
मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याने प्रशासनातील कामकाजात सर्वसामान्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब उमटविणाऱ्या भाषेचा अवलंब झाला पाहिजे, अशी अपेक्षा ‘प्रशासनात बदलत गेलेली भाषा' या विषयावरील चर्चासत्रात व्यक्त करण्यात आली. या चर्चासत्रात यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड, सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, अपर मुद्रांक नियंत्रक संजयसिंह चव्हाण यांचा सहभाग होता. किशोर, बालभारतीचे संपादक, माहिती खात्यातील माजी सहायक संचालक किरण केंद्रे यांनी हा संवाद साधला.
‘माझे वाचन' या विषयावर झालेल्या चर्चासत्रात निवृत्त सनदी अधिकारी सर्वश्री महेश झगडे, सुनील पाटील, स्मार्ट प्रकल्पाचे संचालक डॉ. हेमंत वसेकर, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर खुटवड यांचा सहभाग होता. अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद भंडारी यांनी या सर्वांशी सुंदर संवाद साधला.
वाचनाने विचारांच्या कक्षा रुंदावतात, आत्मविश्वास वाढतो, असे मत श्री झगडे यांनी व्यक्त केले. तर श्री सुनील पाटील म्हणाले, आपल्याला कुठल्या प्रकारचे वाचन आवडते याचा विचार केला तर वाचनाची दिशा ठरविता येते. सोशल मीडियामुळे वाचन कमी होत आहे, असे म्हणण्यात अर्थ नसून उलट वाचनासाठीसुध्दा सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो, असे ते म्हणाले श्री खुटवड म्हणाले, कार्यालयांमध्ये छोट्या वाचनालयांची निर्मिती करावी, भाषा सुलभ आणि शुद्ध लेखन योग्य असावे याकरिता विविध उपक्रम राबवावेत.
डॉ. हेमंत वसेकर यांनी वाचन कमी असल्याने प्रश्नांची उकल करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे आपल्यातील क्षमता वाढविण्यासाठी वाचन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सोनाली घुले - हरपाळे व अंबरनाथ नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री ऋषिकेश पराडकर यांनी सादर केलेल्या कथा लक्षवेधी ठरल्या. संमेलनाच्या अखेरीस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल केंद्र व राज्य सरकारचे अभिनंदन, ऑक्सर्ड शब्दकोषाच्या धर्तीवर मराठी बोलीभाषेतील नवनवीन शब्दांचा संग्रह वाढीस लागावा याकरिता शासनाने अभ्यास समिती नेमावी, शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यकृतीला शासनातर्फे पुरस्कार दिले जावेत, सुलभ मराठी भाषेत शासन निर्णय, कायद्यांची माहिती द्यावी, शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलनाला राज्य शासनाने अनुदान द्यावे, असे पाच ठराव संमत झाले.
एकंदरीतच मराठी भाषा संवर्धन समिती, पुणे महानगरपालिका,यशदा व संवाद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे संमेलन पथदर्शी ठरले. परंतु पुण्यात लाखोंच्या संख्येने स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना जर निमंत्रित करण्यात आले असते तर सभागृह सदोदित भरलेले राहिले असते, तसेच ते त्यांच्यासाठी फार उपयुक्त ठरले असते असे मात्र जाणवले. आयोजकांचे पुनश्च अभिनंदन आणि पुढील संमेलनासाठी हार्दिक शुभेच्छा. - देवेंद्र भुजबळ, निवृत माहिती संचालक