डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
अनुसुचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा शेतकऱ्यांना शेतीसाठी अर्थसहाय्य देण्याची सन १९८२-८३ पासून राबविण्यात येत असलेली "अनुसूचित जाती उपयोजना (विशेष घटक योजना)” बदललेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आवश्यकता विचारात घेता ही योजना सुधारित करुन "डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना” या नावाने दि.५ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत आर्थिक निकषांमध्ये सुधारणा व नवीन घटक समाविष्ट करण्याबाबत दि.१ ऑक्टोबर २०२४ च्या शासन निर्णयानुसार शासनाने मान्यता दिली आहे.
या योजनेमध्ये सन २०२४-२५ या वर्षात खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद रकमेच्या उच्चतम मर्यादेत अनुदान अनुज्ञेय राहील.
१) नवीन सिंचन विहीर :- उच्चतम अनुदान मर्यादाः रु.४ लाख
२) जुनी विहीर दुरुस्ती :- उच्चतम अनुदान मर्यादाः रु.१ लाख
३) शेततळ्यांचे प्लास्टिक अस्तरीकरण :- उच्चतम अनुदान मर्यादाः राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या प्रचलित आर्थिक मापदंड व शेततळ्याच्या आकारमानानुसार परिगणित होणाऱ्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा रु.२ लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
४) इनवेल बोअरिंग :- उच्चतम अनुदान मर्यादाः रु.४० हजार
५) वीज जोडणी आकार :-
उच्चतम अनुदान मर्यादा : रु.२० हजार किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
६) पंपसंच (डिझेल/विद्युत) (डिझेल इंजिन-नवीन बाब) :- उच्चतम अनुदान मर्यादाः १० अश्वशक्ती क्षमतेपर्यंत पंपसंचाकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या ९० टक्के किंवा रु.४० हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
७) सोलार पंप (वीज जोडणी आकार व पंप संच ऐवजी) :- उच्चतम अनुदान मर्यादाः प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या ९० टक्के किंवा रु.५० हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
८) एचडीपीई / पीव्हीसी पाईप (नवीन बाब) :- उच्चतम अनुदान मर्यादाः अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके या योजनेंतर्गत प्रति मीटरकरिता प्रचलित आर्थिक मापदंडाच्या किंवा प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाच्या १०० टक्के किंवा रु.५० हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील.
९) सूक्ष्म सिंचन संच :-
९.१) तुषार सिंचन संच पूरक अनुदान :- उच्चतम अनुदान मर्यादाः प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत १) अल्प/अत्यल्प भूधारकांसाठी ५५ टक्के + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५ टक्के + डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून १० टक्के तसेच २) बहू भूधारकांसाठी ४५ टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ३० टक्के + डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून १५ टक्के किंवा रु.४७ हजार या पैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. (एकूण ९० टक्के अनुदान मर्यादेत)
९.२) ठिबक सिंचन संच पूरक अनुदान :- उच्चतम अनुदान मर्यादाः प्रति थेंब अधिक पीक योजनेंतर्गत १) अल्प / अत्यल्प भूधारकांसाठी ५५ टक्के + मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून २५ टक्के + डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून १० टक्के तसेच २) बहू भूधारकांसाठी ४५ टक्के मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून ३० टक्के + डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतून १५ टक्के किंवा रु.९७ हजार यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. (एकूण ९० टक्के अनुदान मर्यादेत)
१०) यंत्रसामुग्री (वैलचलित / ट्रॅक्टर चलित अवजारे-नवीन बाब) :- उच्चतम अनुदान मर्यादाः रु.५० हजार
११) परसबाग (नवीन बाब) :- उच्चतम अनुदान मर्यादाः रु.५ हजारया योजनेंतर्गत ११ बाबी अंतर्भूत असून लाभ पॅकेज स्वरुपात खालीलप्रमाणे दिला जातो.
नवीन विहीर पॅकेजः नवीन विहीर या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास नवीन विहीर, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंपसंच / डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी). एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु.६ लाख ४२ हजार / रु. ६ लाख ९२ हजार एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (विहीर रु.४ लाख + इनवेल बोअरिंग रु.४० हजार + वीज जोडणी आकार - रु.२० हजार + विद्युत पंप संच/डिझेल इंजिन रु.४० हजार किंवा सोलर पंप (वीज जोडणी व पंप संच ऐवजी) रु.५० हजार + एचडीपीई/पीव्हीसी पाईप रु.५० हजार + तुषार सिंचन संच रु.४७ हजार किंवा ठिबक सिंचन संच रु. रु.९७ हजार + यंत्रसामुग्री रु.५० हजार + परसबाग रु.५ हजार रु.६ लाख ४२ हजार /रु.६ लाख ९२ हजार)
जुनी विहीर दुरुस्ती पॅकेजः जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरिंग, वीज जोडणी आकार, विद्युत पंप संच /डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंप संच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री, परसबाग या घटकांसह एकूण रु.३ लाख ४२ हजार/रु.३ लाख ९२ हजार एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल. (जुनी विहीर दुरुस्ती - रु.१ लाख + इनवेल बोअरिंग रु.४० हजार + वीज जोडणी आकार - रु.२० हजार + विद्युत पंप संच/डिझेल इंजिन रु.४० हजार किंवा सोलर पंप (वीज जोडणी व पंप संच ऐवजी) रु.५0 हजार + एचडीपीई/पीव्हीसी पाईप. रु.५0 हजार + तुषार सिंचन संच रु.४७ हजार किंवा ठिबक सिंचन संच रु.९७ हजार + यंत्रसामुग्री रु.५० हजार+ परसबाग रु.५ हजार रु.३ लाख ४२ हजार /रु.३ लाख ९२ हजार)
शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेजः शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण पॅकेज या घटकाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण, वीज जोडणी आकार, विद्युत पंप संच / डिझेल इंजिन, सोलर पंप (वीज जोडणी व पंप संच ऐवजी), एचडीपीई/पीव्हीसी पाईप, सूक्ष्म सिंचन संच, यंत्रसामुग्री व परसबाग या घटकांसह एकूण रु. ४ लाख २ हजार /रु.४ लाख ५२ हजार एवढ्या मर्यादेत अनुदान देण्यात येईल.
(शेततळ्याचे प्लॅस्टीक अस्तरीकरण रु.२ लाख + वीज जोडणी आकार रु. २० हजार + विद्युत पंप संच / डिझेल इंजिन- रु.४० हजार किंवा सोलार पंप (वीज जोडणी व पंपसंच ऐवजी रु.५० हजार + एचडीपीई/पीव्हीसी पाईप रु.५० हजार + तुषार सिंचन संच रु.४७ हजार किंवा ठिबक सिंचन संच रु.९७ हजार + यंत्रसामुग्री रु.५० हजार + परसबाग रु.५ हजार रु.४ लाख २ हजार/रु.४ लाख ५२ हजार)
लाभार्थी पात्रतेचे निकषः लाभार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक राहील.
शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
शेतकऱ्याच्या नावे जमीनधारणेचा ७/१२ दाखला व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे. (नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका क्षेत्राबाहेरील)
लाभार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे व ते बँक खाते आधारकार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.
दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यास प्रथम प्राधान्य राहील.
या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी लागू असलेली रु.१ लाख ५० हजार /- वार्षिक उत्पन्न मर्यादेची अट रद्द करण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्याकडे किमान ०.४० हेक्टर व कमाल ६.०० हेक्टर एवढी शेत जमीन असणे आवश्यक असेल मात्र, लाभार्थ्याची जमीन दुर्गम भागात व विखंडीत असल्याने ०.४० हेक्टर पेक्षा कमी जमीन धारणा असलेले दोन किंवा अधिक लाभार्थी एकत्र आल्यास त्यांची एकत्रित जमीन किमान ०.४० हेक्टर इतकी होत असल्यास त्यांनी करार लिहून दिल्यास त्यांना योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. त्याचप्रमाणे दारिद्रय रेषेखालील लाभार्थ्यांना कमाल ६.० हेक्टर धारणक्षेत्राची अट लागू असणार नाही.
एकदा संबंधित योजनेचा पूर्ण लाभ घेतल्यास पुढील पाच वर्ष त्याच लाभार्थ्यास किंवा कुटुंबास या योजनेचा लाभ देय होणार नाही. नवीन विहीर या घटकाचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यास २० वर्षानंतर जुनी विहीर दुरुस्ती या घटकाचा लाभ अनुज्ञेय राहील.
अशाच स्वरुपाच्या कृषीविषयक विकास योजनेकरिता विशेष घटक योजनेतून तसेच केंद्र शासनाच्या SCA व घटनेच्या कलम २७५ (A) अंतर्गत उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनेतून लाभ दिला असल्यास योजनेंतर्गत देण्यात येणारा लाभ अनुज्ञेय असणार नाही.
या योजनेचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर त्याबाबतची नोंद घेण्यात येईल.
या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे mahadbt.maharashtera.gov.in/farmer/login/login या संकेतस्थळावर शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येत असून अधिक माहितीसाठी पंचायत समिती येथील कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एम. एम. बाचोटीकर यांनी केले आहे. - मनोज सुमन शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे