नाताळ
भिक्षेकरी याचक मंडळींनी भीक मागणे सोडून काम करावे यासाठी मी प्रयत्नरत असतो. दिसेल त्या संधीतून यांच्यासाठी काय व्यवसाय निर्माण करता येईल याचा सतत विचार करत असतो. कॅलेंडर दिसले, दे नवीन वर्षात विकायला...झेंडूची फुले दिसली, दे दसऱ्याला विकायला..पणत्या दिसल्या, दे दिवाळीत विकायला...टाळ दिसले दे, वारीत विकायला...यावेळी नाताळला वेगळंच घडलं.
चार वर्षांपूर्वी असाच कचरा दिसला होता... भिक्षेकरी मंडळींना तो कचरा साफ करायला लावून पगार दिला होता. या उपक्रमात काम करणाऱ्या लोकांची संख्या वाढत गेली... या टीमला आम्ही मग युनिफॉर्म दिले आणि शिस्तबद्ध पद्धतीने काम करायला शिकवलं.
या टीमचं नाव आहे "खराटा पलटण” ! गेल्या चार वर्षापासून; सातत्याने दर आठवड्याला सार्वजनिक जागांची स्वच्छता आमच्या या टीमकडून करवून घेत आहोत. बदल्यात त्यांना पगार किंवा पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देत आहोत. सांगायला अभिमान वाटतो की आमची ही खराटा पलटण पुण्याच्या ”स्वच्छता अभियान” ची ब्रँड अँबेसिडर आहे. एक भाकरी दिली तर एकवेळ पुरते.... धान्य दिले तर पंधरा-वीस दिवस पुरते...पण स्वाभिमानाने भाकरी कमवायची अक्कल शिकवली तर ती आयुष्यभर पुरते! चिखलात कमळ उगवते असे म्हणतात...रस्त्यात पडलेल्या कचऱ्यातून आमची भाकरी स्वाभिमानाने उगवत आहे!
नाताळलासुद्धा खराटा पलटण कडून स्वच्छता करून घ्यावी, सहकाऱ्याला सांताक्लॉज बनवावे, सर्व काम झाल्यानंतर अचानक तो येऊन सर्वांना आश्चर्यचकित करेल... याशिवाय भेटवस्तू आणि पंधरा-वीस दिवस पुरेल इतके गहू तांदूळ आणि इतर किराणा देईल असा प्लॅन होता.
पण महिनाअखेर असल्यामुळे संस्थेतील पैशाला अगोदरच वाटा फुटल्या होत्या. जे पैसे शिल्लक होते ते ३१ तारखेला इतर कारणांसाठी खर्च होणारच होते. किराणा घेण्यासाठी पैसे शिल्लक नव्हते. जाऊ दे, बघू जानेवारी महिन्यात... असं म्हणून नाराजीने नाताळाचा प्लॅन मी कॅन्सल केला...! नाताळचा दिवस सुरू झाला आणि पितृतुल्य श्री. अशोक नडे सर यांचा मला दुपारी फोन आला.
"अरे अभिजीत, आज आमच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस ! या निमित्ताने माझ्या मुला-मुलीनी एक मोठा कार्यक्रम ठेवला आहे. आमची धान्यतुला करणार आहेत. आमच्या वजनाइतके धान्य तसेच वर आणखी काही भर घालून २५० किलो पर्यंतचे धान्य तुझ्या लोकांना द्यायचे आम्ही ठरवले आहे आज संध्याकाळी कार्यक्रमाला ये आणि जाताना सर्व धान्य घेऊन जा...” मला शब्दच फुटेनात... हा योगायोग म्हणावा? की आणखी काही ? एखादी गोष्ट ठरवावी.. ती रद्द व्हावी आणि पुन्हा कोणीतरी येऊन... ठरल्याप्रमाणे सर्व सुरळीत करून द्यावं ! प्रत्येक वेळी आपल्यापैकीच ‘हे कोणीतरी' बनुन दरवेळी माझ्या आयुष्यात येतं... दररोज तुम्ही माझ्या आयुष्यात सांताक्लॉज बनून येता... आणि माझा रोजचा दिवस नाताळ करून जाता...!
मी नतमस्तक आहे आपणा सर्वांसमोर !!! मातृ-पितृतुल्य नडे पती पत्नी ; यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या... त्यांच्यासमोर सुद्धा नतमस्तक झालो... ! २५ तारखेला नाताळच्या संध्याकाळी सर्व धान्य आणले २६ डिसेंबरला इतर तयारी केली आणि आमच्या आयुष्यात २५ तारखेच्या ऐवजी २७ तारीख नाताळ म्हणून उजाडला !!! आमच्या वृद्ध आज्यांची खराटा फलटणची टीम बोलावली, सार्वजनिक भाग आम्ही सर्वांनी झाडून पुसून स्वच्छ केला. गंमत करावी म्हणून मी त्यांना काम झाल्यावर तोंड पाडून म्हणालो, "आज तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाही” त्यातल्या आज्या म्हणू लागल्या "आसुंदे दरवेळी तू लय काय काय देतूस, एकांद्या बारीला नसलं म्हनुन काय झालं ?” "तू तर एकटा कुटं कुटं आनि किती जणांचं बगशील लेकरा ?” त्यांचे खरबरीत हात माझ्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर फिरवताना त्यातून काळजीच जाणवली. माझ्या डोळ्यातून अश्रू आले... ! याचवेळी तुम्हा सर्वांची आठवण झाली... आणि मी "एकटा” नाही याची जाणीव झाली.
आईच्या पदराला खिसा नसतो परंतु तरीही लेकराला ती काहीतरी देतच असते.... बापाच्या सदऱ्याला पदर नसतो परंतु दरवेळी तो लेकराला सावली देतच असतो ...! माझ्या आयुष्यात भेटलेले हे याचक लोकसुद्धा कधी माझी आई होतात, काहीतरी देत राहतात....कधी बाप होतात आणि मलाच सावली देत राहतात... कसे ऋण फेडावे यांचे..? डोळ्यातलं पाणी झटकत मी मग सहकाऱ्याला खूण केली... तो नाचत उड्या मारत हातात काही भेट वस्तू घेऊन आला. आमचे लोक आश्चर्यचकित झाले... भानावर आल्यानंतर ते मूळ पदावर आले...."मुडद्या फशीवतुस व्हय आमाला” असं म्हणत चप्पल घेऊन त्या माझ्या मागे धावल्या.... आणि सगळे हसायला लागले... ! यानंतर नडे साहेबांनी दिलेलं धान्य आमच्या सांताक्लॉजने त्यांना वाटून टाकलं... ! आमच्याकडे रोषणाई नव्हती...
पण माझ्या म्हाताऱ्या माणसांचे डोळे आनंदाने चमकत होते....आमच्याकडे ख्रिसमस ट्री नव्हता... पण स्वयंपूर्ण होण्याचं रोपटं आपण सर्वांनी मिळून लावलं होतं... आमचा नाताळ आज खऱ्या अर्थाने साजरा झाला....!आज सांताक्लॉज त्यांना भेटला आणि मलाही भेटला.... तुम्हा सर्वांच्या रूपात...!!! नतमस्तक आहे... !!!
लेखनकाल : २७ डिसेंबर २०२४
-डॉ अभिजीत सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट पुणे