अंधाराचे वारसदार
‘अंधाराचे वारसदार' या कादंबरीत दादासाहेब मोरे यांनी आजच्या बदलत्या समाज वास्तवाचे प्रखर आणि दाहक दर्शन घडविले आहे. झोपडपट्टीतील जीवनाचे असे विदारक दर्शन अपवादानेच मराठी साहित्यात आढळते. ग्रामीण जीवनातील खोलवर रुजलेले संस्कार आणि शहरी भोगवादी, चंगळवाद जीवनाची ओढ, त्यातील ताण-तणाव, जगण्यासाठीचा जीवघेणा संघर्ष यांचे कलात्मकतेने केलेले चित्रण या कादंबरीची उंची वाढविते. कलावंताकडे असणारी वर्ण्याविषयासंबंधीची तादात्म्यता, तटस्थता आणि आंतरिक तळमळ यामुळे ही कादंबरी एकूण मराठी कादंबरी वाङमयाला वेगळे परिणाम प्राप्त करून देणारी ठरेल.
कॉलेजमध्ये नव्यानेच जाणारा तरुण रमेश सिनेमाची तिकिटं ब्लॅकनं विकणाऱ्या एका टोळीत नकळत ओढला जातो आणि पहिल्याच झटक्यात पोलिसांच्या तावडीत सापडतो. गणपा हातभट्टीवाला व त्याचे साथीदार त्याला जामिनावर सोडवतात खरा, पण दारू, मटका, गर्द, वेश्या, पान सिगारेट या सर्वांची चटक त्याला लागते आणि ब्लॅकमध्ये तिकिटे विकून या व्यसनांची नशा पूर्ण करण्याची त्याची धडपड चालू राहते. पैसे मिळतात पण ते कधीच पुरे पडत नाहीत. नेहमीच कडकी चालू राहते. उधार उसनवार करावी लागते. तशात शहरातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन स्थलांतर करण्याची योजना काय्रान्वित होते. आठ-दहा झोपडपट्ट्यातील हजार-बाराशे कुटुंबांना शहरापासून दोन-तीन किलोमीटर अंतरावरच्या काळ्या रानात हलवण्यात येते. प्रत्येकी पंधरा बाय दहा फुटांची जागा, अशा चाळीस-पन्नास घरांची रांग, दोन रांगांमध्ये कच्चा मुरुम टाकून केलेले रस्ते नगरपालिकेनं तयार केलेल्या यादीनुसार जागांचे वाटप होत राहते. घरे कधी बांधून होणार याचे वेळापत्रक कोणालाच ठाऊक नसते. तात्पुरती सोय म्हणून प्रत्येक कुटुंबाला थोडे कळक दिले होते. त्या बांबूच्या कळकांनी खोपटं किंवा झोपडी उभी करून तात्पुरता निवारा ज्याचा त्यानं उभा करायचा होता. त्याप्रमाणं लोक कुठून-कुठून पालापाचोळा, पत्रे, प्लॅस्टिक शीट वगैरे आणून आपला उघड्यावरचा संसार झाकण्याचा प्रयत्न करत होते. उघड्यावरच चुल धडधडत होत्या. खाणं-पिणं चालू होतं. बायाबापड्या चार-सहा घरात धुणं-भांडी करून संसाराला हातभार लावत. शाळा लांब. त्यामुळं मुलं आळस करत.
झोपडपट्टीतल्या लोकांचे नाना उद्योग. कोणी माकडवाले होते, कोणी चिंध्या कागद गोळा करणारे. कोणी गवंड्याच्या हाताखाली बिगारी काम करीत. कोणी आडत दुकानात हमाली करत. पोपटवाले जोशी पोपटाचा पिंजरा घेऊन भविष्य सांगत. कोणी भाकरीचे शिळे तुकडे वाळवून बिस्किटाच्या कारखान्यात, पाव-ब्रेडच्या बेकरीत देत. दादासाहेब मोरे या झोपडपट्टीतील वेगवेगळ्या माणसांचे व समस्यांचे वैविध्य दाखवू पाहतात. त्यासाठी रमेशच्या कुटुंबाप्रमाणेच सुनीलच्या कुटुंबालाही मध्यवर्ती स्थान देतात. स्थानांतरामुळे अनेकांच्या रोजी-रोटीतही व्यत्यय येतो. सुनीलचा बाप रामाप्पा व आई सावित्रीबाई चौथ्या मजल्यावरच्या स्लॅबचं सिमेंट ओतण्याच्या कामाला जातात. शिडीवरून पाट्या वर पोचवताना रामाप्पा खाली पडतो. लोखंडी सळ्यांवर पडल्याने, त्याच्या मांडीत सळ्या घुसतात. रक्त वाहू लागते. त्याला ठेकेदार हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो. सावित्रीबाईही त्याच्या मागोमाग जाते. डॉक्टर उजवा पाय मांडीपासून कापतात. ते म्हणतात, ‘महिनाभर हालचाल करायची नाही. कुबड्या लावून चालायची सवय करावी लागेल. दर आठवड्याला तपासणीसाठी या.' मुलगा सुनील शाळा चुकवू लागतो. आईलाही कामावर जाणे कठीण होते. इमारतीचा मालक औषध-पाण्यासाठी थोडे पैसे देतो. झोपडपट्टीवाल्यांच्या घरबांधणीच्या कामाकडे कोणीच लक्ष देत नाही. तेव्हा मोर्चा काढण्याचे ठरते. सुदाम, नऱ्या, रमेश व इतर तरुण मोर्चाची तयारी करतात. ‘तुम्ही मोर्चात आला तरच तुम्हाला घर मिळेल. निवेदनावर सही नाहीतर आंगठा करा.' त्या निवेदनाच्या प्रती कलेक्टर, पोलीस स्टेशन, वृत्तपत्रे यांना देण्यात येतात. कापडी बॅनर्स तयार करण्यात येतात. मोर्चापुढे सुदामचे भाषण होते. निवेदन नगराध्यक्षांना देण्यात येते. रमेशचा दोस्त नऱ्या एकदा रमेशच्या बहिणीला शेवंतीला एकटीच गाठतो. ‘तुझ्या भावाचा दोस्त तर आहेच. मग तुझा दोस्त झालो तर काम बिघडलं?' ... ‘शेवंता त्याच्या अंगावर तांब्या भिरकावते. डोकं धरून तो झोपडीबाहेर पळतो. लोक झोपडीपुढे जमतात. पण गुंड नऱ्याशी वैर घ्यायला कोणीच तयार नसते. पण तेवढ्यात रमेश चाकू घेऊन नऱ्याचा बदला घ्यायला येतो. गणपाला बघून मात्र तो पाय मागे घेतो. नगरपालिकेच्या निवडणुकांची धांदल सुरू होते. तशात या झोपडपट्टीला आग लागते. अग्निशामक दलाच्या गाड्या येईपर्यंत बहुतेक झोपड्या जळून खाक होतात. पुढारी झोपडपट्टीला भेट देतात. आश्वासने देतात. गुंड नऱ्या इतर टोळीवाल्यांना सांगतो, ‘आपण मदतीसाठी फेऱ्या काढू. धान्य, पैसा इ. काही हाती लागले तर बघू. नाहीतर झोपडीही गेली आणि संधीही गेली असं होईल.'
आपल्यातली परस्परांची दुश्मनी या प्रसंगापुरती विसरून कामाला लागलं तरच! ज्याच्या ज्याच्या गँगच्या हाताला जे लागेल ते त्याचं. मग हे तरुण गटागटानं शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरून पैसे मदत गोळा करतात. लोकही कमी-जास्त मदत करतात. धान्य, कपडे, भांडी, ब्रेड, पैसे निवडणुकीतले उमेदवारही साड्या, चादरी वाटतात. मताला शंभर रुपये भाव देतात. प्रत्येक टोळी प्रमुखाला उमेदवार गणपा दहा-दहा हजार रुपये देतो. मते न आणली तर मात्र जिवंत ठेवणार नाही असा दमही भरतो. गणपा दारूवाला निवडून येतो. ब्लॅकने तिकिटे विकताना रमेशची आणि अरुणची मारामारी होते. नऱ्याही रमेशला मारतो. रमेश कसाबसा पळत घरी येतो. आई त्याला हळद मलमपट्टी करते. रमेश रात्री नऱ्याला रस्त्यात गाठून त्याच्यावर चाकूचे वार करतो. त्याच्याबरोबरचे सुनील व अकबर पळ काढतात. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून रमेशही पळ काढतो. आपण पोलिसांच्या हाती सापडलो तर अंधारकोठडीत डांबले जाणार; नाहीतर झोपडपट्टीत लपून राहून अंधाराचे वारसदार म्हणून दिवस काढणार. आपल्या जीवनाला लागलेले हे भेसूर भयानक वळण; त्यातून आपली सुटका नाही. या विचाराने तो त्या भेसूर अंधारात रस्ता दिसेल तिकडे धावत सुटतो... त्याची सगळी स्वप्ने उद्ध्वस्त झालेली असतात. झोपडपट्टीत राहण्याची पाळी आलेल्या तरुणांना जी संगत मिळते ती त्यांना गुन्हेगारीकडे आणि व्यसनांकडे नेते आणि शेवटी त्यांना अंधाराचे वारसदार बनवते.
दादासाहेब मोरे यांनी या झोपडपट्टीतील गरीब रहिवाशांच्या आयुष्यातील परवड वेगवेगळ्या संदर्भासह वाचकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला आहे. रमेश हा नायक म्हणून प्रामुख्याने त्यांनी रंगवला आहे. नऱ्या हा खलनायक. सुनील व इतर गँगवाले, रमेश व सुनील यांची कुटुंबे व त्या झोपडपट्टीतील एकमेव धनिक गणपा दारूवाला या मोजक्या पात्रांनिशी झोपडपट्टीतील लोकांच्या सुख-दुःखाची एक झलक या कादंबरीत मोरे यांनी दाखवली आहे. तटस्थपणे झोपडपट्टीवासीयांच्या ससेहोलपलटीचे भिन्न-विभिन्न प्रकार मोरे पेश करतात; गुन्हेगारी जगाचाही फेरफटका घडवून आणतात. क्रौर्याला सामोरे जाताना मोरे हे काहीसे दचकत दबकतच पुढे जातात. फार खोलात जाण्याचे टाळतात. झोपडपट्टीबद्दल लिहितानाही त्यांना आपण अप्रिय कर्तव्य करत आहो असे काहीतरी जाणवत असावे. त्यात तसा त्वेष नाही. चीड नाही. असहाय अगतिकता आहे. साक्षीभावाने सगळे अधःपतन बघताना या जीवनाचा भेसूर भयानक शेवट होणार ही खंत त्यांना सव्रााधिक सतावते. ‘उद्याच्या भेसूर जीवनाची कल्पना कोणीतरी आपल्याला वेळीच द्यायला हवी होती' अशी पश्चात्तापाची भावना रमेशमध्ये शेवटी जागी होते. पण आता ती निरुपयोगी असते. सरळ रेषेत जायचे कितीही मनात असो, अंधारात वाट वाकडी-तिकडी होण्याची शक्यता अंधाराच्या वारसदारांबाबत विशेषच राहते असा इशारा ही कादंबरी देते.
पुस्तक - अंधाराचे वारसदार लेखक - दादासाहेब मोरे
प्रकाशक- मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
आवृत्ती : २ री प्रकाशन वर्ष : ऑगस्ट २००१
पृष्ठे : १३२ मूल्य - रु. १५०/-
-सौ. मनिषा राजन कडव