पुस्तक परिचय .....
"माझ्या आयुष्यात मला ज्या ज्या शक्य झाल्या त्या त्या सर्व भानगडी मी केल्या. सर्वच अनुभव घेतले. माझ्या जीवनात मी जे जे काही केलं त्या सर्व गोष्टींना सर्वस्वी मीच जबाबदार आहे. जगात आपल्याला कोणीच नाही. आपण एकटेच आहोत ही भावना मनात घट्ट रुजवूनच जीवन जगलो.” असे स्पष्टपणेच नमूद करणाऱ्या श्रीकांत सिनकर यांचे हे पुस्तक चाकोरीबाहेरचे लिखाण वाचायला आवडणाऱ्यांना पसंत पडेल.
श्रीकांत सिनकर यांचे नांव वाचले आणि पोलीस चातुर्यकथा असतील असे वाटल्यामुळे मी ‘सैली १३ सप्टेंबर' हे पुस्तक वाचायला घेतले. यापुर्वी मी श्रीकांत सिनकर यांची अनेक पुस्तकं वाचली आहेत.
सैली १३ सप्टेंबर हे पुस्तक चाळत असताना श्रीकांत सिनकर यांच्या इतर पुस्तकांत आणि ह्या पुस्तकात खूप फरक आढळला. हा लेख संग्रह आहे की चातुर्य कथा संग्रह आहे याचा उलगडा होत नव्हता. या पुस्तकात सुरुवातीला श्रीकांत सिनकर यांचे मित्र सतीश तांबे यांनी ‘अधोलोकाची अनमोल शितं' या लेखाद्वारे पुस्तकाबद्दल व सिनकर यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आपले विचार मांडले आहेत. तसेच ज्येष्ठ साहित्यिक व श्रीकांत सिनकर यांचे स्नेही माधव मनोहर यांनी प्रस्तावनेऐवजी या लेखात पुस्तकाबद्दल व सिनकर यांच्याबद्दल आपली अभ्यासपूर्ण मतं मांडली आहेत.
सतीश तांबे यांच्या मते श्रीकांत सिनकर हे दादरच्या शिवाजी पार्कसारख्या उच्चभ्रू वस्तीत जन्माला येऊनही श्रीकांतची उठबस पांढरपेशा लोकांमध्ये नव्हती. तर अधोविश्वातील गयागुजऱ्या लोकांबरोबर होती आणि लिखाणाचा पिंड खरं तर पत्रकाराचा होता. त्याची उठबस पोलिसांमध्येही जास्त होतीण् त्यामुळे श्रीकांत आधी मराठीत पोलिस चातुर्य कथा' लिहायला लागला व त्याचे हिंदीत भाषांतर करुन ‘मनोहर कहानियां' सारख्या लोकप्रिय मासिकातून प्रसिद्ध होऊ लागल्या. या लेखनातून त्याला पैसा व लेखक म्हणून मान मिळायला लागला. लेखक म्हणून त्यांना व्याख्यान देण्यासाठी सुध्दा निमंत्रण येऊ लागली.
सैली : १३ सप्टेंबर ह्या पुस्तकात मटका व्यवसायातील जगन, हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय करणारा दत्तू , वेश्या व्यवसाय करणारी नेपाळी वेश्या सैली आणि ए ग्रेड हॉटेलमधील वेश्यावृत्तीची एकाच वेळी अनेक पुरुषांना खेळवणारी ‘जिन जिमलेट' या चार व्यक्तींच्या निमित्ताने श्रीकांत सिनकर यांनी बेटिंग, हातभट्टी, वेश्यागार आणि ए ग्रेड हॉटेल असे आपले अनुभव कथन केले आहे. सिनकर हे वेश्यागमन करत असले तरी त्यांना त्यांच्या सहभोगापेक्षा सहवास प्रिय होता.
सिनकर यांचे नेपाळी असलेल्या सैली या वेश्येबरोबर प्रेम जमले होते. त्यांना तिच्याशी लग्न करायचे होते; परंतु ते होऊ शकले नाही. १३ सप्टेंबर हा तीचा जन्मदिवस. त्यामुळे सिनकर यांनी पुस्तकाला ‘सैली ः १३ सप्टेंबर' हे नांव दिले आहे. खरं म्हणजे साहित्यिक जयवंत दळवी यांनी या पुस्तकाला ‘आत्मचरित्राऐवजी' असे नाव सुचवले होते. हे पुस्तक म्हणजे श्रीकांत सिनकर यांचे आत्मनिवेदन आहे. त्यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल फारशी माहिती दिली नसली तरी ‘सुंदर सावली सापडली' या लेखात वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी शैला थत्ते या महिलेबरोबर सिनकर विवाहबद्ध झाल्याबद्दल जी हकीगत कथन केली आहे त्यात मोठा भाऊ, लहान भाऊ, लहान बहीण, आई-वडिल असा ओझरता उल्लेख केला आहे. यावरून त्यांचे षटकोनी कुटुंब असावे असे वाटते.
सिनकर यांच्या लेखनशैली बद्दल ज्येष्ठ साहित्यिक माधव मनोहर म्हणतात की या पुस्तकात सैली आणि जिन ही दोन प्रकरणं वेश्याविषयक असूनही त्यात कोठे अश्लिलतेचा दूरान्वयानेही उल्लेख नाही.
व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकांमध्ये सर्वात वाचकप्रिय पुस्तक पु.ल. देशपांडे यांचे १९६६ साली प्रकाशित झालेले ‘व्यक्ती आणि वल्ली' हे आहे. ह्या पुस्तकाच्या १९६६ पासून २०१३ पर्यंत २७ आवृत्या निघाल्या; परंतु श्रीकांत सिनकर यांच्या ‘सैली : १३ सप्टेंबर' ह्या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाची पहिली आवृत्ती फेब्रुवारी १९८१ साली झाली तर दुसरी आवृत्ती जानेवारी २०१३ रोजी म्हणजे ३२ वर्षांनंतर प्रकाशित झाली यावरून मराठीतील वाचकांची मानसिकता अद्यापही पांढरपेशी आहे हे सिध्द होते.
सिनकर यांच्या अनेक कथा विविध मासिकं, दिवाळी अंकात प्रकाशित झाल्या होत्या. ‘पेटलेली अमावस्या' ही एकांकिका ‘विळखा' ही कादंबरी ‘म्हातारी' ही वादग्रस्त कादंबरी प्रकाशित झाली. त्यांची लेखनशैली अशी होती की पुस्तक वाचताना ती घटना त्यांनी प्रत्यक्ष पहिली आहे आणि त्या गुन्ह्याचा त्यांनी प्रत्यक्ष तपास केला आहे असा भास होतो. त्यामुळे ज्यांनी त्यांना प्रत्यक्ष पहिले असेल अथवा त्यांचे ‘सैली १३ सप्टेंबर' हे पुस्तक वाचले नसेल त्यांच्या डोळ्यासमोर अनुभवी इन्स्पेक्टरच्या वेशातील व्यक्ती डोळ्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही. पण प्रत्यक्षात ते पोलिस खात्यात नोकरीला नव्हते; तर त्यांची गुन्हेगारी विश्वाशी तसेच पोलिस खात्याशी जवळीक होती. पोलिस खात्याकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी शब्दांकन करून कथा व लेख लिहिले.
श्रीकांत सिनकर यांनी ‘जिन जिमलेट' या लेखात त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की ”माझ्या आयुष्यात मला ज्या ज्या शक्य झाल्या त्या त्या सर्व भानगडी मी केल्या. सर्वच अनुभव घेतले. माझ्या जीवनात मी जे जे काही केलं त्या सर्व गोष्टींना सर्वस्वी मीच जबाबदार आहे. जगात आपल्याला कोणीच नाही. आपण एकटेच आहोत ही भावना मनात घट्ट रुजवूनच जीवन जगलो.”
वाचकांनी श्रीकांत सिनकर यांचे हे पुस्तक जरूर वाचावे त्यामुळे गुन्हेगारी जगतातील घडामोडी संदर्भात माहिती मिळते.तसेच साहित्य क्षेत्रांतील आगळे वेगळे व्यक्तिमत्व असलेल्या श्रीकांत सिनकर यांच्या बद्दलची माहिती होते.
‘सैली १३ सप्टेंबर' लेखक - श्रीकांत सिनकर
प्रकाशक - लोकवाड्मय गृह प्रथम आवृती - फेब्रुवारी १९८१
दुसरी आवृती - जानेवारी २०१३
किंमत - २७० रुपये पृष्ठ.... २१६
-दिलीप प्रभाकर गडकरी