आपली आवड -  ‘शाळा'

शैक्षणिक दुरावा दूर करायचा असेल तर शाळेने मुलांच्या जवळ जाऊन त्यांची आवड निवड जाणायला हवी. जोपासायला हवी आणि शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टीची आवड मुलांच्या मनात रुजवायला हवी. मुलांची पहिली आवड ही  ‘शाळा' असायला हवी. नैसर्गिकरित्या मुलांना भांडण आवडत नाही. एकमेकांशी न भांडणारा समाज निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा मुलांची आवड जपण्यासाठी मुलांना शाळा आवडायला हवी. तोच एक राजमार्ग आहे.

प्रत्येक व्यक्तीला आपली आवड जपण्याचा आणि जोपासण्याचा अधिकार असायला हवा. समाजातील आजूबाजूच्या व्यक्तींनी देखील एकमेकांच्या आवडी निवडी जपण्यासाठी एकमेकांना सहकार्य करायला हवे. प्रत्येक व्यक्तीने एवढे आदर्श आणि शहाणपणाने वागावे व सामाजिक भान जपून सामाजिक स्वास्थ्याच्या उंचीचे एवरेस्ट गाठावे. ही अपेक्षा खरंतर जरी स्वप्नवत वाटत असली तरी ती सत्त्यात येणे शक्य आहे. त्यासाठीच माणसांच्या शिक्षणाची आवश्यकता असते. माणसांना शिक्षित करण्याचे काम शाळा करत असतात. माणसांना शहाणे आणि सुसंस्कारित करण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून शाळा करत असतात. उद्याचे नागरिक असणारे आणि आज शाळेत नागरिकत्वाचे धडे गिरवणाऱ्या मुलांना काय आवडते आणि काय आवडत नाही याचा विचार शिक्षणाच्या माध्यमातून शाळेत होतो का? याचा विचार करायला हवा. जर मुलांना शाळा आणि  शाळेतील शिक्षण आवडत असेल तर शाळेतील शिक्षणाने दिलेले धडे सुद्धा नक्कीच आवडत असतील आणि तसं होत नसेल तर भविष्यात आपली नैसर्गिक आवड नैसर्गिकपणे कशी जपायला हवी हे मुलांना कळणारच नाही आणि मग मुले आयुष्यभर न आवडणारी कामे मनाच्या विरुद्ध करत राहतील आणि जीवनाच्या खऱ्या आनंदाला पारखी होतील.

‘मुलांच्या आवडीनिवडी जपण्यासाठी आणि उद्याच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी शाळांची भूमिका काय असावी', या संदर्भात एक प्रयोग केला. पहिलीपासून दहावीपर्यंतच्या शाळेत शिकणाऱ्या शहरी, ग्रामीण आणि सर्व माध्यमातील विद्यार्थ्यांचा प्रयोगामध्ये समावेश केला. प्रयोगाचे नाव होते- ‘मला हे आवडत नाही'.

आपलं सगळ्यांचं आपल्या आवडत्या गोष्टीवर खूप प्रेम असते. त्यामुळे लहानपणापासून ‘माझा आवडता पक्षी', ‘माझा आवडता प्राणी', ‘माझा आवडता नेता' यासारख्या विषयावर आपण शाळेतील परीक्षेमध्ये उत्तर लिहिलेले असते. वक्तृत्व स्पर्धेत भाषण केलेले असते. पण मला अमुक गोष्ट आवडत नाही हे सांगण्याचे आपलं धाडस होत नाही. खरंतर आवडणाऱ्या गोष्टी कमी आणि न आवडणाऱ्या गोष्टी खूप असतात. पण आपण फक्त आवडीच्याच गोष्टीचा विचार करतो. म्हणून विद्यार्थ्यांना शाळेत आणि शाळेबाहेरच्या जगात काय आवडत नाही हेही जाणून घ्यायला हवं असा विचार मनात आला आणि ‘मला हे आवडत नाही', या प्रयोगाला सुरुवात झाली.

        शाळा भेटीमध्ये प्रत्येक वर्गात जाऊन तुम्हाला काय-काय आवडत नाही, यासंदर्भात विद्यार्थ्यांशी चर्चा करायला सुरुवात केली. पहिल्यांदा मला जाणवले की ‘तुम्हाला काय आवडत नाही', असं मुलांना विचारले तरी चौथीपर्यंतची लहानलहान मुलं उत्साहाच्या भरात आम्हाला हे आवडतं, ते आवडतं हेच भरभर सांगायची. बहुतेक त्यांना आपल्याला काय आवडत नाही हे सांगण्याची सवयच नसावी किंवा त्यांच्या नावडीची कोणी दखल घेतली नसावी. मग त्यांना ठासून सांगावे लागायचे की, "तुम्हाला काय आवडते ते सांगू नका, तुम्हाला काय आवडत नाही ते सांगा. असं म्हटलं की मग वर्ग शांत व्हायचा. मुलं एकमेकांकडे बघायची. त्यांची विचार प्रक्रिया सुरू असायची, पण बोलणं सुरूच व्हायचं नाही. मग चर्चेला सुरुवात व्हावी म्हणून मीच मुलांना सांगू लागलो, ”मला पाऊस आवडत नाही, ब्रेड आवडत नाही, सावली नाही, कारले आवडत नाही. माझं बोलणं पूर्ण झालं की मी मुलांना विचारायचो, ”आता तुम्ही सांगा तुम्हाला काय काय आवडत नाही. मग मुलांची खाद्यपदार्थांची यादी सुरू व्हायची, ”मला पेरू आवडत नाही, मेथी आवडत नाही, चहा आवडत नाही, बटाटा आवडत नाही. खूप प्रयत्न केला तरी पहिली दुसरीतील मुले त्यांची ‘नावड', व्यक्त करताना खाद्यपदार्थ आणि काही वस्तूंच्या पलीकडे जात नाहीत हा अनुभव घेतला. यावर उपाय म्हणून तिसरी चौथीच्या मुलांसाठी त्यांना आवडत नसलेल्या गोष्टींची लेखी यादी करायला सांगितले. असं करण्याचा हेतू हा होता की लेखन करत असतात विद्यार्थी विचार करून स्वतःचे मत व्यक्त करतील. माझा हा विचार खरा ठरला. अनेक मुलांनी खऱ्या अर्थाने त्यांचे भाव विश्व, ‘मला हे आवडत नाही', हे व्यक्त करताना लेखी स्वरूपात उलघडून दाखवले. मुलांचे हे व्यक्त होणे कदाचित तत्कालीन असू शकते. म्हणजे त्यांची ही मते कायमस्वरूपी तशीच असणार नाहीत. पण आपल्याला विचार करायला लावणारी नक्कीच आहेत.

ग्रामीण भागातील इयत्ता चौथी मधील एका मुलीने, ‘मला घर आवडत नाही', असं लिहिले होते. त्या शाळेतील इतर मुलांनी मात्र सामान्य गोष्टींचा उल्लेख केला होता. जसे की खाद्यपदार्थ, काही वस्तू. पण त्या एकाच मुलीने घर आवडत नाही असे लिहिले होते. तिची नावड पाहताच मला धक्का बसला. माझ्यासाठी ते अनपेक्षित होते. कारण नऊ दहा वर्षाची मुलगी एवढा संवेदनशील विचार करेल याची अपेक्षाच नव्हती. मी तिने लिहिलेले तिच्या वर्गशिक्षकांना दाखवले. त्यांनादेखील हा धक्का होता. आम्ही दोघांनी त्या मुलीला, ”घर का आवडत नाही” हे विचारायचा खूप प्रयत्न केला. पण ती काहीच बोलली नाही. मग तिच्या वर्गशिक्षिका म्हणाल्या, ”तिचे बाबा थोडे व्यसनाधीन आहेत म्हणून कदाचित तिने असं लिहिलं असेल”. बाईंची प्रतिक्रिया मनात ठेवली आणि मी माझे घर आठवू लागलो. मला माझे घर कधीच अप्रिय नव्हते. घराची ओढ कायम असायची. मग मला माझ्या घरातली माणसं आठवली. त्यांचे प्रेम आठवलं. त्यांचं एकमेकांशी प्रेमाने, आपुलकीने, मायेने वागणे आठवले. घरामध्ये आपल्याला प्रेम मिळणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे याची जाणीव प्रकर्षाने झाली. तरी देखील चौथीतील मुलीने मला घर आवडत नाही असे का लिहिले असावे हा विचार मनातून जात नव्हता. चार-पाच दिवसानंतर केंद्रस्तरावरील क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. भर उन्हात मुलं आनंदाने खेळत होती. जिंकलेली आणि पराजित झालेली मुलं सामना संपल्यानंतर एकत्र आनंदाने आईस्क्रीम खात होती. खेळाडू वृत्तीचे वेगळे चित्र मी पाहत होतो. मैदानावर वेगळाच उत्साह दिसत होता. एवढ्यात एका पालकाच्या खांद्यावर बसलेली एक मुलगी मला दिसली. मुलगी ही आनंदात होती आणि पालकही. बहुदा त्या मुलीचे ते वडील असावेत असा विचार मी केला. दोघ्ोही आनंदात दिसत होते. आनंदाचे हे चित्र पाहत असताना एक शिक्षिका माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, ”या मुलीचा नंबर आला आहे धावण्याच्या स्पर्धेत, म्हणून आनंदाने तिचे बाबा तिला खांद्यावर घ्ोऊन फिरत आहेत, ही परवाची तीच आहे, मला घर आवडत नाही असे लिहिणारी”. मला लगेच परवाचा प्रसंग आठवला. त्या मुलीच्या अपेक्षा काय असतील हे आठवले आणि आजचा हा आनंदाचा क्षण पाहून भविष्यात तिला तिचे घर आवडणार नाही असं कधीच होणार नाही, हा विचार मनात आला.

दुसऱ्या एका शाळेतील तिसरीतील एका मुलीने, ‘मला मेकअप करायला आवडत नाही', असे लिहिले होते. म्हणून तिचे लेखन वाचताच मी तिला विचारले, "तुला मेकअप करायला का आवडत नाही?”  तर तिने क्षणात सांगितले, "आपला चेहरा नैसर्गिक असायला हवा, इतर कोणतेही पदार्थ चेहऱ्यावर लावू नयेत असे माझे बाबा सांगतात”. आपल्या वडिलांचा सल्ला प्रत्यक्ष आपल्या आवडीच्या रूपाने आचरणात आणणारी आणि तेवढेच ठामपणे आपली नावड सांगणाऱ्या तिसरीतील मुलीच्या अभिव्यक्तीला शाळेने तेवढा स्पेस दिला म्हणून ती व्यक्त होऊ शकली. आवडीची कामे माणूस आनंदाने करतो हे तत्व माहीत असल्यामुळे, जर शाळा हे विद्यार्थ्यांचे आवडीचे ठिकाण असेल तर तिथली सर्व कामं मुले आवडीने करतील आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्या जीवनात नक्कीच दिसेल हा विचार मनात घेऊन शाळेच्या अनुषंगाने विद्यार्थी आपल्या नावडीच्या संदर्भात काय लिहीत आहेत याची पाहणी पुढे करू लागलो. या पाहणीत चौथीतील एक मुलगा असे लिहितो, "मला परिसर अभ्यासाचे धडे पाठ करायला आवडत नाहीत”. दुसरा एक विद्यार्थी लिहितो, "मला वाचन करायला आवडत नाही”. विद्यार्थ्याला आवड नसताना पाठांतर करायला लावले किंवा आवड नसताना वाचायला लावले तर तो ते मनापासून करणार नाही. हळूहळू तो त्या गोष्टीपासून दूर जाईल. कारण नैसर्गिक दृष्ट्या त्या गोष्टी त्याच्या आवडीच्या नाहीत. मग हळूहळू त्याला शाळा आवडेना अशी होईल आणि मग तो औपचारिक शिक्षणापासून दूर दूर जाईल. हा शैक्षणिक दुरावा दूर करायचा असेल तर शाळेने मुलांच्या जवळ जाऊन त्यांची आवड निवड जाणायला हवी. जोपासायला हवी आणि शिक्षणाच्या माध्यमातून  चांगल्या गोष्टीची आवड मुलांच्या मनात रुजवायला हवी. मुलांची पहिली आवड ही  ‘शाळा' असायला हवी. अशाच एका दुर्गम शाळेतील एक विद्यार्थी लिहितो, "घरातील माणसे जेव्हा भांडतात ते मला आवडत नाही.” चौथीपर्यंतच्या मुलांच्या अपेक्षांचा परीघ शाळेला कळायला हवा. मग घरात किंवा रस्त्यावर कोणीच कोणाशी भांडणार नाही. कारण नैसर्गिकरित्या मुलांना भांडण आवडत नाही हेच स्पष्ट दिसत आहे. एकमेकांशी न भांडणारा समाज निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा मुलांची आवड जपण्यासाठी मुलांना शाळा आवडायला हवी. तोच एक राजमार्ग आहे.

प्रयोगाचा पुढचा टप्पा होता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना काय आवडत नाही ते पाहणे. हा वयोगट साधारण दहा वर्षे ते चौदा वर्षे या दरम्यानचा आहे. या मुलांची समज बऱ्यापैकी विकसित झालेली असते. व्यक्तिमत्व जडणघडणीच्या दृष्टीने त्यांच्या धारणा निश्चित होण्याचा हा कालावधी आहे. या मुलांशी जेव्हा बोललो, ‘मला हे आवडत नाही', या संदर्भातील त्यांच्या मतांचे जेव्हा लेखी स्वरूपातील अभिप्रायाचे वाचन केले तेव्हा आपली मुले खूप शहाणी व समंजस आहेत,  त्यांच्या अपेक्षासुद्धा अगदी रास्त आहेत, फक्त समाज म्हणून आपण पुढे  कुठेतरी कमी पडत आहोत हे मात्र मुलांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट जाणवले. मुलांच्या या प्रतिक्रिया म्हणजे शाळांनी  काय करायला हवे हे सांगणारी आदर्श उत्तर पत्रिका आहे असे वाटते. चला तर बघूयात आपल्या मुलांची आदर्श उत्तरे.

मुलं म्हणतात- "गणितातील सूत्रे सोडवायला आवडत नाहीत”. "काम पूर्ण केल्यानंतर तेच काम करायला पुन्हा सांगणे हे आवडत नाही”. "अभ्यासाइतके खेळाला महत्त्व न देणे हे आवडत नाही”. "पैशांचा देखावा करणे आवडत नाही”. "चित्र काढायला आवडत नाही”. "मोठेपणा मिरवणे व दुसऱ्याला कमी लेखणे आवडत नाही”. "शाळेतून सुट्टी घ्यायला आवडत नाही”. "व्यसनाधीनता आवडत नाही”. "लहान भावाला कोणी मारले तर आवडत नाही”."नकारात्मक विचार करायला आवडत नाही”. "प्राण्यांना मारायला आवडत नाही”. मुलांची उत्तरे वाचली आणि मनात विचार आला, ‘किती अन्याय करत आहोत आपण मुलांच्यावर, त्यांच्या नावडीची कामे करायला सांगून. काय म्हणत असतील ती आपल्याला?'

शाळेमध्ये अध्ययन अध्यापनाच्या दरम्यान आपल्या कळत नकळत आपल्याला जे वाटते तेच योग्य आहे असे मानून जर आपण एखादी कृती करत असू तर कदाचित ती मुलांना आवडत नसेल, ही एक शक्यता आहे. त्यामुळे मुलांना शाळा नावडीची होईल.त्याऐवजी मुलांच्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने जे खरेच योग्य आहे व ते जर मुलांना आवडत नसेल तर ते मुलांना  कसे आवडेल याचा विचार करून कृतींची योजना केली तर मुलांना याची खात्री पटेल की ‘माझ्या आवडीची दखल शाळेत घेतली जाते'. एकदा ही खात्री पटली की मुलांची आवड ही शाळा होईल आणि मग सुखी समाजाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची पेरणी शाळेला सर्व मुलांच्या मनामध्ये करता येणे शक्य होईल आणि मग आपल्या सर्वांची आवड  ही आपली शाळा होईल. - अमर घाटगे. केंद्रप्रमुख - रत्नागिरी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

पुस्तक परिचय .....