वाळूत हरवलेली सुई
काल्पनिक आणि दिखाव्याचा विद्वान अशा विश्वात उडत राहणारी टोळी फार काळ टिकत नाही. वैफल्यात किती काळ उडणार? जमिनीचे भान ठेवून जगणे तीच खरी कला. वाळूत हरवलेली सुई शोधत राहण्यापेक्षा मोकळा श्वास घेऊन मार्गस्थ झालेले जास्त बरे! मंजिल मिले ना मिले राह तो मिलेगी. जीवन म्हणजे काय? एक प्रवास आहेच!
मानवी जीवनातील स्वभाव ही एक अप्रिय चिंता असेल. समोरची व्यक्ती कशी असेल? सहज कळत नाही. जोवर दोघांमध्ये संवाद होत नाही, तोवर एकमेकांना समजून घेणे शक्य नाही.
एक अँकररुपी ललना हातात माईक घेऊन भरदुपारी एका बस स्टॉपवर बसलेल्या अनोळखी व्यक्तीला प्रश्न विचारू लागते. ”समजा तुम्ही बस मध्ये विंडो सीटवर बसलेले आहात आणि पुढच्या बस स्टॉपवर एखादी स्त्री आली तर तिला शेजारील रिकाम्या सीटवर बसू द्याल का?
"नाही देणार.” ती व्यक्ती लगेच उत्तर देते.
"समजा ती बाई वृद्ध असेल तर?”
"नाही पुन्हा उत्तर नाहीच!”
"बरं समजा ती बाई गरोदर असल्यास?”
"तरीही नाहीच नाही.”
अँकर ललना लगेच कॅमेराकडे वळत म्हणते...
"पहा, मित्रांनो! समाजात कशा प्रकारचे लोक वावरतात, नीट लक्ष देऊन पहा.”
त्या प्रश्न विचारत्या तरुणीस मध्येच थांबवून तो माणूस म्हणाला ...अहो मॅडम, मी बस ड्रायव्हर आहे!”
एकाच वाक्यात सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. उपस्थित सारेच अवाक! हे आहे आजच्या काल्पनिक विश्वात रमणाऱ्यांचे आत्मकेंद्रित डबके! अहो, त्या व्यक्तीला किमान विचारायचे तरी की ‘तू कोण आहेस? काय करतोस? असा आहे आजचा विचित्र जमाना'!
चाय की दुकाने भी
खुलवा दो साहब,
सब लोग शराब के
शौकिन नही होते
त्या वाहन चालकाचे हे शायरीतले मनोगत असावे कदाचित.
सहज कळू शकेल असा कुठलाही मानव हा काल नव्हता, आजही नाही. पूर्वी वयस्कर लोक आपल्या पाल्यांना अनुभवाचे चार बोल सांगायचे. आता तसे कुणी धाडसही करत नाही. का? तर समोर लाखभराचा विश्वगुरू ‘लॅपटॉप' सुरू असतो. विश्वभराची माहिती संकलित केलेला पेन ड्राईव्ह असतो किंवा खिशात पन्नास हजाराचा 5G अँड्रॉईड खोचलेला असतो. त्यांतून सर्व भाषेत अपेक्षित माहिती एका क्षणात सहज मिळते. मग हवा कशाला तो उपदेशक आणि त्याचा मौलिक सल्ला, आणि माहिती? त्या शिवाय work from home ही मानसिकता covid 19 मुळे जगभर पसरलेली आहेच.
एक विनोदी किस्सा वाचनात आला, त्याने माणूस जेव्हा बोलत नाही तेव्हा काय सत्य समोर येते? ते कळले...
एक डॉक्टर एका नवीन पेशंटला त्याच्या विषयीं सविस्तर माहिती विचारत असता सारी उत्तरे त्याची बायको देत होती. शेवटी नाईलाजास्तव बायकोला बाहेर जायला सांगून डॉवटरांनी पेशंटला प्रत्यक्ष तपासायला घेतले. तेव्हा कळले की तो पेशंट ‘बोलू शकत नाही.' म्हणजे त्याला वाचाच नव्हती!!
लगेच पेशंटच्या बायकोला आत बोलावून डॉवटरांनी हे गुपित तिला सांगितले. तेव्हां तीसुद्धा चकित झाली. तुमचा नवरा मुका आहे.
"अय्या डॉवटर हे माझ्या कसे लक्षातच आले नाही? म्हणजे आजवर ज्याच्या समवेत मी संसार करत होते ‘वो गुंगा निकला?' मेरा पती वाचस्पती असे ज्याला समजत होते तो चक्क मूक नायक निघाला?
अनेकदा निवेदक खूप बोलतो, पण प्रत्यक्षात जे बोलायला हवे ते थोडक्यांत आटोपून मोकळा होतो. निवेदक, समीक्षक, गीतकार इत्यादींचे सध्या बरेचसे क्रॅश कोर्सेस आलेले आहेत, त्याची रितसर जाहिरात केली जाते. मुळात आपण त्यासाठी सक्षम आहोत का? फक्त सर्टिफिकेट मिळवण्यासाठी म्हणून असे कोर्स केले जाण्यात अर्थ काय? प्रश्न अनुत्तरित राहिलेला बरा.
काही निवडक विचारवंतांच्या मैफलीत एका रसिक प्रेक्षकाने उपस्थित सर्वांना उद्देशून एक प्रश्न विचारला...एका निर्जन बेटावर राहण्याची पाळी आली असता तुम्ही कोणते पुस्तक सोबत घ्याल? कुणी गुलशन नंदा, कुणी गुमनाम सिनेमाचा DVD तर एक शांत बसलेल्या व्यक्तीने उत्तर दिले... ‘लाकडाची होडी कशी बनवितात? या विषयावरील मार्गदर्शक पुस्तक घेईन!' असे सांगतो.
काल्पनिक आणि दिखाव्याचा विद्वान अशा विश्वात उडत राहणारी टोळी फार काळ टिकत नाही. वैफल्यात किती काळ उडणार? जमिनीचे भान ठेवून जगणे तीच खरी कला.
एका मैफलीत एक मराठी कथा वाचकाशी भेट झाली. गुपतगू बरीच लांबली. "तुमच्या काही निवडक कथा अशा आहेत की त्यावर शॉर्ट किंवा लाँग फ़िल्म शूट केली जाऊ शकते.”
मी आतल्या आत हसलो. शब्दांत बोलणे टाळले. माणसाला सोंग आणून जगावे लागले की मग तो ज्यास्त प्रश्न विचारतो आणि त्याच प्रश्नात उत्तर शोधू लागतो. यालाच घुसमट असे म्हणावे का?
बादलों सा इष्क था उसका
कुछ देर बरसा और फिर
गायब हुआ...!
वाळूत हरवलेली सुई शोधत राहण्यापेक्षा मोकळा श्वास घेऊन मार्गस्थ झालेले जास्त बरे! मंजिल मिले ना मिले राह तो मिलेगी. जीवन म्हणजे काय? एक प्रवास आहेच! -इक्बाल शर्फ मुकादम