पुस्तक परिचय :
कृत्रिमपणाची झालर नसलेली तडजोड..गुंता सोडवणारी किल्ली
निवृत्ती जोरी यांची आत्मकथन असणारी तडजोड..गुंता सोडवणारी किल्ली ही कादंबरी. संगमनेर तालुक्यातील खांबे गावात १९७९ साली एका धनगर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शिक्षणासाठी ते आपल्या मामाच्या गावी दोडी येथे आले. दहावीपर्यंत त्यांनी मामाच्या गावी शिक्षण घेतले. दहावीचे शिक्षण झाल्यावर ते कृषी क्षेत्रात उच्च शिक्षण घेईपर्यंत सगळा प्रवास त्यांनी यात मांडला आहे.
अगदी साध्या, सोप्या भाषेत त्यांनी हा सगळा जीवनप्रवास मांडला आहे. कुठेही त्याला कृत्रिमपणाची झालर नाही. जे जीवन ते जगले तेच त्यांनी अगदी निरपेक्षपणे यात मांडले आहे. जवळपास चार पिढ्या यात वाचकाला वाचायला मिळतात. लेखकाचे आजोबा, आजी, वडील, आई, स्वतः लेखक यांच्या माध्यमातून चार पिढ्या वाचायला मिळतात. लेखकांनी जुना काळसुद्धा अगदी हुबेहूब उभा करण्याचा प्रयत्न केला आहे.काही प्रमाणात स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा काळ, अगदी दोन हजार साल उजाडल्यावर असलेला कॉलेज जीवन हे सगळं यात वाचायला मिळते.
शेतकी कॉलेज येथे शिक्षण घेताना त्यातील अनुभव त्यांनी यात मांडले आहे. रॅगिंग सारखा विषय त्यांनी प्रत्यक्ष अनुभवला आहे. या काळात केलेली मस्ती, अभ्यास, मैत्री हे वाचून कॉलेजजीवन वाचकाला अनुभवता येते. यश अपयश जीवनाचा एक भाग आहे याची जाणीव कॉलेज जीवन वाचताना होते.
लेखकांना अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणींचा सामना करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. अडाणी आजोबा, व्यावहारिक आजी, प्रेमळ मामा मामी यांचा सहवास लाभल्याचे ते सांगतात. त्यांच्या मदतीची जाणीव ठेवतात. ज्यावेळी आपण आपल्या जीवनात मागे वळून पाहतो त्यावेळी आपण केलेल्या संघर्ष फक्त आठवून चालत नाही तर त्या संघर्षाच्या काळात आपल्याला मदत करणारी, आधार देणारी माणसंसुद्धा आठवायला हवीत. यात वाचताना लेखकाचा कृतज्ञभाव वेळोवेळी जाणवतो. आपले वडील, आई, भाऊ ( शिक्षक, मित्र, इतर माणसं ) यांच्या कष्टाची जाणीव लेखकाला आहे हे खूप महत्वाचे आहे.
जीवनाच्या वाटेवर ही जाणीव वाचकाच्या मनावर पेरणारी ही कादंबरी आहे. कादंबरीची मांडणी करताना त्यांनी ५१ भागात याची विभागणी केली आहे. प्रत्येक भागाला आशयाच्या अनुसरून योग्य नाव दिले आहे. त्यामुळे विषयाची परिणामकारकता अधिकच वाढते. तो भाग वाचनीय होतो. ओनामा, रुजवात, एम्पला, शृंगार, खांदेमळणी, घुसळण, धोपटवाट, कानखिळ निसटली, कल्पतरू आहे साक्षीला, माझा निर्देशांक घसरला अशी साजेशी नावे वाचनीय आहेत.
”दरवर्षी पोळ्याच्या आदल्या दिवशी पूर्वतयारी म्हणून माझा दादा आपल्या बैलाची खांदेमळणी करायचा. भविष्यात आमच्या खांद्यांवर कितीही बोजा टाकला, तरी ते खांदे डगमगणार नाहीत अशी मॅट्रिकसाठी आमच्या शिक्षकांनी आमची खांदेमळणी करून घेतली होती. आता माझ्यापुढं एकच लक्ष्य होतं - ते म्हणजे मॅट्रिक!” खांदेमळणी आणि एक नवी सुरुवात याची किती सुंदर सांगड यात घातली आहे.
बऱ्याच वेळा आपण एखादा वाईट प्रसंग घडला की निराश होतो, दुःखी होतो, हताश होतो, आणि डगमगून जातो. तेव्हा आपण ही कादंबरी नक्की वाचावी. जीवन हे सुखदुःखांनी भरलेली मालिका आहे याची जाणीव आपल्याला होते आणि आपल्या जीवनातील नैराश्य नक्कीच कमी होण्यास मदत होईल.
यात अनेक भावनिक प्रसंग रेखाटले आहेत. काही प्रसंग खूप काही शिकवून जातात. प्रत्येक भागाच्या शेवटी एक वेगळा शेवट करून काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कादंबरी वाचताना लेखकांच्या वडिलांनी लेखकाला सांगितलेल्या काही गोष्टी भावून जातात, ”नेवरती, तुला एक सांगतो तू लाख पैसे घे कोणाकडूनबी, ते मंग दोस्तीखतर घेतलेले असो नहीतर व्याजाचे, आपणबी केलेल्या वायद्याला जागून घेतलेले पैसे देऊन टाकले म्हणजी आपणबी मोकळे अन् तो बी! या जगात ज्याचा येव्हार चांगला त्याच्यासाठीला लोक अर्ध्या रातीबी धावून येत्यात. पण जर का एखाद्या टायमाला आपण गल्लत केली अन् ते समोरच्याच्या ध्यानात आलं का समजायचं त्यानं हा आपल्याशी केल्याला येव्हार शेवटचा होता.” किती मोठं गणित नानांनी सोप्या भाषेत अगदी थोडक्यात उलगडवलं होतं. शाळा नसतानासुद्धा त्यांनी लेखकाला या प्रसंगातून अचंबित केलं होतं.
आमच्या कॉमर्समध्ये अकाउंट या विषयात फायनल अकाउंट सोडवताना ॲड्जसमेंट (तडजोड) सोडवावी लागते. जो ॲड्जसमेंट बरोबर सोडवतो त्याची बॅलन्सशीट बरोबर टॅली होते. त्याचप्रमाणे तडजोड, गुंता सोडविण्याची एक गुरुकिल्ली हे अगदी साजेसं नाव पुस्तकाला दिले आहे. जीवनात तडजोड खूप महत्वाची असते. ज्याला जीवनात तडजोड जमते तो नक्कीच जीवनात यशस्वी होतो.
तडजोड गुंता सोडविण्याची एक गुरुकिल्ली - कादंबरी
लेखक : निवृत्ती जोरी प्रकाशन.. सकाळ प्रकाशन पुणे
पाने..३५२ आवृत्ती.. जानेवारी २०२४ मुखपृष्ठ.. किशोर पगारे
-प्रा. कुंडलिक शांताराम कदम