महापरिनिर्वाण...एका युगाचे-एका युगंधराचे
दरवर्षी लाखोंचा जनसमूह मुंबईत चैत्यभूमी ठिकाणी एक येतो का येत असावीत ही माणसं एवढ्या लांब आपल्या सगळं काम बाजूला सारून? कोण कर्नाटकातून आलेलं असतं तर कोण राजस्थानातून, कोण पंजाबमधून तर कोण मध्य प्रदेशमधून, कोणी आपल्या बायको मुलांसोबत असतं; तर कोण आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांसोबत, कोणी आपल्या दोस्तांसोबत तर कोणी आपल्या नातेवाईकांसोबत, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो. काय उद्देश असावा त्यांचा? अशा साऱ्याच प्रश्नांवर प्रकाश टाकणारा हा लेख.
६ डिसेंबर १९५६ हा दिवस अनेकांच्या आयुष्यात काळोख घेऊन उजाडला अन् कोटींचा जनसमूह दादरच्या चौपाटीवर एकवटला; कारण होतं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निर्वाण. मुळात ज्यांनी रंजलेल्या गांजलेल्या उपेेक्षितांना मुख्य प्रवाहात आणलं, विषमतावादी व्यवस्थेला नाकारत समतेच राज्य आणलं, कोंडलेल्या श्वासांना मुक्त केलं त्या बा भिमाचं असं निघून जाणं हे कोणालाच मान्य नव्हतं; पण निसर्गासमोर कोणाचंच काही चालत नसतं म्हणून हा आघात सहन करत आपल्या लाडक्या बाबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून इथे कोटींचा जनसमूह दादर ठिकाणी जमला होता आणि चंदनेच्या चितेवर बाबाला अभिवादन करत दरवर्षी ”या दिवशी तुम्हाला अभिवादन करण्यासाठी आम्ही येणार, तुमच्या स्मृतींना, कार्याला विचारांना उजाळा देणार, असा निःश्चय करून घरी परतलेला हा जनसमूह १९५६ ते आज २०२४ पर्यंत दरवर्षी कोटींच्या संख्येनं न चुकता कितीही संकटं आली तरी ती सहन करत या दिवशी दादरच्या चैत्यभूमी ठिकाणी येतोय, बाबांना अभिवादन करतोय हेच बाबासाहेब जनमनात-विचारात कायम जीवंत असण्याचं उदाहरण आहे.
मग प्रश्न पडतो बाबासाहेबांचा विचार यामुळे कसा जपला जातोय ? तर मग यासाठी शिवाजी पार्कच्या त्या गर्दीत जाऊन एकदा बघावं लागतं की त्या मैदानात या दिवशी काय काय होतं ! तिथे एकवटतात बहुउद्देशीय संघटना आपापलं सामाजिक कार्य पोहचवण्यासाठी, तिथे केलं जातं रक्तदान, तिथे भरवली जातात मोफत आरोग्य शिबीरे, केली जाते गरजवंतांची मोफत आरोग्य तपासणी, सरकारच्या बहुजनांसाठी वा गरजवंतासाठी असणाऱ्या योजनांची दिली जाते माहिती, छोट्या मोठ्या कलाकारांना दिलं जातं व्यासपीठ, एका छताखाली नाही पण किमान एका मैदानात तरी एकत्र येतात हे गटातटात विविध पक्षात पसरलेले आणि बाबासाहेबांचं नावं घेणारे नेते पण याही पलीकडं होतं ते खूप महत्त्वाचं कार्य ते म्हणजे इथे होणारी पुस्तकांची खरेदी विक्री ! करोडो रूपयांची उलाढाल एका दिवसात होते, बहुसंख्य लोक दादरवरून पुस्तके घेऊन जातात, मला वाटतं हीच तर बाबासाहेबांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे. जगाच्या पाठीवर हा एकमेव महामानव आहे की ज्याच्या मृत्यूनंतरही त्याचा विचार जीवंत ठेवण्यासाठी त्याच्या अनुयायांमार्फत एकत्र येऊन इतके उपक्रम आयोजित केले जातात आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच काम अविरत केलं जातं.
मुळात बाबासाहेबांच कार्यच इतकं प्रखर आणि व्यापक आहे की त्याच्या उंचीचा अंदाज येणं अशक्य आहे. पण मग पुन्हा हाच प्रश्न मनात येतो की का येत असावीत ही माणसं एवढ्या लांब आपल्या सगळं काम बाजूला सारून? कोण कर्नाटकातून आलेलं असतं तर कोण राजस्थानातून, कोण पंजाब मधून तर कोण मध्य प्रदेशमधून, कोणी आपल्या बायको मुलांसोबतं असतं तर कोण आपल्या म्हाताऱ्या आई वडीलांसोबत, कोणी आपल्या दोस्तांसोबत तर कोणी आपल्या नातेवाईकांसोबत, ऊन-वारा-पाऊस कसलीच पर्वा न करता ही लोकं येतात बाबाला अभिवादन करायला १ डिसेंबर पासूनच दादरच्या शिवाजी पार्कवर भिमअनुयायी जमू लागतात. एवढं सगळं कशासाठी ?
मग कळतं हे सगळं बाबासाहेबांसाठी असतं ! अंधारलेल्या जगण्याला बाबांमुळे प्रकाशाची वाट मिळाली, वर्षानुवर्षांची तहान बाबांमुळे चवदार ओंजळीने' भागली गेली, पिढ्यानपिढ्यांची गुलामगिरी संपली आणि समतेच्या आभाळाखाली येणारी पिढी शिकायला बाहेर पडली. गावकुसाबाहेरचे सन्मानाने गावात आले, बंगल्यात राहू लागले, गाडीत फिरू लागले हे सारं बाबासाहेबांच्या कार्यामुळे शक्य झालं.याचमुळे त्यांच्या ऋणांची जाणीव म्हणून वर्षातील एक दिवस हे सारेच चैत्यभूमीला जमतात.
मागील वर्षी याच दिवशी दादरला गेलो असताना एक प्रसंग अनुभवायला मिळाला. मी एका ठिकाणी पुस्तक विकत घेण्यासाठी थांबलो असता माझी नजर बाजूला, आपल्या नातीला मांडीवर घेऊन बसलेल्या आजीवर गेली, हातावर त्यांच्या जय भिम गोंदलेलं होत, माझी नजर त्यांच्या हालचालींवर होती, तोच एक गाडी सामान घेऊन आली आणि खड्डा असल्यामुळे त्या गाडीच्या पाठी ठेवलेला एक कागद खाली पडला. आजींची नजर त्यावर गेली त्यांनी नातीला बाजूला बसलेल्या तिच्या आजोबांकडे दिलं आणि ती आजी कागद उचलायला त्या कागदाजवळ गेली. तिने कागद उचलला, पुसला आणि छातीला लावला. हे पाहून माझी उत्सुकता शिगेला पोहचली; की काय असावं कागदात असं की त्यासाठी ही किमान ६५ वर्षे ओलांडलेली, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेली, थकलेली आजी धावपळ करत होती.मला राहवलं नाही आणि मी तिच्याजवळ गेलो, तिला जय भिम घातला, समोरून तीही जय भिम बोलली, मी विचारलं आजी काय होत ओ कागदात असं, त्या हसल्या आणि त्या कागदावरच्या एका कोपऱ्यात असणाऱ्या बाबासाहेबांच्या फोटोकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या, ”माझा बाप...!”
हे उत्तर ऐकल्यावर काय बोलू हे समजतच नव्हतं, त्या कागदावर काय लिहलंय हेही आजीला माहित नव्हतं पण तरी बाबासाहेबांचा फोटो आहे म्हणून या आजीने एवढे कष्ट उचलले. आजपर्यंत बाबासाहेब वाचत आलो होतो; पण त्या दिवशी मी बाबासाहेब जगले ! नव्याने बाबासाहेब मला उमगले ! बाबासाहेबांनी अधिकार दिले, हक्क दिले, घटना दिली; पण त्याहून पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी माणुसकी दिली.बाबासाहेबांनी किती संपत्ती कमवली माहित नाही. पण आज बाबासाहेबांनी कमवलेली ही माणसं जेव्हा पाहतो त्या वेळेला वाटतं जर जगातला सर्वश्रेष्ठ श्रीमंत कोण असेल तर तो अर्थात भारताची शान The Symbol Of Knowledge क्रांतिसूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्या आजीला मी नाव विचारलं सुकाबाई असं ती म्हणाली, अकोल्यावरून आली आहे असं सांगत ती माझ्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवत पुन्हा निघून गेली.
मला वाटतं आपल्या सर्वांना या महामानवाच्या आभाळभर व्याप्तीची जाणीव असायला हवी. आज बाबासाहेबांचा विचार वाचवायचा असेल तर समाज शिकला पाहिजे, समाजाने वाचलं पाहिजे आणि उच्चस्थानी गेल्यावरही बाबासाहेबांच्या उपकरांची जाणीव ठेवत समाजकार्य केले पाहिजे. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे युगान्युगे सूर्य बनून इथल्या पिढ्यांना प्रकाश देत राहतील. या युगंधरास महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन.
-विवेक मधुकर वारभुवन