श्रद्धांजली
६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अर्थात बाबासाहेब हे फक्त एक नाव नाही तर हा अथांग ज्ञानाचा महासागर आहे. विषमता नष्ट करण्यासाठी आपले आयुष्य वेचणारा महान तपस्वी ज्याने डोळे उघडे ठेवून समाजाला नवी दिशा व उज्वल भविष्य दिले आहे. वेशीबाहेर राहणाऱ्या अठरापगड जातींना न्याय देण्यासाठी आपल्या सर्व पदव्या पणाला लावल्या. त्या मानवाला मानवंदना देण्यासाठी देशविदेशातील लोक आज चैत्यभूमीवर दाखल झाली आहेत.
या तीन चार दिवसात करोडो रूपायांची पुस्तक पुस्तक विक्री, बौद्ध पंचाग कॅलेंडर, कितीतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या मूर्तींची विक्री या ठिकाणी होईल. गावावरून आणलेल्या शिदोरी अंगतपंगत मांडून आनंदाने खातील. मुंबई विभागातून खिचडी मिठाई, चपाती-भाकरी इ.घेऊन वाहने या अनुयायांना अन्नदान करण्यासाठी उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतील. ह्या वातावरणात गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती तहानभूक विसरून या सोहळ्याचा भाग बनलेला पहायला मिळेल. ज्ञान आणि विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेला, प्रज्ञा, शिल, करुणा प्रदान केलेला भारतीय पण, लोप पावत चाललेला बौद्ध धम्म २० व्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्विकारला आणि त्यांच्या अनुयायांनी तो वाढवण्यासाठी प्रयत्न केले. आज ही संख्या खूप वाढली आहे. शिक्षणाचा वसा घेऊन हा समाज इतर समाजाला दिशादर्शक ठरत आहे.
डॉक्टर, इंजिनिअर, वडिल, न्यायाधीश, व्यावसायिक, प्रशासन, इ. क्षेत्रातील या समाजाची प्रगती तुलनात्मक दृष्ट्या अभ्यासली तर, इतर समाजापेक्षा निश्चित प्रगती जास्तच आहे. काही अशिक्षित लोकांना वाटते की, ही प्रगती फक्त आरक्षणामूळे झाली आहे, पण हे अर्धसत्य आहे. मुळात शिकण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी त्यागाची गरज असते ती समाजात निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. म्हणतात ना,
शुद्धबीजा पोटी फळे रसाळ गोमटी
पेरलेले उगवते अशी या समाजाची धारणा झाली म्हणून शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. ते दिवसागणिक वाढत आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दैवत माणून ही प्रगती चालू असताना मात्र सामाजिक व राजकीयदृष्ट्या हा समाज पुन्हा एकदा खूप मागे जातांना दिसत आहे. स्वतःचे अस्तित्व तो विसरत चालला आहे. स्वार्थ त्याच्या नसानसात भिणत चालला आहे. त्यामुळे एकमेकांशी सोयरसुतक नसल्यागत तो वागत आहेत. राजकीय पक्षआणि नेते तर विचारु नका, ते खूप गटांमध्ये विखुरले आहेत. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची अनेक शकले उडालेली आहेत. आपली ऐपत विचारात न घेता निवडणूक लढवल्या जातात. किती तरी या समाजाचे उमेदवार स्वतःचे निवडणूक आयोगाला भरलेले डिपॉझिट वाचवू शकत नाहीत.
समाज व नेते एकत्र आले तेव्हा १९९६ ला चार खासदार निवडून आल्याचे आपल्याला माहीत असलेले उदाहरण आहे. त्यानंतर कधीच समाज एकत्र आला नाही आणि निवडणूक जिंकला नाही. या काही बाबींचा या समाजाने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. माझे संविधान, माझा महापरिनिर्वाण दिन, माझा नागपूर दिक्षा दिन, माझा भीमा कोरेगाव दिन, ई. साठी एकत्र येणारा समाजाची खरी गरज आहे. असे झाले तर समाजाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खरी श्रद्धांजली वाहिली असे होईल. पुढेनिर्माण होणारे धोके टळतील हे निश्चित आहे.
-प्रा. डॉ. श्रीकृष्ण दिगंबर तुपारे