सामाजिक व आर्थिक समतेसाठी लढणारे डॉ. आंबेडकर
बहिष्कृतांच्या चळवळीला वर्ग लढ्याचे स्वरुप येणे सहज शक्य होते, त्यातून भारतीय एकसंघतेला तडा जाऊन धर्माच्या नांवावर या देशाची शकले झाली. तशी परिस्थिती उद्भवली असती परंतू ”भारतीय” हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्थायीभाव होता. भारतीय समाजात त्यांना बदल हवा होता; पण त्यासाठी समाजप्रबोधन हाच मार्ग होय, अशी त्यांची दृढनिष्ठा होती. त्यामुळेच राष्ट्रनिष्ठा त्यांनी कधी सोडली नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार त्यांनी सर्वात महत्वाचा मानला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जिवन म्हणजे भारतीय जनतेच्या समतेच्या लढयाची अविस्मरणीय गाथा होय. दलितोत्ध्दारक, धर्मसुधारक, प्रकांडपंडीत, समाजशास्त्रज्ञ व संविधानाचे शिल्पकार असे विविध पैलू त्यांच्या जिवनाशी निगडीत आहेत. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा विचार करता, तत्कालीन सामाजिक, राजकिय प्रश्नांना ते कसे सामोरे गेलेत या प्रश्नाप्रमाणेच राष्ट्रीय एकात्मतेचा विचारही त्यांनी केला. या सर्व बाबींचा मागोवा घेणे अभ्यासाचा विषय आहे.
महाडच्या चवदार तळयातील सर्वांसाठी म्हणजेच अस्पृश्यांना पाणी मिळत नव्हते. पाणी म्हणजे जीवन, तेच त्यांच्यापासून हिरावून घेतले यासाठी सत्याग्रह करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. मार्च १९२७ रोजी सत्याग्रही तळ्याकडे निघाले. माणुसकीचा हक्क व निसर्गाची देणगी जे पाणी, ते मिळवायचेच एवढयासाठी चालेले होते. डॉ. आंबेडकर सर्वांच्या पुढे होते. अस्पृश्य म्हणून मुंबईच्या कॉलेजात ज्यांनी पाण्याचे हाल सोसले, बडोद्याच्या हॉटेलमध्ये ज्यांनी मार खाल्ला.. ते खरोखरच सत्याग्रहींचे सेनापती शोभत होते. सर्वजण तळ्याजवळ येऊन पोहोचले, प्रथमतः त्यांनी पाण्याचा घोट घेऊन इतरांना पाणी पिण्याची मोकळीक दिली. आपला समाज एक संघ असला पाहिजे, यावर त्यांचा अधिक भर होता. सर्व समाज शहाणा करुन सोडावा ही त्यांची कल्पना होती. ”जे-जे आपणांसी ठावे, ते-ते इतरांशी सांगावे, शहाणे करुनही सोडावे सकल जन” हा रामदासांचा संदेश त्यांनी आचरणात आणला आणि इतरांनासुध्दा सांगीतला, या संदेशाकडे डोळेझाक करुन चालणार नाही.
नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी ५ वर्षे सतत झगडत राहिले शेवटी १९३५ मध्ये नाशिकचे काळाराम मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यात आले. त्याचवेळी बौध्द धर्म स्विकारणार अशी घोषणा त्यांनी येवले (नाशिक) या ठिकाणी केली. त्या दरम्यान ”बहिष्कृत भारत” नावाचे नियतकालिक सुरु केले. आपल्या भारत देशात इंग्रजांचे राज्य होते. नंतर १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र्य झाला. भारतातल्या लोकांना विशिष्ट पध्दतीने राज्यकारभार करता यावा यासाठी भारताची स्वतंत्र्य राज्यघटना असणे आवश्यक झाले. त्या दृष्टीने भारतीय विद्वानांची एक घटना (तज्ञ) समिती नियुक्त करण्यात आली. त्यात बॅ.तेजपाल सप्रु, बॅ.जयकर आणि बॅ.आंबेडकर हे होते. परंतु उर्वारित दोन तज्ञांनी नकार दिल्यामुळे पं.जवाहरलाल नेहरुंनी ही जबाबदारी बॅ. आंबेडकर यांच्यावर सोपविली, ती त्यांनी स्विकृत केली. एवढा मोठा कायदेतज्ञ असलेल्या या महात्म्याचे पूर्वजीवन मात्र अत्यंत वाईट गेले असतांना बेदरकारपणे आगपाखड करता आली असती, पण तीसुध्दा त्यांनी केली नाही. अशावेळी देखील बहिष्कृतांच्या चळवळीला वर्ग लढ्याचे स्वरुप येणे सहज शक्य होते, त्यातून भारतीय एकसंघतेला तडा जाऊन धर्माच्या नांवावर या देशाची शकले झाली. तशी परिस्थिती उद्भवली असती परंतू ”भारतीय” हा त्यांचा स्थायीभाव होता. भारतीय समाजात त्यांना बदल हवा होता; पण त्यासाठी समाजप्रबोधन हाच मार्ग होय, अशी त्यांची दृढनिष्ठा होती. त्यामुळेच राष्ट्रनिष्ठा त्यांनी कधी सोडली नाही. राष्ट्रीय एकात्मतेचा विचार त्यांनी सर्वात महत्वाचा मानला.
स्वतःबरोबर इतरांचा विचार करुन त्यांनी राष्ट्रनिष्ठेपुढे इतर निष्ठा गौण मानल्या. आपण सर्व भारतीय आहोत ही भावना रुजविणे व वाढविणे महत्वाचे आहे. या निष्ठेला कोणतीही निष्ठा स्पर्धा करु शकत नाही. संकुचित जातीय, धार्मीक किंवा राजकिय व अन्य स्वार्थासाठी त्यांनी राष्ट्रनिष्ठा सोडली नाही. त्यांची ही भावना स्वातंत्र्योत्तर काळात सत्तेत सहभागी होतांना, कायदामंत्री असतांना रिपब्लीकन पक्ष काढताना, धर्मांतराची घोषणा करतांना अशा महत्वाच्या जीवनप्रसंगी सतत जागी राहिल्याचे दिसेल. त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांना राष्ट्रपुरुष संबोधले पाहिजे. खरोखरच डॉ. आंबेडकरांना वगळून हा देश मोठा झाला असता काय, याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. डॉ. आंबेडकरांची कायदामंत्री म्हणून निवड करण्यात आली. त्यांनी अहोरात्र कष्ट करुन मोठया कष्टाने आपल्या अंगी असलेली सगळी बुध्दिमत्ता प्राणपणाला लावून २ वर्षे ११ महिने १७ दिवसात घटना लिहून पुर्ण केली. त्यामुळे त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर जेवढी जबाबदारी होती तेवढी जबाबदारी जगातील कोणत्याही पुरुषावर नव्हती. ते जर अजुन जगले असते तर कदाचित त्यांच्या मनासारखे निश्चित घडले असते, हे कोणीही नाकारु शकत नाही.
भीमाच्या शिक्षणासाठी रामजींनी अतोनात कष्ट घेण्याचे ठरविले होते. आपल्या मुलाला प्रखर बुध्दीमत्तेची दैवी देणगी लाभली असल्याचे ओळखून भीमाच्या हिंदु समाजातील एका अडाणी व क्रुर रुढीमुळे त्याकाळी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या जातीत जन्मल्यामुळे काही जणांकडुन क्षणोक्षणी अपमान होऊ लागला. पण त्यातही त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या केळुसकर गुरुजींच्या प्रोत्साहनामुळे व मार्गदर्शनामुळे भिम उत्तम तऱ्हेने मॅट्रीकची परीक्षा १९०७ साली पास झाला, चाळीतील लोकांनी मोठा थाटात सत्कार केला. रामजी पुढे मुलांच्या शिक्षणासाठी मुंबईस आले. भीमाने मुंबई सारख्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश केला. जातीने अस्पृश्य असल्याने भिमाला इच्छा असूनही संस्कृतचा अभ्यास करता आला नाही. पार्शियन भाषेत मात्र त्याचा पहिला नंबर असे. आनंदाची अभ्यासातील प्रगती बेताचीच असल्याने त्यास नोकरीला लावले, नंतर आनंद व भीमाचे लग्न केले. लग्नाच्या वेळी भीमा १४ वर्षाचा रमा ९ वर्षाची होती.
बडोदे सरकारची शिष्यवृती मिळवून एल्फिन्स्टन कॉलेजात प्रवेश घेतला. कॉलेजात शिक्षण देखील भीमा महार असल्यामुळे त्याला योग्य मार्गदर्शन व मदत मिळाली नाही. तरीही तशाच परिस्थितीत भीमराव एल्फिन्स्टन कॉलेजमधुन १९१२ साली बी.ए. झाले. बडोद्याच्या महाराजांच्या ऋणातून अल्पसे मुक्त होण्यासाठी त्यांनी त्यांचेकडे नोकरीचा अर्ज केला. त्यांना सयाजीराव गायकवाडांच्या कडे नोकरी मिळाली. परंतु वडिल आजारी असल्याची तार मिळताच डॉ. आंबेडकर मुंबईस निघाले. सुरत स्टेशनवर वडिलांसाठी बर्फी घ्यावी म्हणून ते उतरले असताना गाडी निघून गेली. त्यामुळे घरी पोहोचण्यास त्यांना उशीर झाला. वडिलांचे डोळे मुलाला पाहण्यासाठी आतूर झाले होते. मुलगा आल्याचे कळताच त्यांनी डोळे उघडले. आपल्या लाडक्या मुलाच्या अंगावरुन प्रेमाने हात फिरविला आणि त्या महान पुरुषाने हया जगाचा शेवटचा निरोप घेतला. बडोद्याच्या प्रागतिक राजे सयाजीराव साहेबांनी शिष्यवृत्ती देऊन त्यांना अमेरिकेत पाठविले. आपण केवळ शिक्षणासाठी अमेरिकेत आलो आहोत याची जाणीव भीमरावांना होती. एखाद्या तपस्व्याप्रमाणे त्यांनी उपासना केली. ते अभ्यासात दिवसाचे अठरा तास घालवू लागले. १९१५ साली ते एम.ए. झाले. त्यानंतर त्यांनी निरनिराळया विषयांवर दोन-तीन प्रबंध लिहिले. हया कष्टांचे फळ म्हणून १९२४ साली कोलंबिया विद्यापीठाने त्यांना ”डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी” ही पदवी दिली. सरकारी कचेरीत त्यांना मोठया हुद्याच्या जागेऐवजी केवळ २२५ रुपयांवर खर्डेघाशी करावी लागू लागली. हाताखालचे लोकदेखील त्यांना पाणी देत नसत व त्यांच्या टेबलावर दुरुन फाईल टाकत. मानी भीमरावांना मिळत असलेली ही वागणूक पसंत नव्हती. त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला म्हणून ते मुंबईला परतले.
एवढे झाले तरीही त्यांनी धीर खचू दिला नाही, थोडीशी खटपट करुन त्यांनी सिडेनहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापकाची जागा मिळवली, पैसा जमवला व १९२० साली ते अपुर्ण अभ्यास करण्यासाठी पुन्हा एकदा लंडनला रवाना झाले. तिथे ते सकाळी आठ ते संध्याकाळी पाचपर्यंत निरनिराळया ग्रंथालयात पुस्तके वाचीत आणि रात्री दहानंतर दिवस उजाडेपर्यंत त्यांचा अभ्यास चालू असे, त्याचे फळ १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना दिलेली ”डॉक्टर ऑफ सायन्स” ही पदवी होय. बहिष्कृत वर्गावर वर्षानुवर्षे जो अन्याय होत आलेला आहे तो वेशीवर टांगून त्याचे निराकरण झाले पाहिजे ही त्यांची मागणी होती. बहिष्कृतांचा हा लढा लढतांना त्यांनी नेहमी विधायक आणि व्यापक भूमिका घेतली आणि अस्पृश्य समाजाला स्वतःहुन काही करावेसे वाटावे या दृष्टीने त्यांच्यात चैतन्य निर्माण करायचे अशा दृष्टीने त्यांनी आपल्या कार्याची पाऊले पुढे टाकण्यास सुरुवात केली. त्यापैकी पहिली सुरुवात म्हणजे १९४० साली त्यांनी सुरु केलेले पाक्षिक ”मुकनायक” हे होय.
”पिकते तेथे विकत नाही” हा सिध्दांत माहित आहे, तेव्हा आपल्याजवळ असलेल्या माणसाचे गुण आपण ओळखु शकत नाही. दूसऱ्या माणसाला त्याची पारख होते हे सर्वविदित आहे. म्हणूनच १ जून १९५२ रोजी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाने ”डॉक्टर ऑफ लॉ” ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला. डॉ. आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या लोकशाही तत्त्वांचा पुरस्कार करणारे अनेक ग्रंथ लिहिले, भाषणे दिली आणि आपली दलिताबद्दलची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या प्रेरणेने शाळा, प्र-शाळा तर निघाल्याच पण उच्च शिक्षण देणारी महाविद्यालयेही निघाली. शिक्षण, समाजकल्याण, अर्थकारण, राजकारण या सर्वामध्ये त्यांनी आपले स्वतंत्र, तर्कशुध्द विचार मांडून दाखविले. दलित समाजात जागृती होत गेली तेव्हा त्यांना ज्ञानाचे महत्व पटले. अनेक दलित आज समाजात विचारवंत म्हणून मान्यता पावले आहेत, त्यामागे डॉ. बाबासाहेबांची प्रेरणा आहे. समाजाने त्यांच्या विषयीचा आदर अनेक प्रकारे व्यक्त केला आहे. आज त्यांचे नाव दिलेली कितीतरी विद्यालये, महाविद्यालय, विद्यापीठे कार्यरत आहेत.
हिंदु धर्मातून परधर्मात जाण्याचा विचार करतानाही भारतातच उगम पावलेल्या बौध्द धर्म याची नागपूर शहरात आपल्या लाखो अनुयायासह १४ ऑक्टोंबर, १९५६ रोजी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. आपण जो धम्म घेतला तो उत्तम रीतीने पाळण्याचा निर्धार केला पाहिजे; नाहीतर महार लोकांनी तो निंदाजनक स्थितीत आणला असे होऊ नये म्हणून आपण दृढनिश्चय केला पाहिजे. या धर्माचे लोण जागतीक पातळीवर उंचावत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निंधनाने सामाजिक व आर्थिक समतेसाठी लढणाऱ्या एका झुंजार योध्दयाला आज भारत देश मुकला आहे, अशा या थोर महापुरुषाच्या ६८ व्या महापरिनिर्वाणदिनी पुण्यस्मरण !
-प्रविण बागडे