मुशाफिरी
‘शिस्तीने राष्ट्र मोठे बनते' हे काही केवळ भिंतीवर लिहायचे घोषवाक्य नव्हे किंवा ट्रक अथवा रिक्षाच्या मागच्या बाजूला लिहीण्याची ती घोषणाही नाही. तो प्रगतीचा मूलमंत्र आहे. राष्ट्र हे व्यक्ती, समुह यांनी बनते. अणुबॉम्बचे हल्ले पचवून जपानसारखा देश राखेतून समर्थपणे उभा राहिला तो केवळ कठोर शिस्त व प्रखर राष्ट्रप्रेम यामुळेच! शिस्त, देशप्रेम, नागरिक शास्त्र, सामुहिक-कौटुंबिक बांधिलकी-सौहार्द, आपले हक्क, आपली कर्तव्ये या साऱ्या गोष्टींची जाणीव लहानपणापासून घरातूनच दिली जाते, दिली जायला हवी. तसे न झाल्यास याच भारताचे खाऊन याच देशाच्या सैन्यावर, पोलीस दलांवर दगडफेक करणारे कसे जागोजागी वाढीला लागतात हे आपण पाहात आहोतच!
प्रिय वाचकहो, १९९९ सालच्या नोव्हेंबर अखेरीस म्हणजे मागच्या शतकात सुरु झालेल्या ‘मुशाफिरी' या स्तंभलेखनाला यंदा २०२४ सालच्या नोव्हेंबर अखेरीस पंचवीस वर्षे पूर्ण झाली असून २६ व्या वर्षातील हा पहिला लेख आपल्या हाती सोपवताना मला अत्यानंद होत आहे. दोन तपाहुन अधिक काळ या लेखनात सातत्य ठेवून विविध विषय, विविध व्यक्तींचे काम, प्रवासवर्णने, स्थान माहात्म्य, पुस्तकांचे परिक्षण, चिंतनपर लिखाण वाचकांसमोर आणता आले. कोणताही साचा, फॉर्म वगैरे डोळ्यांसमोर ठेवण्याऐवजी लवचिकता बाळगत विविधांगी स्वरुपाचे लेखन करीत गेल्यामुळे विषयांची मर्यादा, उणीव, कमतरता कधी भासली नाही व त्यांना वाचकपसंती, वाचकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत गेल्यामुळे लिहीण्याची उमेदही वाढत गेली हे कबूल करायलाच हवे. याचे सारे श्रेय या लिखाणावर प्रेम करणाऱ्या वाचकांनाच जाते हे नक्की ! पेजर, फ्लॉपी, सीडी, फॅक्स वगैरेंची चलती असण्याच्या काळात गेल्या शतकात या लेखमालेची सुरुवात झाली. त्यावेळी हाताने लिहीलेली पाने ‘नवे शहर'च्या कार्यालयात नेऊन द्यावी लागत. मग ती टाईप झाल्यावर शुध्दलेखन तपासण्यासाठी जावे लागे. त्या काळी लंडन पिल्सनर कंपनीत मी कामास असताना जेव्हा मोकळा वेळ मिळे तेंव्हा मी हे सदर लिहुन काढीत असे व ववचित प्रसंगी कंपनीच्या फॅवसवरुनही पाठवीत असे याची आजमितीस आठवण होते. मार्क झुकेरबर्ग याने माध्यमजगतात क्रांती घडवली. सारी दुनिया ‘करलो मुठ्ठीमे' होऊन गेल्याच्या युगात जन्मलेल्या नव्या पिढीला हे सारे वेगळेच वाटू शकेल. त्या काळात जेंव्हा मला राजस्थान, गुजरात, हैदराबाद या व अशा परराज्यांत अधिक दिवस जाण्याचा योग येई, तेंव्हा तेथूनही लेख लिहुन फॅक्सने पाठवले असल्याचे स्मरण आज होते. आता काय.. व्हाट्स अप, इमेल, टेलिग्राम असा माहिती तंत्रज्ञानाचा विस्फोटच झाला असल्याने कुठुनही हवी ती माहिती मोबाईलवर टाईप करुन फोटो, रील्ससह कुठेही पाठवता येत असल्याने प्रसारमाध्यमांत काम करण्याचे एका अर्थाने सुलभीकरण झाले आहे.
या सगळ्यातच नियमितपणा, सराव, शिस्त, कोणत्याही राजकीय, धार्मिक, जातीय गटाची वकीली करण्याऐवजी आपले म्हणणे आपल्या पध्दतीने तटस्थपणे मांडण्याची भूमिका ठेवल्यामुळे सव्वीस वर्षे मुशाफिरी ही लेखमाला सुरु ठेवता आल्याची नम्र जाणीव मला आजही आहे. दैनिक ‘नवशक्ती'मध्ये माजी आमदार स्व. प्रमोद नवलकर यांनी ‘भटवयाची भ्रमंती' हे साप्ताहिक सदर तब्बल छत्तीस वर्षे लिहिले. त्यांना मृत्यु आला त्या दिवशीही त्यांनी पुढील सप्ताहाचा लेख लिहुनच आपले डोळे मिटले, हे विशेष! ही झाली लेखनाप्रतीची प्रामाणिक बांधिलकी! दै. ‘नवे शहर'मध्ये मी फिचर्स, मुलाखती, वाचकपत्रे, वाचक संवाद, सांस्कृतिक-शैक्षणिक जगतातील कार्यक्रम व त्यांचे वार्तांकन, क्वचितप्रसंगी संपादकीय लेख अशा प्रकारची जबाबदारी सांभाळीत असल्याने अनेक प्रकारच्या व्यवती-प्रवृत्तींशी नित्यनेमाने संबंध येतो. त्यातूनच मला ‘मुशाफिरी'साठी विषय मिळत असल्याने त्यात ‘ताजगीका एहसास' जपता येतो. वाचक, लेखक, सांस्कृतिक जगत, शैैक्षणिक व क्रीडा विश्व, समाजातील विविध स्तरातील लोकांशी चर्चा, वेगवेगळ्या व्यासपीठांवरुन पुस्तक प्रकाशन, विविध स्पर्धांचे परिक्षण, वर्धापनदिन, संस्थांचे पारितोषिक वितरण, तसेच नामांकितांचे सत्कार वगैरे कार्यक्रमांत पाहुणा, ववता म्हणून सामील होण्याची संधी मिळत असल्याने तेथेही आपोआप लिखाणासाठी विषय मिळतात. लोकांशी बोलताना समाजातील ‘अंडर करंट' अर्थात अंतःप्रवाह समजतात, त्याचा लेखनासाठी लाभच होतो. या साऱ्यात मी मानसशास्त्राचा विद्यार्थी व मराठीचा प्रेमी असल्याचा खूप फायदा झाला हे कबूल करायलाच हवे. लोकांना बोलते करण्याचे व त्यांच्याकडून वस्तुनिष्ठ माहिती मिळवण्याचे तंत्रही अशाच शिस्त व सरावाने जमून येत गेले.
‘मुशाफिरी'च्या गेल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत मित्रपरिवारात खूपच चांगली व धनात्मक भर पडत गेली. झुवयाने व्हाटस अपचा शोध लावेपर्यंत स्टॉलवरुन ‘नवे शहर' विकत घेऊन जो किंवा जी वाचील त्यांच्यापर्यंतच हे सदर पोहचत असे. पण समाजमाध्यमे अवतरली आणि त्यांनी छापील प्रसारमाध्यमांतील माहितीही आपल्यात सामावून घेत ती विद्युतवेगाने सर्वदूर पोहचवण्याचा चंग बांधल्याने जणू डबल इंजिनाचे काम झाले. अर्थात यामुळे प्रत्यक्ष पेपर विकत घेणारे तसेच जाहिराती देणारे घटले हा अप्रत्यक्ष तोटाही नजरेआड करुन चालणार नाही. करोना काळात खऱ्या अर्थाने छापील वर्तमानपत्र अर्थात पेपरची हार्ड कॉपी मिळणे दुरापास्त होत गेले व डिजिटल मिडिया, सॉफ्ट कॉपी, पीडीएफ यांनी माध्यमजगतात आपला कब्जा पक्का करायला घेतला. करोना काळात अशा सॉफ्ट कॉपीज वाचायची सवय लागलेल्यांना पुन्हा हार्ड कॉपीकडे खेचून आणण्याचे मोठे आव्हान छापील प्रसारमाध्यमांपुढे आहे. आमच्या पिढीतील वाचकांना कुणी कितीही वर्तमानपत्रांच्या सॉपट कॉपीज फॉरवर्ड, शेअर केल्या तरी छापील पेपर वाचल्याखेरीज आमचे समाधान होतच नाही. कारण त्या वाचनाची शिस्त व सवय!
गेल्या पंचवीस वर्षात वाचनासोबतच ‘मुशाफिरी' लेखनाची अशी सवय अंगी मुरवल्यामुळेच त्यात सातत्य ठेवता आले. हे लिखाण अंध विद्यार्थ्यांनाही वाचता यावे म्हणून ‘मुशाफिरी' मधील निवडक लिखाणाची आजवर २६ पुस्तकेही ब्रेल लिपीत प्रकाशित झाली आहेत. २००५ साली सुरु केलेल्या ‘वार्तादीप' साप्ताहिकाचा मालक-संपादक आणि ते वर्तमानपत्र २०१९ साली बंद केल्यावर ‘नवे शहर'चा उपसंपादक असताना मला अनेक वाचक-लेखकांचे नेहमी फोन येत असत की ‘आम्हालाही अशी नियमित लेखनाची संधी द्या' म्हणून! अनेकांनी त्या दिलेल्या संधीला जागून लेखनात नियमितपणा ठेवला, त्या लिखाणाची पुस्तके बनवण्यातही यामुळे त्यांना मदतच झाली ती त्यांच्या लेखनाच्या शिस्तीमुळे. मात्र काहीजणांना त्यात सातत्य बाळगता आले नाही. ‘मुशाफिरी' लिहिताना जसे अनेक वाचक जोडले गेले, तसे काही लोकांना त्यातील मुद्दे टोकदार वाटल्याने काहीजण दुखावलेही गेले असणार. अर्थात असे दुखावले जाणे केवळ मुद्दयापुरते, त्या त्या विषयापुरते, त्या त्या वेळेपुरते असावे, असले पाहिजे याचे भान गमावल्याने काहीजण उगाचच कायमचे दुरावले. दारु पिऊन परिवार व मित्रपरिवाराला लाज आणणारे, व्यसनी, जुगारी, समाजविरोधी कृत्यांत सहभागी असणारे, दुसऱ्याकडे सतत उधार-उसनवार करुन पैसे बुडवणारे, धूम्रपान करणारे, तंबाखूृ-गुटखा-मावा वगैरे पदार्थांचे सेवन करुन जिकडे तिकडे थुंकून आपल्याबरोबर आपले कुटुंबिय व सोबत वावरणाऱ्यांच्या जीवाला धोका उत्पन्न करणारे कितीही विद्वान असले तरी मला असे लोक मनापासून कधीही आवडत नाहीत. ‘मुशाफिरी'च्या लिखाणात त्यांच्यावर टिकेची झोड उठवली जाणारच. तीच बाब या देशाचे खाऊन या देशाच्या पवित्र भूमीत राहुन शत्रुराष्ट्रांचे गोडवे गाणाऱ्या काही मुसलमानांबाबतच्या लिखाणाची. हे काही लोक देशद्रोही, बेईमान, धोकेबाज आहेत याबाबत दुमत नसावे. त्यांनी या देशावर प्रेम करणाऱ्या भारतीय मुसलमानांना लाज आणली आहे. पण म्हणून सरसकट सगळ्याच मुसलमानांशी वैर, वितुष्ट, गैरसमज करुन घेणे चालणार नाही हेही ध्यानात घेतले पाहिजे. कित्येक वर्षांपासूनचे माझे कित्येक मुसलमान मित्र आहेत. त्यातील अनेकांच्या जाहीर कार्यक्रमात मी व्यासपीठावर बसलो आहे, त्यांच्या पुस्तकांच्या प्रकाशनसमयी भाषण केले आहे. त्यांच्या समाजोपयोगी कार्यक्रमांच्या बातम्यांना नेहमीच व्यापक प्रसिध्दी दिली आहे. माझ्या ब्रेल लिपीतील पुस्तकांचे प्रकाशन नामवंत मुस्लिम व्यक्तीमत्वांच्या हस्ते केले आहे, त्यांच्या मुलाखती घेऊन त्या मी प्रसिध्दही केल्या आहेत, करीत राहणार आहे. हे व या प्रकारचे सारे काही सकारात्मक करण्याची संधी पत्रकारितेने व ‘मुशाफिरी'ने मला दिली, याहीपुढे अशी संधी मिळत राहणार आहे. गेली पंचवीस वर्षे तुम्हा साऱ्या सुजाण, सुसंस्कृत, देशप्रेमी, सज्जन, शिस्तप्रिय वाचकांचे प्रेम ‘मुशाफिरी'स्तंभलेखनाला लाभले तसेच याहीपुढील वर्षांमध्येही लाभत राहील याची यामुळेच खात्री आहे.
६ डिसेंबर रोजी असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन!
-राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर, नवी मुंबई