देवदिवाळी
मार्गशीर्षातील जत्रा आणि थंडी यांचे नाते हे असे अतूट आहे की विचारता सोय नाही. चाकरमानी माणूस कार्तिक महिन्यात येणाऱ्या नित्याच्या दिवाळीला दिवाळी म्हणायला फारसा उत्सुक नसतो. ”आमची दिवाळी म्हंजे देवदिवाळी. ही पोराटोरांची दिवाळी”. त्या चाकरमान्याला ह्या दिवाळीचे एवढे कौतुक नसते. त्याला गावाकडची देवदिवाळी आठवत असते. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या म्हणजे देवदिवाळीचा दिवस.
गावखेड्यातील अनेक सण हे तिथल्या कृषीसंस्कृतीशी जोडलेले आढळतात. हे सण साजरे करण्याची पद्धत त्या त्या वेळी उपलब्ध असणाऱ्या शेताभातील पिकावर अवलंबून असते. कार्तिक संपला आणि मार्गशिर्षातील थंडी सुरु झाली. चक्क उजाडलं तरी अजूनही कोणी अंथरुणाच्या बाहेर पडत नाहीत. थंडीचा कहर झालेला आहे. ”एवडी थंडी बाप जन्मात बगलाव नाय.” दिवसाची सुरुवात ह्या पेटंट वाक्याने सुरु होते. घरातले सगळे चुलीकडे धगासाठी हात पसरवून अंगावर घोंगडी घेऊन हु हु हु करत थंडीपासून बचाव करायचा प्रयत्न करतात. मालकिणीने एखादा कडक कपाचा चहा दिला की मात्र थंडीचा फटका हळूहळू कमी होतो.
कार्तिकच्या आसपास कोकणात भात कापणी सुरु होते. एकदा भात कापणी संपली की शेतातले कुणगे ओकेबोके झालेले असतात. आता महिनाभर तिकडे कोणाचे लक्ष जाणार नाही. भातकापणीची सगळी हत्यारं शेतकऱ्यांनी आत खोरणात ठेऊन दिले आहेत, आता वर्षभर त्या हत्यारांचे काही कामं नाही. एकीकडे शेतकऱ्यांची ही स्थिती तर लोककलाकारांची वेगळी स्थिती. पुढील चार महिने त्यांना फुरसत मिळणार नाही. शेतीची हत्यारे माळ्यावर गेली पण त्याचवेळी लोककलाकारांनी आपल्या पेटाऱ्यात ठेवलेले गणपती, शंकासुराचे मुखवटे वर काढले जातील. आत्ता गावागावातले टिपर सुरु होतील. कोकणात असल्या जत्रांना ”टिपराची जत्रा” म्हणतात.
मार्गशीर्षातील जत्रा आणि थंडी यांचे नाते हे असे अतूट आहे की विचारता सोय नाही. चाकरमानी माणूस कार्तिक महिन्यात येणाऱ्या नित्याच्या दिवाळीला दिवाळी म्हणायला फारसा उत्सुक नसतो. ”आमची दिवाळी म्हंजे देवदिवाळी. ही पोराटोरांची दिवाळी”. त्या चाकरमान्याला ह्या दिवाळीचे एवढे कौतुक नसते. त्याला गावाकडची देवदिवाळी आठवत असते. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या म्हणजे देवदिवाळीचा दिवस. या दिवशी गावातले वातावरण कमालीचे उल्हासित झालेले असते. पहाटेच्या वेळी पडलेल्या दवातून चालताना पायाला खडे टोपले तरी काही वाटत नाही. दव पिऊन मत्त झालेली झाडे हळूहळू दवबिंदू पानावरून खाली ओघळून देतात. गावातल्या जत्रेबरोबर सकाळी साजरा होणार्या ”गवळद्या”चे ह्या ग्रामसंस्कृतीत विशेष महत्व आहे. ”गवळदा” हा मालवणी मुलखातील शब्द, या शब्दाची उत्पत्तीचा विचार करताना गव + ळ + दा म्हणजे गो वासरांशी निगडीत असून त्याचे पालनपोषण करून त्यांचा सांभाळ कर अशी तिकडच्या एका इष्टदेवतेला कल्पून त्याची आराधना करायची. म्हणून ”गवळदा” हा शक्यतो रानात केला जातो. रानातील एक जागा साफ करून तिकडे वनभोजन केले जाते. ह्या दिवशी वाडीतील पुरुष मंडळी जेवण करतात. गवळदा हा उत्सव शेतीशी निगडीत आहे. पोटच्या पोरांच्या बरोबरच शेतकरी माणसाचे त्याचे गोठ्यातल्या गुरांवर प्रेम असे. मोठी गुरं-वासरं जरी दूर वाड्यात किंवा गोठ्यात बांधली तरी लहान दुभती वासर घराच्या पडवीत बांधलेली असायची. एवढा शेतकऱ्याचा गुरांवर जीव होता! ही गुरे रानांत चरताना त्यांचे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून, हिंस्त्र पशुंपासून त्यांचे रक्षण करावे म्हणून ”गवळदा” करण्याची पद्धत कोकणातील गावागावातून पाळली जाते. जेवण झाल्यावर नैवैद्य करून आरती करून सगळे वनभोजन करून जेवतात. जेवणानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या लहान मुलांना वाघ-सिंह बनवले जाते, म्हणजे त्याचे तोंड पट्ट्यांनी रंगवून त्याला वाघाचे स्वरूप दिले जाते आणि पळा.....पळा....असे म्हणून त्यांना रानाच्या दिशेने पळवले जाते. हा प्रतीकात्मक खेळ जरी असला तरी त्यात ह्या हिंस्त्र पशूंना आपल्या गुरांसाठी आपण प्रसंगी कोणत्याही परिस्थितीत उभे राहू शकतो हाच अर्थबोध होतो. जिथे जिथे म्हणून ”गवळदा” करण्याची जागा आहे तिकडे एक तुळशीवृंदावन नक्की असते. जेवणाचा कार्यक्रम झालं की वाडकर तिथल्या तुळशीचे लग्न लावतात.
मार्गशीर्ष महिन्यात जवळच्या रानफुलांना एक वेगळाच गंध येतो. आजूबाजूला चाफा किंवा सोनचाफा असेल तर मग काय विचारता? गंध गंध अवधी सृष्टी मोहून टाकतो. अशाचवेळी संध्यकाळ होते आणि पोटात हिव भरेल अशी थंडी वाजू लागते. संध्याकाळची उन्हे जशी कलतात तशी तशी गुरे घरी येतात. गुरांना एकदा गोठ्यात बांधलं की त्यांच्या शिंगांना रंग काढला जायचा, त्यांची पूजा केली जाते. त्यांना तवसोळ्याचा नैवेद्य केला जातो. गायीच्या शेणाने गवळणी थापल्या जातात. हा सोहळा मानव, निसर्ग यांच्या एकंदरीत जिव्हाळ्याने जपला जातो, कवी वसंत सावंत यांच्या अनेक कवितेत निसर्गाशी परमेश्वराने किती आपलेपणा साधला आहे याची अनेक उदाहरणे मिळतात. एका बैलाशी शेतकऱ्यांची कशी नाळ जुळली आहे हे बघा ना
हुस्कारात प्रणव ओमकार
वशिंड घोळवत
बाहुबळ अजमावणारी त्याची
खानदानी चाल
आदब
बैल पिढ्यान्पिढ्याचा पोशिंदा
शक्तीचा सम्राट .......
मानवी उर्जेचे एक अप्रतिम वर्णन या कवितेत कवी सावंत यांनी केले आहे.
गाव आता पुर्वीसारखा राहिला नसल्याची कल्पना येईल.तेवढ्यात कोणी म्हातारा त्या ठिकाणी येईल आणि पोरांना विचारेल ”पावणे ! कोणाकडे इलेत?”
त्यावर तो चाकरमानी ”अवो दाजींनु ! मी पावणो नाय; आबा गावकारांचो पकलो.”
”अरे पकल्या कधी इलंस?”
त्यावर पकल्या आई बाबांबद्दल सांगेल आणि म्हातारा प्रेमाने दुपारी त्याला जेवायला घरी बोलवेल. तळकोकणातल्या ग्रामसंस्कृतीचा हा एक अविभाज्य भाग कोकणी माणसाने आजही जपला आहे. मुंबईहून आलेल्या चाकरमान्याच्या घरात कोण नसेल तर शेजारी म्हणून त्याला जेवण वाढणं हे आपलं कर्तव्य आहे हे कोकणी माणसाला वाटतं. त्याने चाकरमान्याला साधा..पण रुचकर स्वयंपाक केळीच्या पानावर वाढला असेल. जेवताना तो म्हातारा त्या पकल्याला सांगेल ”झीला! जेवान सादाच हा. आता काय बाबा पावणो इलो म्हणून काय रेडो धुपुचो हा !!”(मोठा कोणी तालेवार पाहुणा ऐनवेळी जेवायला आला आणि घरात दुध नसेल तर रेड्याचं दुध तर काढता येणार नाही त्याला बिनदुधाचाच चहा प्यायला मिळणार.) अशा गोष्टी प्रत्येक गावात होत असतात. कारण आज कोकणातल्या निम्म्याहून जास्त घरांना कुलूपं लागली आहेत.
देवदिवाळीच्या दिवशी सकाळी घरातली देवपूजा झाली की, गावातली मंडळी सहजच आमच्या घरी यायची. या ठिकाणाहूनच गवळद्याची तयारी व्हायची. गवळदेव म्हणजे गुरं राखणाऱ्या गुराख्यांचा देव. पर्यायाने शेतकऱ्यांचा देव. हा गवळदेवाचं स्थान जिथे वाडीतली गुरं चरायला जातात त्या ठिकाणीच आहे .संपूर्ण परीसर झाडावेलींनी वेढला आहे. पक्षांचा चिवचिवाट आहे आणि निसर्ग सहस्त्र हस्ते आपल्या शक्तीची उधळण करतो असा भास ह्या ठिकाणी होतो. निसर्गात देवत्वाचा साक्षात्कार होणे ही कल्पना कवीपेक्षा शेतकऱ्यांना आधी आली असावी. निसर्गात देवत्व शोधणं ह्या अद्भुत कल्पनेला इंग्रजी साहित्यात ”ज्दाूग्म् ज्ीहूप्ग्ेस्” म्हणतात. वर्डस्वर्थच्या कवितांमधून आपणास याची जाणीव होईलच. ह्या ठिकाणी हल्ली आजुबाजुने छान बांधकाम करुन तिथे देवस्थानाचं वास्तव्य केलं आहे. सकाळी तिथे गेल्यावर तरूण पोरं जागा साफ करतील. माझे बाबा तिथले देव नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालुन ”शुचिर्भुत” करतील. तिथे पुरुषमंडळी स्वयंपाक करत असतात. आकाराम साळकर भातासाठी मोठा टोप आणुन स्वतः भातासाठी माणसांचा अंदाज घेउन तांदूळ टाकेल. मारूती मामा डाळीच्या टोपाचा ताबा घेईल आणि डाळ खाली लागू नये म्हणून मोठ्या डावूलाने डाळ ढवळेल आणि सदा कुबडे एखादी गावगजाल सांगत बटाटे आणि भोपळा चिरेल. जेवणाची तयारी होत असताना बाकीचे सर्व या गप्पा ऐकण्यात तल्लीन झालीत. अशाप्रकारच वातावरण पुर्वी नेहमीच असायचं; पण हल्ली प्रत्येकाच्या घरात टिव्ही असल्याने सर्वजण घरात बसून संध्याकाळ टिव्ही बघण्यात घालवतात. सर्वांची जेवण झाली की मुलांची तोंड वाघाच्या मुखवट्यांनी रंगवून खेळ खेळून दुपारी घरी जाऊन झोपून देतात कारण त्यादिवशी प्रत्येकाला रात्री देवळात जौयची ओढ लागलेली असते. त्यादिवशी रात्री नाटकं आणि जत्रा होणार असते. प्रत्येकाला जागरण होणार असते.
..हळूहळू संध्याकाळचा प्रहर सुरू होतो, थंडी पडू लागते. लोक कानटोपी घालुन ”हल्ली एवडी थंडी नाय. नायतर आमी ल्हान असताना नुस्ते दातार दात आपटायचे, पण आंगार कपडो काय नसायचो. आता आंगभर कपडे आसंत पण थंडी काय आवरत नाय” अशा गजाली रंगत असतानाच कोणी तर येत आणि मोठ्या घरात धार्मिक कार्यासाठी जायचं असल्याची आठवण करुन देत. ”मोठं घर” म्हणजे गावातल्या शुभ कार्याची ज्या घरातून सुरुवात होते ते घर. या घरातल्या एका पुरुषाने धार्मिक कार्य करायचे असा संकेत आहे. त्याप्रमाणे ही मंडळी ही सेवा करत असतात. माझ्या गावाचं कुलदैवत असणार्या नागेश्वर मंदिरात शुभ कार्याची सुरुवात होते आणि मग मानकरी मंडळी देवांसहीत पावणादेवीच्या मंदिरात येतात, याठिकाणी गावची जत्रा भरते. बाहेरच्या थंडीवर मारक म्हणुन गुळाचा चहा हल्ली फक्त जत्रेत मिळतो. देव देवळात आले की गावातले गावकरी, माहेरवाशीनी पावणादेवीची ओटी भरतात. हा कार्यक्रम संपला की दशावतारी नाटक उभं रहात. कोकणातल्या लोक कलाकारांनी जपलेली ही परंपरा आज वर्षानुवर्षे चालू आहे. हे मध्यरात्री उभं राहिलेलं नाटक पहाटे संपतं आणि धार्मिक कार्याचा उत्तरार्ध सुरू होतो. त्यावेळी पहाटेच्या निरव शांततेत मानकऱ्याच्या डोक्यावर पिठ ठेवून त्यावर ताट ठेवले जाते. ताटात प्रकाशमान झालेल्या पणत्या असतात आणि हा साजशृंगार घेउन तो मानकरी मंदिराला पाच फेऱ्या मारतो तेव्हाचं दृश्य खरोखरच बघण्यासारखं असतं. हळूहळू कार्यक्रम संपतो. लोक घरी परतात, आपापल्या कामाला लागतात. पुढचे आठ दिवस जत्रेशिवाय लोक काहीच बोलत नाही. हा सोहळा मी पाहिला आहे, अनुभवला आहे. हा सोहळा वर्षानुवर्षे असा चालू आहे, या सोहळ्यावर कधी दुखांःचं सावट पडत नाही की दुष्काळाचं. कारण या निसर्गाने, या मातीने हा कणखरपणा इथल्या माणसाला दिला आहे .
-वैभव साटम