दुबार मतदार घटण्याऐवजी वाढविले; राजन विचारे यांचा आरोप
ठाणे : २१-ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत ६ विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी ‘निवडणूक आयोग'ने घटविण्याऐवजी वाढवली असल्याने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी २३ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. तसेच यावेळी राजन विचारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघडणी करतानाच ‘निवडणूक आयोग'च्या प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरेही ओढले.
याप्रसंगी निवेदन देताना शिवसेना (उबाठा) संपर्कप्रमुख नरेश मणेरा, जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, केदार दिघे, सुरेश मोहिते, भास्कर बैरीशेट्टी, संजय दळवी, प्रतिक राणे, अमोल हिंगे, विश्वास निकम आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
माजी खासदार राजन विचारे यांनी शिष्टमंडळासोबत ९ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकारी शिनगारे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे १ लाख ६६ हजार ९१० दुबार नावांची प्रिंट कॉपी आणि सॉपट कॉपी दिली होती. त्यावेळी जिल्हाधिकारी शिनगारे यांनी अधिकाऱ्यांना सदर सर्व नावे तातडीने पडताळणी करुन वगळून टाकावी, असे आदेश दिले होते. तरी देखील सदरची दुबार नावे वगळण्यात आलेली नाहीत. पण, ती वाढविण्यात आली असल्याचा आरोप राजन विचारे यांनी यावेळी केला.
नुकतेच ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीतील सर्वेनुसार १ लाख ९३ हजार ३०२ दुबार नावे आढळून आलेली आहेत. म्हणजे मागील यादीपेक्षा एकूण २६,३९२ नावे वाढली आहेत. त्यामुळे यावर प्रचंड नाराजी दर्शवून विचारे यांनी प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. तसेच सदरची दुबार नावे वगळली नाहीत तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन कोर्टात दाद मागावी लागेल, असा थेट इशाराही विचारे यांनी दिला आहे.
विधानसभा मतदार संघ पूर्वी नंतर
१४५-मीरा भाईंदर ३४३१० ४६८९०
१४६-ओवळा माजिवडा २९०८२ ४५७६६
१४७-कोपरी पाचपाखाडी २१३२० १७९९७
१४८-ठाणे १६७६० १३८११
१५०-ऐरोली ३९५९० ३९७६०
१५१-बेलापूर २५८४८ २९०७८
एकूण दुबार नावे १६६९१० १९३३०२
एकूण वाढलेले दुबार मतदार २६३९२