मकाऊची जंमत आणि कॅसिनोची गंमत...

इतर पक्षाच्या नेत्याने असं केलं असतं तर त्याला पदावरून तात्काळ दूर केलं गेलं असतं. पण भाजप ते करणार नाही. कारण असले उद्योग करणाऱ्यांंचीच पक्षात रीघ असल्याने कोणाकोणाला हटवणार असा प्रश्न आहे. तेव्हा शेण खाल्लेल्यांचं समर्थन केल्याविना त्यांच्याकडे पर्याय नाही. द्युत खेळण्याचा अधिकार हिंदुत्ववाद्यांना संस्कृतीने दिला असल्याने या संस्कृतीचे पाईक असलेल्यांना त्याचं काही वाटणार नाही.  

आपणच संस्कृतीचे कसे पाईक आहोत, आपल्याहून संस्कृतीची अक्कल कोणालाच कशी नाही, याविषयी अक्कलेचे तारे तोडणारे भाजपचे नेते दोन दिवसांपासून जमिनीवर आलेले दिसतात. आपल्या प्रदेशाध्यक्षाच्या द्युतक्रीडेचे गोडवे गाऊ लागल्यापासून पक्षातल्या बोलबच्चन टग्यांची बोलती बंदी झालेली दिसते. आपण करत असलेल्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी हे टगे कसलीही उदाहरण पुढे करायचे. मकाऊला पोहोचलेल्या आपल्या नेत्याच्या काळ्या कारनाम्याचं उत्तर देतानाही या मुर्खांनी आदित्य ठाकरेंपुढच्या भरलेल्या ग्लासचं उदाहरण देण्याचा निर्लज्जपणा केला आणि मकाऊच्या कॅसिनोतील जुगार झाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. लाज विकलेलीच माणसं असले उद्योग करत असतात. आज भाजपचे नेते ते करत आहेत. जगाला संस्कृतीचं ज्ञान शिकवणाऱ्या या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना असल्या क्रीडा माफ आहेत. यामुळेच नंगानाच करणारा सोमय्या बायकांबरोबर फुगड्या घालताना दिसतो. जग पायाखाली घेणाऱ्या या माणसांना संस्कृतीच झोंबलेली दिसते आहे. खरं काय आणि खोटं काय याची खात्री न करताच प्रसिध्दीलोलूपांनी पक्षाला अडचणीत आणलंच; पण आपला प्रदेशाध्यक्षाच्या काळ्या कृतीचंही समर्थन केलंय. इतर पक्षांच्या कोणत्याही नेत्याने असं काही केलं की देशाचा पंतप्रधान आपल्या भाषणात त्याचा उल्लेख करतो आणि विरोधकांची लायकी काढतो. विरोधकांनाही प्रदेशाध्यक्षाच्या काळ्या कारनाम्याचा उल्लेख देशभर सुरू असलेल्या निवडणुकांतल्या जाहीर सभांमध्ये करता आला असता. याचं भानही महाराष्ट्र भाजपच्या हौसभऱ्यांना राहिलेलं नाही. एकतर आपला प्रदेशाध्यक्ष सामान्य गरीब घराण्यातला. त्याला एकवेळच्या जेवणाची मोताद. तेव्हा त्याच्यावर आरोप करून त्याला अडचणीत आणल्याने भाजपच्या बोलबच्चन मंडळींचा ऊर भरून आलाय. गरीब बिचाऱ्या प्रदेशाध्यक्षावर नको ते आरोप करून विरोधक अत्यंत हिन राजकारण करत असल्याचा त्यांचा आरोप तोंडात बोटं घालायला लावणारा आहे. इतक्या  गरीब घराणातल्या व्यक्तीला भाजप प्रदेशाध्यक्ष करू शकतो, यावर कोणाचा विश्वासच राहिलेला नाही. ऊर्जामंत्री असताना या प्रदेशाध्यक्षाने केलेल्या कमाईचा या मंडळींना गंधही नसेल. तेव्हा अशी व्यक्ती त्यांच्या लेखी गरीब असणं हा त्यांच्या अज्ञानाचा भाग होय. बुध्दीचा सारासार वापर करायची नाही आणि जिभेवर येईल ते बोलायचं यासाठी भाजपच्या राज्यातल्या बोलछबूंचा हात कोणीही धरणार नाही.

आज आपलं राज्य कोणत्या संकटात आहे, पक्षापुढे असलेल्या अडचणी किती सतावणाऱ्या आहेत, मराठा आरक्षणाने पक्षाचं वाटोळं करायला घेतलं असताना याची उत्तरं देण्याऐवजी नको त्या उदाहरणांची फेक करत आपला शहाणपणा पुढे करायला या मंडळींना लाज कशी वाटत नाही? आपला प्रदेशाध्यक्ष चीनच्या मकाऊला पोहोचतो, तिथे द्युत खेळतो, त्यात साडेतीन कोटी उडवतो आणि पुन्हा निर्लज्जासारखं आपल्या मकाऊ दर्शनाचं समर्थनही करतो? इतकं होऊनही आपल्या वाहिन्यांवर त्याचा साधा गंध नाही? कुठे आहेत प्रसार माध्यमं? बोरू ऐवजी आम्ही पिपाण्या आणि बूमऐवजी फुकायच्या नळ्या घेतलेल्याच बऱ्या. नेते एकमेकांवर आरोप करतात तितकंच आम्ही दाखवायचं, मग आमचं काम काय? असा प्रश्न माध्यमांना पडत नाही, याचं नवल वाटतं. पटोले, वडेट्टीवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे वा आदित्य ठाकरे, सुनील प्रभू यांनी हे केलं असतं तर? सारे तुटून पडले असते. भाजपच्या नेत्यांनी तर त्यांना नागडं करून सोडलं असतं. त्यांच्या समाधानासाठी आमची माध्यमं मग कामाला लागली असती. देशभर त्याचा डंका वाजला असता.राष्ट्रीय विकाऊंनी तर महाराष्ट्राची पुरती बदनामी केली असती. आता सगळ्यांचीच दातखिळी बसली आहे. अशावेळी माध्यमांची लाज कोणी रस्त्यावर काढली तर त्याला दोष कसा देणार? इतर पक्षाच्या नेत्याने असं केलं असतं तर त्याला पदावरून तात्काळ दूर केलं गेलं असतं. पण भाजप ते करणार नाही. कारण असले उद्योग करणाऱ्यांंचीच पक्षात रीघ असल्याने कोणाकोणाला हटवणार असा प्रश्न आहे. तेव्हा शेण खाल्लेल्यांचं समर्थन केल्याविना त्यांच्याकडे पर्याय नाही. द्युत खेळण्याचा अधिकार हिंदुत्ववाद्यांना संस्कृतीने दिला असल्याने या संस्कृतीचे पायिक असलेल्यांना त्याचं काही वाटणार नाही.  

प्रदेशाध्यक्षांच्या कारनाम्याची ही पहिली वेळ नाही. मंत्री असतानाच्या त्यांच्या कार्यालयातील गंमती जमती अनेकांनी ऐकल्यात. खात्यातले कमाईचे मार्ग, ठरलेले कंत्राटदार, त्यांच्यासाठी मंत्री म्हणून सरबराईच्या सुरस कथा कोणी विसरू शकत नाही. आपल्या कमाईची टक्केवारी ही ३६५ टक्क्यांनी वाढल्याचं सांगणारी आकडेवारी आश्चर्यकारकच नव्हे; तर अजबही आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यावर किमान त्यांनी स्वतःला सावरायला हवं होतं. पक्षाचं पालकत्व आल्याने आपला मार्ग इतरही चोखाळू शकतात, याची जाण त्यांना झाली नाही. आपणच विकृती जोपासली तर इतरांना तो अधिकार आपसुक प्राप्त होत असतो. आता या हाताखालच्यांनी थेट जुगाराचे अड्डे गाठले तर त्यांच्यावर कारवाई करण्याचीही आवश्यकता नाही.

राज्याचे पक्ष प्रमुख झालो म्हणून सगळ्यांनाच आनंद झालाय अशा थाटात हे प्रदेशाध्यक्ष होते. हे पद देऊन काहींनी त्यांची कामं करून घेतलीत. हा माणूस आपल्या शब्दाबाहेर जाऊ शकत नाही, याची खात्री अनेकांना होती. मात्र त्याने नेत्याच्या विरोधकांना एक करायचा प्रयत्न सुरू केला आणि संकटाने त्याला घेरलं. वाळित टाकलेल्या विरोधकांना गोंजारण्याच्या नादात आपलीच विकेट पाडून घेतली. पदाधिकाऱ्यांंच्या बैठकीत माध्यमांच्या प्रतिनिधींना धाब्यावर नेण्याच्या सूचना केल्या आणि त्या जशाच्या तशा बाहेर आल्या. त्या बाहेर आणणारे कोण, हेही त्यांनी लक्षात घेतलं नाही. मकाऊ हे म्हणजे मुंबईतलं ताज हॉटेल नाही. स्थानिक कर्मचाऱ्याने फोटो घेतले आणि राऊतांना पाठवले. कॅसिनोतील हे फोटो राऊतांकडे पोहोचतात याचा अर्थ प्रदेशाध्यक्षांना कळायला हवा होता. राऊतांना फोटो पाठवणारे कोण, याची माहिती सत्तेला घेणं अवघड नाही. पण तो व्याप कोणी करणार नाही. प्रदेशाध्यक्षांसाठी तो धडा आहे. त्यांनी आपण सांगतो तसंच वागलं पाहिजे, असंच यामागचं सांगणं आहे. आपण सर्वव्यापी असल्याचं दाखवण्याचा हा खाटाटोप होय. राऊतांनी सोशल मिडियावर केवळ एक दोन फोटोच शेअर केले.  आणखी २७ फोटो आणि चार व्हिडिओ या क्रीडेचे आपल्याकडे असल्याचं सांगत राऊतांनी प्रदेशाध्यक्षांची झोप उडवून दिली आहे. तो मकाऊतला कॅसिनो नाही, असं सांगण्याचीही सोय राहिली नाही. पळवाट म्हणून घरच्या मंडळींना घेऊन फिरायला गेल्याचा बनाव केला आणि कॅसिनोत बसल्याचे फोटो कोणीतरी काढल्याचं खोटंच सांगावं लागलं. इतकी फजिती कोणी केली याचा अभ्यास प्रदेशाध्यक्षांनी केला तर बरं होईल. महाराष्ट्राच्या संस्कृतीची भाजपच्या नेत्यांनी कशी वासलात लावलीय, तेही या निमित्ताने पुढे आलं हे बरं झालं. स्वतःला शहाणं समजणाऱ्या काही कथित शुचिर्भूतांनी असल्या नेत्यांचे गोडवे गाण्याचाच ठेका घेतला आहे. राज्याची लाज घालवली म्हणून ही माणसं राऊतांनाच जाब विचारायला कमी करणार नाहीत. यानिमित्त माणुसकीची भाषा राऊतांनी भाजपला शिकवली हेही योग्य झालं. एका फोटोच्या आधारे कोणाचं जीवन उद्ध्‌वस्थ करू नका, असं सांगणाऱ्या प्रदेशाध्यक्षांचा धागा पकडत तेव्हा तुझा धर्म कुठे गेला होता... याची जाणीव राऊतांनी भाजपच्या नेत्यांना करून दिली तेही बरं झालं. विरोधकांवर खोटेनाटे आरोप करताना माणुसकीची आणि संस्कृतीची चिरफाड करणाऱ्या प्रदेशाध्यक्षाच्या समर्थकांना हे कळणार नाही. उलट हे निमित्त घेऊन या नेत्यांनी राऊतांच्या मागे इडीची पिडा न लावली तर नवलच... 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

सामाजिक विषमतेचे परिणाम