मुशाफिरी
खरेच जंटलमेन्स गेम राहिला आहे का?
सुमारे पंचेचाळीस दिवस आपल्या देशात क्रिकेटचा उरुस भरवण्यात आला होता. त्याने दहा वेळा तरी देशातील क्रिकेटप्रेमींना सुखद विजयाचा अहसास दिला; अगदी दिवाळीतही! पण ऑस्ट्रेस्लियन खेळाडूंनी आपला खेळ उंचावत भारतीय खेळाडूंचे विमान अलगद जमिनीवर उतरवले; तेही भारतीय पंतप्रधान आणि काही तारे-तारकांसमोर...आणि ‘असले फुकाचे इव्हेंटीकरण करण्याऐवजी मैदानावरील खेळच शेवटी महत्वाचा ठरत असतो तिकडे लक्ष द्याल तर ते तुमच्या हिताचे ठरेल' असा अबोल संदेशही दिला. मात्र त्यांच्या खेळाडूने त्याच विश्वचषकावर पाय ठेवत साऱ्यावर पाणी ओतले आणि ‘जंटलमेन्स गेम' वर प्रश्नचिन्ह उभे केले.
क्रिकेट, धर्मकारण, राजकारण आणि मनोरंजन विश्व या चार गोष्टींना आपल्या देशात अनन्यसाधारण महत्व दिले जात आहे. यात रस नसणाऱ्यांना तोकडे, अपुरे, अर्धवट, अरसिक, कलाद्वेष्टे वगैरे म्हणून हिणवण्याची प्रथा आहे. संपूर्ण विश्वात एकूण १९५ देश आहेत, त्यातील १०४ देशांतच क्रिकेट खेळले जाते. त्यातही २०२३ च्या ‘विश्व'चषक स्पर्धेत केवळ दहाच देश खेळत होते. केवळ दहा देशांतील या स्पर्धेला ‘विश्वचषक' वगैरे म्हणायलाही अनेकांचा आक्षेप आहे... आणि तरीही क्रिकेट हा परदेशी खेळ आपल्या सारख्या विकसनशील ( महासत्ता वगैरे बनू पाहणाऱ्या ) देशात प्रचंड लोकप्रिय मानला जातो. या खेळाचे मूळ आपल्या महाभारतातील श्रीकृष्णाच्या चेंडूफळीत असल्याचाही दावा केला जातो. हा खेळ मुळात इंग्रजांचा, वेस्ट इंडिजवाल्यांचा की ऑस्ट्रेलियनांचा...यावरही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. खेळ कुणाचाही असो, त्याचे पेटंट कुणाचेही असो; आपल्या भारतीय मातीत हा खेळ रुजला, वाढला, चांगलाच फोफावला हे वास्तव नाकारता येत नाही. या खेळाला केंद्रस्थानी ठेवून स्वतःला ‘पर्फेवशनिस्ट' म्हणवून घेणे आवडणाऱ्या आमीर खान याने २००१ साली ‘लगान' नावाच्या चित्रपटाची निर्मिती केली होती व त्यात प्रमुख भूमिकेतही तो वावरला होता. इंग्रज राजवटीत अत्यंत अविकसित असलेल्या भारताच्या एका प्रांतातील गावठी खेळाडूंनी क्रिकेट खेळणे आणि हरल्यास दुप्पट ‘लगान' द्यावी लागेल म्हणून त्वेषाने रवताचे पाणी करुन खेळ दाखवत तो सामना सत्ताधीश इंग्रजांना हरवून जिंकणे असे त्याचे कथानक होते आणि त्याचा दिग्दर्शक होता..आपला मराठी माणूस आशुतोष गोवारीकर ! चित्रपटाचे एक ठीक असते, कुणी हरायचे, कुणी जिंकायचे हे आधीच ष्टोरीत लिहुन ठेवलेले असते; त्यामुळे एखादा बरगड्या दाखवणारा चिरकुट माणूसही कोणत्याही बलाढ्य पैलवानाला पराभूत करु शकण्याची किमया घडवता येते. कारण तिथे सारेच लुटुपुटुचे असते.
...पण प्रत्यक्ष मैदानावरील खेळाचे तसे नसते. तिथे तुमचा अनुभव, सराव, परिस्थिती पाहुन केलेला खेळ, संयम, आक्रमण, व्युहरचना, प्रतिस्पर्ध्याचे डाव ऊधळून लावण्याची मानसिकता हे सारे कामी येत असते. १९ नोव्हेंबरला यातच आपण कमी पडलो हे साऱ्या जगाने पाहिले आहे. आता कोणताही खेळ म्हटला की त्यात हार-जीत असणारच! दहा सामने जिंकून एक सामना हरलो म्हणून भारतीय संघ तोकडा, दुबळा, कमकुवत आहे असे म्हणणे केवळ अखिलाडूपणाचे होईल. हा अंतिम सामना भारताने गमावला म्हणून काही स्वयंघोषित विद्वानांनी अनेक क्रीडाबाह्य कारणे दाखवीत समाजमाध्यमांवर गरळ ओकायचे काम केले आहे. खेळाकडे खेळ म्हणून बघण्याऐवजी ते दोन देशांमधील युध्द, धर्म अशा नजरेने त्याच्याकडे बघितल्यास आणखी वेगळे काय होणार म्हणा! क्रिकेटची बॅटही कधी हातात न धरलेल्या काही महिलाही ‘आता विटी दांडू खेळा म्हणावं, कोहलीची बायको स्टेडियमवर आली की असेच होणार पासून ते मोदी, शाहरुख स्टेडियममध्ये आल्याने आपले खेळाडू दबावाखाली आले; कपिलदेव, महेंद्रसिंग धोनीला या सामन्यासाठी सन्मानाने न बोलावल्याने त्यांचे शाप भोवले' असले शेरे मारताना दिसत आहेत. आता समाजमाध्यमांमुळे ते लागलीच जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचतेही. एका विद्वानाने असे लिहिले की ‘भारतीय खेळाडूंनी सराव झाल्यानंतर संविधानाची दोन दोन पाने वाचली असती तर चांगले खेळले असते.' आता बोला!
काही विद्वानांनी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना भारताने किती विश्वचषक जिंकले आणि नरेंद्र मोदींच्या काळात आपण कसे काहीच जिंकू शकलो नाही याचा लेखाजोखा सादर करण्याचा प्रयत्न केला. देशाच्या विद्यमान सत्ताधीशांनी क्रिकेट खेळात राजकारण तर आणलंच आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिसून आलेली घोषणाबाजी याचं निदर्शक आहे. पण त्याला केवळ केंद्रातलेच राजकारणी जबाबदार नाहीत. आजपासून चाळीस वर्षांपूर्वी १९८३ साली अंतिम सामन्यात केवळ १८३ धावा करुनही उत्कृष्ट गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाच्या जोरावर क्रिकेटमधील कर्दनकाळ मानले गेलेल्या तत्कालिन गतविजेत्या बलाढ्य वेस्ट इंडिज संघाला धूळ चारणाऱ्या कपिलदेव निखंज याच्या अंतिम विजेत्या संघातील मराठी खेळाडू संदीप मधुसुदन पाटील याला मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरवण्यासाठी व अमोल काळेला निवडून आणण्यासाठी भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी आमदार आशीष शेलार आणि राष्ट्रवादीचे मराठी अध्यक्ष शरद पवार कसे एकत्र आले होते हे तुम्ही आम्ही पाहिले आहे.
या काही राजकारण्यांनी क्रिकेटसारख्या ‘जंटलमेन्स गेम' मानल्या जाणाऱ्या खेळाचा विचका करायला घेतला आहे. खेळाच्या व्यवस्थापनात खेळाडुंनाच जबाबदाऱ्या मिळायला हव्यात. तिथे राजकारण्यांचे काय काम? पण जिथे सुर्यप्रकाशही पोहचत नाही तिथे राजकारण पोहचते आणि गुणवत्ता पडते बाजूला व ‘हा आमचा तो तुमचा' असे प्रकार सुरु होतात आणि खेळाडुंच्या खच्चीकरणाला सुरुवात होते. एकेकाळी म्हणे अखिल भारतीय कसोटी संघात मुंबईचे खेळाडूच जास्त असत. जसे अजित वाडेकर, फारुख इंजिनियर, सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, एकनाथ सोलकर, करसन घावरी, राजू कुलकर्णी, संजय मांजरेकर, राहुल मंकड, चंद्रकांत पंडित, रवि शास्त्री वगैरे. यानंतर मुंबई विरुध्द दिल्ली असा अघोषित संघर्ष सुरु झाला. त्यानंतर राष्ट्रीय क्रिकेटची सूत्रे दिल्लीकडील हिंदी पट्टयाने ताब्यात घेतली आणि खेळाडूंसाठी राजकारण्यांचे लॉबिंग सुरु झाल्यालाही पुरेसा काळ लोटला आहे. त्यामुळे सरकार कुठल्याही पक्षाचे असो; रेल्वेमध्ये जशी सर्वाधिक नोकर भरती हिंदी पट्टयातूनच होते, तेच क्रिकेटचेही होऊन बसले. महाराष्ट्रात हयात घालवलेल्या रोहित शर्मा या भारतीय क्रिकेट कप्तानाला जर एखादा खेळाडू त्याच्या संघात हवा असेल किंवा नको असेल तर त्याचे तरी स्वातंत्र्य त्याला मिळत असेल का, याची शंकाच येते.
एकेकाळी एनडीटीव्ही चा संपादक असलेल्या रविश कुमार या ज्येष्ठ पत्रकाराचे विविध विषयांवरील निवेदन रोचक आणि विश्लेषणात्मक असते. वंचित, उपेक्षित घटकांची बाजू तो पुरेशा ताकदीने मांडतो. विविध प्रश्नांच्या मुळाशी जाऊन साद्यंत माहिती पुरवण्याची त्याची हातोटी अनुकरणीय आहे. ‘१९ तारखेच्या अंतिम सामन्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय संघाच्या फलंदाजीच्या वेळी अहमदाबादला पोहचले होते, पण भारतीय खेळाडूंची पडझड सुरु झाली व समोर हार दिसू लागल्याने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अडीच तास उशिराने आले,' असे रविश कुमारने त्याच्या युट्युब चॅनेलवर नमूद केले आहे. पंतप्रधानांना जिंकण्याचे श्रेय घ्यायला यायचे होते, भारताच्या विजयी कर्णधारासोबत फोटोबाजी करायची होती..पण संघ हरतोय हे लक्षात येताच ते गप्प झाले, त्यांनी खिलाडूपणे भारताचा पराभव स्विकारला नाही असे काहीसे रविश कुमार सुचवतो. प्रत्यक्षात मोदी तिथे आले, त्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले. दहा सामने जिंकून अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या भारतीय संघाला धीर द्यायला ते भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले व त्यांनी मोहम्मद शमी या भारतीय मुस्लिम (तौबा तौबा!) खेळाडूला आलिंगन दिल्याचा फोटो त्याच मुस्लिम खेळाडूने एवस वर पोस्ट केला आहे....आणि तिकडे ऑस्ट्रेलियन खेळाडू म्हणतात की आमच्या विजयाच्या वेळी स्टेडियमवर सन्नाटा पसरला. आणि त्यांच्यातलाच एक खेळाडू त्याच विश्वचषकावर लांब तंगड्या टाकून बसल्याचा फोटोही पाहायला मिळतो. मग कशाला म्हणायचे खिलाडू वृत्ती?
यावर मला एक प्रसंग आठवतो. २००६ साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडली, जी तत्कालिन ऑस्ट्रेलियन संघाने जिंकली होती आणि त्यावेळी ‘बीसीसीआय' चे अध्यक्ष होते शरद्चंद्र गोविंद पवार. पवारांनी विजेतेपदाचा चषक ऑस्ट्रेलियन कर्णधार आणि संघाच्या हाती सोपवला आणि पुढच्याच क्षणाला ब्रॅड हॉग या ऑस्ट्रेलियन खेळाडूने पवारांना चवक ढकलून दिले. त्याला तत्कालिन ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉण्टिंगनेही साथ दिल्याचे तुम्ही आजही उपलब्ध व्हिडिओतून पाहू शकता. त्यात ते खेळाडू पवारांकडे बघून उद्धट शेरेबाजी करत असल्याचेही पाहायला मिळते. याला उत्तर म्हणून मग राष्ट्रवादीच्या जीतेंद्र आव्हाड यांनी काही गाढवे आणून त्यांना ऑस्ट्रेलियन संघाच्या वेशात दाखवून बातमीबाजी केली होती.
...तरीही आपण क्रिकेटला ‘जंटलमेन्स गेम' म्हणतो, केवळ खेळाडूंनीच खेळायचा खेळ समजतो. प्रत्यक्षात तसे नसल्याला केव्हाच सुरुवात होऊन गेली आहे. यात तर पाकड्यांनी मैदानावर मारामाऱ्या करणे, माकडउड्या मारुन दाखवणे, त्यांचा देश हरल्यावर तेथील नागरिकांनी घरोघरी टीव्ही फोडणे वगैरे प्रकारावर तर मी इथे काहीच लिहीलेले नाही.
(मुशाफिरी) राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.