चौकडी
चांगली मजुरी मुंबईत मिळते म्हणून तिकडे गेलेल्या त्या चौघांपैकी एकाने चोरून ऐकले की शेट आणि तो मांत्रिक काहीतरी बोलत आहेत. त्यास दुस-याचे बोलणे ऐकण्याची वाईट सवय होती. त्याने ऐकले ‘बळी' देण्याची तयारी चालू आहे. ते बोलणे ऐकून तो मजूर बिथरला, धावत गॅरेजमधे आला. ती वार्ता ऐकून चौघेजण अंधारातून पळून गेले होते. पुढे काय झाले..? वाचाच!
चार मित्र होते. ते चौघे उनाड होते. त्यामुळेच ते शाळा शिकले नाहीत. तरूण झाल्यावर ते गावखात्यात शेतमजूर म्हणून काम करू लागले होते. त्यांचा एक अलिखित नियम होता. तो म्हणजे चौघांनी एकत्रच काम करायचे, दोघे इकडे, एक तिकडे किंवा दोन इकडे - दोन तिकडे असे ते काम करत नसत. त्यांना लोक चौकडी म्हणत असत. त्यांना एकमेकांशिवाय करमत नसे. तसे ते कामाला वाघ होते. अजून त्यांच्यापैकी कुणाचे लग्न झाले नव्हते. चौकडी खाऊन पिऊन सुखी होती.
एक दिवस त्यांना मुंबई शहरात काम करण्याची खुमखुमी आली. कारण तिकडे जास्त काम आणि जास्त पैसे मिळतात असे समजले होते. गावातला एक म्हातारा काका त्यांना नवी मुंबईत घेऊन आला होता. काकाच्या झोपडीत ते उतरले होते. काकाने सकाळी त्यांना कामासाठी नाक्यावर नेले होते. इमारत काम, साफसफाई काम, माती खोदाई, ट्रकमधे माल भरणे अशी अंगमेहनतीची कामे तिकडे चालत होती. ह्या चौकडीची एकाच ठिकाणी काम करण्याची सवय असल्याने त्या दिवशी त्यांना एकत्र काम लागले नाही. सर्व मजुर कामास गेले पण हे नाक्यावर माशा मारीत राहिले होते. कामाचा पहिला अर्धा दिवस फुकट गेला होता. इतक्यात एक शेट त्याची जीप मोटार घेऊन आला होता. त्यास खोदकामासाठी मजुर हवे होते. चौघांना काम मिळतेय म्हणून ते जीपमधे बसले होते.
शेटची जीप डोंगर रानात एका दगडखाणीजवळ थांबली होती. तिथे एक मांत्रिक भूमिपूजन करित होता. विधी आटोपल्यावर नारळ पेढ्यांचा प्रसाद मजुरांनाही वाटण्यात आला होता. चार फुट बाय सहा फुट पांढ-या चुन्याची चोकट होती. त्यात लिंबूचे गोल, गुलाल, हळद, अबीर यांचे गोल काढलेले होते. शेटने ती चौकट त्या मजुरांना खोदण्यास सांगीतली होती. काम अंगावर देण्यात आले होते. रात्री बारावाजेपर्यंत चौकट सहा फुट खोल खोदून द्यायची होती. मजुरीच्या तिप्पट पैसे, दोन वेळ जेवण, चहा मिळणार होता. हे त्यांचे पहिलेच काम असल्याने त्यांनी होकार भरला होता.
तिन वाजता जेवण करून, सहा वाजता चहा पिऊन त्यांनी रात्री दहा वाजताच चौकट खोदून दिलेली होती. त्यांचे ते काम पाहून शेटने त्यांना गावठी दारूची बाटली आणि जेवण दिले होते. या मेजवानीने रात्रीचा एक कधी वाजला त्यांना कळलेच नाही. आता एवढ्या रात्री कुठे जाणार म्हणून ते चौघे गॅरेजमधे झोपले होते. रात्री तिन वाजता चौघांपैकी एक मजुर लघुशंकेसाठी उठला होता. त्याने ऐकले की शेट आणि तो मांत्रिक काहीतरी बोलत आहेत. त्यास दुस-याचे बोलणे ऐकण्याची वाईट सवय होती. त्याने ऐकले बळी' देण्याची तयारी चालू आहे. ते बोलणे ऐकून तो मजूर बिथरला, धावत गॅरेजमधे आला. ती वार्ता ऐकून चौघेजण अंधारातून पळून गेले होते.
डोंगराजवळच्या चार फाट्यावर ती मजूर चौकडी धापा टाकीत धावत आली होती. तेव्हा पहाटेचे चार वाजले होते. रस्ताकडेस एक आंब्याचे मोठे झाड होते. त्यावर पोलीस लपून बसले होते. शहरी भागात घरफोड्या होतात म्हणून पोलीस चोरांचा शोध घेत होते. त्या पोलीसांना हे चारजण आयते सापडले होते. गवतात लपविलेली जीप बाहेर काढून पोलीसांनी त्या चौकडीस पोलीस ठाण्यात नेले होते. घरफोडीचा गुन्हा कबूल करत नाहीत म्हणून त्यांची धुलाई चालू झाली होती. ते चोर नव्हतेच; पण आधारकार्ड सोबत नसल्याने ते नक्की कोण आहेत हे सिद्ध होत नव्हते. मग उलटसुलट तपासणी, हाताचे ठसे तपासनी करता करता सकाळचे नऊ वाजले होते. चौकडीचे मजूर फार घाबरले होते. मुंबईचे काम अंगाशी आले याचा पश्चाताप त्यांना होत होता. तिकडे मान कापण्याची स्थिती तर इकडे हाडे मोडण्याची स्थिती अशा बिकट परिस्थितीत ते सापडले होते.
दहा वाजता दगडखाणीचा तो शेट काही कामानिमित्त पोलीस स्टेशनला आला होता. त्याला पाहून त्या मजुरांनी हंबरडा फोडला होता. शेटने ओळख देताच पोलीसांनी त्या चौकडीस सोडले होते. त्यांचे अंग सुजले होते. पहाटे बळी देण्याची गोष्ट ऐकून शेट म्हणाला आम्ही एक बकरा बळी दिला आहे. चला जेवायला. तेव्हा ते मजुर म्हणाले, ‘नको शेट, आम्ही आमच्या गावाला जातो...' शेटने त्यांना रेल्वेस्थानकावर सोडून देताच ते भूतासारखे धावत गेले होते. - गज आनन म्हात्रे, नाटककार-साहित्यिक, करावे गाव.