यंदाही फटाक्यांनी केली हानीच हानी !

न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून मुंबईत यंदाही दिवाळीच्या दिवसांत मध्यरात्री १२ ते १ वाजेपर्यंत फटाके फुटतच राहिले. परिणामी हवेतील प्रदूषण तर वाढलेच शिवाय ध्वनी प्रदूषणातही कमालीची वाढ झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ तासांत देशातील ८५ शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कमालीचा घसरला होता..ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर राज्यातील पुणे आणि दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर शहर होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाने सर्वत्र कमाल मर्यादा गाठली. या सर्वांचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन खासगी तसेच सरकारी दवाखान्यांसमोर रुग्णांच्या रांगा लागू लागल्या.

 दिल्लीपाठोपाठ मुंबईतील हवेची पातळी खालावली. त्याबरोबर प्रशासनाने प्रदूषण करणाऱ्या अनेक घटकांवर निर्बंध आणले. मुंबईतील समस्त रस्ते पाण्याने स्वच्छ करण्याची तयारीही करण्यात आली आणि तेव्हढ्यातच दिवाळी आली. दिवाळीत फोडल्या जाणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ होणार हे लक्षात घ्ोऊन न्यायालयाने फटाके फोडण्यावर वेळेचे बंधन आणले. सुरुवातीला तीन तास आणि नंतर केवळ दोन तास फटाके वाजवण्यास अनुमती देण्यात आली. रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवातही केली. फटाके फोडण्यामध्ये बच्चे कंपनी आघाडीवर असल्याने पोलिसांच्या कारवाईवरसुद्धा बंधने येऊ लागली. फटाके फोडणाऱ्यांच्या तुलनेत तुटपुंजे पोलीस दल कुठे कुठे पोहोचणार? व्हायचे तेच झाले. न्यायालयाचे नियम धाब्यावर बसवून मुंबईत दिवाळीच्या दिवसांत मध्यरात्री १२ ते १ वाजेपर्यंत फटाके फुटतच राहिले. परिणामी हवेतील प्रदूषण तर वाढलेच शिवाय ध्वनी प्रदूषणातही कमालीची वाढ झाली. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २४ तासांत देशातील ८५ शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक कमालीचा घसरला होता ज्यामध्ये पहिल्या क्रमांकावर राज्यातील पुणे आणि दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर शहर होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रदूषणाने सर्वत्र कमाल मर्यादा गाठली. या सर्वांचा लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन खासगी तसेच सरकारी दवाखान्यांसमोर रुग्णांच्या रांगा लागू लागल्या. प्रदूषणामुळे घसा खवखवणे, खोकला, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, ताप, डोळे जळजळणे यांसारख्या आजारांनी नागरिक त्रस्त होऊ लागले. यामध्ये लहान मुलांची संख्या अधिक होती.

दरवर्षी फटाक्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडतात ज्यामध्ये वित्त हानी तर होतेच शिवाय काहीवेळा आकस्मिक आग लागल्याने जीवित हानीही  होते, अपंगत्व, अंधत्व आणि बहिरेपणाही येतो. आग लागण्याच्या घटना टाळण्यासाठी मुंबईत अग्निशमन दलाने जनजागृती मोहीम हाती घेऊन त्या अंतर्गत झोपडपट्या आणि चाळींमध्ये जाऊन १६९ ठिकाणी व्याख्याने घेतली. ज्यामध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या. आग लागल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. उच्च न्यायालयाने घातलेले निर्बंध आणि अग्निशमन दलाने केलेली जनजागृती यानंतरही मुंबईत ७९ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत २७ ठिकाणी आगी लागल्या. दिवाळीच्या काळात मुंबई अग्निशमन दलाच्या कार्यालयात आग विझवण्यासाठी बोलावण्याकरिता प्रतिदिन १४ ते १५ दूरध्वनी येत होते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुर्ला नेहरू नगर भागात अभ्युदय बँकेच्या जवळील इमारतीच्या गच्चीवर फटाक्याचे रॉकेट आदळल्याने भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या ४ बंबांनी अथक परिश्रम केल्यानंतर ही आग विझवण्यात यश आले. पेटते रॉकेट स्टेशनरीच्या दुकानात शिरल्याने बोईसरमधील सृष्टी परिसरातील स्टेशनरीचे दुकान जाळून खाक झाले. फटाक्यांमुळे विरारच्या मनवेलपाडा तलावाजवळ प्लास्टिकच्या दुकानाला मध्यरात्री भीषण आग लागली, ज्यामध्ये दुकान पूर्णपणे जळून खाक झाले. विरारमध्येच विवा धवलगिरी कॉम्प्लेक्समध्ये एका रूमला फटाक्यांमुळे आग लागली. जोगेश्वरी येथील एका इमारतीच्या तेराव्या मजल्यातील बाल्कनीत रॉकेट शिरल्याने आग लागली. मुंबईतील ग्रांट रोड परिसरात एका इमारतीच्या ११ आणि १२ व्या मजल्यावर भीषण आग लागली. ही आग विझवताना आणि इमारतीतील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाला अथक प्रयत्न करावे लागले. दिवाळीच्या आरंभीच विलेपार्लेतील एका ११ माजली इमारतीला आग लागली. ज्यामध्ये एका ९६ वर्षीय वृद्धेला आपला जीव गमवावा लागला. भायखळा येथील एक इमारतीलाही भाऊबीजेच्या दिवशी आग लागली.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यात ८ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या. या आगीचे स्वरूप भीषण नसले तरी त्या विझवण्यासाठी अग्निशमन दलाला बरीच मेहेनत घ्यावी  लागली. सोलापूरच्या बार्शीमधील शिवाजीनगर येथे हॉटेल राजवाडाला फटाक्यांमुळे आग लागली यामध्ये हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. कोल्हापूरच्या शाहूवाडीतील एका तेलाच्या दुकानाला फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत दुकान भस्मसात झाले. बुलढाण्यात कापड बाजाराला फटाक्यांमुळे आग लागल्याने सुमारे ८० ते ९० लाखांचा माल जळून खाक झाला. नगर जिल्ह्यातील सावडी येथील एक घरात जळका फटाका शिरल्याने घर जाळून खाक झाले, गुलमोहोर परिसरातील एका घरालाही फटाक्यांमुळे आग लागली. नाशिकच्या मेनरोड रेड क्रॉस सिग्नल परिसरातील वर्धमान या कपड्याच्या शोरुमला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या १० हून अधिक बंबांनी ही आग विझवली. या आगीत शेजारील ३ दुकानेही जळाली. येवल्यातील नाकोडा फॅशन ड्रेसेस दुकानाला आग लागून लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. पुण्यातील रास्ता पेठ, कोथरूड, कोंढवा, नाना पेठ, घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, हडपसर या ठिकाणी फटाक्यांमुळे आगी लागण्याच्या घटना घडल्या. डोळ्याजवळ फटाका फुटल्याने डोळ्यांना दुखापत होणे, बुबुळांना इजा होणे, चेहेरा भाजणे, कानाचा पडदा फाटणे, ऐकू यायचे बंद होणे, डोळे जळजळणे, डोळ्यांतून पाणी येणे, फटाक्यांच्या अति आवाजामुळे चक्कर येणे, डोके दुखणे यांसारख्या आजारांनी त्रस्त झालेले अनेक रुग्ण दिवाळीच्या काळात वाढल्याची नोंद पुण्यात करण्यात आली. दरवर्षीच्या तुलनेत यंदा नाशिकमध्ये फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणात तिप्पट वाढ झाली.

 दिवाळी खरेतर नातेवाईकांसोबत एकत्र साजरा करण्याचा सण; मात्र फटाक्यांचा जीवघेेणा धूर आणि आवाज नको म्हणून शहरातील श्वसनविकार, हृदय विकार असणारे अनेक जण दिवाळीच्या आधीच गावी किंवा शहराबाहेर मित्रमंडळींकडे,  अन्य नातेवाईकांकडे काही दिवसांसाठी राहायला जातात. जे इथे आपल्या नातेवाईकांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी थांबतात..त्यांना फटाक्यांच्या प्रदूषणामुळे जीव नकोसा होऊन जातो. गर्भवती स्त्रिया, मनोरुग्ण यांनाही फटाक्यांच्या आवाजाचा आणि विषारी वायूचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कुत्रे, मांजरी यांसारखे पाळीव प्राणी, पक्षी यांच्या आरोग्यावरही फटाक्यांचा विपरीत परिणाम होतो, ज्यामुळे ते भयभीत होऊन सैरावैरा धावू लागतात. भीतीमुळे अनेकदा हे प्राणी आणि पक्षी जीवसुद्धा गमावतात. सोलापूर जिल्ह्यातील चिंचणी नावाचे एक गाव आहे. या गावातील  शेतकरी किरण जाधव यांच्या घरी पोमेरेनियन जातीचा भालू नामक पाळीव कुत्रा होता. जाधव यांच्यासह संपूर्ण गावाला भालूचा लळा लागला होता. ९ वर्षांपूर्वी दिवाळीत फटाक्यांच्या आवाजाला घाबरून भालूने जीव सोडला. भालूच्या मृत्यूमुळे गावातील ४५० नागरिक हळहळले. भालूच्या मृत्यूमुळे ग्रामस्थांनी गावात फटाके बंदीचा निर्णय घ्ोतला. तेव्हापासून आजपर्यंत दिवाळीच्या काळात गावातील कोणीच फटाके वाजवत नाहीत. परंपरागत पद्धतीनुसार दिवाळी साजरी करतात. भालूच्या स्मृतिप्रीत्यर्थ ग्रामस्थांनी गावात १० हजार झाडे लावली.  त्यामुळे एकेकाळी ओसाड असलेले हे गाव आज हिरवळीने बहरले आहे. जी बाब चिंचणीसारख्या छोट्याशा गावातील लोकांच्या लक्षात आली, ती शहरातील सुशिक्षित लोकांच्या केव्हा लक्षात येणार ?

 वास्तविकतः दिवाळी हा दिव्यांचा सण. तिमिराकडून तेजाकडे जाण्याची शिकवण देणारा सण; मात्र दिवाळीतील जीवघेण्या फटाक्यांमुळे आपला प्रवास तेजाकडून तिमिराकडे चालला आहे की काय असे वाटू लागते. दिवाळी आणि फटाक्यांचा काहीच संबंध नाही. फटाक्यांची निर्मिती केवळ आतषबाजीसाठी करण्यासाठी करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात आतषबाजी करावी असा उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथांत अथवा धर्मशास्त्रात नाही, मग दिवाळीसारख्या पवित्र सणात ही प्रदूषणाची खैरात कशासाठी ? फटाक्यांमुळे क्षणिक सुख मिळते; मात्र त्यापासून होणारे नुकसान कैकपटीने अधिक असते. केवळ दिवाळीच्या काळात अब्जोवधी रुपयांच्या फटाक्यांचा निव्वळ धूर होतो. ज्या  देशाचा काही भाग आजही दारिद्रय रेषेखाली जगत आहे, ज्यांना दिवसातून २ वेळा अन्न मिळणेही दुरापास्त आहे, अशा देशात फटाके फोडण्यात आणि त्यापासून होणारे नुकसान निस्तरण्यात अब्जोवधी रुपये खर्च होत असतील तर ते देशाला नक्कीच परवडणारे नाही. ज्या गोष्टी धर्मशास्त्रात नाहीत आणि जर त्यामुळे सामाजिक स्वास्थ बिघडणार असेल तर अशा बाबींवर बंदी आणणेच योग्य आहे. यंदा देशातील हवेची गुणवत्ता कमालीची बिघडल्याने अनेक राज्यांनी फटाके फोडण्यावर बंदी घातली तर काही राज्यांनी केवळ हरित फटाके फोडण्यास अनुमती दिली. दरवर्षी दिवाळीच्या दरम्यान फटाक्यांमुळे होणारी वित्त आणि जीवित हानी, फटाक्यांच्या बाबतीत न्यायालयाला करावा लागणार हस्तक्षेप, या दिवसांत प्रशासनावर पडणारा अधिक भार या सर्व बाबी लक्षात घेऊन दिवाळीच्या काळात फटाके फोडण्यावर केंद्र सरकारने देश पातळीवर बंदी आणायला हवी ! -जगन घाणेकर, घाटकोपर. 

 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

चौकडी