गेले ते दिवस.. उरल्यात फक्त आठवणी

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं. मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो. फक्त एक लवंगी सर वाजवायचा; बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते, असे सांगितले जायचे. दिवस हळूहळू उजाडायचा. लहान होवून, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे, भरपूर आनंद लुटणारी, सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीय का?...की आपण विसरत चाललोय हे सर्व? एक मात्र नक्की की आपण खूप पुढे आलोय.

खरा आनंद म्हणजे काय रे भाऊ..नाही सांगता येणार ना! माहीत आहे मला. कारण आज धावपळीच्या आयुष्यात आणि बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांची आनंदाची व्याख्याच बदलून गेली आहे. आज प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजून आनंद विकत घ्यावा लागतो. पण तरीही तो आनंद असतो का, त्याने आपण खरच आनंदी, खुश होतो का? आनंदाची आधुनिक संकल्पना ही मूलतः व्यावहारिक आहे, तात्त्विक नाही. त्यामुळे यात आनंदाच्या तंत्रावर लक्ष केंद्रित केलं जातं. त्यामुळे आनंद म्हणजे काय हा आस्थेचा विषय उरत नाही, तर आनंद कसा प्राप्त करायचा याबद्दलच तेवढी आस्था ठेवली जाते. की फक्त समाधान मानावे लागते.

 दिवाळीची सुट्टी म्हटली की  एव्हाना सहामाही परीक्षा संपून सुट्टी सुरु झालेली असायची. मजाच मजा यायची. दसऱ्यापासूनच थंडी पडायची आणि दिवाळी येईपर्यंत तर ती भलतीच वाढत जायची. दिवसभर खेळून हाथ-पाय थंडीने कोरडेठाक व्हायचे, उकलायचे. त्यावर गायीचे किंवा शेळीचे दूध लावले जायचे, कसले चमकायचे हात पाय. मग सुट्टीतील उद्योग चालू व्हायचे. किल्ले बनवणे, गेरूच्या मातीने पूर्ण रंग भगवा करून टाकायचा. त्यावरचे हळीव चांगलेच वाढायचे. सलाईनच्या कारंज्यात दिवसभर पाणी भरत बसायचे. वाऱ्याने मावळे पडायचे. चिखल सुकून बुरुजाला भेगा पडायच्या. कधीकधी तर परत परत बनवावा लागायचा. दिवस जायचा गड' राखण्यात !! फटाक्यांची भलीमोठी यादी कधीच तयार असायची. मग मातीचा गल्ला फोडला जायचा. त्यात सापडायची इकडून तिकडून उचललेली आठ-आणे रुपयाची नाणी. फटाके आणायला खारीचा वाटा.

फटाक्याच्या दुकानात अधाश्यासारख व्हायचं. लवंगी फटाक्यांची माळ, आम्ही त्याला लार बोलत असू, ती तोडून वाटून घेत असे. भुईनळे, चक्र, फुलझडी, नागगोळी, टिकल्या आणि पिस्तुल. पिशवी गच्च भरायची. एकदम ‘श्रीमंत' झाल्यासारखं वाटायचं. मग एकमेकांचे बघत बघत घरी येवून सर्व भावंडांबरोबर त्याची वाटणी व्हायची. अगदी वात गळालेल्या फटाक्यांची सुद्धा !! हाताला छान चांदीसारखा दारूचा रंग लागायचा. भारी वाटायचं. हीच काय ती दारू माहिती तेव्हाची !!

‘पोरांनो, लवकर झोपा. सकाळी अभ्यंगस्नानाला उठायचं आहे' - आजी सांगायची. पण इथे झोप कोणाला असायची. कुडकुडणारी थंडी, बाहेर मंद प्रकाश, दूरवरून कोंबड्याची बांग ऐकू यायची. आईला उठवायचं. शेकोटी पेटवली जायची. त्याच्या जवळ बसून अंगात उब आणायची. आई उटणे लावायची. गार लागायचं. तो गरम पाण्याचा तांब्या अंगावर घेतला की छान वाटायचं. त्या पाण्याला धुराचा वास असायचा. मला तो आवडायचा. ‘मोती' साबण छोट्याश्या हातात मावायचा नाही आणि बादलीतलं पाणी संपूच नये असं वाटायचं.

देवघरात आई आम्हाला ओवाळायची. नवे कोरे कपडे अंगात घालायची. डोक्याला वासाचं तेल लावायची. ते गोठायचं नाही म्हणून बरं वाटायचं. मोठ्याच्या पाया पडून फटाके वाजवायला पळायचो. फक्त एक लवंगी सर वाजवायचा; बाकी सगळे सोडून, पुरवून पुरवून. त्यातच मज्जा असते, असे सांगितले जायचे. दिवस हळूहळू उजाडायचा. न वाजलेले फटाके सापडायचे. केवढा जास्त आनंद व्हायचा त्याचा. आता हे सगळे लिहिताना विचार येतोय, कधी जगले असं शेवटचं? केवढा तरी आनंद, ना आजच्यासारखे महागडे कपडे, ना आजच्यासारखे कित्येक प्रकारचे फराळ.

लहान होवून, छोट्या गोष्टीत रमून, निरागसपणे, भरपूर आनंद लुटणारी, सर्वात जास्त आवडणारी दिवाळी मागे पडलीय का?...की आपण विसरत चाललोय हे सर्व? एक मात्र नक्की की आपण खूप पुढे आलोय.  पुन्हा मागे वळून बघण्यासाठी, हल्ली कुणालाच वेळ नाही. - प्रा.सौ.अलका सानप, मुंबई. 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी