मुशाफिरी

दिवाळी : आपले येतील का जवळी? 

दिवाळी सणाला जाती, धर्म, प्रान्त, भाषा, वर्ण, हा गट, तो गट, आरक्षित, खुला, एवढ्या टक्क्यांचा, तेवढ्या टक्केवाल्यांचा वगैरे वगैरे जुल्मी मर्यांदात अडकवून ठेवले नाही हे आपलं नशिब! सण मुळात असतात ते याचसाठी की सारे द्वेष, तिरस्कार, वैरभाव, शत्रुत्व, असुया, अहमहमिका अशा भावना गळुन पडाव्यात आणि साऱ्यांनी ‘गिले-शिकवे भुलुन गलेसे लगवावे.' नातेवाईक, कूटुंबे यांच्यात कळत-नकळत पडत गेलेल्या फटी दिवाळीनिमित्त बुजवल्या जाव्यात. एकतेची, सामायिकपणाची, स्नेहाची, सौहार्दाची भावना दृढमूल व्हावी.

   अखिल भारतातील सर्वात मोठा समजला जाणारा ‘दिवाळी सण' सुरु झाला आहे. मोठ्या लांबीचा व साधारणपणे प्रत्येक दिवसाचे विशेष असे सांस्कृतिक महत्व असलेला असा हा सण आहे. त्याला आपण साऱ्यांनी उजेडाचा, प्रकाशाचा, आनंदाचा, शुभेच्छांचा, रांगोळीचा, आकाशकंदिलाचा, भेटीगाठींचा, नाविन्याने सजण्याचा सण म्हणून मान्यता दिल्याला मोठा काळ लोटला आहे.

   तुुमचा जन्म खेड्यात झालेला असो, निमशहरी भागात, उपनगरात की महानगरात..! सर्वांना दिवाळी म्हटले की आठवते ती बालपणीची गावाकडचीच दिवाळी. तो गायी वासरांच्या शेणामुताचा वास, ती कौलारु घरे, स्वच्छ सारवलेलं अंगण, ती भांडखोर भावंडे, फटावयांवरुन होणाऱ्या भावा-बहिणीतील लूटुपुटुच्या झटापटी, सकाळी लवकर उठायला लावून आजी-आई-काकी-मामी या ‘संस्थांनी' आपल्याला उटणे लावून खसखसून चोळत घातलेले अभ्यंग स्नान, मग फटाके वाजवण्यासाठी पळण्यातली लगबग, फराळाचा मनमुरादपणे घ्यायचा आस्वाद, वेगवेगळ्या नातेवाईकांकडे जाण्याचा योग, नातेवाईकांनी आपल्याकडे येऊन आपल्या गालावर हात फिरवीत ‘अला बला' करीत स्वतःच्या कानाजवळ मोडलेली बोटे या साऱ्या रम्य बालपणाची चित्रफितच आपल्या डोळ्यांसमोरुन सरकते. आमच्या आजोबांनी आमच्या पूर्वजांचे गाव शंभर वर्षांपूर्वीच सोडल्याने आम्ही जन्माने मुंबईकरच! तेथे कुठे गायी, म्हशी, कौलारु घरे, अंगणे पाहायला मिळणार? पण जन्म जरी मुंबईचा असला तरी इयत्ता तिसरीपासून पुढच्या आयुष्याचा मोठा काळ हा कल्याणमधील खेड्यात गेला. १९७० पासून १९८८ पर्यंत त्याच खेड्यात राहिल्याने विहीरीचे पाणी, गावात वीजेची सोय नसणे, पक्के रस्ते नसणे, गायी-गुरे, आजूबाजूला शेते, खळे, मळे, आंबे-पेरु-पपई-सिताफळाची भरपूर झाडे अशा भवतालात मी राहिलो. म्हणून खेड्यातली दिवाळी काय असते ते मी जवळून जाणून आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही भाषेतल्या लेखकाच्या बालपणीचे वर्णन तपासा! त्यावेळची त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याचे लिखाणात आढळेल. ‘मी चांदीचा (किंवा सोन्याचा!) चमचा तोंडात ऊन जन्माला आलो' असे लिहीणारा लेखक माझ्या तरी पाहण्यात नाही.

   माझ्या लहानपणीच्या वर्षांतील मोठा कालखंड हा माझ्या आत्याच्या घरी गेला आहे. तेंव्हा सर्वसाधारणपणे अनेक कुटुंबे सर्वसाधारण आर्थिक परिस्थितीचीच असत. काका, मामा, आत्या, मावशा, मावस-मामे-आते-चुलत भावंडे एकमेकांना धरुन असत. कुणालाही कुणाकडेही जाऊन बेलाशक मुवकाम ठोकावासा वाटे. आत्या, मामी, काकी, मावशी प्रेमाने आपल्या सोबत नात्यातील मुलांना स्वतःच्या घरी आग्रह करुन नेत असे. तिच्या घरातील मुलांनाही आपल्या या भावंडांचे आपल्याकडे येणे आवडत असे. नातेवाईकांच्या मुलांना पाहून ती तोंड वाकडे करीत नसत किंवा ‘अभ्यास आहे, परिक्षा आहे, क्लास आहे, प्रॅक्टीकल आहे, गाण्याचा रियाझ करायचा आहे' असली फालतू कारणे सांगून आतल्या खोलीत जात दाराला कडी घालून बसत नसत. काका-मामा-आत्या-मावशी यांच्याकडचे यश, त्यांच्याकडील शुभ वर्तमान, त्यांच्याकडील नवी खरेदी ही सर्वांसाठी आनंददायी वाटत असे. अभिमानाने इतरांना सांगण्याची बाब वाटत असण्याचा तो सारा काळ होता. दिवाळीलाच किंवा (एखाद्या लग्नप्रसंगीच!) नवे कपडे अंगाला लागण्याचा तो सारा काळ! वडिलांनी दिलेले पैसे घेऊन बाजारात स्वतंत्रपणे कपडे घ्यायची अवकल येईपर्यंत मी दहावी-अकरावी ओलांडली होती. दिवाळीपूर्वी वडिल शंभर रुपये देत. यात आपण शर्ट आणि पॅण्ट बसवायची. तेंव्हा वीस-पंचवीस रु. मीटर कापड असे. फटाके मला आत्याची मुलेच देत असत. गणेश मूर्तींच्या सुबकपणासाठी जगभर नाव झालेले पेण हे माझे आजोळ. मामाच्या गावीही काही दिवाळ्यांना जाण्याचा योग आला आहे. रायगड जिल्ह्याचे मत्स्यवैभव म्हणून मानला गेलेला जिताडा मासा तसेच चिंबोऱ्या यांचा आस्वाद दिवाळी काळात मामाच्या, मावशीच्या गावी जाऊन घेण्याची मौज काही न्यारीच! पुढे पत्रकार झाल्यावर विविध कार्यक्रम, पत्रकार परिषदांनिमित्त ताजमहाल, अंबॅसिडर, ललित, रिनेसान्स, जे. डब्ल्यू मेरियट, सहार या व अशा कित्येक पंचतारांकित हॉटेलांतून मी शेकडो वेळा जेवलो असेन. पण जिताडा आणि चिंबोरीचा तो गावाकडचा अप्रतिम स्वाद मला कुठेही नंतर चाखायला मिळाला नाही. आता तर माझे आई-वडिल, मामा-मामी, आत्या, मावश्या ही सारी मागची पिढीच देवाघरी गेल्याल्या अनेक वर्षे होऊन गेली आहेत. त्यामुळे त्यांच्या हातच्या चवीलाही मी कायमचा पारखा झालो आहे. मामा-मावशी, आत्या-मामी, काका-काकी ही सारी मंडळी ‘दिवाळीनिमित्त तुला आणि तुझ्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा' असे तोंडाने कधीही न बोलूनही दिवाळीत प्रत्यक्ष भेटी-गाठी-मुक्कामातील त्यांच्या मोकळ्याढाकळ्या वावरण्यातून सातत्याने त्या ‘शुभेच्छा आणि शुभाशिर्वाद' झिरपत असत. त्यांचे स्पर्श, त्यांची साथ-सहवास हा न बोलताही बरेच काही सांगून जात असे. त्या साऱ्याला माझी पिढी मुकली आहे.

   ‘स्वतःपुरतेच पाहा, नातेवाईकांना जास्त जवळ करु नका, तुम्ही त्यांच्याकडे जास्त जाऊ नका म्हणजे ते तुमच्याकडे जास्त येणार नाहीत, नातेवाईक-मित्रमंडळींना घरी मुवकामाला बोलावू नका, जेवढ्यास तेवढे संबंध ठेवा, आपले-आपल्या मुलाबाळांचे करिअर जास्त महत्वाचे आहे, ते जास्त डिस्टर्ब होता कामा नये' असल्या फेजमध्ये आपल्यातील अनेकजण केव्हा गेले ते कधी कळलेही नाही. आणि नात्यांची घट्ट वीण उसवत गेली ती गेलीच! तिचे ‘डॅमेज कंट्रोल' करायला कुणीही पुढे आले नाही. तीन वर्षांपूर्वीच्या करोना साथीने घरातल्याच माणसांना जिथे ‘अस्पृश्य' ठरवले, अगदी घरातल्यांच्या मृतदेहांना सुध्दा हात लावण्याची प्राज्ञा नव्हती, तिथे नातेवाईक वगैरेंना कोण विचारतो? करोनाने नातेसंबंधांच्या वर्मावरच घाव घातला !

    आता दिवाळीला शुभेच्छा दिल्या जातात.. पण वाढत्या प्रमाणात समाजमाध्यमांवरुन! त्यांनी दिवाळी भेटकार्डांनाही जवळपास मोडीत काढले. लोक नातेवाईकांना भेटण्याऐवजी जवळच्या नाट्यगृहात किंवा अन्यत्र ‘दिवाळी पहाट' कार्यक्रमाला जाणे अधिक पसंत करु लागले आहेत, हेही मी पाहतो. कुटुंब एकाच जागी राहात असेल तर ठीक..पण अलिकडे अधिक रुपये, डॉलर, पौंड, येन, रुबेल कमावण्यासाठी कुटुंबेही विभागली आहेत. माझ्या पाहण्यात अशी अनेक वयस्क जोडपी आहेत, ज्यांच्या मुलांनी आपले करियर करण्यासाठी (की म्हाताऱ्या आईबापांपासून सुटका मिळवण्यासाठी?) परदेश गाठले आहे. तिकडचीच मुलगी, मुलगा पाहुन जन्मदात्यांना न विचारताच लग्नही उरकून घेतलं आहे. ते तिकडून भरपूर पैसे पाठवतात. बाळंतपण असेल तर तेवढ्यापुरते जन्मदात्यांना बोलावून मुल थोडं मोठं झालं की म्हातारा-म्हातारीची बोळवण करीत मायदेशी पाठवतात आणि नंतर मग आईबापांना भेटायला येतच नाहीत. परदेशातले ‘मेडिकल ट्रीटमेन्ट्‌स' म्हणे ‘एवसपेन्सिव्ह' आहेत, या सबबीवर आईबापांच्या विविध दुखण्यांवर उपचार भारतातच करायला भाग पाडतात. अशा वृध्द अनेक जोडप्यांचे दिवाळीतील भेसूर, भयाण, एकाकी, मजबूर चेहरे मला व्याकुळ करतात. या दोघांतील कुणी एक देवाघरी गेला तर उरलेल्याचे आयुष्य म्हणजे निव्वळ काळ्या पाण्याची सजाच! कोकणातील गावी गणपतीनिमित्त मुंबई-पुणेकर जाऊन आल्यावर गणेशोत्सव संपल्यानंतर ते भकास, एकाकी घर आणि अंगणाकडे शून्यात नजर लावून बसलेला म्हातारा किंवा म्हातारीचे फोटो समाजमाध्यमांवर अनेकजण फिरवतात. पण परदेशात कायमचे गेलेल्या मुला-मुलींविना एकाकी पडलेल्या म्हातारा-म्हातारीचे वास्तव हे त्याहुन अधिक सर्वव्यापी, दाहक आणि जळजळीत आहे.  

   बघा..म्हणजे दिवाळी आहे, मुले-सूना-जावई-नातवंडे सारे काही आहे, पैसाही मुबलक आहे, नातेवाईकही आहेत. पण तरीही कुणीही कुणाजवळ नाही. शेजार-पाजारचेच येऊन, भेटून शुभेच्छा देऊन आशीर्वाद घेऊन जात आहेत. कामवाली, केअर टेकर किंवा वृध्दाश्रमाचे व्यवस्थापन यांनाच आपले महाकुटुंब मानून दिवस ढकलायची वेळ अनेक वृध्द जोडप्यांवर आल्याचे बघायला मिळणे हे अधिक दुर्दैवाचे! आता कुणी म्हणेल की एवढा चांगला आनंदाचा वर्षभरातला सर्वात मोठा सण आणि तुम्ही कसली म्हाताऱ्यांची रडकथा लावलीय? आजूबाजूला काही चांगले, सर्वसमावेशक, सकारात्मक, विधायक, संरचनात्मक घडतच नाही की काय? तर होय! तेही घडतेय. हल्लीच्या पिढीचे अनेकजण अधिक प्रॅक्टीकल, करिअर ओरिएन्टेड आहेत. त्यांच्याकडे बऱ्यापैकी पैसाही खुळखुळतोय. आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे त्याचा ते सकारात्मक वापरही करताहेत. काही जण दिवाळीला अंधशाळा, वृध्दाश्रम, अनाथाश्रम, परित्यवतांची केंद्रे, सुधारगृहे, बालकाश्रम येथे जाऊन खाऊ-मिठाई वाटप करताहेत. काहीजण गरीब मुलांच्या शैक्षणिक खर्चाचा वाटा उचलताहेत. काहीजण गरीब मुलींना शैक्षणिक दत्तक घेत आहेत. त्यांच्या नावावर फिवस डिपॉझिट उघडून देत आहेत. रुग्ण, अपघातग्रस्त, संकटग्रस्त यांना मदतीचे आवाहन करणारा व्हाट्‌स अप संदेश मिळाला तरी मदतीला पुढे सरसावताहेत.

   आपल्या कुटुंबाप्रति, नातेवाईकांप्रति, समाजाप्रति, देशाप्रति असाच स्नेहभाव जपणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचेच पाहायला मिळो अशा सदिच्छा आणि या लेखाच्या तमाम वाचकांना, शुभचिंतकांना यंदाची दिवाळी आणि आगामी संवत्सर सुख समृध्दी, भरभराटीचे जावो यासाठी खूप खूप शुभेच्छा! शुभ दीपावली. - राजेंद्र गोपीनाथ घरत, उपसंपादक, दै. आपलं नवे शहर.

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

अब्रू गेली, अधिकाऱ्यांना अक्कल कधी येणार?