अशा जगलो आम्ही नवरात्री

सर्व आज्या आणि मावश्या झोपडपट्टी किंवा पुलाखाली राहतात. अशा सर्व आज्यांच्या घरी झोपडपट्टीत जाऊन आम्ही दिवा लावला आहे... म्हणुन मंदिरात यायला आम्हाला वेळच मिळाला नाही देवी..! यासाठी मी तुझी माफी मागणार नाही किंवा तू माफ करावंस अशी अपेक्षा सुद्धा ठेवणार नाही. कारण तू हल्ली मंदिरात राहत नाहीस, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे...आणि तू जर रोज आम्हाला रोज रस्त्यांवर दर्शन देत आहेस..तर मी कशाला येऊ मंदिरी ?

ऑक्टोबर महिना.... ! अर्थात भाद्रपद अश्विन..या महिन्यात देवीची प्रतिष्ठापना झाली. तिथून पुढे नऊ दिवस देवीच्या पूजनाचे नवरात्र म्हणून मनापासून स्वागत केले जाते. आपली आजी, आई, बहीण, मुलगी, सुन, नात, आत्या, मावशी आणि पत्नी! आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असलेल्या याच त्या दुर्गा माता!! यांच्यापुढे ताट घेऊन आरती करणे, उदबत्ती लावणे, कापूर लावणे, नारळ फोडणे आणि साडी अर्पण करणे म्हणजेच यांची पूजा.. असं नाही! या माता भगिनींना आनंद वाटेल, समाधान वाटेल, मुख्य म्हणजे सन्मान मिळेल अशी कोणतीही गोष्ट करणे म्हणजे तीची पुजा.

आईचा खरबरीत हात हातात घेऊन, तीच्या पदराला हात पुसत, दुसऱ्या हाताने तीच्या पुढे जेवणाचं ताट ठेवत, पायाशी बसून तिची चौकशी करणे हि त्या आईची पूजा...! काय म्हातारे जेवलीस का ? म्हणत काशाच्या वाटीने खोबऱ्याचं तेल भेगाळलेल्या पायावर चोळून लावणं... ही त्या आजीची पूजा... ! येडी का खुळी? इतकं कामं कुटं एकटीनं करायचं असतात होय येडे.... ! मी कशासाठी आहे... ? मला पण सांगत जा की गं बाय म्हणत, तिच्या खांद्यावर हात ठेवणे ही त्या बायकोची पूजा.... !!

अय झीपरे, हितं आमच्या फरशीवर नको उड्या मारू... तिथं आभाळात जाऊन झेप घे... तिथं काय अडचण आली तर मला हाक मार... मोठया भावाची ही दोन वाक्य, म्हणजेच बहिणीची केलेली पूजा..!!! आम्ही नवरात्री साजऱ्या केल्या नाहीत... पण अक्षरशः आम्ही नव रात्री जगलो...!

पहिला दिवा -  अन्नपूर्णा प्रकल्पाच्या माध्यमातून रस्त्या कडेला पडलेल्या निराधार आईंच्या हातात जेवणाचं ताट ठेवलं..! यांना निराधार तरी कसं म्हणावं ? यांना मुलं बाळं सुना नातवंडं सर्व आहेत.. पण, जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही..! बरोबर आहे, आंबा खावून, कुणी कोय जपून ठेवतो का ? आयुष्यभर आई बापाचा गोडवा पातेल्यात खरवडून घेतल्यावर शेवटी उरतंच काय ? कोयच ना ?? असो, लोकांनी उकिरड्यात फेकलेल्या या कोयी आम्ही साफ करून परत जमिनीत रुजवत आहोत... खतपाणी घालत आहोत....आम्हाला फळं नकोच आहेत, एक झाड जगलं, हेच आमच्यासाठी खूप आहे !

दुसरा दिवा-फाटक्या साडीत, रोज नवं आयुष्य जगणाऱ्या आज्ज्यांना  आणि महिलांना नव्या कोऱ्या साड्या दिल्या... एक? दोन ? तीन? नाही... तब्बल १३४१...!!! पुर्वी भीक मागणाऱ्या ज्या माता भगिनीनी भीक मागणे सोडून आता काम करण्याची तयारी दाखवली आहे, अशा माता भगिनीचे पाय धुवून...  पूजन करून त्यांना साड्या दिल्या आहेत. या उपक्रमातून त्यांचे मनोबळ आणखी वाढेल... त्यांचे समाजात कौतुक होईल आणि इतर भिक मागणाऱ्या माता भगिनीना सुद्धा काम करण्याची प्रेरणा मिळेल हा या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमात आम्हाला अनेकांनी मदत केली, पण मला कौतुक वाटले ते सौ.अनुश्रीताई भिडे आणि भिडे काका यांचे ... ज्यांच्या दहा फुटावरसुद्धा कोणी उभे राहणार नाही, अशा माझ्या भीक मागणाऱ्या लोकांचे पाय यांनी तबकात घेऊन धुतले...कुठुन येतं हे... ? कसं येतं.. ? आणि का ? काय मिळत असेल यांना..? या प्रश्नांची उत्तरे शोधत वेळ घालवण्यापेक्षा, मी अनुश्री ताई आणि भिडे काका यांचे पाय धुऊन तीर्थ प्राशन केले...!

तिसरा दिवा -भीक मागणे सोडलेल्या, परंतु शिक्षणाची वाट धरलेल्या कुमारीकांचे या नवरात्रात पाय धुवून पूजन केले. पूजन करण्यामागे, या मुलींचे कौतुक करणे आणि इतर मुलींना शिकण्याची प्रेरणा मिळावी हा हेतु होता. सौ सुप्रियाताई दामले, हिंदु महिला सभा, पुणे यांची ही संकल्पना होती... ! आम्ही या सर्व मुलींना शैक्षणीक साहित्य देवुन सरस्वती पूजन केले. संस्थेने माझ्या मुलींना ड्राय फ्रूटस दिले, मनोभावे त्यांचे कौतुक केले. मी आणि मनीषा बाजूला फक्त उभे राहून, आमच्या लेकींचे होणारे कौतुक पाहत होतो... ! आई आणि बापाला अजुन काय हवं ? माझ्या पोरींना ड्राय फ्रूट मिळाल्यावर, त्या पोरींनी तो पुडा फोडून मला आणि मनीषाला ड्राय फ्रूटचे घास भरवले.... काय सांगू राव.... हे ड्राय फ्रूट अश्रुंनी ओले होवून गेले.

चौथा दिवा -ज्या ताईंना कोणाचाही आधार नाही, अशा ४ ताईंना याच काळामध्ये नवीन व्यवसाय सुरू करून दिले! गणेश हॉटेल समोर, शिवाजीनगर कोर्ट पुणे, येथे यातील अनेक ताई रस्त्यावर किरकोळ वस्तू विक्रीचा व्यवसाय करत आहेत!! घुसमटलेल्या चार भिंती मधून या महिला बाहेर येऊन स्वतःच्या पायावर सन्मानानं उभ्या आहेत. हरलेल्या या माता परिस्थितीच्या नरड्यावर पाय देऊन पुन्हा उभ्या राहिल्या आहेत आमच्यासाठी हिच विजयादशमी !

पाचवा दिवा -ज्या महिलांना भीक मागणं सोडायचं आहे, अशा महिला माझ्याकडे काम मागत आहेत मी गाडगे बाबांचा भक्त आहे, गाडगेबाबांचे विचारसरणीला अनुसरून आम्ही अशा सर्व महिलांची एक टीम तयार केली आहे, या टीमला खराटा पलटण असं नाव दिलं आहे या माध्यमातून या महिन्यात पुण्यातील वेगवेगळे भाग स्वच्छ करवून घ्ोऊन त्यांना पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे ..कपडे दिले आहेत ....याव्यतिरिक्त त्यांच्या इतर गरजा सुद्धा भागवल्या आहेत.! आमच्या या टीमला पुणे महानगरपालिकेने स्वच्छता अभियानचे ब्रँड ॲम्बेसिडर केले आहे, यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट ! या सर्व आज्या आणि मावश्या झोपडपट्टी किंवा पुलाखाली राहतात. अशा सर्व आज्यांच्या घरी झोपडपट्टीत जाऊन आम्ही दिवा लावला आहे... म्हणुन मंदिरात यायला आम्हाला वेळच मिळाला नाही देवी.... ! यासाठी मी तुझी माफी मागणार नाही किंवा तू माफ करावंस अशी अपेक्षा सुद्धा ठेवणार नाही.... कारण तू हल्ली मंदिरात राहत नाहीस, याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.... आणि तू जर रोज आम्हाला रोज रस्त्यांवर दर्शन देत आहेस... तर मी कशाला येऊ मंदिरी ???

सहावा दिवा - ज्यांना विविध प्रकारचे गंभीर आजार होते अशा रुग्णांना, दवाखान्यात ॲडमिट करून उपचार केले. डोळे ऑपरेशन करून चष्मे दिले, दिव्यांग व्यक्तींना काठ्या कुबड्या आणि लागेल ते इतर वैद्यकिय साहित्य दिले. आमच्या परीने आम्ही असा नैवेद्य अर्पण केला.

सातवा दिवा - हे नऊ दिवस लोक अनवाणी पायाने रस्त्यावर चालतात....! माझ्या भीक मागणाऱ्या समाजाचे लोक वर्षानुवर्षे, अनवाणी पायाने चटके सहन करत जगत आहेत.. मग यांच्या पदरात अजुन पुण्य का नाही मिळाले ? याचा विचार करत आम्ही ही प्रथा बदलली.... या नवरात्रात ज्यांच्या पायी चप्पल नाही, अशा सर्वांच्या पायी चप्पल घातली.. ! माते तुला हे आवडलं नसेल, तर माझ्या तोंडात चप्पल मार, पण यांच्या पायी मात्र चप्पल राहू दे, उन्हात खूप पाय भाजतात गं !

आठवा दिवा -ज्यांनी आयुष्यभर पोरांच्या अंगावर मायेची चादर पांघरली, परंतु आता जे रस्त्यांवर आहेत, अशा रस्त्यावरील  सर्व आई बापांना, येणारे थंडीचे दिवस लक्षात घेवून गरम शाली आणि इतर कपडे दिले आहेत.

नववा दिवा - अनेक महिलांकडे अनेक प्रकारचे कला कौशल्य असते, या कला कौशल्याचा वापर करून यांना आणखी प्रशिक्षण देऊन, त्यांच्याकडून वस्तू तयार करवून घेऊन आपण त्या विक्री करणार आहोत आणि येणारा पैसा हा सर्व त्या महिलांना जाईल, असा विचार करत आहोत. अनेक भिक मागणाऱ्या महिलांना यामुळे एकाच वेळी व्यवसाय उपलब्ध होईल आणि त्या त्यांची घरं चालवू शकतील....यांना प्रशिक्षण देण्यासाठी, एका जागेची सोय करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.. परंतु आम्हाला अजून कोणतीही जागा मिळालेली नाही. कामाचं खूप कौतुक होतं...अवॉर्डस मिळतात .. सर्टिफिकेट मिळतात....

परंतु ‘अवॉर्ड आणि सर्टिफिकेटने आपण दुसऱ्याचं पोट नाही भरू शकत बाबा,' हे माझ्या माईनं (आदरणीय सिंधुताई सपकाळ यांनी) माझ्या कानात खूप पूर्वीच सांगितलं होतं...! असो....काहितरी होईलच...  हा नववा दिवा राखून ठेवलाय, त्या प्रशिक्षणाच्या जागेसाठी ...! पोराच्या जेवणाचा विचार करते ती आई....परंतु पोराच्या जीवनाचा विचार करतो तो बाप...! मला जे दिसते ते माझ्या पोराला सुद्धा दिसावं म्हणून जमिनीवरून कडेवर उचलून घेते ती आई...! पण मला जे दिसतंय, त्यापलीकडचं पोराला दिसावं म्हणून, पोराला डोक्यावर उचलून घेतो तो बाप...!! आपण सर्वजण समाज म्हणून आमची कधी आई झालात तर कधी बाप झालात.... !! आमच्यावर प्रेम आणि माया करतांना, तळागाळातल्या समाजाला समरसून मदत करताना, आपण सर्व सीमा ओलांडल्या...!  आमच्यासाठी हिच विजयादशमी.... हाच दसरा...!

या महिन्यात जे काही काम झालं  या महिन्यात जे काही काम झालं त्याचे सर्वस्वी धनी आपण आहात आणि म्हणुन ऑक्टोबर महिन्याचा लेखाजोखा आपणास सविनय सादर... !
 लेखनकाल -३१ऑक्टोबर २०२३ - डॉ अभिजित सोनवणे, डॉक्टर फॉर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

जग मिथ्या नाहीच मुळी!