जग मिथ्या नाहीच मुळी!

कीर्तनकार, प्रवचनकार निवृत्तीचा उपदेश करीत असतात; पण ते स्वतःही निवृत्ती अवस्थेला गेलेले नसतात. खऱ्या अर्थाने निरासक्त कोणालाच होता येत नाही. टिळा लावू दे, माळा घालू दे, जटा वाढवू दे,मुंडण करू दे, पटा रंगवू दे, श्वेतांबर वा पितांबर नेसू दे वा दिगंबर होऊन फिरू दे, शेवटी उघडे यायचे आणि जायचे हे मात्र निश्चित! जे दिसते ते सत्य बाकी सब मिथ्या!

जीवनामध्ये कधी रंगोत्सव येतात तर कधी गंधोत्सव! रंगाची जागा गंधाने वा गंधाची जागा रंगाने घ्ोतली तरी उत्सव आपला आहेच. मानवी मनाला जात्याच उत्सवाचं वेड असते. कधी मनपाखरू विविध रंगात न्हालेल्या पंखांनी आरस्पानी नभाखाली घिरट्या घालीत राहाते. तर कधी गंधात बुडून कोवळ्या सूर्याकिरणात निरागस फुलपाखरासारखं रुंजी घालत असते. मनपाखरू शब्दही मोठा चमत्कारिक आहे. कुणी मनाला वाऱ्यासमवेत तुलित करते. मारुततुल्यवेगं! ते खरंही असेल. पण सामान्य माणूस हा मूर्ताचा उपासक असतो. डोळ्याने दिसणाऱ्या गोष्टीचे त्याला अप्रूप असते. कानाने ऐकलेलं त्याला भावतं. मूर्ताभोवती त्याच्या भावभावना लवकर तादात्म्य पावतात. वारा अमूर्त असल्याने त्याचा स्पर्श जाणवत असला तरी आकृती साकारत नाही. त्यामुळे सर्व सामान्य माणूस अमूर्ताचा उपासक बनू शकत नाही. ती अवस्था फार वरची म्हणायची. ती खरी साधकावस्था!

तर हो, मानवी आयुष्य जीवनोत्सवात रमणारे. जीवन एकापरीने उत्सवच नाही का? सुखदुःखाच्या किनारी तेवढ्या बदलणार. जीवनाचं महावस्त्र इथून तिथून सारखंच. कधी वसंत फुलून येतो. कधी ग्रीष्म तपस्वी बनून पानगळीची पखरण करून जातो. कधी वैशाखाचा वणवा तर कधी श्रावणाच्या रेशीम धारा! कधी सोसाट्याचा वारा तर कधी मधुगंधित अनिलालाचा मोरपिसी स्पर्श. सारं कसं स्वप्नवत, तरीही सत्य! जग मिथ्या आहे असे तत्ववेत्यांना म्हणायचे तर खुशाल म्हणू दे. पण जीवनाचा अखंड आनंद उपभोगणाराला ते सत्यच वाटते.

मृत्यू अटळ आहे, हे त्रिकालाबाधित सत्य असले तरी जीवनात मौज आहे हेही नाकारून चालणार नाही.केवळ एक दिवसाचं आयुष्य घेऊन येणारी बोटांच्या नखांएवढी चिमुकली फुलपाखरं आपण पाहिली आहेत का? त्या एका दिवसात बेभान होऊन या फुलावरून त्या फुलावर थिरकत, रंगांची उधळण करीत हिरव्या गवतातून अचानक बाहेर पडून हळदकुंकवाचा सडा सांडतांना ज्यांनी पाहिले असेल ते हे जग मिथ्या आहे असे मानणार नाही. अंधाऱ्या रात्री नभाच्या काळ्या पैठणीवर तारकाफुलांच्या काढलेल्या बेलबुट्या, चांदण्यारात्री रजनीनाथाच्या सहवासात सजणारी ताऱ्यांची मैफल, कृष्णघनांतून स्त्रवणाऱ्या अमृत धारा पृथ्वीच्या कलशात पडून ओथंबून वाहत असताना धरतीच्या कणाकणांत होणारी नवथर संजीवन हालचाल, कालांतराने धरतीच्या गर्भातून बाहेर पडणाऱ्या तृणांकुरांची लयबद्ध सळसळ, गवताची हिरवी पाती, गुलेगुलजार कळ्या, बहुरंगी फुले, रसदार फळे हे सारं मिथ्या मानायला माझं मन तयार नाही.

बालपणी आईच्या स्तनाग्रातून स्रवणाऱ्या अमृताहून गोड असलेल्या दुग्धधारा आणि तिच्या मांडीची उशी करून तीवर डोके ठेवून घेतलेला निद्रानंद, तिने चिऊकाऊचे नाव करून भरलेला एक एक घास, बालपणीचे रुसवेफुगवे, हसणे-रडणे माझ्या स्मृति कोशांत असे काही घर करून बसले आहे की गंभीर चेहऱ्याच्या दर्शनशास्र्त्यांना भलेही ते मिथ्या वाटत असले तरी मी मात्र तसे मानायला तयार नाही. माझ्या नेत्रांना जे दिसतं, वाणीतून जे व्यक्त होतं, श्रवणेंद्रियाद्वारे जे मनात रूजतं, नासिकेची गंधवेणा जी जाणीव करून देते, जिव्हेद्वारा रसरूचीचा जो अनुभव होतो,  स्पर्शाद्वारे तरल भावसंवेदनांची जी अनुभूती होते, त्यातून मी सुखावतो वा दुखावतो, ते सारे मला सत्य वाटते. जन्मापासून अंतापर्यंत जाणवणारे वैश्विक ऋणानुबंध केवळ भास आहेत, हे मनाला पटत नाही. संन्यासी याबाबतीत काहीही बको, मी संसारी माणूस मात्र ते सत्यच मानणार आहे. जग मिथ्या ब्रह्म सत्य हा युक्तिवाद त्यांच्या दृष्टीने खराही असेल, पण हाडामासाच्या माणसाला तो रुचायला हवा ना! जीव, जीवात्मा, जगत्‌ ईश्वर अशा विविध संज्ञांचे चिकित्सक अभ्यासकांना काय वाटायचे ते वाटू दे. तेही सर्व सामान्यासारखे जन्माला येतात, आपला शरीरधर्म सांभाळतात आणि जगरहाटी प्रमाणे एक दिवस तेही देह ठेवतात. मग या चर्वितचर्वणातून ते काय साधतात हे त्यांना अथवा त्यांच्या देवालाच ठाऊक! पुन्हा नव्याने सुरवात आणि तसाच शेवट. असे असताना जिवंतपणीचे अनुभव मिथ्या हे मला तरी मान्य होण्यासारखे नाही.

जगाचा अंत होईल तेव्हा होवो. तो पाहायला मी असणार नाही. माझ्या आधी जे घडले त्याच्याशी माझा काही एक संबंध नव्हता. माझ्यानंतर जे घडेल त्याच्याशीही माझा काही संबध असणार नाही. मग मी भूत भविष्याचा वेध कशासाठी घेऊ. माझे आयुष्य जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंच्या अतरालात बद्ध आहे. माझ्या दृष्टीने तेच सत्य आहे. मी कर्मयोगी आहे. कर्मयोगी हा ज्ञानयोगी नसतो अथवा ज्ञानयोगाचे कर्मयोगाशी नाते नसते, असे म्हणता येणार नाही.

खरे तर कर्मयोगाकडूनच ज्ञानयोगाकडे वाटचाल होत असते. त्यामुळे नामभेदांचे वादंग माजविण्यापेक्षा त्याचा आस्वाद घेता आला पाहिजे. कीर्तनकार, प्रवचनकार निवृत्तीचा उपदेश करीत असतात; पण ते स्वतःही निवृत्ती अवस्थेला गेलेले नसतात. खऱ्या अर्थाने निरासक्त कोणालाच होता येत नाही. टिळा लावू दे, माळा घालू दे, जटा वाढवू दे,मुंडण करू दे, पटा रंगवू दे, श्वेतांबर वा पितांबर नेसू दे वा दिगंबर होऊन फिरू दे, शेवटी उघडे यायचे आणि जायचे हे मात्र निश्चित! जे दिसते ते सत्य बाकी सब मिथ्या!
-प्रा. डॉ.राम नेमाडे. 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

मुशाफिरी