सर्वसामान्यांच्या न्यायासाठी रिपब्लिकन पक्ष रस्त्यावरची लढाई लढेल - जिल्हाध्यक्ष महेश खरे 

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात स्थानिक प्रकल्पग्रस्त, शहरी आणि झोपडपट्टीतील नागरिकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आजही सोडवले गेले नाहीत. त्यामुळे आगामी काळात सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष जनआंदोलन उभारणार असून नवी मुंबईकरासाठी रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष महेश खरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.  

 रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार गत महिन्यात महेश खरे यांची नवी मुंबईच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली आहे. नूतन जिल्हाअध्यक्ष महेश खरे यांनी शुक्रवारी वाशी येथे आयोजित पत्रकार परिषदेत नवी मुंबई जिल्हा कार्यकारणी जाहीर केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना खरे यांनी नवी मुंबई शहर हे उद्योगधंद्यांची नगरी म्हणून ओळखली जाते. येथील बेरोजगार आणि सुशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने रोजगार मेळावे आणि व्यवसाय प्रशिक्षण शिबिर राबवणे, स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांना सिडको, महापालिका तसेच एमआयडीसीमध्ये नोकरी मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.  

तसेच नवी मुंबई महापालिकेच्या कंत्राटी कामगारांना कायम करुन घेणे, कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे तसेच मागासवर्गीय जाती व जमातीच्या कामगारांना पदोन्नती देणे, नवी मुंबई शहरातील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणे, ऐरोली आणि वाशी टोलनाका येथे नवी मुंबईतील वाहनचालकांसाठी टोलमुक्त करणे आदींसह सामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी पुढील काळात संघर्ष करणार असल्याचे महेश खरे यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर प्रदेश सचिव चंद्रकांत कांबळे, कार्याध्यक्ष विजय कांबळे, टिळक जाधव, एल.आर.गायकवाड, प्रकाश जाधव, रामचंद्र विकेकरी यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.   

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पक्षविरोधी कार्यवाही केल्यामुळे युवा मोर्चाचे अध्यक्ष शेखर जगन्नाथ पाटील यांची बीजेपी मधून हकालपट्टी