राज्यातील उद्योग बाहेर जात असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन
नवी मुंबई -: महाराष्ट्रात होऊ घातलेले मोठमोठे प्रकल्प एका पाठोपाठ परराज्यात म्हणजे परस्पर गुजरातला पळवण्यात येत असल्याचा आरोप करीत त्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तर्फे वाशीतील छञपती शिवाजी महाराज चौकात गाजर दाखवून निषेध आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात होऊ घातलेले वेदांता फॉक्सकॉन,मरीन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिवाईस पार्क असे सर्व मोठे उद्योग महाराष्ट्र बाहेर गुजरातला हलवल्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प देखील बडोद्याला पळविण्यात आला आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात उत्कृष्ठ इन्फ्रास्ट्रक्चर, चोवीस तास वीज, मुबलक पाणी व सुशिक्षित तरुण या सगळ्या सोयीच्या गोष्टी असताना देखील, या राज्यातून प्रकल्प बाहेर गुजरातला जात आहेत. त्यामुळे उद्योगांचे विमान गुजरातला तुपाशी आणि बेरोजगारीचे गाजर राज्यातील तरुणांना ठेवत त्यांना उपाशी ठेवले जात असल्याचा आरोप जिलाध्यक्ष नामदेव भगत यांनी केला असून.यावेळी काळे विमान उडवत गाजर दाखवत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी युवक अध्यक्ष किशोर आंग्रे, महिला अध्यक्षा सलुजा सुतार,माजी नगरसेवक संदीप सुतार तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.