सिडको’च्या गृहनिर्माण योजनेत १० हजार नागरिकांचे अर्ज

नवी मुंबई ः परवडणाऱ्या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी आणि अन्य पायाभूत सोयी सुविधांमुळे नवी मुंबईमध्ये वास्तव्य करण्यासाठी तळोजा नोड सर्वसामान्य नागरिकांकरिता उत्तम पर्याय ठरत आहे. सिडकोच्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील गृहसंकुले तळोजा नोडमध्ये साकारण्यात आली आहेत. ‘सिडको’ने नुकत्याच आणलेल्या गृहनिर्माण योजना अंतर्गत तळोजा नोड मधील ५,७३० परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. ‘सिडको’च्या सदर गृहनिर्माण योजनेला उत्तम प्रतिसाद लाभत असून आत्तार्पयंत १० हजार नागरिकांनी या गृहनिर्माण योजनेत अर्ज नाेंदणी केली आहे.

सिडको आपल्या गृहनिर्माण योजनांद्वारे सातत्याने सर्वसामान्य नागरिकांकरिता नवी मुंबईमध्ये परवडणाऱ्या दरातील घरे उपलब्ध करून देत असते. ‘सिडको’च्या बहुतांशी गृहनिर्माण योजनांमधील संकुले तळोजा नोडमध्येही साकारण्यात आली आहेत. ‘सिडको’कडून २६ जानेवारी रोजी ५,७३० घरांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ५,७३० घरांपैकी १,५२४ घरे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी आणि उर्वारित ४,२०६ घरे सर्वसाधारण प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत. सदर योजनेकरिता २४ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना तळोजा नोडमध्ये आपले हक्काचे घर घण्याची आणि नवी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरामध्ये वास्तव्य करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे, असे ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी स्पष्ट केले आहे.

तळोजा नवी मुंबईतील वेगाने विकसित होणाऱ्या नोडपैकी एक आहे. मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे आणि ‘सिडको’चा मेट्रो प्रकल्प, यामुळे या नोडला उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. ‘मेट्रोे’चे आगार तळोजा येथे असून मेट्रो मार्गेही सदर नोड सीबीडी-बेलापूरला जोडला जाणार आहे. या नोडमधील काही क्षेत्र शाळा, पदवी महाविद्यालये, प्रार्थनास्थळे, रुग्णालये, समाजकेंद्रे, वसतिगृहे आदि सामाजिक उद्देशांकरिता राखीव आहे. मेट्रो रेल्वेच्या स्थानकांलगत वाणिज्यिक उपक्रमांकरिता काही क्षेत्र ‘सिडको’कडून निश्चित करण्यात आले आहे. यामुळे तळोजा नोडमध्ये मोठ्या प्रमाणावर वाणिज्यिक संधी निर्माण होणार आहेत. परवडणाऱ्या दरातील घरे, कनेक्टिव्हिटी, रोजगार, वाणिज्यिक प्रकल्प यामुळे तळोजा नोड नवी मुंबईतील वास्तव्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरत आहे. -डॉ.संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक-सिडको.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल पालिकेच्या मालमत्ता करास नागरिकांचा प्रचंड विरोध