पर्यावरणपूरक चळवळीसाठी माझी वसुंधरा अभियान -अभिजीत बांगर
नवी मुंबई ः पर्यावरणाच्या संरक्षण-संवर्धनाची व्यापक चळवळ उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण-वातावरणीय बदल विभागाने ‘माझी वसुंधरा’ अभियान सुरु केले असून यामध्ये मागील वर्षी नवी मुंबई महापालिकेला राज्यातील द्वितीय क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. सदरचे मानांकन उंचावून ‘निश्चय केला-नंबर पहिला’ असे उद्दिष्ट साकारण्यासाठी महापालिकेने गतीमान कार्यवाहीस सुरुवात केली आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावर्षी अभियानाला सामोरे जात असताना करण्यात आलेल्या कामांचा ३ फेब्रुवारी रोजी सविस्तर आढावा घत यामध्ये अधिक व्यापक स्वरुपात काम करण्याचे निर्देश दिले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, शिक्षण विभागाचे उपआयुक्त जयदीप पवार, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या निसर्गाच्या पंचतत्वांना अनुसरुन त्यांचे संरक्षण-संवर्धन करण्याचे अभियानाचे उद्दिष्ट असून ते साध्य करण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणावर अभियानाची जनजागृती करावी. व्यापक लोकसहभागावर भर द्यावा, असे आयुक्त अभिजीत बांगर यावेळी म्हणाले.
माझी वसुंधरा अभियानात पंचतत्वांवर आधारित उपक्रमांना विविध गुण असून नमूद निकषांनुसार कार्यवाही करावयाची असते. नवी मुंबई महापालिकेचा नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबविण्यावर भर असतो. त्या अनुषंगाने पर्यावरण संरक्षण, संवर्धनाचा संदेश जास्तीत जास्त नागरिकांर्पयंत पोहोचण्यासाठी शालेय स्तरापासून ज्येष्ठांर्पयंत सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग असणारे उपक्रम आठही विभाग कार्यालय क्षेत्रात व्यापक स्वरुपात राबविण्यावर भर देण्यात यावा. या अनुषंगाने शाळांमध्ये मुलांच्या मनावर लहान वयापासूनच पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यादृष्टीने शाळांमध्ये पर्यावरण विषयक निबंध, चित्रकला, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, अशी सूचना आयुक्तांनी शिक्षण विभागाला केली.
दरम्यान, ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२२’ला निर्धाराने सामोरे जात असताना ‘माझी वसुंधरा’ अभियानामध्येही नवी मुंबई महापालिकेने कार्यवाहीला सुरुवात केलेली असून नागरिकांनीही प्रदुषणमुक्त आणि पर्यावरणपूरक नवी मुंबईच्या वाटचालीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.