‘लिडारे’द्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण सुरु

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे लिडार तंत्रज्ञान वापरुन सर्वेक्षण करण्यात येत असून याबाबतच्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी ४ फेब्रुवारी रोजी घतला. तसेच येत्या जुलै अखेरर्पयंत पहिल्या टप्प्यातील कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित एजन्सीला दिले.

याप्रसंगी शहर अभियंता संजय देसाई, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, कार्यकारी अभियंता सुनिल लाड तसेच संबंधित एजन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी एजन्सीमार्फत लिडारद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याच्या कार्यपध्दतीची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. यामध्ये मालमत्तांचे प्रत्यक्ष जागी सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याकरिता विशिष्ट ॲपही तयार केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ड्रोनद्वारेही आकाशातून सर्वेक्षण करण्यात येणार असून ड्रोनद्वारे सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेली विविध विभागांची शासकीय मंजुरी मिळविण्याचे काम जलद गतीने करण्यात येत आहे. यामध्ये कोणत्याही अडचणी जाणवल्यास महापालिकेमार्फत सहकार्य करण्यात येईल, असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूचित केले.


नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील वाढत्या नागरिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेस मालमत्ता कराद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ व्हावी. तसेच महापालिकेची आर्थिक स्थिती अधिक सुधारण्याच्या दृष्टीने भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस मॅपींग) यावर आधारित लिडार तंत्रज्ञानावर आधारित सर्वेक्षण करण्यात येत आहे.
याद्वारे महापालिकेच्या मालकीच्या मालमत्ता तसेच शहरातील जलवाहिन्या, मलनिःस्सारण वाहिन्या, पथदिवे, विविध नागरी सुविधा यांची माहिती अद्ययावत होणार असून या सर्वेक्षणाचा उपयोग महापालिका क्षेत्रातील सर्क्रिंगीण विकासाच्या नियोजनाकरिता उपयोगी होणार आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील सर्व मालमत्तांबाबतची पूर्ण आणि अचूक माहिती महापालिकेस उपलब्ध होऊन उत्पन्नात वाढ होणार आहे.


दरम्यान, या सर्वेक्षणामध्ये ३६० डिग्रीमध्ये विस्तीर्ण सर्वेक्षण होणार असून यामध्ये मोबाईल मॅपींग सिस्टीम वापरुन पायाभूत पातळीवरील प्रतिमा संपादित केली जाणार आहे. पायाभूत सर्वेक्षणासोबतच नवी मुंबई महापालिका क्षेत्राचा बेस मॅप अद्ययावत केला जाणार असून त्यासह इंटीग्रेशन केले जाणार आहे. सदर सर्व करत असताना त्यामध्ये महापालिका क्षेत्रातील वृक्षगणनाही करण्यात यावी. तसेच सदर माहिती संकलन आणि त्यावरील संपादनासाठी साधारणतः १०० कर्मचाऱ्यांना हॅन्डस्‌ ऑफ ट्रेनिंग दिले जाणार असून साधारणतः ५० कर्मचाऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. याबाबतची विस्तृत माहिती घत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी विहित कालावधीत आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पर्यावरणपूरक चळवळीसाठी माझी वसुंधरा अभियान -अभिजीत बांगर