न्हावा शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसानभरपाईचे वाटप


नवी मुंबई ः एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे आणि वाशी येथील ४६० मच्छीमार बांधवांना बेलापूरच्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे नुकसान भरपाई मिळाली आहे. यासंदर्भात एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली असून सद्यस्थितीत दिवाळे, बेलापूर आणि सारसोळे गाव येथील एकूण ८२ मच्छीमार बांधवांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी १ लाख ९२ हजार रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित पात्र मच्छीमारांनाही लवकरच नुकसान भरपाई मिळणार असून सदरची प्रक्रिया सुरु असल्याची तसेच दुसऱ्या टप्प्याची नुकसान भरपाईही त्वरित मिळणार असल्याची माहिती आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी, याकरिता मी गेली ३ वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे तसेच वाशी गांव येथील कोळी बांधव मासेमारी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एमएमआरडीएतर्फे न्हावा-शेवा तेशिवडी सी-लिंक कॉरीडोअर ब्रिजचे काम समुद्रातून होत असल्यामुळे नवी मुंबईतील स्थानिक मच्छीमार कोळी बांधवांना सदर परिसरात मासेमारी करण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला असून त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. न्हावा-शिवडी सागरी पुलाच्या कामामुळे सदर ठिकाणी मासेमारी करणाऱ्या शेकडो स्थानिक कोळी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजुनही बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने त्यांची अत्यंत दयनीय अवस्था निर्माण झाली आहे, असे सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

     

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘लिडारे’द्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण सुरु