जागतिक कर्करोग दिनानिमित्त पोस्टर डिझाईन स्पर्धा

नवी मुंबई : कर्करोग (कॅन्सर) या आजारामुळे जगात प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर जिवितहानी होताना दिसते. त्यामुळे कर्करोगाविषयी मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण व्हावी याकरिता नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात.

      असाच एक उपक्रम 4 फेब्रुवारी या जागतिक कर्करोग दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असून या अंतर्गत लोकसहभागातून कर्करोगाविषयी जनजागृती व्हावी याकरिता पोस्टर डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये मोठ्या प्रमाणावर कल्पक दृष्टी असते. या नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर कर्करोगाविषयी जनजागृतीत व्हावा ही भूमिका नजरेसमोर ठेवून 15 ते 25 वर्षे वयोगटातील युवकांसाठी महानगरपालिकेने पोस्टर डिझाईन स्पर्धा आयोजित केली आहे. याकरिता युवकांनी ए थ्री आकाराच्या को-या कागदावर उभ्या किंवा आडव्या स्वरुपात मराठी / इंग्रजी भाषेतील कलात्मक पोस्टर 300 पीपीआय रिझॉल्युशनमध्ये [email protected] या इमेल आयडीवर 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत पाठवावयाचे आहे.

      पोस्टर डिझाईन पाठविताना फाईल नेमच्या ठिकाणी स्पर्धकाने आपले पूर्ण नाव ठेवावयाचे आहे. सदर स्पर्धेतील उल्लेखनीय पोस्टर डिझाईनला आकर्षक पारितोषिके दिली जाणार असून डिझाईनचे सर्व हक्क नवी मुंबई महानगरपालिकेकडे असणार आहेत. तर इंग्रजी डिझाईन अंतिम निवडीत असल्यास त्यांस मराठी रूपांतरित डिझाईन देणे अनिवार्य राहील. ई मेलव्दारे ऑनलाईन डिझाईन पाठविण्याऐवजी डिझाईन प्रिंट केलेली प्रत पाठवावयाची असल्यास ती नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, आरोग्य विभाग, तिसरा मजला, सेक्टर 15 ए, पामबिच जंक्शन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - 400614 या पत्त्यावर दि. 3 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जमा करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

      तरी कर्करोगाविषयी नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या पोस्टर स्पर्धेमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलात्मक प्रतिभेला व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणा-या स्पर्धात्मक संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कोळी बांधवांना करंजा मच्छिमार सहकारी सोसायटीच्या निवडणूकीची प्रतिक्षा