देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी। राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी

भल्या पहाटेच रामाचे स्मरण करावे. रामाने एकदा अंतःकरणात प्रवेश करून ते भरून टाकले की इतरविकारांना तिथे येण्यास जागाच उरणार नाही. त्यांना तिथे यावेसेच वाटणार नाही. पहाटेच घेतलेला हा आनंदाचा, निर्भयतेचा अनुभव दिवसभर ऊर्जा पुरवीत राहील.

सुखानंदकारी निवारी भयाते।
जनी भक्तीभावे भजावे तयाते।
विवेके तजावा अनाचार हेवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा । श्रीराम ६९।

दिवसाची सुरवात रामाच्या चिंतनाने करावी हे समर्थ सांगत आहेत. चिंतनाचा विषय असलेल्या रामाच्या रूपाचे, गुणांचे, सामर्थ्याचे वर्णन करीत आहेत. ज्याची भक्ती करायची तो राम सुख देणारा, अंतःकरणात आनंदनिर्माण करणारा, सर्व भयाचे निवारण करणारा आहे. म्हणून भक्तीभावाने त्याचे भजन करावे. त्याचा आश्रयकरून त्याच्या सहवासात निर्भय होऊन, निश्चिंत होऊन रहावे. माणसाला सहजच सुखाची आशा असते.आनंदाची ओढ असते. जगातील विषयांत सुख आहे, ते प्राप्त झाल्याने आनंद आहे असे लोकांना वाटत असते. पण तसा अनुभव सातत्याने येत नाही. सुख मिळाले असे वाटेपर्यंत ते निसटून जाते. आनंद झाला असे वाटेपर्यंत तो विरजून जातो. याचे कारण अंतःकरणातील भय, द्वेष, मत्सर इ. विकार. आपल्याला काही मनाजोगे लाभले तर ते कायमचे टिकेल ना, कोणी ते हिरावून तर घेणार नाही ना, कोणाची दृष्ट तर लागणार नाही ना, ह्या भयाने मनुष्य ग्रस्त होतो. तिथेच सुखाला ओहोटी लागते. आपल्याला काही लाभ झाला याचा आनंद इतर कुणाचा त्याहीपेक्षा मोठा लाभ पाहताच ओसरतो. द्वेष, मत्सर इ. विकारांमुळे आनंदाला विरजण लागते. माणसाच्या मनात प्रत्येक क्षणाला अनंत कामना जन्म घेत असतात. एक इच्छापूर्ण झाली. बरे वाटते. तेवढ्यात नवी इच्छा निर्माण होते. बरे वाटणे संपते. समाधानाची स्थिती अल्पकाळ टिकते. अपूर्ण जगातून पूर्ण आनंद शोधण्याच्या अट्टाहासामुळे हे घडते.

...म्हणून समर्थ सांगतात, जो सुखाचा, आनंदाचा ठेवा आहे त्याचा आश्रय घ्या. तिथे आनंदाचा शोध घ्या. ‘पूर्णानंद हे भगवंताचे स्वरूप आहे. त्याची खरी ओढ लागली की जगाविषयी अलिप्तपणा निर्माण होते. आशा, अपेक्षा संपतात. सर्वसामर्थ्यवान, सर्वसत्ताधीश भगवंताचा मोठा आधार वाटतो. भय संपते. मात्र हा अनुभव येण्यासाठी आपले अंतःकरण निर्मळ असावे लागते. आचरण शुद्ध असावे लागते. जगाला दाखवण्यासाठी भगवंताचे भजन करायचे पण आपल्या विचार-वर्तनात विधी-निषेध, न्याय-नीती सांभाळायची नाही असे धोरण चालत नाही. हा दंभ होतो. अंतःकरणात कोणताही विकार लेशमात्र जरी शिल्लक असेल तरी भगवंताचा अनुभव येत नाही. अर्थात संपूर्ण आनंदाचा अनुभव येत नाही. म्हणूनच विवेकाने अंतःकरणातील विकार दूर करावेत. दुराचार-दुर्वतन सर्वथा टाळावे. हेवा-दावा, मत्सर, ईर्ष्या यांपासून पूर्णतः दूर रहावे. यासाठी सातत्याने आणि सावधपणे प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच समर्थ विवेकाची आवश्यकता नमुद करतात. विवेक जागृत असेल तरच जे उचितत्याचा स्वीकार आणि अनुचित त्याचा त्याग करता येतो. अन्यथा सर्व मनमानी भोंगळ कारभार होतो. सुख, आनंद दूरच राहतात. मनस्ताप मात्र होतो.

सर्व प्रकारच्या ताप, भय, दुःखापासून सुटका करून घ्यायची असेल तर अत्यंत आनंददायी असे रामाचे नाम घ्यावे. भल्या पहाटेच त्याचे स्मरण करावे. रामाने एकदा अंतःकरणात प्रवेश करून ते भरून टाकले की इतर विकारांना तिथे येण्यास जागाच शिल्लक राहणार नाही. त्यांना तिथे यावेसेच वाटणार नाही. पहाटेच्या वेळेस घेतलेला हा आनंदाचा, निर्भयतेचा अनुभव दिवसभर ऊर्जा पुरवीत राहील. लहान वयात, तरुण वयात भक्तीची गोडी लागली तर पुढच्या संपूर्ण जीवनात भगवंताच्या सामर्थ्याचा अनुभव येत राहील. प्रभात काळाचे, प्रारंभीच्या काळाचे ते महत्त्व आहे.
जय जय रघुवीर समर्थ   -सौ. आसावरी भोईर 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

व्यापार संवर्धनासाठी स्टार्ट अप्स सक्षम असणे गरजेचे