निसर्गाच्या लहरी..!     

रानात रात्र रंगत चालली होती झाडावरचे पशुपक्षी निशब्द झाले होते. वरात किड्यांनी अंधाऱ्या रात्री झकास सूर धरला होता. आकाशामध्ये त्यादिवशी चांदण्या भयंकर कमी दिसत होत्या. दादाच्या कवटीच्या झाडावर घुबड एकसारखे ओरडत होते आणि वातावरण अधिकच भेसूर मनाला वाटत होते. आजी शेतात राहायला आल्यापासून शेतामध्ये काय काय घडले त्या गोष्टी रुपात सांगत असे. निसर्गाचे वर्णन आजी हुबेहुब सांगत असल्यामुळे माझ्या डोळ्यापुढे चित्र जसच्या तसे उभे राहत होते. एखादा विषय गोष्टीतून गंभीर आणि भयानक ऐकायला कानावर आला तर मनाला भीती वाटत असे.

 आज आजी निसर्गाच्या लहरी कशा असतात हे सांगत होती. घरातील स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत आजी गोष्ट संपवून टाकत होती. वर्षात बारा सण हे कसे असतात त्याचीसुद्धा गोष्ट आजी सांगत असे. इतकी आजी ज्ञानी होती. माझ्या काही वेळा मनाला वाटत असे जन्म घेताना अशी काही ज्ञानी माणसे या जगात जन्माला येतात आणि स्वतःच्या ज्ञानातून अज्ञान समाज सुज्ञान करतात. खरंतर ही गोष्ट अतिशय चांगली अशीच आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातसुद्धा संतांनी अज्ञान लोकांना एक चांगला भक्ती मार्ग दाखवून दिला आहे. भक्तिमार्ग हा विषय नसता तर या जगातील काय अवस्था झाली असती हे सांगणे कठीण आहे. आजी मागील दोन वर्षाच्या पाठीमागची गोष्ट सांगत होती. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्वारीचे पीक अतिशय जोमात आले होते. प्रत्येक शेतकरी आनंदात होता. कारण ज्वारीच्या एका ताटाला कमीत कमी दोन किलो ज्वारी उतारा पडणारच. अशी मनात अभिलाषा धरून शेतकरी वर्ग आनंदात होता. तोंडावर दिवाळी आली होती यावर्षी पाऊस काळ संपला याची खात्री सर्व शेतकरी वर्गाला झाली होती. आता ज्वारीच्या कंसाला फुलकळी भरपूर टचाटून भरली होती आता कशाची भीती नाही. ज्वारी भरपूर पिकणार अशी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनाला वाटत होते....।

... पण अचानक एके दिवशी निळे आभाळ काळे दिसू लागली व काळे ढग आकाशात जमू लागले. दुपारपर्यंत सूर्यदेवानं चांगली हजेरी लावली होती. निसर्गाची लहर बदलली आणि मध्याव आलेला सूर्य आभाळात झाकारला गेला आणि दिवसा अंधार सगळीकडे पडू लागला वातावरण बदललेले पाहून भक्ष शोधायला गेलेले पक्षी पिलाच्या आशेने घरट्याकडे पळू लागले. पक्ष्यांनासुद्धा वाटले असेल निसर्गाच्या लहर बदललेली आहे. संपूर्ण वातावरण काळवंडून गेले. भीतीपोटी पशुपक्षी पश्चिमेकडून पूर्वेकडे आकाश मार्गाने पळत होते. गोठ्यामध्ये गाई म्हशी वैरण न खाता त्यांना सुद्धा जणू पाऊस येणार आहे असावा, अशी चाहूल लागली होती. काही वेळातच विजा चमकून निसर्गाला वेडावून दाखवू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. हत्तीच्या सोंडेसारखे पावसाचे थेंब पिकावर व जमिनीवर पडू लागले आणि पाऊस वाढला. काही वेळातच वातावरणात बदल झाल्यामुळे पावसाबरोबर वारासुद्धा वाहू लागला. वाऱ्याबरोबर पाऊससुद्धा पुढे पुढे पळत होता. पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळू लागले. सकाळपासून दुपारपर्यंत मजेत असणारा शेतकरी एका क्षणात नाराज झाला आणि आणि पाऊस अधिकच वाढू लागला. दुपारपासून रात्री बारा वाजेपर्यंत एक सारखा पाऊस धरतीवर पडतच होता. या पावसाच्या आवाजाने व विजेच्या आवाजांने गोठ्यात असणारी गाई वासरे हंबरू लागली. इतके वातावरण त्यावेळी गंभीर झाले होते.

मोठ्या पावसामुळे शेतामध्ये पिकामध्ये कमरे एवढे पाणी साचून राहिले होते. आपल्या छपरातसुद्धा भरपूर पाणी शिरले होते. पाणी छपरात घुसल्यामुळे संपूर्ण स्वयंपाकाची चूल पाण्याखाली झाकून गेली होती. जळणसुद्धा संपूर्णपणे भिजून गेले होते.  घरातील सारी कपडे अंथरून पांघरूण खाटेवर ठेवल्यामुळे ते तेवढे चांगले राहिले. हा बाका प्रसंग पाहून शेजारच्या आत्याने आमच्यासाठी त्या दिवशी स्वयंपाक तयार केला होता. पाऊस वाढत आहे आमची म्हातार बाई स्वयंपाक कसा करणार? कारण म्हातार बाईच्या घरात शंभर टक्के पाणी शिंरले असणार. आपला शेजारी आहे, शेजारधर्माला आपण मदत करायची संकटाच्या वेळी हे आपले कर्तव्य आहे. प्रत्येक वेळी संकटाच्या वेळी आमचा शेजार धर्म धावून आला आहे आणि अजूनसुद्धा येत आहे. खरंच असे शेजारी प्रत्येकाला मिळावेत. या जगात एकमेकासाठी मदतीच्या विषयी धावणारी माणसं दादांच्या कुटुंबासारखी असावी. मी इथे नांदायला आल्यापासून दादा,  आत्या, दादांचा थोरला मुलगा आनंदा, त्याची बायको हौसा व दुसरी बायको, तानाजी व त्यांच्या बहिणी. आम्हाला किती मदत करतात याचे गणित कुणाला समजणार नाही. पावसाचा जोर वाढतच होता. फक्त विजा चमकाईच्या कमी झाल्या होत्या. पाणी पाणी शेतात व गावातसुद्धा झाले होते. इतका पाऊस मी नांदायला आल्यापासून कधीच पडला नव्हता. आभाळाला काय दुःख झाले असावे म्हणून असा हा रडतो. माणसाला दुःख होते तसे निसर्गाला सुद्धा दुःख होत असावे असे माझ्या मनाला सुद्धा वाटत होते, असे आजी सांगत होती. घड्याळात अंदाजे साडे आठ वाजून गेले असावे. पावसाची धार कमी नव्हती सगळीकडे अंधार पसरला होता. आमच्या घरामध्ये एक मिणमिणता दिवा व कंदील आता प्रकाश इतकाच मला दिसत होता. बाहेरून हाक मारली म्हातार बाई, पाऊस वाढला आहे .मी व दादा हातात कंदील घेऊन व डोक्यावर पोत्याची खोळ करून तुमच्याकडे आलो आहे, दरवाजा लवकर उघडा...।

.. आत्तीचा आवाज ऐकून मी दार उघडले आतीसोबत दादा होते. आमच्यासाठी भाकरी आमटी भात थोडे दूध लोणचे उडदाचे डांगर व दादांच्या हातामध्ये भरलेली पाण्याची कळशी होती. एवढ्या मोठ्या पावसातून ही मंडळी धावून आली आणि दादा म्हणाले, म्हातारबाई सर्वजण जेवायला बसा. पाऊस भयंकर वाढला आहे. तुम्हाला जेवायला घालतो. त्यावेळी दादांनी आमच्या कुटुंबाला जेवायला घातले. पाऊस पडतच होता. पावसाची धार कमी नव्हती सुनबाईचा ओढा पाण्याने धोधो वाहत होता. दादांच्या समोर आम्ही सर्वांनी जेवण केले. दादा व अति त्यांच्या घराकडे पावसातून निघून गेली. पाऊस चालू होता. आमच्या घरातील सर्व लोक जेवले. पण मी मात्र जागी होते. ज्वारीच्या पिकाला फुलकळी आली आहे, ही फुलकळी या पावसाने पूर्णपणे धुवून गेली आहे. आता या पिकात काय अर्थ आहे? या भागातील शेतकऱ्यांचे स्वप्न अपुरे राहिले एवढे मात्र निश्चित!  ज्वारीच्या ताटाला कणसे आहेत; पण फुलकळी नाही. फुल असेल तर फुलकळी आहे..परंतु या पावसामुळे फुलकळी पूर्णपणे धुवून गेली आहे. तीन दिवस पाऊस पडत होता. निसर्गाच्या लहरी मानव प्राण्याला कळत नाहीत एवढे मात्र निश्चित. सकाळपासून आमच्या शेतकरी राजाने कितीतरी मोठी भावना मनावर धरली असावी; पण या पावसामुळे सारी त्यांची अशा आता लोप पावली असावी. आजीचा विचार माझ्या लक्षात आला होता. पाऊस वाढत होता जेवण करून आम्ही झोपी गेलो आणि शांत झोप लागली..| - दत्तात्रय पांडुरंग मानुगडे 

 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

राज्यात गुटखाबंदी आहे का?